शुभदा साने

लेखनक्षेत्रातले खाचखळगे दाखवून देत एकदा मला दादांनी विचारलं, ‘‘लेखन हे एक प्रकारचं आव्हानच आहे. ते तुला पेलता येईल का? टीका ही होणारच. त्याला तुला समर्थपणे तोंड देता येईल का? भरभरून चांगलं कुणीच म्हणत नसतं. ते सुख एखाद्याच्याच वाटय़ाला येतं. आपण सातत्यानं लिहीत राहिलं पाहिजे. मध्यमवर्गीयांचा लेखक असा आमच्यावर नाही का शिक्का बसला? माझ्या कथा-कादंबऱ्यांमध्ये मध्यमवर्गीयांच्या सुख-दु:खाचं प्रतिबिंब पडलेलं आढळतं. पण त्या सुख-दु:खांनासुद्धा कितीतरी कंगोरे, पापुद्रे असतात. त्यांची उकल मी व्यवस्थित करतो असं मला वाटतं. मी जे अनुभवतो, जे बघतो तेच लिहितो. ‘फाइव्ह स्टार’ संस्कृतीचं वर्णन मी कधी करत नाही तसंच झोपडपट्टीतलं वर्णनही माझ्या लेखनात नसतं, कारण त्या दोन्ही संस्कृती मला पूर्णपणे अपरिचित आहेत.’’ ‘आनंदी-गोपाळ’, ‘रघुनाथाची बखर’ आदी कादंबऱ्यांचे लेखक श्री. ज. जोशी यांच्या ‘आभाळमाये’विषयी सांगताहेत त्यांच्या कन्या शुभदा .

‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्याचा बराच गाजावाजा झाला, चर्चाही झाली. अर्थात तो विषयही तसाच जबरदस्त आहे. ‘आनंदी गोपाळ’ ही कादंबरी वाचकांना खिळवून ठेवणारीच आहे. या कादंबरीचं हस्तलिखित वाचत असताना माझी जी मन:स्थिती झाली होती ती मला अगदी आत्ताही आठवतेय.. मी त्या वेळी परकाया प्रवेश करायला शिकले. कधी लहानगी नऊ वर्षांची यमू.. कधी आनंदी.. कधी गोपाळराव.. एखाद्या क्षणी आनंदीचे आई-वडील, मधूनच कार्पेटर मावशी.. अशा निरनिराळ्या भूमिका करण्याचा मजेदार खेळ माझं मन त्या वेळी खेळत होतं..

कादंबरीचं हस्तलिखित मला वाचायला मिळालं होतं, कारण कादंबरीचे लेखक श्री. ज. जोशी माझे वडील! आम्ही दादा म्हणायचो त्यांना. आज ‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाच्या निमित्तानं मन भूतकाळात गेलंय. आठवणींची सुवासिक फुलं मनाच्या अंगणात ओघळलीयत. थोडं दूर असलेलं इवलं फूल मला आत्ता खुणावतंय, जवळ बोलावतंय. मला माझा शाळेचा पहिला दिवस आठवतोय. दादाच मला पोचवायला आले होते. त्या वेळी वर्गात सगळा गोंधळच होता. मुलं रडत होती. आई-वडिलांना सोडत नव्हती. आई-वडील मुलांची समजूत काढत होते, त्यांना थोपटत होते. ते सगळं दृश्य बघून मी तर गांगरूनच गेले. नवं दप्तर हातात धरून नुसतीच उभी राहिले; पण त्या अवस्थेत थांबायला दादांना जास्त वेळ नव्हता. त्यांना कामाला जायचं होते. त्यामुळे ते मला म्हणाले, ‘‘ती बघ तिथे रिकामी जागा दिसतेय. त्या कडेच्या रांगेत दुसऱ्या बाकावर ठेव तिथे दप्तर..’’ मी दप्तर तिथं ठेवलं. दादांनी ते बघितलं आणि म्हणाले, ‘‘मी जातो.’’ आणि दादा निघून गेले. त्यांनी काही मला थोपटलं वगैरे नाही. त्या वेळी ते जरा खटकलं; पण आता वाटतंय दादा ‘शो’ करण्यातले नव्हते हेच खरं! याचं उत्तम उदाहरण म्हणजे मला किंवा भावाला (विश्वास जोशी) बाहेरून यायला उशीर झाला, की ते अस्वस्थ व्हायचे. बाहेरच्या फाटकात उभे राहायचे; पण आम्हाला लांबून येताना बघून मात्र पटकन घरात जायचे. स्वत:ला वाटलेली काळजी आमच्यापासून लपवायचे.

त्या पहिल्या दिवसाची अजून एक मजेशीर आठवण आहे. त्या दिवशी मधल्या सुट्टीत सगळी मुलं आपापले डबे घेऊन वर्गाबाहेर आली. मीही आले. माझी कुणाशीच ओळख झालेली नव्हती. त्यामुळे मी एकटीच एका झाडाखाली बसले आणि डबा खाल्ला आणि परत वर्गात जायच्या वेळी आपण कुठल्या वर्गात बसलो होतो तेच मला आठवेना – सगळे वर्ग सारखेच दिसायला लागले. तेवढय़ात मधली सुट्टी संपल्याची घंटा झाली. मी मग कुठल्या तरी एका वर्गात जाऊन बसले. तो शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे वर्गशिक्षकांनाही सगळी मुलं नवीनच होती. त्यामुळे त्यांच्याही काही लक्षात आलं नाही. शाळा सुटेपर्यंत मी त्याच वर्गात बसले. माझं दप्तर माझ्याजवळ नव्हतंच.. आमचं घर शाळेपासून जवळ होतं. कुठे क्रॉसही करायला लागत नव्हतं. त्यामुळे शाळा सुटल्यावर मी एकटी घरी येईन, असं सांगितलं होतं. सांगितल्याप्रमाणे मी घरी गेले. आई-दादा बाहेरच्या खोलीत बसले होते. दादा नुकतेच ऑफिसमधून आले होते. मला आलेली बघितल्यावर आई म्हणाली, ‘‘आलीस का! हातपाय धू.. खायला देते..’’ आणि मग तिच्या एकदम लक्षात आलं. तिनं विचारलं, ‘‘अगं, दप्तर कुठे आहे तुझं?’’ मी थोडा विचार केला आणि सांगायला लागले..

‘‘आई! अगं, मी शाळेतून निघाले आणि घोले रोडवरून येताना एका घोडय़ानं मला धक्का मारला. मी खाली पडले. माझं दप्तर लांब उडून पडलं. तेवढय़ात समोरून एक माणूस आला. त्याचं तोंड लाल होतं आणि नाक पिवळं होतं.. त्यानं माझं दप्तर उचललं आणि तो घाईनं पळून गेला. ‘माझं दप्तर – माझं दप्तर’ मी ओरडत होते; पण तो जोरात पळून गेला..’’ माझं बोलणं ऐकून आई म्हणाली, ‘‘काही तरीच तुझं बोलणं! म्हणे लाल तोंडाचा, पिवळ्या नाकाचा माणूस आला आणि दप्तर घेऊन गेला – जरा पटेल असं तरी बोलावं!’’ आई असं म्हणाली; पण तिचं बोलणं मध्येच थांबवत दादा म्हणाले, ‘‘आई काहीही म्हणू दे! पण तुझं हे कथाकथन मला खूप आवडलं हं!’’

मी जे सांगितलं त्यात काहीही तथ्य नाही हे लक्षात येऊनही तिकडे दुर्लक्ष करून दादांनी माझ्या सांगण्याच्या पद्धतीवरच लक्ष केंद्रित केलं आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी ते म्हणाले, ‘‘तुझं कथाकथन मला खूप आवडलं हं!’’ तेव्हापर्यंत माझी कथाकथनाशी फारशी ओळखही नव्हती. कथाकथन म्हणजे गोष्ट सांगणं एवढंच मला माहीत होतं. दादांचा अभिप्राय ऐकून मला वाटलं आपल्याला गोष्ट चांगली सांगता येतेय. त्यानंतर चौथीत असताना मी कथाकथनाच्या स्पर्धेत भाग घेतला. आपल्याला बक्षीस मिळेलच असं मला वाटत होते – कारण दादांनीच सर्टिफिकेट दिलं होते; पण बक्षीस मिळालं नाही – मी थोडी नाराज झाले. घरी येऊन रडतच आई-दादांना निकाल सांगितला, तेव्हा दादा म्हणाले, ‘‘कुठल्याही स्पर्धेत उतरताना आपण शंभर टक्के तयारी करून जायचं – यश मिळावं, ही अपेक्षा ठेवायची; पण नाही मिळालं तर खचून मात्र जायचं नाही. कदाचित तू सांगितलेली गोष्ट अगदीच सगळ्यांना माहीत असलेली असेल. इतर मुलांनी जरा वेगळ्या गोष्टी सांगितल्या असतील. पुढच्या वेळी कथाकथनाच्या स्पर्धेत भाग घेताना जास्त चांगली कथा निवड.. त्यासाठी वाचन आवश्यक आहे.’’ या प्रसंगानंतर काही दिवसांनी आई-दादा बाहेर जायला निघाले. काही कामासाठी. मी आणि विश्वास घरीच थांबणार होतो आजोबांजवळ. ‘‘आम्हाला यायला उशीर होईल,’’ बाहेर पडता पडता आई म्हणाली. मी विचारलं, ‘‘आमच्यासाठी काय आणणार येताना?’’ आई-दादांना त्या दिवशी घरी यायला उशीर झाला. आल्या आल्या दादांनी माझ्या हातात गोष्टीचं एक पुस्तक ठेवलं. आई म्हणाली, ‘‘हा तुमच्यासाठी खाऊ! गोळ्या, चॉकलेटं, बिस्किटं दोनचार दिवसांत संपून जातात.. पण या खाऊचं तसं नाही – हा नेहमी तुमच्याजवळच राहील.’’ दादा म्हणाले, ‘‘या पुस्तकातल्या गोष्टी वेगळ्या तर आहेतच, पण काही तरी शिकवण देणाऱ्याही आहेत.. आता कथाकथनाच्या स्पर्धेत यातली एखादी कथा तुला सांगता येईल..’’

नंतर काही दिवसांनी माझा वाढदिवस आला. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आमच्याकडे पोस्टानं ‘चांदोबा’चा अंक आला. तो पाहून मला प्रचंड आनंद झाला. कारण ‘चांदोबा’ मला अतिशय आवडायचा. त्यातल्या वेताळाच्या गोष्टी, सिंदबादच्या सफरी वाचताना मला तहानभुकेची शुद्ध राहायची नाही. शेजारच्या बेबीकडे तो यायचा. तिचा वाचून झाला की ती मला तो द्यायची. असा आवडता ‘चांदोबा’ घरी आलेला बघून माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. दादा म्हणाले, ‘‘पत्त्यावर तुझंच नाव आहे ना बघ.. नाही तर दुसऱ्या कुणाचा तरी अंक चुकून आपल्याकडे आलेला असायचा.’’ मी नाव बघितलं – माझंच नाव होतं. मग दादा नेहमीप्रमाणे हसले आणि म्हणाले, ‘‘अगं, मीच ‘चांदोबा’ची वर्गणी भरलीय तुझ्यासाठी – उद्या तुझा वाढदिवस आहे ना – वाढदिवसाची तुला भेट!’’ दादांनी दिलेली ही भेट मला खूपच आवडली. अशा काही प्रसंगांमुळे माझ्या आणि विश्वासच्या मनात वाचनाची आवड निर्माण होत गेली. शाळेत असताना मला कविता करायला खूप आवडायच्या. कुठलाही एक विषय मी निवडायची आणि कविता करून टाकायची. कवितेचे कागद मी माझ्या कपाटात ठेवून द्यायची – थोडे अस्ताव्यस्त – एके दिवशी दादांनी मला एक वही आणून दिली. म्हणाले, ‘‘या वहीत तू तुझ्या कविता लिहित जा. सुट्टे कागद कुठे तरी हरवून जातील. वेळ मिळेल तेव्हा त्या कागदांवरच्या कविता या वहीत उतरवून काढ. दादांचं म्हणणं मला पटलं. नंतर मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही मुंबईला जायला निघालो. मी माझं सामान बॅगेत भरत होते. तेव्हा तिथे येऊन दादा म्हणाले, ‘‘तुझी कवितांची वही घे बरोबर. जमलं तर आपण शांताबाई शेळके यांना भेटायला जाऊ. त्यांना तुझ्या कविता दाखवू!’’ दादांचं बोलणं ऐकून मला आनंद तर झालाच, पण थोडं टेंशनही आलं. शांताबाईंसारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवयित्रीला आपल्या कविता दाखवायच्या म्हणजे.. पण शांताबाईंना भेटल्यावर मात्र माझा तो ताण एकदम कमी झाला. त्या खूपच आपुलकीनं बोलल्या माझ्याशी. माझी प्रत्येक कविता त्यांनी मनापासून वाचली. काही कवितांचं त्यांनी कौतुक केलं. काही कवितातल्या चुका दाखवल्या. ‘प्रसिद्धीच्या पाठीमागे लागू नको.. सतत लिहीत रहा..’ हा सल्ला मला दिला. योग्य वेळी दादा मला शांताबाईंकडे घेऊन गेले म्हणून किती बरं झालं. आपल्या मुलीला काय हवं आहे हे त्यांनी बरोबर ओळखले.. शांताबाईंनी माझ्या ‘सावल्या’ या कवितेचं कौतुक केलं होतं,  तीच कविता मी ‘साधना’ अंकातर्फे जाहीर झालेल्या काव्यस्पर्धेसाठी पाठवून दिली. त्या कवितेला कुमार गटाचं पहिलं बक्षीस मिळालं.

बक्षीस समारंभाच्या दिवशी परगावी गेलेले दादा अचानक पुण्याला परत आले. म्हणाले, ‘‘आज तुझा बक्षीस समारंभ आहे ना? म्हणून मी एक दिवस लवकर परत आलो.’’ ही आभाळमाया बघून माझं मन भरून आलं.. असाच अनुभव मला मी आकाशवाणीच्या ‘बालोद्यान’ कार्यक्रमात काव्यवाचन केलं होतं तेव्हा आला. कार्यक्रम ‘लाइव्ह’ होता. आई माझ्याबरोबर आली होती. कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो. दादा घरात असतील अशी माझी अपेक्षाच नव्हती. कारण ती त्यांची बाहेर जायची, जुन्या मित्रांना भेटायची वेळ होती. ती वेळ दादा कधी चुकवायचे नाहीत. त्यामुळे दादा घरात नसणारच असंच मला वाटत होतं; पण दादा घरातच होते. त्यांनी मला शाबासकी दिली. म्हणाले, ‘‘ऐकला तुझा कार्यक्रम – छान झालं सादरीकरण.’’ – दादांचं बोलणं ऐकून मी सुखावले. दोनचार मिनिटं अशीच गेली. मग दादा म्हणाले, ‘‘पुढच्या वेळी कविता वाचताना काही गोष्टी लक्षात ठेव – आज कविता वाचताना तुझी जरा घाई झाली. पुन्हा तशी घाई करू नकोस – सावकाश वाच – एकेक ओळ दोन वेळा वाचली की जास्त परिणाम साधला जातो. त्यासाठी मोठमोठय़ा कवींचे काव्यवाचनाचे कार्यक्रम ऐकायला हवेत.. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट यांचं काव्यवाचन ऐकायला तुला एकदा मी घेऊन जाईन..’’ त्याप्रमाणे नंतर ते घेऊनही गेले.. असेच छोटेमोठे प्रसंग.. पण या प्रसंगातून मला लपेटून राहिलेली आभाळमाया मला नेहमीच जाणवत आलीय.

दादा आमच्याशी नेहमीच मित्रत्वाच्या – बरोबरीच्या नात्यानं वागायचे. त्यांची भीती आम्हाला कधीच वाटायची नाही. परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून ते कधीच फारसे रागवायचे नाहीत. त्यांचं एक मत होतं. ते म्हणायचे, ‘‘प्रत्येक माणसाची ठरावीक क्षमता असते. ती त्याला ओलांडता येत नाही. एखाद्या ५० टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनं कितीही अभ्यास केला तरी त्याला ८० टक्के मिळवता येणार नाहीत.’’ दादांच्या स्वभावातला आणखी एक पैलू म्हणजे स्वत:चं सामान्यपण त्यांनी कधीही लपवलं नाही! काही लोक म्हणतात, आम्हाला बुद्धी असून शिकायची संधी मिळाली नाही. काही लोकांचं मत असतं, आम्ही प्रयत्न करत नाही. प्रयत्न केला तर काय वाटेल ते जमेल! काही लोकांना वाटत असतं आमच्यात ‘स्पार्क’ आहे, पण तो लोकांना दिसत नाही! पण दादांनी मात्र त्यांच्या लेखनातून खुल्लमखुल्ला सांगून टाकलं.. ‘हो! मी एक सामान्य आहे!’ स्वत:चा नसलेला मोठेपणा लोकांना सांगण्यापेक्षा स्वत:चं असलेलं सामान्यपण कबूल करण्यातच मनाचा मोठेपणा आहे, असं मला वाटतं.

दादांनी कधीही स्वत:ची मतं आमच्यावर लादली नाहीत. याला एक अपवाद मात्र आहे. मी कुठला विषय घेऊन बी.ए. व्हावं यावर आमच्या घरात जोरदार चर्चा झाली. मी म्हणत होते, ‘‘मी मराठी घेऊन बी.ए. होते.’’ मला मराठीची आवडही खूप होती. काहीतरी लिहावं असं वाटायचं. म्हणूनच मला वाटत होतं मराठी घेऊन बी.ए. व्हावं. पण दादांनी माझं मत खोडून काढलं. त्यांनी मला अर्थशास्त्र घ्यायला लावलं. ते म्हणाले, ‘‘मराठीचं वाचन काय कधीही होतंच – मराठी आपल्या घरात आहेच! पण अर्थशास्त्र तू मुद्दाम थोडंच वाचणार आहेस?’’ थोडय़ा नाइलाजानंच मी अर्थशास्त्र घेतलं. पण आता वाटतंय झालं ते बरंच झालं.. तेव्हा अर्थशास्त्राची ओळख झाली. नेहमीच्या जीवनात तेच उपयोगी पडतं.

दादा अत्यंत पारदर्शक, अस्सल पुणेरी जातिवंत गप्पिष्ट होते. मोठमोठे लेखकसुद्धा आमच्या घरी दादांच्या गप्पा ऐकायला यायचे. एखाद्या दिवशी एखादा नवोदित लेखक पण यायचा. एकदा असेच एक नवोदित लेखक आले होते. स्वत:च्या एका कथेबद्दल दादांना सांगत होते. दादाही त्यांचं बोलणं मन लावून ऐकत होते. ते गेल्यावर आई म्हणाली, ‘‘अहो, आज आपल्याला बाहेर जायचंय ना? मग जरा आटोपतं घ्यायचं की!’’ दादा म्हणाले, ‘‘ते किती आशेनं आले होते इथे. आम्हीसुद्धा कधीतरी नवोदित होतोच की! ते दिवस मला आठवले..’’ दादांच्या त्या एका वाक्यात केवढा अर्थ साठलेला होता.

मी आणि विश्वास – आमच्या दोघांची सर्व हौसमौज त्यांनी कुवतीबाहेर केली. किंबहुना अंथरुण पाहून पाय पसरावे असा त्यांचा  स्वभावच नव्हता. दूरच्या भविष्याचा विचार करण्यापेक्षा ते वर्तमानातच रमत. ‘महिना अखेर’ हा कारकुनी जीवनातील कळीचा शब्द आम्हाला फक्त शब्द म्हणूनच माहीत होता. त्याची झळ आम्हाला कधीच लागली नाही. जीवनाचा आणि साहित्याचा रसिकतेनं आस्वाद घ्यायला दादांनी आम्हाला शिकवलं. त्यांनी आम्हाला दिलेली ही अमूल्य ठेवच आहे.

त्यांच्या साहित्याचा वारसा थोडय़ा प्रमाणात का होईना पण माझ्याकडे आलाय याचा मला अभिमान आहे. पहिली कथा तर मी शाळेत असतानाच लिहिली. पण ती प्रसिद्धीला मात्र कुठे दिली नाही. प्रसिद्ध होण्यासारखी ती नव्हतीच. महाविद्यालयामध्ये गेल्यावर मला लघुत्तम कथा लिहाव्याशा वाटायला लागल्या. कमी शब्दात सगळं कथानक बसवायचं. मला त्याचंच आकर्षण वाटायला लागलं. मी तीन/ चार कथा लिहिल्या. त्या अशाच कुठे कुठे प्रसिद्धही झाल्या. एक कथा तर ‘सत्यकथा’मध्ये छापून आली. ‘सत्यकथे’तली कथा वाचून दादा आपलं कौतुक करतील असं मला वाटलं होतं त्याप्रमाणे त्यांनी कौतुक केलं. पण नंतर लेखनक्षेत्रातले खाचखळगे दाखवून दिले. ‘‘हे एक प्रकारचं आव्हानच आहे – ते तुला पेलता येईल का?’’ त्यांनी विचारलं. ते म्हणाले, ‘‘टीका ही होणारच! त्या टीकेला तुला समर्थपणे तोंड देता येईल का? भरभरून चांगलं कुणीच म्हणत नसतं. ते सुख एखाद्याच्याच वाटय़ाला येतं. आपण सातत्यानं लिहीत राहिलं पाहिजे. तू विचार कर म्हणून म्हणतो हे एक प्रकारचं आव्हान आहे.’’

दादांनी असं म्हटल्यावर मी त्यांच्याकडे बघतच राहिले. माझा हळवा स्वभाव ओळखूनच त्यांनी मला ही सगळी कल्पना दिली होती. ती केवळ माझ्यावरच्या मायेपोटीच. दादांच्या डोळ्यातूनच मला त्यांच्या भावना कळत होत्या. दोन-चार मिनिटं अशीच सरकली. नंतर ते म्हणाले, ‘‘मध्यमवर्गीयांचा लेखक असा आमच्यावर नाही का शिक्का बसला? पण मला त्याचं काही वाटत नाही. माझ्या कथा-कादंबऱ्यांमध्ये मध्यमवर्गीयांच्या सुख-दु:खाचं प्रतिबिंब पडलेलं आढळतं. पण त्या सुख-दु:खांनासुद्धा कितीतरी कंगोरे, पापुद्रे असतात. त्यांची उकल मी व्यवस्थित करतो असं मला वाटतं. साग्ांण्याचा हेतू एवढाच की मनाचा तोल बिघडू देऊ नये’’ एवढं बोलून दादा किंचित थांबले. मग म्हणाले, ‘‘मी जे अनुभवतो – जे बघतो तेच लिहितो. ‘फाइव्ह स्टार’ संस्कृतीचं वर्णन मी कधी करत नाही तसंच झोपडपट्टीतलं वर्णनही माझ्या लेखनात नसतं, कारण त्या दोन्ही संस्कृती मला पूर्णपणे अपरिचित आहेत.’’ दादा त्या दिवशी असं बरंच बोलले माझ्याशी. त्यांचं बोलणं मला पटत होतं.

ते ऐकून मला एकदम त्यांच्या ‘कारकुनीतील बत्तीस वर्ष’ या लेखाची आठवण झाली. एका दर्जेदार वृत्तपत्रात तो प्रसिद्ध झाला होता. नोकरीत आलेल्या बऱ्या-वाईट अनुभवांचं प्रतिबिंब त्यात ठळकपणे पडलेलं होतं. आणि दादांनी त्याचं खुसखुशीतपणे वर्णन केलं हेतं. तो लेख वाचून सुप्रसिद्ध साहित्यिक वि. ग. कानिटकर दादांना म्हणाले, ‘‘तुमचा ‘कारकुनीतील बत्तीस वर्ष’ हा लेख वाचला. छान जमलाय. पण मला कळत नाही आठ तास ऑफिसमध्ये इतकं काम केल्यावर घरी आल्यानंतर थोडय़ाच वेळात तुम्हाला लिहायची स्फूर्ती कशी येते? हे कसं काय बुवा तुम्ही जमवता?’’ दादा म्हणाले, ‘‘ऑफिसमध्ये काम करताना मी खर्डेघाशी करणारा कारकून असतो. तिथून बाहेर पडल्यावर मी संसारी गृहस्थ होतो. आणि घरी गेल्यावर बायकोनं दिलेला चहा पिताना माझ्यातला लेखक जागा होतो. थोडक्यात काय, की वेगवेगळ्या भूमिका वठवण्याचं कसब माझ्यात आहे. दोन भूमिकांची गल्लत मी कधी होऊ देत नाही! म्हणूनच ऑफिसमधून घरी गेल्यावर थोडय़ाच वेळात मी लेखनासाठी तयार होतो. कारण भूमिकेतला बदल!’’ दादा आणि वि. ग. कानिटकरांमधलं हे संभाषण आजही माझ्या लक्षात आहे.

प्रथितयशांच्या अभिप्रायांप्रमाणेच सामान्य वाचकांची सुद्धा खूप पत्रं दादांना यायची. ती पत्रंसुद्धा दादांना खूप महत्त्वाची वाटायची. जपून ठेवायचे ते ती पत्रं. ‘आनंदी गोपाळ’ कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर तर अशा पत्रांचा ओघच सुरू झाला. आणि गंमत म्हणजे ही अशी सगळी पत्रं देणारा पोस्टमन एकदा आमच्या घरी आला आणि त्यानं ‘आनंदी गोपाळ’ वाचायला मागितली. ‘आठ दिवसांत परत देतो’ म्हणाला. दादांनीही त्याला ती कादंबरी दिली. त्यानंही ती व्यवस्थित परत केली. कादंबरी आवडल्याचं त्यानं आवर्जून सांगितलं. हा प्रसंग दादांसाठी खूप वेगळा होता.

‘आनंदी-गोपाळ’ आणि ‘रघुनाथाची बखर’ या दोन कादंबऱ्या दादांच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना त्यांच्या प्रतिमेतून बाहेर आणणाऱ्या आहेत. ‘आनंदी-गोपाळ’ ही कादंबरी खूप गाजली. वाचकप्रिय ठरली. तिला राज्य शासनाचा ‘ह. ना. आपटे पुरस्कार’ आणि इतर पुरस्कारही मिळाले.

‘रघुनाथची बखर’, ‘यात्रा’, ‘जोशी पुराण’, ‘पुणेरी’ या पुस्तकांनाही यश मिळालं. पण यशाची हवा डोक्यात जाऊ नये अशी शिकवण दादांनी आम्हाला त्यांच्या वागण्यातून दिली. असे संस्कार दादा कळत-नकळत करून जायचे. मी एकदा दादांना विचारलं होतं, ‘‘दादा, तुमची काही पुस्तकं खूप गाजली. रसिकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवलं. पण काही मात्र चांगली असूनही विशेष यश मिळवू शकली नाहीत. असं का?’’  माझा प्रश्न ऐकून दादा छान हसले. आणि म्हणाले, ‘‘तुला सांगू का? प्रत्येक कथेचं, लेखाचं, कादंबरीचं, पुस्तकाचं स्वत:चं असं नशीब असतं. ते जन्माला येतं त्या वेळच्या ग्रहांवर ते अवलंबून असतं!’’ दादा खरं म्हणजे नास्तिक होते, पण त्या वेळी ते तसं म्हणाले एवढं खरं!  माझ्या लेखन प्रवासात हे वाक्य मला नेहमीच आठवतं.. काही प्रसंगच असे घडतात की त्या वेळी पुस्तकाच्या नशिबाची आठवण येतेच!

माझं पुण्याला नेहमीच जाणं होतं. खूपवेळा मी दादांच्या आवडत्या पुण्यातून म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठेतून फेरफटकाोारून येते.. त्या वेळी मला वेगळाच अनुभव येतो. तिथे खरं म्हणजे आता अपार्टमेंट्सचं जाळं झालं आहे. पण मला मात्र त्या वेळी दादांची ‘वाडा संस्कृती’ आठवते. काही काळासाठी अपार्टमेंटस् पुसली जातात. आणि दादांच्या कथा-कादंबऱ्यांमधले जुने दहा-दहा बिऱ्हाडांना सामावून घेतलेले वाडे माझ्या डोळ्यांसमोर साकार होतात. आणि त्या वाडय़ांमध्ये राहणारे – कुठल्या तरी कार्यालयामध्ये कारकून असणारे किंवा एखाद्या शाळेत शिक्षक असणारे वामनराव, नारायणराव, माधवराव माझ्याशी बोलायला लागतात. मध्यमवर्गीय समस्या मांडायला लागतात. काहीवेळा माझ्या उदास मन:स्थितीत मला धीर द्यायला दादांच्या कथेतलं एखादं पात्र माझ्याजवळ येतं. त्या मन:स्थितीतून ते मला बाहेर काढायचा प्रयत्न करतं. क्वचितप्रसंगी मार्गदर्शकही होतं. असा अनुभव मला नेहमीच येतो. आणि मलाच असं नाही आमच्या घरातले सगळेच अशा अनुभवातून जातात. विशिष्ट प्रसंगी दादांनी रंगवलेलं एखादं पात्र पुढय़ात येऊन संवाद साधायला लागतं.

हा केवढा मोठा ठेवा आहे. आमच्यासाठी आज दादा हयात नाहीत. पण त्यांच्या कथा-कादंबऱ्यातली पात्रं मात्र अशा तऱ्हेनं जिवंत आहेत. आम्ही दादांना काय दिलं कोण जाणे! पण दादा मात्र आमच्यासाठी हा अमूल्य ठेवा ठेवून गेले आहेत. ही आभाळमायाच!

सुप्रसिद्ध साहित्यिक वि. ग. कानिटकर दादांना म्हणाले, ‘‘तुमचा ‘कारकुनीतील बत्तीस वर्ष’ हा लेख वाचला. छान जमलाय. पण  मला कळत नाही आठ तास ऑफिसमध्ये इतकं काम केल्यावर घरी आल्यानंतर थोडय़ाच वेळात तुम्हाला लिहायची स्फूर्ती कशी येते? हे कसं काय बुवा तुम्ही जमवता?’’ दादा म्हणाले, ‘‘ऑफिसमध्ये काम करताना मी खर्डेघाशी करणारा कारकून असतो. तिथून बाहेर पडल्यावर मी संसारी गृहस्थ होतो. आणि घरी गेल्यावर बायकोनं दिलेला चहा पिताना माझ्यातला लेखक जागा होतो. थोडक्यात काय, की वेगवेगळ्या भूमिका वठवण्याचं कसब माझ्यात आहे. दोन भूमिकांची गल्लत मी कधी होऊ देत नाही! म्हणूनच ऑफिसमधून घरी गेल्यावर थोडय़ाच वेळात मी लेखनासाठी तयार होतो. कारण भूमिकेतला बदल!’’

chaturang@expressindia.com