अमृत पुरंदरे

‘‘माझी आई कशी होती? तर मी असं म्हणेन की ती भारी होती. डॅशिंग होती. तिच्या काळाच्या पुढे होती. तिच्या काळात एका स्त्रीनं घराबाहेर पडून समाजकार्य करणं हे खरंच अतिशय अवघड काम होतं. ते तिने केलं. विद्यार्थ्यांच्या अडचणी तिला जाणवत होत्या. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या तिला समजल्या होत्या. त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं मिळवण्यास ती अनेक प्रयोग सातत्याने करत राहिली. राजकारण तिला कधी कळलं नाही. भावलं नाही. ती सरळसोट स्वभावाची होती. तिला अनेक पुरस्कार मिळाले, पण त्यामुळे ती कधी हुरळून गेली नाही. अनेकांची होती तशी ती आमचीही आदर्श होती. तिच्यासारखी आई मिळणं हे भाग्यातच असावं लागतं. ते आमच्या वाटय़ाला आलं.’’ सांगताहेत अमृत पुरंदरे आई निर्मलाताई पुरंदरे यांच्या नितळ, निखळपणाविषयी..

कुमुद माजगांवकर. जन्म १९३३. लग्नानंतर, सोळाव्या वर्षी ती निर्मला बळवंत पुरंदरे झाली. इतक्या लहान वयात तिला खूप श्रीमंती आणि खूप गरिबीही अनुभवायला लागली होती. शिक्षण मॅट्रिक. माहेरी संकटांचा डोंगर कोसळलेला. चार बहिणी आणि दोन भाऊ. शेवटी आजीनं ठरवलं की जे आधी येतील त्यांना मुलगी देऊन टाकायची. सगळ्या बहिणींची लग्नं तशीच झाली. सगळ्याच दिसायला, नाकीडोळी चांगल्या. सुदैवाने पुढे सगळ्यांचंच बरं झालं, असं म्हणता येईल. निर्मलाला तीन मुलं झाली. मोठी माधुरी. दोन नंबर अस्मादिक आणि तीन नंबर प्रसाद. पती (बाबासाहेब पुरंदरे) इतिहासवेडा. किल्ले फिरणारा. इतिहासाची कागदपत्रं अभ्यासत इतिहास संशोधक मंडळात पडीक राहणारा. सासरीसुद्धा आर्थिक संकटं आली. त्या परिस्थितीत तिने आम्हा तीन मुलांना सांभाळत संसार केला.

नवरा सगळा महाराष्ट्र पालथा घालत फिरणारा, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातले पाहुणे हक्काने पुण्यात आमच्या घरी यायचे. ओढाताण व्हायचीच.. अशातच मुलांवर संस्कार करायचे. त्यांना मोठं करायचं.. तिचं सांगणं असायचं, ‘दुसऱ्यांकडून काही घेऊ नये. दुसऱ्याकडे कधी काही मागू नये. खोटं बोलू नये. शाळेत सर्व कार्यात सहभागी व्हायचं. गॅदरिंग, खेळ, बॅण्ड, वक्तृत्व स्पर्धा, नाटक, एनसीसी सगळ्यांमध्ये भाग घ्यायचा.’ पुढे तिचा सख्खा मोठा भाऊ म्हणजे श्रीकांत (माजगावकर) याने ‘माणूस’ नावाचं मासिक (पुढे साप्ताहिक) आणि ‘राजहंस प्रकाशन’ असा व्यवसाय सुरू केला होता. आधीच आर्थिक अडचणी, त्यात व्यावसायिक अडचणी. त्याला मदत करायला आई तिकडे जायला लागली. हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत सहसंपादक झाली. नवीन लेखकांची हस्तलिखितं बघणं, तपासणं आणि निवडणं हे तिचं एक काम. ती घरी हस्तलिखितं घेऊन यायची. मला वाचायला सांगायची. माझं मत विचारायची. मी साधारण आठवी, नववीत असेन. हस्तलिखितातलं मला काय आवडलं, काय आवडलं नाही हे समजावून घ्यायची. त्याचं परीक्षण कसं करायचं हे सहज बोलता बोलता सांगायची. त्यामुळे संपादनाचे संस्कार आपोआप होत गेले. ‘माणूस’मुळे अनेक लेखकांच्या ओळखी होत. ते घरी येत. त्यांच्या चर्चा सहज कानावर पडत. त्याचा पुढे बराच फायदाही झाला.

आईचा जन्म १९३३ चा. स्वातंत्र्यपूर्व काळात बालपण गेले होते. खरं तर जुने संस्कार पण आईचे विचार काळाच्या पुढचे होते. उदाहरण सांगतो. आमच्या घरी छोटासा देव्हारा होता. बाबा देवांची नियमित पूजा करायचे. पण ते नसले की ते काम आई, बहीण आणि माझ्यावर असायचे. मला पूजेचा कंटाळा यायचा. मी टाळाटाळ करायचो. बहीण तिचा नृत्याचा क्लास, खेळ आणि अभ्यासात गुंतलेली असायची आणि आईची कुठली मीटिंग असली की ते काम माझ्यावर यायचं. मी कसंबसं उरकायचो. एकदा तर असं झालं की चार-पाच दिवस मी पूजाच केली नाही, अगदी आईने सांगूनसुद्धा. यावर तिनं काय करावं? सगळे देव गुंडाळून ठेवले. म्हणाली, ‘‘देवांची काळजी घेता येत नाही आपल्याला तर कमीत कमी हाल तरी नकोत.’’ तेव्हापासून आमच्या घरातनं देवघर गेलं ते कायमचं. बाबांनी विचारलं, ‘‘काय झालं? देव्हारा कुठाय?’’ आई म्हणाली, ‘‘देवांकडं लक्ष द्यायला आम्हाला जमत नाहीये. त्यांचे हाल नकोत. म्हणून काढून टाकला.’’ बाबा रागावले. पण काही बोलले नाहीत. आमच्याशी महिनाभर बोलले नाहीत. मग त्यांना समजलं असणार, की याचा काही उपयोग नाही. त्यांनीही राग हळूहळू सोडून दिला. खरं तर आई आस्तिक किंवा नास्तिक अशी नव्हती. ती व्यावहारिक होती एवढंच.

असं असलं तरी आम्ही चुकलो की मात्र ती ‘उत्तम’ रागवायची. भीतीच वाटायची तिच्या रागावण्याची. आमचे बाबा आमच्यावर कधी रागावल्याचंही आठवत नाही की त्यांनी आमचा अभ्यास घेतल्याचंही आठवत नाही. ती जबाबदारी आईची! वेळ पडल्यास फर्स्ट क्लास ‘धुऊन’ काढायची. देवाची माफी मागणे, ही सर्वात उच्च कोटीतील शिक्षा. फार अपमानास्पद वाटायचं. व्यायामाला जायला पाहिजे, हा मात्र तिचा हट्टच असायचा. मला आणि प्रसादला तिने त्यासाठी महाराष्ट्र मंडळात घातलं होतं. ती आम्हाला कधी सोडायला आली नाही, पण आम्ही घामाघूम होऊन परत येतोय की नाही याकडे मात्र तिचं नक्कीच लक्ष असायचं. तिने आम्हाला महाराष्ट्र मंडळात घातलं ही तिची सोयसुद्धा होती. कारण त्या वेळेदरम्यान ती ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’चं काम करू शकत होती. नंतर आम्हालाही ‘मंडळा’ची गोडी लागली. तिथं मल्लखांब, कुस्ती, पोहणे, आसने, व्हॉलीबॉल, या गोष्टी शिकता आल्या. चांगले शिक्षक आणि मित्र मिळाले.

या काळातली एक आठवण मात्र घट्ट आहे. आमची आजी आमच्या घराच्या जवळ राहायची. तिच्या गॅलरीतून बरोबर समोर आमची खिडकी दिसायची. खेळून आल्यावर आम्ही आजीकडेच जायचो. भूक लागलेली असायची. कधी कधी आईला घरी यायला उशीर व्हायचा. आजीच्या गॅलरीतून आमच्या घरचा दिवा कधी लागतोय याची वाट बघत बसायचो. डोळ्यात भुकेनं पाणी यायचं. पण आजीला कळू न देण्याचा प्रयत्न करायचो. आजी खायला द्यायची, पण ‘आपल्यामुळे आजीवर बोजा नको या भावनेतून ते घ्यायचं नाही,’ असं आम्हाला निक्षून सांगितलेलं. त्यामुळे घरी आल्यावर आईच्या कुशीत शिरून रडायचो. आईचेही डोळे ओले व्हायचे. खरं तर अशी वेळ आमच्यावर आली याचा त्या वेळी मनापासून राग यायचा. आईचा राग यायचा. इतर लोक म्हणतात, तसं ‘आईनं कामावर जायला पाहिजे का?’ असा प्रश्न पडायचा. पण आई नंतर छान समजूत काढायची.

व्यसनांबद्दलचीही एक लख्ख आठवण आहे. मी साधारण १३ – १४ वर्षांचा असताना आमच्याकडे एक पाहुणे आले होते. ते सिगारेट ओढत होते. त्यांचं स्टाइलमध्ये दोन बोटांत सिगारेट पकडणं, एका कॉर्नरकडे बघत धूर सोडणं, धूर आत घेताना ती सिगारेत जळत मागेमागे जायची आणि तिचं तांबडं टोक जास्त उजळायचं. धुराची वलयं सुटायची. मला ते सगळं आकर्षक वाटलं. मी त्यांना प्रश्न विचारायला लागलो. आई तिथेच होती. शांतपणे सारं ऐकत होती. मी ‘तुम्हाला कसं वाटतंय? नाकातून धूर सोडून दाखवणार का? सिगारेट का प्यायची.’ वगैरे अनेक प्रश्न त्यांना विचारले. आई त्या वेळी काहीच बोलली नाही, पण त्या रात्री तिने मला समोर बसवलं. म्हणाली, ‘‘तुला तंबाखू, सिगारेट, बिडी, दारू ही व्यसनं करायची आहेत का? कर. माझं काही म्हणणं नाही. मी तुझ्यावर सारखं लक्ष नाही ठेवू शकणार आहे. पण हे वाईट आहे. अपायकारक आहे.’’ एवढं सांगून तिने त्याचे सारे दुष्परिणाम नीट समजावून सांगितले. बस्स..  एवढच. हा विषय पुन्हा आयुष्यात कधी निघाला नाही की काढावा लागला नाही.

मी लहान असल्यापासून ती संध्याकाळी दोन तास ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’त कामाला जायची. १९६० चा तो काळ. नातेवाईक, शेजारी यांना तिचं असं काम करणं आवडत नव्हतं. एकही पैसे न घेता सामाजिक संस्थेसाठी काम करणं त्यांना रुचत नव्हतं. तसं ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बोलून दाखवायचे. तिलाही ते बोलून दाखवत असणार. ती ऐकून घ्यायची आणि सोडून द्यायची. तिनं ते फार मनाला लावून घेतलं नाही कधी. पुढे ते काम वाढायला लागलं. आमचं वयही वाढत गेलं. संपादन आणि सामाजिक काम याला तिनं वाहून घेतलं. पुढे तिला फ्रान्सला शिकण्यासाठी जायची संधी मिळाली. ती फ्रान्सला गेली. यात आमच्याकडे साहजिक दुर्लक्ष झालं. पण त्यामुळे आम्ही तिघेही जास्त स्वतंत्र व्हायला लागलो, झालो. व्यसन करू नका आणि मित्र चांगलेच निवडा, हे मात्र तिने आमच्या मनावर बिंबवलं होतं. बहुधा तिला खात्री होती की मुलं एवढय़ा गुणावर स्वतंत्रपणे पायावर उभी राहतील. उत्तम, निवडक मित्र हे आमच्या तिघांचं सर्वात मोठं धन आहे, असं मला वाटतं.

प्रत्येकाचा संपूर्ण दिवस कार्यमग्न राहील याचीही आई काळजी घ्यायची. मात्र आईच्या सतत कामात असण्याचा एक परिणाम असा झाला की, सातवीपासूनच स्वत:चं स्वत: जेवायची सवय लागली. आई सकाळी स्वयंपाक करून फ्रिजमध्ये ठेवून जायची. ज्याने त्याने आपलं आपलं आपल्या आपल्या वेळेला खायचं. पण अन्न गरम करून खायला मिळेल, ताजं खायला मिळेल, असले लाड तिनं कधी केले नाहीत, किंबहुना कधी करता आले नसावेत. कारण तिचं काम हे सर्वप्रथम असायचं, नंतर कुटुंब. कुटुंबानं या गोष्टी समजून घ्याव्यात ही तिची अपेक्षा. आम्हीपण ते समजून घेतलं, घ्यावं लागलं. निर्मलाच्या ‘निर्मलाताई’ झाल्या. समाजात मान वाढत गेला. कामाचं कौतुक होत गेलं. त्या कौतुकाचंही काही वाटू नये इतकं कौतुक झालं. आम्ही त्याच्यातच आनंदी झालो. आनंदी आहोत..

आई जेव्हा फ्रान्सला निघाली, त्या काळात बाबा वर्षांतले सहा महिने तरी फिरतीवर असत. त्यांना सतत व्याख्यानांची आमंत्रणं असत. मग आमच्याकडे कोण बघणार? आईने निर्णय घेऊन टाकला. मला आणि प्रसादला हॉस्टेलवर ठेवलं. हा एकदम वेगळाच अनुभव होता. माझी बहीण, (माधुरी पुरंदरे) तिला आम्ही जिजी म्हणतो, घरी एकटी राहणार होती. वय वर्षे १७. ती अभिनव महाविद्यालयात शिकत होती. शिकता शिकता घर सांभाळत होती आणि आमच्यावरही लक्ष ठेवत होती. तिच्यावर ही मोठी जबाबदारी होती. बाबा येतील तेव्हा त्यांचीही काळजी तिलाच घ्यावी लागे. तिने ही जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. खरं तर यामुळे ती जास्त गंभीर आणि समंजस झाली. खंबीर झाली. अशा वेळेला फ्रान्सहून आईची पत्रं आली की खूप आनंद व्हायचा. आई नियमित आणि फारच सुंदर पत्र लिहायची. तिकडचे सगळे अनुभव ती पत्रात लिहायची. जिजी वाचून दाखवायची. आणि वाचता वाचता आमच्या डोळ्यात अश्रू चमकायचे. कधी कोणी भारतात येणार असलं की त्यांच्याबरोबर ती खाऊ पाठवायची. जिजी तो आम्हाला हॉस्टेलवर आणून द्यायची. त्या एका वर्षांत मला खूप वेगळं काही शिकायला मिळालं. वेगळं जग बघायला मिळालं. महाराष्ट्रभरातल्या मुलांच्या ओळखी झाल्या.

आईने पुढेही खूप प्रवास केला. तिला प्रवास आवडायचा. ती आमच्यावर घर सोडून जायची. जाताना सूचना दिलेल्या असत. त्यामुळे लहान वयात जबाबदारीची जाणीव झाली. प्रवासाहून आली, की आमच्यासाठी काही तरी छान गिफ्टस् आणलेल्या असत. पण खरी गंमत असायची तिचे प्रवास वर्णन ऐकण्यात. ती छान, सलग, किंवा क्रमश: सगळ्या प्रवासाचं सुंदर वर्णन करायची. तिचे अनुभव सांगायची. हा कार्यक्रम चांगला दोन-तीन तास चालायचाच, पण पुढे महिनाभर सुटलेले प्रसंग ती सांगत राहायची. तिच्या कामाबद्दलसुद्धा ती सगळ्या गोष्टी आम्हाला शेअर करायची. घडलेले विशेष प्रसंग, भेटलेल्या वेगळ्या व्यक्ती, घडलेल्या चांगल्या – वाईट घटना – असं सगळं. ते ऐकायला आम्हाला सगळ्यांनाच आवडायचं.

‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र’ ही तिने सुरू केलेली संस्था. ती सुरू करायचं तिनं ठरवलं तेव्हा आम्ही सगळे विशीच्या पुढे होतो. तिने आमचा सल्ला नाही घेतला. फक्त आम्हाला सांगितलं. मात्र ते का, कसं वगैरे सगळं समजावून सांगितलं. ग्रामीण भागात मुलींना बालवाडी शिक्षणाची कशी गरज आहे, त्यांच्या अडचणी काय आहेत, बालवाडी शिक्षिका ग्रामीण भागांतूनच तयार केल्या तर बालवाडय़ा नक्की चालतील ही तिची कल्पना. आज शेकडो बालवाडी शिक्षिका तेवढय़ाच बालवाडय़ा चालवत आहेत. आणि हजारो मुलं, मुली त्याचा लाभ घेत आहेत.

पुढे तिचं आणि बाबांचंही काम इतकं वाढत गेलं की आम्ही सगळे एकत्र भेटणं दुरापास्त झालं. मी महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रयत्न करत होतो. गुण फार चांगले नव्हते. पण मला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश हवा होता. मी आईला तसं सांगितलं. ती म्हणाली, ‘‘स्वत:च्या गुणांवर जिथं मिळेल तिथं अ‍ॅडमिशन घ्यायची. मी कुठंही ओळख सांगणार नाही. तुम्हीपण माझं आणि बाबांचं नाव सांगायचं नाही.’’ खरं तर ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’त काम करत असल्याने तिच्या बऱ्याच ओळखी होत्या. बाबांनासुद्धा शब्द टाकता आला असता. त्यांचा शब्द कोणी टाळलाही नसता. पण शेवटी मला माझ्या गुणांच्या लायकीप्रमाणे जिथं प्रवेश मिळायचा तिथंच मिळाला. पण तेव्हापासून आम्ही भावंडांनी आईबाबांच्या नावाचा वापर आपण होऊन कुठंही केला नाही. स्वत:च्या लायकीनं स्वत:ला सिद्ध करायला लागतं, पूर्वसंचित फार काळ उपयोगी पडत नाही हा धडा यातून मिळाला. तो योग्यच होता, असं आज मला वाटतं. बाबांनाही अनेक मान्यवर, सरकारी पुरस्कार मिळाले. ‘पद्मविभूषण, ‘पुण्यभूषण’, महाराष्ट्रभूषण, आणि इतर अनेक. पण आईने त्याचं भांडवल स्वत:च्या कामाच्या फायद्यांसाठी कधी केलं नाही. बाबांच्या ओळखी कधी मागितल्या नाहीत किंवा वापरल्याही नाहीत. तिच्या संस्था तिने स्वत: वाढवल्या, बांधल्या. बाबांना तिच्या कामाचं कौतुक होतं. आईला बाबांच्या कामाचं कौतुक होतं पण दोघांनी कधी ते एकमेकांच्या तोंडावर केलं नाही. त्यांच्यातलं हे नातं मला कधीही उलगडलं नाही. आईच्या शेवटच्या काळात बाबा अनेकदा तिच्याजवळ जाऊन बसत. ते दोघेच असताना आम्ही शक्यतो तिथे थांबायचो नाही. त्यांचं एकांतात काय बोलणं व्हायचं हे आम्हाला कधी कळलं नाही – आम्ही कधी विचारलं नाही.

पण आयुष्यभर ती कामच करत राहिली. तिचं काम इतकं होतं आणि ते नंतर नंतर इतक्या झपाटय़ाने वाढत गेलं की, घराकडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता. तिच्या प्राथमिक सांसारिक जबाबदाऱ्या तिने नीट पार पाडल्या असं नक्की म्हणता येईल. पण शेवटची १०-१५ वर्ष आम्ही आमच्या कामात आणि ती तिच्या कामात अशीच गेली. तिच्या आजारपणातली शेवटची पाच-सहा वर्ष, आम्ही आमची कर्तव्यं नक्कीच पार पाडली, तिला काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. पण पुढे तिचं आजारपण वाढतच गेलं. ती जाणार याचा अंदाज तिला आणि आम्हाला आला होता.. त्याप्रमाणे अलीकडेच, २० जुलै २०१९ ला ती गेली.

माझी आई कशी होती? तर मी असं म्हणेन की ती भारी होती. डॅशिंग होती. तिच्या काळाच्या पुढे होती. विद्यार्थ्यांच्या अडचणी तिला स्वत:ला जाणवत होत्या. ग्रामीण स्त्रियांच्या समस्या तिला समजल्या होत्या. त्यांच्यासाठी ती सतत काम करत राहिली. त्यांच्या प्रश्नांवर उत्तरं मिळवण्यास ती अनेक प्रयोग सातत्याने करत राहिली. राजकारण तिला कधी कळलं नाही. भावलं नाही. ती सरळसोट स्वभावाची होती. कामात तडजोड तिनं कधी केली नाही. तिला अनेक पुरस्कार मिळाले. पण त्यामुळे ती कधी हुरळून गेली नाही. अनेकांची होती तशी ती आमचीही आदर्श होती. तिच्यासारखी आई मिळणं हे भाग्यातच असावं लागतं. ते आमच्या वाटय़ाला आलं. ‘डय़ुटी फर्स्ट’- ‘काम आधी, कुटुंब नंतर’ ही शिकवण तिने आम्हाला दिली. ती आमच्यावर बिंबवली. एक स्थितप्रज्ञता आमच्यात आणली. एक व्यक्ती म्हणून, एक समाज कार्यकर्ती म्हणून, एक कार्यतत्पर व्यक्ती म्हणून ती मला आदरणीय वाटते.

तिच्या काळात एका स्त्रीनं घराबाहेर पडून समाजकार्य करणं हे खरंच अतिशय अवघड काम होतं. ते तिने केलं.

शेवटी, मी एवढंच म्हणेन, की ती गेल्याचं मला वाईट वाटलं, दु:ख नाही झालं, हे मात्र खरं.

व्यसनांबद्दलचीही एक लख्ख आठवण आहे. मी साधारण १३ – १४ वर्षांचा असताना आमच्याकडे एक पाहुणे आले होते. त्यांचं स्टाइलमध्ये दोन बोटांत सिगारेट पकडणं, धूर आत घेताना ती सिगारेत जळत मागेमागे जायची आणि तिचं तांबडं टोक जास्त उजळायचं. धुराची वलयं सुटायची. मला ते सगळं आकर्षक वाटलं. आई त्या वेळी काही बोलली नाही, पण त्या रात्री तिने मला समोर बसवलं म्हणाली, ‘‘तुला तंबाखू, सिगारेट, बिडी, दारू ही व्यसनं करायची आहेत का? कर. माझं काही म्हणणं नाही. मी तुझ्यावर सारखं लक्ष नाही ठेवू शकणार आहे. पण हे वाईट आहे. अपायकारक आहे.’’ एवढं सांगून तिने त्याचे सारे दुष्परिणाम नीट समजावून सांगितले. बस्स..  एवढच. हा विषय पुन्हा आयुष्यात कधी निघाला नाही की काढावा लागला नाही.

fxpune@yahoo.com

chaturang@expressindia.com