आनंद माडगूळकर

पपा अव्वल दर्जाचे वाचक होते. ‘पंचवटी’च्या वरच्या मजल्यावरच्या कपाटात अक्षरश: हजारो पुस्तकं होती व ती सर्व त्यांनी वाचली होती. त्या संग्रहात रामायण, महाभारत, गीता, गीताभाष्यं, पुराणं, उपनिषदं होती. त्यात महानुभाव लेखक होते, पंडित कवी, शाहीर होते, साने गुरुजी होते, वरेरकरांनी केलेली शरद्चंद्र चट्टोपाध्यायांची भाषांतरं होती. शिवाय टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, काफ्का होता, सात्र्ही होता. पपांचं वाचनवेड मला लाभलं होतं. एकदा त्यांच्या लक्षात आलं, की मी पद्मपुराण वाचतोय, डोस्टोव्हस्की आणि काफ्काही वाचतोय. त्यांनी मला बोलावलं. म्हणाले, ‘‘चांगलं करतोयस. पण नीट दिशा ठेवून वाच. एकेक लेखक पूर्ण वाच. तू काय वाचावं हे मी सांगणार नाही, पण जगातलं सगळ्या प्रकारचं साहित्य वाचलंच पाहिजे व ते पचवताही आलं पाहिजे. तू तरुण आहेस, दगडही पचवले पाहिजेत.’’ माझ्या वाचनाला दिशा मिळाली..  महाकवी ग. दि. माडगूळकर यांच्याविषयी सांगताहेत त्यांचे पुत्र आनंद माडगूळकर.

आजही पपांची ‘पंचवटी’

मुंबई-पुणे हायवेवर आहे.

आजही तिच्या परसदारावरून

पुणे-मुंबई रेल्वे धावत असते.

आजही कृषी विद्यालयावरून दिवसभर वाऱ्याची झुळूक पंचवटीच्या दिशेने येत असते.

आजही त्या झुळुकीमुळे शहारणारी

सुरूची झाडं तिथंच आहेत.

आजही पपांनी ज्या तुळशी वृंदासमोर बसून ‘गीतरामायणा’तली काही गीतं लिहिली, ते तुळशी वृंदावन तिथंच आहे.

आजही ज्या ‘ब्लेस्ड टेबला’वर बसून पपांनी जेवणाच्या पंक्ती आपल्या गप्पांनी रंगवल्या, ते टेबल तिथंच आहे,

आजही ज्या कोचावर बसून पपा लिहीत असत, येणाऱ्या जाणाऱ्यांना भेटत असत तो कोचही तिथंच आहे.

आज नाहीत ते आमचे पपा,

ग. दि. माडगूळकर!

पण, मग लगेच आठवतो तो घराबाहेरचा निळा फलक – ‘येथे ग. दि. माडगूळकर राहत असत.’ तो सांगतो- हे गदिमांचं घर आहे. वाऱ्याच्या झुळकीनं शहारणाऱ्या सुरूच्या झाडांची सळसळ कानात सांगते, हा पपांच्या घराच्या प्रत्येक दगडावर कोरला गेलेला पपांचा श्वास आहे. रस्त्यावर येणारी-जाणारी काही माणसं थबकतात, पायातल्या वहाणा काढतात, बाहेरूनच ‘पंचवटी’कडे पाहून नमस्कार करतात आणि मग ठामपणानं जाणवत राहातं, आहेत, पपा आहेत. इथला कण न् कण पपांच्या अस्तित्वानं भरलेला आणि त्यांच्या आशीर्वादानं भारलेला आहे. आमच्या देहाच्या कुडीत पपांनीच तर प्राण भरला, त्यांनीच रक्तातून वाहणारं मराठी मातीचं, मराठी संस्कृतीचं प्रेम दिलंय. ‘ज्ञानियाचा वा तुक्याचा, तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात सारा, गदिमांचा अंश आहे!’ पपा आहेत!

आम्ही सात भावंडं. माझ्यापेक्षा मोठे तिघं वर्षां, कल्पलता आणि श्रीधर (शिरू). माझ्यापेक्षा तिघं लहान. शरदकुमार, दीपा आणि शुभदा. मी बरोबर मधला. मोठय़ा दोघींची आमच्यावर ताईगिरी चालायची. शिरू ताईचा लाडका (ताई म्हणजे आमची आई. तिला तिच्या माहेरी ताई म्हणत, म्हणून आम्हीही.) आणि कुमार पपांचा लाडका. धाकटय़ा दोघी सर्वाच्याच लाडक्या. मलाच मी एक दुर्लक्षित मुलगा आहे असे वाटायचं. मी कुंतीचा भीम आहे, असा माझा समज होता. ती गोष्ट तुम्हाला आठवते का बघा, जंगलात कुंतीला आणि पांडवांना राक्षस भेटला. तो म्हणाला, ‘तुमच्यापैकी एकाला मी खाणार.’ तेव्हा धर्मानं आणि कुंतीनं भीमाला पुढे केला व सांगितलं, ‘याला खा.’ कारण, धर्म मोठा व अर्जुन छोटा. मधला आपला पुढे करायला बरा! पण ती माझी समजूत होती, हे मला नंतर उमगलं. माझ्या जन्मानंतर पपांचं एक पत्र ताईला आलं होतं, त्यात त्यांनी लिहिलं, ‘‘प्रिये, या मुलाचा जन्म आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येणार. याचं नाव तू आनंद ठेव.’’ पपा तेव्हा मुंबईत होते. माझा जन्म आणि त्यांचा पहिला गाजलेला चित्रपट ‘राम जोशी’ एकाच वेळचे.

पपांच्या मोठय़ा पोटातली मोठी माया कळायला फार वेळ गेला. पपा फार मोठे होते, हे कळायलाही वेळ लागला. आपण ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ची मुलं आहोत, त्यांना लोक प्रेमाने ‘महाकवी’ म्हणतात, ही जाणीव खूप उशिरा झाली. आमच्या करता ते पपा होते. ते कोपिष्ट होते. दुर्वासही लाजावा इतके कोपिष्ट. आम्ही मुलं त्यांच्यापासून लांब राहायचो. पपांचा राग त्यांच्या जिवलग मित्रावर- आमच्या नेमाकाकावरही कोसळायचा. पण रागावले नसताना पपांसारखे पपाच. एकदम राजेशाही वागणं! मित्रांसोबत मफिली सुरू असायच्या. गप्पाष्टकांचं आवर्तन कायम जागतं. कोणाचीही मफल असो, त्या मफिलींचे बादशहा म्हणजे

ग. दि. माडगूळकर. एक तर परमेश्वरानं त्यांना भरभरून प्रतिभा बहाल केली होती. अभिनय अंगभूत होता. जिव्हेवर सरस्वतीची कृपा होती. आणि नेमक्या क्षणी नेमकी गोष्ट आठवून देणारी विलक्षण स्मरणशक्ती त्यांना लाभली होती.

एक गमतीदार आठवण! मी जरा मोठा झाल्यावर आणि पपा आमदार झाल्यावर केव्हा तरी एकदा, आम्ही रेल्वेने मुंबईला जायला निघालो. ज्या ट्रेनने जायचं होतं, तिचा प्रथम वर्गाचा डबा एका लष्करी शाळेतल्या तरुणांनी भरलेला होता. त्यांची मजा चाललेली होती. पपांचा चाहता असणारा टी.सी. त्या दिवशी पपांना म्हणाला, ‘डबा पूर्ण भरलेला आहे, तुम्ही माझ्या जागेवर बसा.’ पोरांची मस्ती व गाणी चालू होती. पपा त्या खुर्चीत अवघडल्यासारखे बसलेले होते, त्यांना थोडं बरंही नव्हतं. मी काही वेळाने डब्यात गेलो व काही मुलांना विनंती केली की, ‘माझे वडील वयस्क आहेत व त्यांना बरंही नाही. त्यांना इथं जागा द्याल का?’ त्यांच्यातला एक जण म्हणाला, ‘चलिये, लेके आईये, हम लोग अ‍ॅडजस्ट कर लेंगे.’ पपांना त्यांच्यात बसवलं. पोरांचा आरडा-ओरडा सुरू होता. तेव्हा नुकताच ‘बॉबी’ चित्रपट आलेला. ‘‘हम-तुम एक कमरें में..’ वगरे चालू होतं. त्यांना काय माहिती की एका महान कवीसमोर, चित्रपटलेखकासमोर आपण बसलोय. मी पपांच्या जागेवर बसलो. काही वेळानं आवाज बंद झाला, लोणावळ्याला मी कंपार्टमेंटमध्ये डोकावलो. पपांना या मुलांच्या मस्तीचा काही त्रास तर नाही ना होत? पाहतो तो काय, पपा मध्ये बसलेले, आजूबाजूला सारी पोरं गोळा झालेली आणि पपा त्या मुलांना तुलसी रामायणातला एक दोहा समजावून सांगत होते, सगळी मुलं कान देऊन ऐकत होती. पपांना सर्वाना आपलंसं करण्याची खूबी लाभली होती.

पपा तसे जाडजूड, रुंद होते. त्यांचा हाताचा पंजा मोठा, भरदार आणि मऊसूत होता. पण रागावल्यावर आमच्या गालावर पूर्ण वजनानं पडायचा व तिथं नक्षी उमटायची. त्याच हातानं कागदावर निळ्या शाईची रेखीव फुलपाखरं उमटू लागली की ईश्वराच्या मनातले भावार्थ उमलू लागायचे. कधी तरी मला वाटायचं, आम्ही पोरं त्यांच्या खिजगणतीतही नाही. पण एकदा प्रीडिग्रीच्या वर्गात असताना माझ्या निबंधाला चांगले गुण मिळाले. स. शि. भावे, गं. ना. जोगळेकर आमचे शिक्षक होते. त्यांनी भरपूर गुण दिले. पपांनी मला जवळ बोलावलं. माझा निबंध वाचायला मागितला. निबंध वाचताना ते मान डोलवत होते. त्या निबंधात एक वाक्य मी लिहिलं होतं, ‘तात्यासाहेब केळकर यांचं वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अकाली निधन झालं.’ त्यानंतर कंसात मी मल्लिनाथी केली होती की ‘निधन हे नेहमी अकाली होत असतं.’ ते वाचल्यावर पपा मला म्हणाले, ‘‘बाब्या, (माझं घरातलं टोपणनाव ‘बाबा’ आहे) लेका, फाजील आहेस.’’ आणि खूप हसले.

आम्हा भावंडांत तीन गट होते, पहिला गट वर्षां आणि लता यांचा, कारण त्या मोठय़ा होत्या, दुसरा गट शिरू, मी व कुमारचा, तिसरा गट अर्थातच धाकटय़ा दोघींचा. पहिला गट मोठय़ा बहिणींचा. परिणामी पपांच्यासोबत एखाद्या नव्या चित्रपटाच्या मुहूर्ताला किंवा प्रीमिअरला जाण्याची पहिली संधी त्यांना मिळायची. आम्ही ‘नाही रे’ वर्गातले. आम्हाला खूप राग यायचा. मी तो व्यक्त करू शकत नसे. पण शिरू बंडखोर वृत्तीचा होता. तो त्या दोघींच्या चपला किंवा पर्स लपवून ठेवायचा. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असायचा. त्या दोघींची होणारी धावपळ बघून आम्हाला मजा वाटायची.

पपा अव्वल दर्जाचे वाचक होते. ‘पंचवटी’च्या वरच्या मजल्यावरच्या कपाटात अक्षरश: हजारो पुस्तकं होती व ती सर्व त्यांनी वाचली होती. त्या संग्रहात रामायण, महाभारतासारखे ग्रंथ होते, गीता, गीताभाष्यं, पुराणं, उपनिषदं होती. त्यात महानुभाव लेखक होते, पंडित कवी होते, शाहीर होते, आधुनिक काव्यं होती, साने गुरुजी होते, वरेरकरांनी केलेली शरद्चंद्र चट्टोपाध्यायांची भाषांतरं होती. त्याचबरोबर त्या संग्रहात एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाचे सर्व खंड होते, टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, काफ्का होता, सार्त् होता. अतिशय समृद्ध संग्रह होता तो. पपांचे मित्र

रा. ब. ग्रामोपाध्ये आणि चित्रपट निर्माते गोविंदराव घाणेकर यांनी पपांना अनेक इंग्रजी पुस्तकं आणून दिली होती. पपांचं वाचनवेड मला जन्मत:च लाभलं होतं. पपांसमोर उभं राहायची हिंमत नसलेला मी ते नसताना त्यांच्या त्या वरच्या खोलीत जाऊन पुस्तकं वाचायचो. एकदा त्यांच्या लक्षात आलं, की बाब्या पद्मपुराण वाचतोय, डोस्टोव्हस्की आणि काफ्काही वाचतोय. त्यांनी मला बोलावलं. म्हणाले, ‘‘चांगलं करतोयस. पण नीट दिशा ठेवून वाच. एकेक लेखक पूर्ण वाच. तू काय वाचावं हे मी सांगणार नाही, पण जगातलं सगळ्या प्रकारचं साहित्य वाचलंच पाहिजे व ते पचवताही आलं पाहिजे. तू तरुण आहेस, दगडही पचवले पाहिजेत.’’ माझ्या वाचनाला दिशा मिळाली..

ज्या खोलीत त्यांची पुस्तकं होती, त्या खोलीत मोठी निळी सतरंजी पसरलेली असे, तिच्यावर छोटासा गालिचा, गालिच्यावर आणि त्या गादीवर एकही सुरकुती न पडलेली पांढरी स्वच्छ चादर, भिंतीला टेकलेले पांढरे स्वच्छ तक्के, बाजूला पानाचा डबा, लिहिण्याचं डेस्क, त्याच्यावर कधीही पपांच्या हातून अंगावर अक्षरनक्षी कोरून घेण्यास तयार असलेले पांढरे शुभ्र कागद, सदैव मंद सुवास पसरवणारं पेटलेल्या उदबत्त्यांचं घर आणि निळी शाई भरलेलं सोनेरी टोपणाचं ‘पार्कर’चं पेन. त्यांच्या समोरच्या भिंतीवर एक चित्र होतं. आणि प्रेरणादायी शिवरायांची प्रतिमा. असा सारा पपांचा लेखनाचा जामानिमा असायचा. त्या सिद्धहस्त लेखकाला कुठेही लेखन सुचायचं. पण हा सारा कॅन्व्हास असायचा तेव्हा पपा खूश असायचे. ताईही एखाद्या पूजेची तयारी करावी तितक्या पवित्र भावनेनं ही तयारी करायची. महाकवीचं अनंत आभाळ सांभाळायला धरणीची माया लागते, ती ताईकडे होती.

पपांच्या लेखनाबद्दल अनेक आख्यायिका आहेत, ते असं वेगानं लिहितात, ते तसं झटपट लिहितात. पण, एकदा माझ्याजवळ बोलताना ते म्हणाले होते, ‘अनेकांना वाटतं, माडगूळकर मनात आलं की पटापट लिहितो. पण बाब्या, जोवर माझं मेंटल वर्क पूर्ण होत नाही, तोवर मी कागदाला लेखणी लावत नाही.’ कित्येकदा पपा शांत बसलेले दिसत, कदाचित त्या वेळी त्यांच्या प्रतिभेचं रसायन ढवळलं जात असणार. पण, ‘गीत रामायणा’च्या वेळचा बाबूजींचा अनुभव वेगळा आहे. अनेकदा रेकॉर्डिगची वेळ जवळ आली तरी पपांचं गीत तयार नसायचं. स्वत: बाबूजी किंवा त्यांचा एखादा माणूस पपांसमोर बसायचा. बाबूजी म्हणायचे, ‘अण्णा तुम्ही माझी पंचाईत करणार.’ पपांसमोर वाल्मीकी रामायणाची एक प्रत असायची. तिची पाने चाळून पपा तो ग्रंथ मिटून ठेवायचे आणि कागद समोर ओढून त्यांच्या लाडक्या ‘पार्कर’ पेनातून निळी कलाबूत त्यावर झरायची. काही मिनिटांत ते गीत लिहून काढायचे. पपांनी मला जे सांगितलं ते आणि बाबूजी सांगतात ते यात तुम्हाला विसंवाद दिसतो. पण मला वाटतं, पपांच्या प्रतिभेची ही दोन्ही रूपं होती. माझाच एक अनुभव सांगतो. पु. ल. देशपांडे यांची साठी झाली, त्या वेळी ‘स्वरानंद’ने ‘पुलकित गीते’ हा कार्यक्रम केला. मी त्यात सहभागी होतो. ‘स्वरानंद’ची मंडळी मला म्हणाली, ‘‘गदिमांकडून जाहिरातीसाठी काही ओळी मिळतात का ते बघ ना.’’ मी पपांच्या त्या बठकीसमोर जाऊन बसलो व पपांना विनंती केली की, ‘‘आम्हाला या कार्यक्रमाच्या जाहिरातीसाठी काही ओळी लिहून द्या.’’ क्षणभर विचार करून ते म्हणाले, ‘‘घे लिहून.’’ पण त्यांनी स्वत:च कागद ओढला व त्यावर त्यांच्या देखण्या अक्षरात लिहिलं – ‘पुलकित श्रवणे, पुलकित वदने, पुलकित श्रोते, पुलकित गीते.’ ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटासाठी एक लावणी लिहायची होती. त्या दरम्यान राजाभाऊ परांजपे ट्रेन पकडण्यापूर्वी पाच मिनिटं पपांना भेटायला ‘पंचवटी’त आले. आले, बसले, पाच मिनिटे बोलले व लगेच निघाले. पपा म्हणाले, ‘अहो, आत्ता आलात व आता जातो म्हणता? थांबा की जरा.’ तिथल्या तिथे पपांनी लावणी रचली – ‘काहो बोलत नाही का? राया हासत नाही का? आला नाहीत, तर तुम्ही जातो म्हणता का?’ आता तुम्हीच ठरवा पपा कसं लिहायचे ते? एवढं खरं, की हा महाकवी जे लिहायचा ते अजरामर ठरायचं.

पपा जसे शीघ्रकवी होते तसेच ते शीघ्रकोपीही होते. एकदा पपा एका पटकथेचं वाचन करत होते, त्या वाचनाला काही मंडळी हजर होती. त्यातील एकानं पपांचं सलग चाललेलं वाचन थांबवून काही सूचना केली. पपांनी त्याच्याकडे न बघता जवळ पडलेला अडकित्ता त्याच्यावर फेकून मारला. बिचाऱ्याला लागला नाही हे त्याचं नशीब! त्यांच्या या रागामागे एक मीमांसा होती. ती मीमांसा तयार व्हायला एक प्रसंग कारणीभूत ठरला होता. आपण काही काळ खपून जे तयार केलं, ते काम नेमकं असणार याची त्यांना खात्री होती. पपांचा पहिला गाजलेला चित्रपट ‘राम जोशी’. त्या वेळी पपा नवखे होते. त्यांनी घाबरत दिग्दर्शक व्ही. शांतारामांना विचारलं, ‘‘मी शूटिंग बघत बसलं तर चालेल का?’’ त्यांनी होकार दिला. शूटिंग पाहता-पाहता पपांच्या मनात, एका दृश्यात काही बदल करावा असा विचार आला. त्यांनी तसं अण्णांना सुचवलं. तर त्यांनी उत्तर दिलं, ‘‘माडगूळकर, आपण या पटकथेवर वर्षभर काम करून ती नक्की केलीय ना, आता त्यात बदल नाही.’’ ही शिकवण त्यांच्या मनात असावी.

पपांचं मत्र मोठं होतं, आमच्या घरी नामवंत साहित्यिक येत असत. आमच्या भल्या मोठय़ा डायनिंग टेबलवर बसून जेवत असत. भावेकाका त्या टेबलाला ‘ब्लेस्ड् टेबल’च म्हणत. आयताकृती अशा त्या टेबलाच्या लांबडय़ा दोन बाजूंना तीन तीन जण तर दोन छोटय़ा बाजूंना एकेक जण बसत. सारेच दिग्गज असत. पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, सुधीर फडके, ग. रा. कामत, बाबा पाठक हे नेहमी येत असत. त्या टेबलावर गप्पा मारत त्यांचं जेवण चाले. आजही जेवणघराच्या वळचणीला त्यांच्या गप्पांचे निनाद लगटून बसल्याचा भास मला होतो.

पपांच्या त्यावेळच्या नकला पाहून भाई म्हणायचे, ‘बरं झालं अण्णा तुम्ही एकपात्री करत नाहीत ते. तुम्ही आमची छुट्टी केली असती.’ पपांच्या आजारपणात एकदा भाई घरी आलेले होते. आम्ही जेवत होतो. जेवता जेवता पपांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. कोणाहीबद्दल काही गमतीदार बोलायचं असलं की पपा असं बघायचे. माझ्या पोटात खड्डा पडला. मी तोवर तसा स्थिरस्थावर झालेला नव्हतो. पपा पु. लं. ना म्हणाले, ‘‘भाई, आमच्या बाब्याचं ना मांजरीसारखं आहे. दिसेल त्या वाटीत डोकावून पहायचं.’’ भाई पुढच्या क्षणी म्हणाले, ‘‘मग चांगलं आहे रे, आनंद. असंच शोधता-शोधता तुला तुझी वाटी मिळेल.’’ मला माझी वाटी मिळाली की नाही ते सांगता येणार नाही. पण, एक गोष्ट मला नक्की सांगता येईल की, मला जन्मत:च ‘गदिमा’ या तीन अक्षरी महामंत्राची गुटी मिळाली होती.

पपा आमदार असताना शनिवारी रात्री मुंबईहून डेक्कन क्वीनने परत येत असत. ते पुण्याला आले की, छान आंघोळ करत व आम्ही सारे जेवायला बसत असू. पपांनी एक शिरस्ता पाडला होता. दिवसभर कुठेही उंडारा, पण रात्री जेवणाच्या टेबलावर सगळे  एकत्र असायलाच हवेत. मग जेवणाच्या टेबलावर पपा आठवडाभर काय काय घडलं ते सांगत असत. आठवडाभरात जे जे भेटले त्यांच्या शैलीच्या नकला करत करत ते किस्से सांगत. आम्ही सारे मंत्रभारल्या अवस्थेत ते ऐकत असू. त्या नकलात यशवंतराव चव्हाण असत, वसंतराव नाईक असत किंवा एखादा टॅक्सीवाला सरदारजीही असे. शनिवारच्या त्या जेवणाच्या मफिली संपता संपता रात्रीचा एक वाजलेलाही कळत नसे. कधी मजेत, पपा ताईकडे रोखून बघत व म्हणत, ‘‘मंदीला (आईचं लग्नापूर्वीचं नाव) माहीतच नाही की आपला नवरा किती मोठा आहे?’’ ताई लगेच टोला परतवून लावत असे. ती म्हणे, ‘‘तुमची अपेक्षा आहे की काय की घरी आल्यावरही आम्ही तुमच्या आरत्या ओवाळायच्या?’’ तिचा लटका राग पाहून पपा गडगडाट करत हसत असत.

मला कधी कधी प्रश्न पडत असे की हा सिद्धहस्त कवी आणि ही उत्तम दर्जेदार गायिका, यांचा त्यावेळी संवाद कसा साधला जात असेल? ‘कुबेराचं धन’ चित्रपटासाठी पपांनी गाणं लिहिलं होतं, ‘‘कधी तरी मी आले होते, बसले होते, या इथे की त्या तिथे?’’ त्या गीतात लिहिले होते, ‘‘मी गाणारी, तुम्ही लिहिते.’’ ताईच्या मनातला भावच त्यांनी नेमका टिपला असेल का? ताई कधी तरी सांगायची, पपांनी कविता किंवा गाणं लिहिलं व तिला ऐकवलं, की ती तत्काळ त्यांना ते कवन गुणगुणून दाखवत असे. माणिक वर्माच्या जातीचा ताईचा आवाज होता. पपांशी लग्न केल्यावर तिनं आपणहून गाणं सोडलं आणि पपांच्या संसाराचं जीवन-संगीत गायला सुरुवात केली. तिला गाणं सोडल्याची कधी खंत वाटली असेल का? नसावीच. कारण आकाशाशी जडलेल्या त्या नात्यानं तिच्यातली धरणीमाता सुखावली होती. तसं पहायला गेलं तर चित्रपट धंदा बेभरवशाचा! पपांचं उत्पन्न सतत कमी-जास्त होणारं. आमचं मोठं कुटुंब. आला-गेला सतत चालू असायचा. त्या दोघांनी हसत-खेळत कसं भागवलं असेल त्या काळात? दोघांच्याही चेहऱ्यावर कधीही चिंतेचं मळभ आलेलं नसे. कायम हसतमुख. पपांच्या ‘प्रायोरिटीज’ ठरलेल्या होत्या. त्यात सर्वात आधी त्यांची आई, मग भावंडं आणि त्यानंतर त्यांचा स्वत:चा संसार. त्या संसारातलं आपलं स्थान ताईनं मान्य केलं होतं. पपांचा विचार करताना ताईला त्यांच्यापासून वेगळी करताच येत नाही. शिवशक्तीचं परस्परांत विलीन झालेलं अलौकिक रूप होतं ते.

आमच्या घरासमोर मोठं अंगण होतं. कित्येकदा रात्रीच्या वेळी पपा त्या अंगणात सतरंजी पसरून आभाळातल्या चांदण्या पहात पहुडत. आम्ही पोरं त्यांच्या अवतीभवती असू. मूड लागला तर पपा गोष्ट सांगत, मूड नसेल तर आमची मस्ती पहात बसत. कधी कधी ताई आम्हाला रागे भरे. एका रात्री पपा असेच लोळत पडलेले होते. समोरच्या मुंबई-पुणे हमरस्त्यावर एक बस थांबली. त्यातून ‘‘अण्णा, आहात का?’’ अशी हाळी देत पु. ल. देशपांडे आणि ‘वाऱ्यावरची वरात’ची पूर्ण टीम एकापाठोपाठ एक उतरली. त्यांच्यातच अनपेक्षितरीत्या मंगेश पाडगांवकरही होते. सारे बाहेरच सतरंज्या टाकून बसले. त्या रात्री आभाळातल्या नक्षत्रांनाही लाजवील अशी एक मफल आमच्या अंगणात रंगली. या मफिलीवरून आठवलं. आम्हा मुलांच्या मुंजीनिमित्तसुद्धा असाच एके संध्याकाळी अचानक एक कार्यक्रम झाला. पपा निवेदनाला बसले, बाबूजी गायला बसले आणि पंचवटीच्या त्या प्रांगणात पहिल्यांदा ‘गीतरामायण’ गायलं गेलं. दोन-तीन गाणी संपत नाहीत तोच, समोरचा मुंबई-पुणे हमरस्ता रसिकांच्या गर्दीमुळे बंद झाला.

पपांची पन्नाशी झाली, तेव्हा त्यांचा पुण्यात एक हृद्य सत्कार झाला होता. त्यात ‘गदिमा साहित्य नवनीत’ हा ग्रंथ प्रकाशित झाला. पुलंनी त्याला विलक्षण प्रस्तावना लिहिली होती. का कोण जाणे, त्या प्रसंगाला आम्ही सातही मुलं हजर नव्हतो. पपांनी त्यांच्या रोजनिशीत त्याबद्दल लिहिलेलं मी नंतर चोरून वाचलं. त्यांना त्याचं वाईट वाटलेलं. पपांची डायरी मी नेहमी गुपचूप वाचत असे. त्यांच्या डायरीत ते त्यांचं मन उतरवून ठेवत असत. मी ताईला म्हणालो, ‘‘ताई, आम्ही पपांना घाबरतो गं. त्यांची आदरयुक्त भीती वाटते.’’ पण हे पपांना मी कधीच बोलून दाखवू शकलो नाही. कदाचित आम्ही कोणीही त्यांना हे सांगितलं नसावं. आणि म्हणूनच असेल कदाचित पपांचा व माझा एकत्र एकही फोटो नाही.

पपांचा त्यांच्या जावयांवर खूप जीव होता. सुधाकर (वर्षांचा नवरा) गेल्यावर ते अक्षरश: कोसळून पडले होते. अनेक दिवस त्यांच्या डायरीत त्यांनी फक्त ‘सुधाकर’, ‘सुधाकर’ एवढंच लिहिलं होतं. पपांचा व माझा संवाद खरा सुरू झाला तो मी मुंबईत शिक्षणासाठी गेल्यावर. त्याचं असं झालं, की मला शिक्षण संपवल्यावर ‘एचएमव्ही’त  जायचं होतं. ‘एचएमव्ही’चे दुबे हे पपांचे मित्र होते. माझं मन त्यांना उलगडून सांगितल्यावर काही दिवसांनी ते मला म्हणाले, की अण्णांना तू अजून शिकायला हवं आहे. पपांनी त्यांचं मनोगत, त्यांच्या मित्राच्या करवी सांगितलं. मी ‘व्ही.जे.टी.आय.’ अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक कोर्स निवडला- ‘वुलन अँड वोर्स टेक्नॉलॉजी’ नावाचा. त्यात माझं मन रमलं नाही. पण मी तो कोर्स करायला मुंबईत राहिलो. इच्छा नसताना! परिणामी अभ्यास झाला नाही. त्यात बाहेरच्या जेवणामुळे मी आजारी पडलो. मी परीक्षा न देताच पुण्यात परतलो. पपांनी विचारलं, ‘‘पेपर्स कसे गेले?’’ मी हळूच पुटपुटलो, ‘‘मी परीक्षा दिली नाही.’’ पपा स्तंभित झाले. ते काहीच बोलले नाहीत. माझ्याकडे पहात राहिले. मला वाटलं, ते ओरडतील वगरे. तसं काहीच झालं नाही. मी मनातून हललो, ठरवलं, की आता घरातून पैसे न घेता मुंबईत राहायचं. पपांच्या एका ओळखीच्या माणसाकडे मी कारकुनाची नोकरी करू लागलो. पगार जेमतेम २७२ रुपये महिना. त्यात मुंबईत टिकाव लागणं अवघड होते. काही दिवसांनी पपांना हे कळलं. ते मुंबईत आले. माझी ढासळलेली तब्येत पाहून ते हतबुद्ध झाले. ‘‘बाब्या, हे काय करून घेतलंस स्वत:चं? असं नसतं करायचं बाळा.’’ त्यांनी खिशातून पाचशे रुपये काढून माझ्या हातात ठेवले. ‘‘पशाची काळजी करू नकोस. अनुभव घेत रहा.’’ मी मग मुंबईत माझी ‘वाटी’ शोधू लागलो. नाटकात कामं करू लागलो. वसंत सबनीसांचं ‘नाटक’ याच नावाचं एक धमाल नाटक मुंबईत असताना राज्य नाटय़ स्पर्धेसाठी आम्ही केलं. ते नाटक बघायला पपा, ताई, सबनीसकाका हजर होते. माझी भूमिका थोडीशी चावट होती. मी आल्यावर हशा पिकत असे, टाळ्या पडत. त्या दिवशीची पपांची डायरी मी नेहमीसारखी गुपचूप वाचली. पपांनी लिहिलं होतं, ‘बाब्या इथं कुठलासा कोर्स करायला आलाय. पण हा कोर्स तो पूर्ण करेल की नाही ते सांगता येणार नाही. तो शेवटी नाटक-सिनेमातच जाणार. तेही खरंच. यथा बीजं तथा अंकुर:।’ पपांचा तो मला आशीर्वाद वाटला.

पपांना स्वकर्तृत्वाची जाण होती. पण वृथा अभिमान नव्हता. त्यांचे काही चित्रपट त्यांच्या शेजारी बसून पाहण्याचा योग मला आला होता. ‘जगाच्या पाठीवर’च्या वेळी पपा स्वत:शीच बोललेलं मला आठवतंय, ‘राजानं छान दिग्दर्शन केलंय’. ‘सुवासिनी’च्या वेळी ते म्हणाले होते, ‘बाबूजीनं काय चाली दिल्यात.’ स्वत:बद्दल मात्र कधी एक अक्षरही काढत नसत.

पपांच्या ऑपरेशननंतरच्या काळात मी पपांच्या खूप जवळ आलो होतो. मला घरी यायला उशीर झाला की पपा जेवायला थांबत असत. एकदा ते मला हळूच म्हणाले, ‘‘बाब्या, दिवसभर तू काय करतोस ते मी विचारत नाही. पण रात्री घरी जेवायला एकत्रच बसायचं.’’ मी नंतर कधीही रात्रीच्या जेवणाची वेळ चुकवली नाही. पपा शेवटच्या दिवसात अस्वस्थ असत. मी एकदा पपांचे पाय चेपत बसलो होतो. आमची उद्योगधंद्यातील धडपड त्यांना आवडत नसे. त्यांचे लाडके औंधचे महाराज, त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही की सांगत, ‘‘आमचे तुम्हाला आशीर्वाद नाहीत.’’ तसे पपा आम्हाला सांगत, ‘‘आमचे तुम्हाला आशीर्वाद नाहीत.’’ त्या दिवशी पपा माझ्याकडे रोखून पहात म्हणाले, ‘‘बाब्या, आज शब्द मागे घेतो. आमचे तुम्हाला आशीर्वाद आहेत.’’ पपांच्या डोळ्यात पाणी होतं.

त्यांच्या जाण्याच्या दोन दिवस आधी ताई माझ्याजवळ येऊन म्हणाली, ‘‘बाबा, अरे यांना समजावून सांग, ते जेवत नाहीत.’’ मी म्हणालो, ‘‘ताई, ते तुझं ऐकत नाहीत, तर माझं काय ऐकणार?’’ पण तरीही मी पपांच्या जवळ गेलो. पपांकडे रोखून पहात म्हणालो, ‘‘पपा, खा हो तुम्ही काही तरी.’’ त्यांचे डोळे पाणावले, ‘‘मंदे, बघ. कालपर्यंत डोळा वर करूनही न पाहणारा मुलगा आज ओरडायला लागलाय. बाब्या, अरे जो अनंताच्या प्रवासाला निघालाय, त्याच्यावर ओरडून काय उपयोग?’’ मी पपांच्या पायावर कोसळलो. महाकवी अनादि अनंत असतो.

पपा गेले त्या दिवशी, त्यांच्या आईला ‘पारखे पुरस्कार’ मिळणार होता. आजीला ते म्हणाले, ‘‘तू पुढे हो मी आलोच.’’ आजी कार्यक्रमाला गेली. इकडे पपांना कडकडून थंडी भरली. अंगावर आम्ही रग टाकले. नंतर त्यांना अचानक उकडायला लागलं. ते घामानं थबथबले. म्हणाले, ‘‘मंदे, आत्ता थंडी, आत्ता गरम. अजब वाटतंय.’’ अचानक त्यांनी मला जवळ बोलावलं. ‘‘आनंद!’’ मी जागीच खिळलो. ताई म्हणाली, ‘‘तुला हाक मारतायत.’’ मी त्यांच्याजवळ गेलो. तोपर्यंत त्यांनी कधीही मला मिठी मारली नव्हती. पपा कसेबसे उठले, दोन्ही हात पुढे केले. माझ्या खांद्यावर ठेवले.. आणि पपा गेले! अनंताच्या प्रवासाला अनादि-अनंत निघून गेला. जाताना आमच्यासाठी आभाळ मोकळं सोडून गेला..

शब्दांकन- नीतिन आरेकर

nitinarekar@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

chaturang@expressindia.com