Speech Fasting Benefits : अनेकदा रोजच्या धावपळीपासून दूर गडबड-गोंधळ नसेल अशा ठिकाणी जाऊन शांतपणे बसण्याची इच्छा होते. कोणाशीही न बोलता गप्प राहावेसे वाटते. मौन ही आपल्या आरोग्यासाठी सर्वोत्तम गोष्ट मानली जाते. जास्त बोलल्याने लोकांना तुमचा त्रास होतोच आणि तुमची शारीरिक ऊर्जाही कमी होते. अनेकदा लोकांना काम करताना बोलायची सवय असते मग ते घरी असो किंवा ऑफिसमध्ये. कधी कधी खूप बोलणे म्हणजे मन भरकटवण्यासारखे असते, पण काही लोक असे असतात जे दिवसभर बोलत राहतात.
तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही दिवसभर गप्प राहिल्यास तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल? याच संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलचे सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शौनक अजिंक्य यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.
डॉ. शौनक अजिंक्य यांच्या मते, दिवसभर शांत राहण्याच्या या प्रक्रियेला स्पीच फास्टिंग असे म्हणतात. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रभाव पडत असतो.
स्पीच फास्टिंगचे फायदे
१) ताण, थकवा होतो कमी : स्पीच फास्टिंगमुळे तुमच्या व्होकल कॉर्ड्सना आराम मिळतो. त्यामुळे ताण आणि थकवा कमी होतो. विशेषत: ज्यांना कामनिमित्त सतत बोलावे लागते त्यांच्यासाठी ही फायदेशीर गोष्ट असते. एक दिवस शांत राहिल्याने कॉर्टिसोलसारख्या तणावाच्या हार्मोनमध्ये घट होऊ शकते आणि परिणामत: विश्रांती व चांगली झोप लागू शकते.
२) संवाद कौशल्य सुधारू शकता : शांत राहिल्याने आत्मनिरीक्षण करता येते आणि स्वत:बद्दल अधिक जाणून घेऊ शकता. तुम्ही इतरांचे अधिक लक्षपूर्वक ऐकता. त्यामुळे तुमच्या विचारात भर पडते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे संभाषण कौशल्य सुधारू शकता.
३) आध्यात्मिक जोडणी : अनेक धर्मांमध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये मौन ठेवण्यास खूप महत्त्व देण्यात आले आहे. शांत राहून तुम्ही तुमच्या अंतरंगाशी किंवा मनाशी एकरुप होऊ शकता.
दिवसभर शांत राहिल्याने तुमच्या शरीरात काय बदल दिसून येतात?
१) शारीरिक विश्रांती : दिवसभर शांत राहिल्याने शारीरिक विश्रांतीही मिळते. मग त्यामुळे तुमच्या व्होकल कॉर्ड्स, घशाचे स्नायू व अगदी चेहऱ्याच्या स्नायूंनाही आराम मिळतो. यादरम्यान नैसर्गिक पद्धतीने तुम्ही सखोल श्वास घेऊ शकता. त्यादरम्यान खूप शांत, मोकळे वाटते. संभाव्यतः रक्तदाब आणि हृदयाची गती कमी होते.
२) एकाग्रता वाढते : दिवसभर शांत राहिल्याने मनाची चंचलता कमी होऊन, तुमचे मन एखाद्या स्पष्ट असलेल्या विषयावर अधिक क्षमतेने केंद्रित करणे शक्य होते. त्यामुळे तुम्ही स्वत:सह इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकता. त्यामुळे कर्तव्यभावना वाढू शकते.
दिवसभर शांत राहणे कोणी टाळावे?
दिवसभर शांत राहणे अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकते; परंतु प्रत्येकासाठी हा उपाय योग्य नाही. डॉ. अजिंक्य यांनी काही अटींसह सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
१) व्होकल कॉर्ड डिसऑर्डर किंवा श्वासोच्छवासाच्या समस्या : स्पीच फास्टिंग आधीच व्होकल कॉर्डच्या समस्या किंवा श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या लोकांसाठी अपायकारक ठरू शकते.
२) मानसिक आरोग्यविषयक चिंता : चिंता, नैराश्यग्रस्त व्यक्ती, किंवा डिपोलर डिसऑर्डर असल्यास व्यक्ती यामुळे आधीच कोणाशी जास्त बोलत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी दिवसभर शांत राहणे धोक्याचे ठरू शकते.
३) नातेसंबंधांमध्ये गैरसमज आणि निराशा : स्पीच फास्टिंगमुळे काही वेळा नातेसंबंधांमध्ये गैरसमज आणि निराशा येऊ शकते. विशेषत: जर तुमच्या सभोवतालच्या लोकांना तुमचे हेतू माहीत नसतील.
४) लिहिणे किंवा शाब्दिक संकेत : काही परिस्थितींमध्ये लिहिणे किंवा शाब्दिक संकेत वापरणे आवश्यक असू शकते. तुमच्या वैयक्तिक परिस्थितीचा विचार करा आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.