मासिक पाळी येणे हे प्रत्येक मुलीला स्त्रीत्वाकडे नेणारे आणि म्हणूनच अपरिहार्यही. सृजनाशी जोडलेल्या या नैसर्गिक चक्राला अनेकदा जोड मिळते ती वेदनेची-पोटदुखीची. ऋतुप्राप्तीपासून रजोनिवृत्तीपर्यंत सोबत राहणारी ही वेदना म्हणजे नेमकं काय? काय आहेत त्यावरचे उपाय.

मागच्याच आठवडय़ात      १२ वर्षांच्या सुरभीला घेऊन तिची आई आली. सुरभी शाळेच्याच गणवेशात होती. डोळय़ांत अश्रूंनी गर्दी केलेली! आईने सुरुवात केली, ‘‘शाळेतून फोन आला, खूप पोटात दुखते आहे म्हणून घरी घेऊन जा. आज तिची परीक्षाही बुडाली. डॉक्टर, काही महिन्यांपूर्वीच तिची मासिक पाळी सुरू झाली आहे. दर वेळी पोटात दुखण्याचा हा तिचा त्रास मला अगदी बघवत नाही. खूप काळजी वाटते. डॉक्टर काही तरी करा.’’
मला वाटते, मासिक पाळी सुरू झाल्यानंतर ९० टक्के मुलींनी आणि त्यांच्या आयांनी हा त्रास अनुभवलेला आहे. असे होणे फारसे काळजीचे नसते. हे माहीत असूनही याची संभाव्य कारणमीमांसा व त्यावरील उपचार जाणून घेणे ही आज काळाची गरज आहे असे वाटते. मासिक पाळीच्या त्रासामुळे नियमित दिनक्रमापासून दूर राहणे आजच्या काळात कुणालाच आवडणारेही नाही हे तितकेच खरे.
नवीन लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत तर नवीच समस्या उद्भवते. अगदी काल-परवाचीच गोष्ट. विशी-पंचविशीतील एक तरुणी, सोबत नवरा आणि सासू! ही मुलगी पाळीच्या आधीच्या व नंतरच्याही कालावधीमध्ये सारखी पोट दुखते म्हणून झोपून असे. लग्नाला सात-आठ महिनेच झालेले होते. नुकते नवीन नातेसंबंध प्रस्थापित होण्याच्या या कालावधीत शारीरिक सहजधर्माने व्याधीचे रूप धारण केल्याने हा प्रश्न मानसिक अधिक आहे का, हा संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे, अशा वेळी त्या प्रश्नाची खरी कारणमीमांसा समजून घेणे गरजेचे ठरते.
सर्वसाधारण मध्यम वयात हे दुखणे नव्याने सुरू झाले तर मात्र डॉक्टरांकडून तपासून घेऊन, सल्लामसलत करवून नव्याने गर्भाशयात काही प्रश्न निर्माण झाले आहेत का, याचे निदान करणेदेखील तितकेच महत्त्वाचे. साधारण ३०-३५ च्या वयोगटांतील ही स्त्री-नोकरी, व्यवसाय, लहान मुले यांच्या साऱ्या आघाडय़ांवर दशभुजांनी लढत असते. साधारण कामामधून आराम मिळविण्यासाठी किंवा घरच्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मासिक पाळीच्या दुखण्याचा बहाणा पुढे करणे अशासारख्या गोष्टी तिच्या हातून सहसा घडतच नाहीत, कारण तिची आयुष्यातील प्राधान्ये बदललेली असतात. असे दुखणे नव्याने सुरू झाले तर तज्ज्ञ डॉक्टर तपासणी, सोनोग्राफीच्या माध्यमातून दुखण्याचे निदान करतात.
साधारण चाळिशीनंतर होणाऱ्या त्रासात पोटदुखीबरोबर रक्तस्रावाचे प्रमाण सर्वसाधारणपणे अधिक असू शकते. कामानिमित्त आज बाहेरगावी, बाहेरच्या देशांमध्ये जावे लागणाऱ्या स्त्रिया अशा शारीरिक तक्रारींनी बेजार होतात. कामाची वाढलेली जबाबदारी, दिवस-रात्रीचे झोपेचे बदलते चक्र, प्रचंड मानसिक ताण, जोडीला काही वेळा उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारखे आलेले जोडीदार, या साऱ्यांचा परिणाम निसर्गचक्रावर होतो. वाढत्या वयामुळे, रजोनिवृत्तीतील संप्रेरकांचे बदलले प्रमाण या साऱ्या तक्रारींना खतपाणी घालते.
या पोटदुखीची विविध कारणे समजून घेण्याआधी मासिक पाळीचे नसíगक चक्र कसे सुरू असते हे समजून घेऊ या. मासिक पाळीच्या कालावधीचे चक्रही मुलगी वयात आल्यानंतर तिच्या शरीरात संप्रेरकांच्या प्रभावाखाली निर्माण होणाऱ्या स्त्रीबीजनिर्मितीच्या नियमिततेवर अवलंबून असते. त्यासाठी हायपोथॅलमस               (Hypothalamus) ही मेंदूतील ग्रंथी पिच्युटरी (pituitary) अथवा मस्तिष्क ग्रंथीस प्रेरणा देते. पिच्युटरी ग्रंथीद्वारा निर्माण होणारे स्राव अंडाशयास बीजनिर्मितीसाठी चालना देतात. बीजनिर्मिती झाल्यावर अंडाशयातून निर्माण होणारी संप्रेरके गर्भाशयातील अंत:स्थ त्वचेवर परिणाम घडवितात. पर्यायाने ही अंत:स्थ त्वचा वाढायला लागते. गर्भधारणा न झाल्यास संप्रेरकांचा प्रभाव कमी होऊन कात टाकल्याप्रमाणे ही अंत:स्थ त्वचा शरीराच्या बाहेर फेकून दिली जाते. या चक्रात नियमितता असेल तर हे चक्र नियमितपणे सुरू राहते. (म्हणजेच यांत देवाधर्माचा शिवाशिवीचा प्रश्न उद्भवत नाही. मल-मूत्राप्रमाणेच हा एक निसर्गधर्म आहे. हे ओघाने आलेच.)
सर्वसाधारणपणे ज्या चक्रात बीजनिर्मिती होते. (ovulatory cycle) त्या चक्रात मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखते असे मानले जाते. या दुखण्याची जातकुळीदेखील वेगवेगळी असते. काही वेळा अत्यंत तीव्र (sharp) अखंड दुखणे राहते, तर काही वेळा थोडय़ा थोडय़ा वेळाने पोटात कळा येणे, पोटात आग पडल्याप्रमाणे दुखणे, त्याच्या जोडीला शौचाची भावना होणे अशा तक्रारी संभवू शकतात. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या पोटदुखीचे वर्णन अथवा वर्गीकरण (classification) दोन प्रकारांनी करता येते.
क) तीव्रतेनुसार  
* कमी तीव्रता- फक्त मासिक पाळीच्या पहिल्या दिवशीच दुखते. नित्य दिनक्रमात व्यत्यय येत नाही.
* मध्यम तीव्रता- दुखणे दोन ते तीन दिवसांपर्यंत चालू राहते. त्याच्या जोडीला थकवा, डोकेदुखी, जुलाब हेही त्रास उद्भवतात.
* तीव्र- अत्यंत तीव्र दुखणे. याची तीव्रता ३ ते ७ दिवसांपर्यंत राहते. त्यामुळे नित्य दिनक्रमात अनेकदा व्यत्यय येतो.
सर्वसाधारणपणे आत्यंतिक मानसिक ताण जो कुठल्याही कारणामुळे आलेला असो, त्यामुळे सहनशक्ती कमी होते. त्याची परिणती त्रास वाढण्यात होऊ शकते.
 ख) कुठल्याही कारणामुळे निर्माण होणारी वेदना-
१) प्राथमिक (primary) कारणे :  सर्वसाधारणपणे    
नुकत्या वयात आलेल्या लहान मुली, तरुणी यांच्यामध्ये गर्भाशयात / अथवा जननसंस्थेत इतर कुठलाही दोष नसतानाही मासिक पाळीच्या कालावधीत वेदना होतात.
साधारणपणे-
अ) मासिक पाळीतील बीजनिर्मिती सुरू झाल्यापासून ६ महिने ते २ वर्षे काळापर्यंत हा त्रास सुरू राहू शकतो.
ब)पाळी सुरू झाल्यावर वेदना सुरू होतात व १ ते २ दिवस सुरू राहतात.
क) जर लहान वयात मासिक पाळी सुरू झाली तर हा त्रास अधिक होतो, असे आढळून आले आहे.
२) दुय्यम (secondary) कारणे :
  साधारणपणे मासिक पाळी सुरू होण्याच्या अनेक दिवस आधी हा त्रास सुरू होतो आणि काही वेळा पाळीचे सर्व दिवस हा त्रास होत राहतो. बऱ्याच वेळा फायब्रोइड्स, इंडोमेट्रिओसिस, रोगजंतूंचा प्रादुर्भाव, जन्मजात गर्भाशयातील रचनात्मक दोष अशा काही कारणांमुळेही असा त्रास उद्भवतो. अनेक वेळा या वेदनांबरोबर चक्कर येणे, अचानक घाम येऊन घेरी येणे व तोल जाणे, अनेक वेळा शौचास जावे लागणे, स्तन जड होणे, चिडचिड होणे, डोकेदुखी, थकवा इत्यादी लक्षणे जाणवू शकतात. या वेदना ओटीपोट, मांडय़ा व नितंबाच्या भागाकडे जाणवू शकतात.
ch11
स्त्रीरोगशास्त्राच्या एका पुस्तकात पूर्वी एक फार गमतीशीर वाक्य होते, ‘ज्या मुलींच्या आईला मासिक पाळीच्या वेळी पोट दुखते, त्या मुलींनाही ही पोटदुखी निश्चितच जाणवते.’ अर्थात याचा संबंध आनुवंशिकतेशी नसून मानसिकतेची जुडलेला आहे हे सांगणे न लगे !
शंभरामध्ये नव्वद वेळा हे दुखणे कुठल्याही मोठय़ा कारणामुळे नसताना त्याचा फार मोठा बाऊ केला जातो. किंबहुना मानसिक दुर्बलता, प्रचंड मानसिक ताण- दडपण या साऱ्यांच्या परिणामस्वरूप हा त्रास उद्भवतो व वाढतो. गर्भाशयामध्ये प्रोस्टॅगलॅण्डइन (prostaglandin) नावाचे स्राव मासिक पाळीच्या वेळी निर्माण होतात. गर्भाशयाच्या स्नायूंना आकुंचन पावण्याची प्रेरणा यामुळे मिळते. त्यामुळेच तर गर्भाशयातील वाढलेला स्तर गर्भाशय मुख व योनिमार्गातून बाहेर फेकून देण्यास मदत होते. रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकुंचन पावल्यामुळे गर्भाशयाच्या स्नायूस रक्तपुरवठा तात्पुरता कमी होतो. म्हणून या वेदना अनुभवास येतात. वैद्यकीय कारणमीमांसा समजून घेतल्यावर हा सर्व त्रास कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
सर्वात महत्त्वाचे आहे ते समुपदेशन व धीर. अनेक प्रकरणांमध्ये, हा धीर आईकडेच नसतो, त्यामुळे ती तो मुलीला कुठून आणून देणार हेच महत्त्वाचे!  विविध वयातील पाळीच्या वेळी होणाऱ्या पोटदुखीच्या त्रासाची कारणे जरी वेगवेगळी असली, तरी एका समान धाग्याने उपचार पद्धतीच्या काही समान तत्त्वाची गुंफण आपण निश्चितच करू शकतो.
  उदाहरणार्थ –
  १)   शारीरिक पातळीवर घेण्याची काळजी
  अ) पुरेशी विश्रांती
  ब) पुरेसा, वेळेवर घेतलेला, योग्य तो पौष्टिक आहार
  क) नियमित योगासने, इतर कुठलेही व्यायाम प्रकार
   ड) वेदनाशामक औषधे व जीवनसत्त्वे यांचा मर्यादित वापर
२)  मानसिक पातळी  – आपल्यावरील ताणाचे व्यवस्थापन (इतर व्यवस्थापकीय कौशल्यांप्रमाणे करणे) माझ्यासाठी जगाने बदलावे यापेक्षा मीच बदलणे सोयीस्कर आहे, ही वृत्ती स्वीकारायला वेळ लागू शकतो.
३) भावनिक पातळी –  आपल्या असंतुलित भावनांचा परिणाम हायपोथॅलॅमस या मेंदूतील ग्रंथीवर होतो. ही ग्रंथी पीयूषिका अथवा पिच्युटरी ग्रंथीतून निघणाऱ्या संप्रेरकांचे नियंत्रण करते. त्यामुळेच मासिक पाळीचे चक्र नियमित राहते. भावना नीट हाताळता आल्यास दुखण्याचे नियोजनही व्यवस्थित करता येते.
४)  आध्यात्मिक – याचा अर्थ ‘अधि  + आत्म’ असा घ्यायचा आहे. याचा अर्थ स्वत:चा नीट अभ्यास करायचा आहे. स्वत:चीच शाळा घ्यायची आहे. आपल्यातील त्रुटी, उणिवा, अहंकार काढून टाकायचे आहेत. यासाठी स्वत:ची साधना वाढवायची आहे.
आपली जीवनशैली, व्यायाम, आहार, झोप, मानसिकता या साऱ्यांचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आपल्याला कळत नाही असे नाही, परंतु त्यात आवश्यक ते बदल घडवून आणण्यासाठी लागणारी मनोवृत्ती, वेळेचे नियोजन, आमची प्राधान्यता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अगदी लहानपणापासून खेळांना प्राधान्य न देता क्लासेसमध्ये जाण्या-येण्यात वेळ घालविणे अधिक महत्त्वाचे वाटत असेल तर नीट विचार करावा. नियमित सूर्यनमस्कार, योगासने केल्याने शरीर लवचीक बनते, आपल्या स्नायू, मज्जासंस्था, अंत:स्रावी ग्रंथी यासर्वामध्ये एक समतोल साधता येऊ शकतो. गर्भाशयाभोवती होणारा अनावश्यक रक्तसंचय टाळता येऊ शकतो. आसनांच्या नियमित सरावाने मन शांत राहू शकते. दुखणे सहन करण्याची शारीरिक, मानसिक क्षमता वाढते. वेदनाशामक औषधांच्या मात्रेचे प्रमाण निश्चितपणे कमी करता येऊ शकते, हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.
नियमित प्राणायाम साधना म्हणजे मनावर नियंत्रण आणण्याचे प्रभावी शस्त्र आणि शास्त्र दीर्घश्वसन, अनुलोम-विलोम, भ्रामरी, चंद्रभेदन यांच्या सरावाने दुखण्याची तीव्रता कमी होऊ शकते. भावनांवर नियंत्रण आणण्यासाठी उपयुक्त ठरणारी साधना म्हणजे ओम्काराचे उच्चारण, मंत्र, जप, भक्तियोग इत्यादी. औषधे ज्याप्रमाणे बाह्य़ शरीरावर काम करतात, त्याप्रमाणे मंत्र मनावर काम करतात.
पीसीओडी (PCOD)- म्हणजेच स्त्रीबीजनिर्मितीच्या क्षमतेत अडथळा. आजच्या प्रचंड व्यग्र तरुणींना भेडसावणाऱ्या या प्रश्नाचे प्रमाण खूप वाढले आहे. पूर्वी याचं प्रमाण अत्यल्प होतं, ते आता जवळपास शंभरात पंचवीस तरुणींपर्यंत येऊन पोचलं आहे. शारीरिक अस्वास्थ्याच्या खाईत लोटणाऱ्या या प्रश्नाने सध्या धुमाकूळ घातला आहे. भावी पिढीत लहान वयात सुरू होणारे उच्च रक्तदाब, मधुमेह यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी साधनेला पर्याय दिसत नाही. नियमित योगसाधनेने या साऱ्यावर मात करता येऊ शकते. आपली पुढची पिढी सावरायची असल्यास याचा आत्ताच गांभीर्याने विचार व्हायला हवा.
नियमित साधनेने रक्तातील इंडोर्फिन्स (Endorphins ) या नैसíगक वेदनाशामक घटकांचे प्रमाणही वाढते, हे सिद्ध झाले आहे. वाढते वजन हे देखील वेदनांना जबाबदार असते, असे आज मानण्यात येऊ लागले आहे. अपुरी झोप शरीरातील संप्रेरकांच्या असंतुलनास जबाबदार असते, हेही संशोधनाने सिद्ध झाले आहे.
 प्रश्न म्हटला तर आहे साधाच! उत्तरही आधीच निसर्गानेच दिले आहे! गरज आहे ते जाणून, समजून घेण्याची, आणि त्या दृष्टीने नैसíगक, ताणविरहित जीवनशैली आत्मसात करण्याची !    

what is heatwave in marathi
विश्लेषण: वाढत्या तापमानाचा तडाखा किती तीव्र? उष्माघात प्राणघातक कसा ठरतो?
control blood sugar
रक्तशर्करेच्या नियंत्रणासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा

डॉ. उल्का नातू यांचा ‘कळा ज्या लागल्या शरीरा’ हा लेख कोणत्याही वयातील डिस्मेनोरिया अर्थात सर्व वयोगटातील पाळीतील पोटदुखीविषयी आहे.