वर्षां ठुकरुल
बरोबर पंधरा वर्षांपूर्वी माझं लग्न विशाल ठुकरुल यांच्याशी झालं. हे पूर्णत: ‘ॲरेंज मॅरेज’. मी एका निर्यात कंपनीत ‘अकाउंट असिस्टंट’, तर विशाल एका फार्मा कंपनीत ‘एमआर’ची नोकरी करत होते. संसार छान सुरू झाला. पण कधी कधी नियती दगा देते तसं झालं आणि एकामागून एक अशी दोन बाळं आम्ही गर्भारपणातच गमावली. प्रचंड मानसिक तणावात असताना लग्नानंतर दोन वर्षांतच मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. साठवलेल्या पैशांतून जागा भाडय़ानं घेऊन सायबर कॅफे व संगणक वर्ग सुरू केला. वर्षभर सगळं सुरळीत सुरू असताना पुन्हा एकदा आईपणाची चाहूल लागली.

डॉक्टरांनी पूर्ण ‘बेड रेस्ट’ सांगितली आणि कॅफे, क्लास बंद करावा लागला. कारण ते सगळं सांभाळायला कुणी मिळत नव्हतं. काळजात कालवाकालव झाली. पण तेवढय़ापुरतीच; कारण आईपणाचं सुख मोठं होतं. घरात मोठी लेक अगदी आनंद घेऊन आली आणि तिच्या संगोपनात झोकून देत मी आईपण अनुभवू लागले. मात्र तिच्याही मागे किरकोळ आजारांचं शुक्लकाष्ठ लागलं होतं. बाबा आमचा आतून हळवा. पण वरून धीटपणा दाखवत धीर द्यायचा म्हणून निभावलं. सासूबाई, नणंदांनी अगदी मनापासून, आपुलकीनं केलं सगळं. सहा वर्षांनी दुसऱ्या लेकीचं आगमन झालं. धाकटी लेक अडीच वर्षांची झाली, तशी मनानं उचल खाल्ली. काहीतरी करायला हवं.. एक तर लाख-दोन लाखांच्या खर्चातली दोन्ही बाळंतपणं विशालनी माझ्या माहेरून एकही पैसा न घेता केली होती. राहात्या घराचे हप्ते आणि गावी बांधलेल्या घराचं कर्ज होतं. बचत संपून, दागिने विकले जाऊन वर आठ लाख रुपयांचं कर्ज झालं. विशाल दाखवत नसले तरी त्यांची ओढाताण दिसत होती. मी अर्धवेळ नोकरी शोधली. दोन र्वष ती केली. घरखर्चाला थोडा हातभार लागला. धाकटी लेक जेव्हा खूप आजारी पडली, तेव्हा मी नोकरी सोडून पुन्हा घरात बसले. अशातच विशाल यांच्या नोकरीत बारीकसारीक कुरबुरी सुरू झाल्या. वरच्या पदावरची माणसं बदलून त्यांच्या जागी दुसरी आली आणि जुन्या लोकांना अंतर्गत राजकारणाचा त्रास होऊ लागला. विशाल यांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि कोणालाही उलटून बोलण्याचा नसल्यामुळे त्यांची आतल्या आत घुसमट होत होती. त्या वेळी त्यांना सांभाळणं गरजेचं होतं. त्यांना म्हटलं, ‘‘तुम्ही इतक्या तणावात नोकरी नका करू. ही नोकरी सोडून द्या आणि दुसरी बघा. लगेच नाहीच मिळाली तरी ताण घेऊ नका. आपण ज्या घरात राहतो ते घर पंचवीस लाख तरी नक्कीच देईल. कर्ज फिटून ‘वन रूम किचन’ घेऊन राहू शकतो. आमच्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात.’’ या वेळीही नेहमीप्रमाणे आई (सासूबाई) माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या होत्या. मग विशालनी नव्या जोमानं नवी नोकरी शोधली. असे खूप लहानमोठे प्रसंग आहेत, ज्यात आम्ही दोघं आणि आई असे एकजुटीनं मार्ग काढत आलोय.

sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते

अर्धवेळ नोकरी सोडून वर्ष झालं होतं आणि रिकाम्या डोक्यात ‘काही तरी करायला हवं’ हेच सुरू असायचं. विशाल यांचे एक मित्र ब्लॉगिंग करायचे आणि त्यांचं संकेतस्थळ होतं. त्यापासून प्रेरणा घेत माझी लिखाणाची आवड ब्लॉगिंगमध्ये आणायची ठरवली. त्यावर अभ्यास सुरू झाला आणि २०१९ मध्ये ‘वेलवेट कविशा’चा जन्म झाला. वेलवेट म्हणजे मखमल आणि माझं माहेरचं नाव- कविता आणि नवऱ्याचं नाव विशाल यातून अक्षरं घेऊन तयार केलेलं नाव ‘कविशा’! (साखरपुडय़ानंतर ‘कविशा’ हा आम्ही हौसेनं बनवलेला हॅशटॅग होता! अर्थात तेव्हा तो ट्रेंड नव्हता. लग्नानंतर मी ‘वर्षां’ झाले.) मी आणि माझ्या दोन मैत्रिणींनी मिळून ब्लॉगिंग संकेतस्थळाचं इंद्रधनुष्य पेललं. गेली तीन र्वष आम्ही सतत लिहीत आहोत. आम्ही काही प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यांपैकी तीन छान सुरू आहेत. त्यात भर घालण्याचा प्रयत्न आहे. संकेतस्थळाचं तांत्रिक काम विशाल सांभाळतात. नोकरी सांभाळून आम्हाला मदत करतात. मी मान खाली घालून तासन्तास लिहीत बसते तेव्हा माझ्या ६८ वर्षांच्या सासूबाई माझ्या मदतीसाठी उभ्या राहातात. घरकामासाठी मदतनीस नाही. आम्ही दोघी मिळून घर सांभाळतो. पाहाणारा आमच्याकडे पाहून सहज म्हणतो, ‘तुमची आई खूप छान आहे’. पावतीच मिळते, नात्याच्या घट्ट विणेची!

पैसा नव्हता म्हणून आमच्या संसाराची गाडी कधी कुरकुरली नाही किंवा आता पैसा हाती आला म्हणून वाऱ्यावर स्वार झाली नाही. आज लोक मला लेखिका म्हणून ओळखतात. हा सर्व प्रवास सोपा नव्हता. नात्यांची मखमली वीणच त्यात कामाला आली. मग नवऱ्यानं आणि जया पाटील, सविता किरनाळे, धनश्री दाबके या मैत्रिणींनी माझ्यावर दाखवलेला विश्वास असो, की सासूबाईंची माया असो. आजही या दिल्याघेतल्याच्या जगात मी समृद्ध आहे, ती या मखमली, पण घट्ट बंधांमुळे. असं म्हणावंसं वाटतं, ‘ढळू न देई मी आत्मविश्वास
लाख संकटे आली जरी
तरीच शोभेन ना मी
विशालची वर्षां खरी!’
‘इतनी शिद्दत से मैंने..
अतुल कांबळे
श हरुख खानचा ‘ओम शांती ओम’मधला तो प्रसिद्ध संवाद ऐकलाय ना? ‘इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की हैं, के हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की हैं..’ आमच्याबरोबर असंच काहीसं घडलं. मी आणि अश्विनी एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. आम्ही कल्याणला एकाच सोसायटीत राहायचो, एकत्र खेळायचो आणि तेव्हापासूनच एकमेकांचे ‘फेव्हरेट’ होतो!

सुरुवातीला आम्ही फक्त चांगले मित्र होतो. कदाचित त्या वेळेस प्रेमाचा अर्थ समजण्यासाठीसुद्धा आम्ही खूप लहान होतो. पण एकमेकांना भेटण्याचं आकर्षण आणि उत्साह कायम असायचा. लहान असलो तरी एकमेकांबद्दल ‘फीिलग्ज’ होत्या. पण निदान आम्हाला जे वाटलं त्याबद्दल आम्ही प्रामाणिक होतो. आमच्या कथेतलं पहिलं वळण तेव्हा आलं, जेव्हा माझ्या वडिलांनी आम्ही कल्याणहून अंधेरीला राहायला जातोय, असा निर्णय घेतला. कल्याण आणि अंधेरी खूप लांब, त्यात आम्ही दोघं वयानं खूप लहान. त्यामुळे क्वचितच भेटायचो. एकमेकांना लँडलाइनवर कॉल करायचो, कारण तेव्हा मोबाइल फारसा लोकप्रिय नव्हता. लँडलाइनवर आम्ही फक्त पाच मिनिटं बोलायचो, कारण सतत भीती वाटायची की आमच्या कुटुंबीयांना जर हे कळलं तर पुढे काय होईल. पण काळ अतिशय वेगानं निघून गेला. शाळा, कॉलेज सगळं पूर्ण झालं. मात्र लँडलाइनवर कॉल करण्याची पद्धत तीच. फक्त वाढदिवस आणि सणांना. बरेच दिवस ‘लाँग डिस्टन्स’मध्ये असल्यामुळे आणि आपापल्या करिअरच्याही वेगवेगळय़ा योजना डोक्यात असल्यामुळे आमचं हे नातं टिकेल की नाही असं सतत वाटायचं. कालांतरानं आमच्यातला संपर्क कमी होत गेला. दोघं अभ्यासात आणि करिअर घडवण्यात व्यग्र झालो. पण भावना अजूनही तशाच होत्या. मला परदेशात काम करण्याची संधी मिळाली आणि मी तिथे निघून गेलो. आमच्यातलं अंतर आणखी वाढलं, संपर्क आणखी कमी झाला. जवळपास पाच र्वष संपर्कात नव्हतोच. एकदा मी भारतात परत येणार होतो आणि नेमका त्याच दिवशी तिचा वाढदिवस होता. मी तिला फोन केला व तिनं भेटण्याची इच्छा व्यक्त केली. भेटल्यावर खात्री झाली, की एकमेकांबद्दलची भावना, प्रेम, आकर्षण तसंच आहे, जे लहानपणी होतं. त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की पुन्हा संपर्कात राहायचं. पुन्हा एकदा मी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भारतात आलो आणि त्या दिवशी मला वाढदिवसाचं सगळय़ात मोठं गिफ्ट मिळालं. प्रथमच आशू माझ्या वाढदिवसाला माझ्याबरोबर उपस्थित होती आणि तिनं मला लग्नासाठी ‘प्रपोज’ केलं. आम्ही वर्षभरातच लग्न करण्याचं ठरवलं. आशू लहान कुटुंबात, लाडात वाढलेली मुलगी. माझं एकत्र कुटुंब. ती इथे जुळवून घेऊ शकेल का याची मला भीती वाटत होती, कारण लग्नानंतर पंधरा दिवसांतच मी परदेशात परत गेलो. पण हे आव्हान तिनं मनापासून स्वीकारलं आणि कुटुंबात, नातेवाईकांत गुंतून गेली. इतकी, की कोणत्याही कार्यक्रमात माझी अनुपस्थिती कोणाला जाणवलीच नाही! तिनं आईबाबांबरोबर आमच्या गावी जायलाही सुरुवात केली. ती खूप मेहनती, अभ्यासू, हुशार आणि जबाबदार आहे हे तिनं सुरुवातीच्या काही दिवसांतच सिद्ध केलं. आमचं नातं यामुळे आणखी मजबूत झालं. दोघांचे करिअर प्लॅन्स ठरलेले होते. तिनं तिच्या गुणांचा नेहमी चांगला उपयोग करून घ्यावा यासाठी मी तिला प्रोत्साहन देत होतो, तशीच ती मला माझ्या करिअरसाठी सतत पाठिंबा देत होती. आम्ही दोघांनी भारतात स्थायिक व्हायचं ठरवलं. आमच्या करिअर- बरोबर होणाऱ्या बाळाला सगळे संस्कार मिळावेत, आजी-आजोबांचं प्रेम मिळावं हा हेतू. मला नवीन नोकरी मिळाली. अश्विनीनंही ‘आयडीबीआय’मध्ये नोकरी केली, पण गरोदरपणामुळे तिला ‘ब्रेक’ घ्यावा लागला. तेव्हा मला समजलं, की प्रत्येक स्त्रीच्या संपूर्ण आयुष्यात खूप आव्हानं असतात. स्वत:चं घर सोडणं, नवीन कुटुंबाला समजून घेणं, गर्भारपण, करिअर, माहेरची काळजी, सासरच्या घरातली वेगवेगळी आव्हानं.. आम्हाला कन्यारत्न झालं आणि आयुष्याला दुसरं वळण मिळालं. बाळाचे डायपर बदला, रात्रभर जागे राहा, तरीही त्याच उत्साहानं सकाळी ऑफिसला जाणं, संध्याकाळी त्याच उत्साहानं घरी येणं हे चक्र. पण मला त्याचा थकवा कधी जाणवला नाही. बाळाचं नाव आर्या ठेवलं. या सगळय़ात आशूला घर बघणं, बाळाकडे लक्ष देणं आणि नवीन नोकरीसाठी स्वत:ला तयार करणं हे सर्व करायचं होतं. तिचं लग्नाआधीचं जीवन अतिशय वेगळं होतं, पण लग्नानंतर आमच्यापुढे बरीच आव्हान आली आणि आम्ही एकमेकांबरोबर घट्ट उभे राहिलो. मग आव्हान भावनिक, आर्थिक, वैद्यकीय वा इतर काहीही असो. अश्विनी एका कंपनीसाठी ‘सेल्स आणि क्वालिटी कंट्रोल’ पदावर काम करू लागली आणि मी माहिती तंत्रज्ञान कंपनीसाठी ‘ट्रॅव्हल्स स्पेशलिस्ट’ म्हणून काम करत होतो. आर्या दोन वर्षांची असताना आशूला ऑफिसच्या कामासाठी काही काळ युरोपला जाण्याची संधी आली. पण बाळाच्या काळजीनं आणि घरातले तयार होतील की नाही या भीतीनं तिचं ठरत नव्हतं. एवढय़ा चांगल्या संधीला नाही म्हणणं मला चुकीचं वाटलं. मी आणि घरातल्यांनी तिला युरोपला जाण्यासाठी प्रोत्साहनच दिलं. बाळाची संपूर्ण काळजी मी घेईन याची खात्री दिली. तिची पहिली परदेशवारी सफल ठरली. त्यानंतर याच आत्मविश्वासानं आणखी दोनदा वेगवेगळय़ा देशांत ऑफिसच्या कामानिमित्त ती जाऊन आली. तिच्या पािठब्यानं मी नोकरीसह माझा ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चा व्यवसाय सुरू केला. त्यात मला पहिल्यापासूनच रस. तशीच नृत्य ही आशूची आवड. मी खात्रीनं सांगू शकतो, की तिच्या नृत्य सादरीकरणानंतर संपूर्ण गर्दीत सगळय़ात आनंदी मी असतो आणि यापुढेही असेन.

आता आर्या शाळेत जाऊ लागली आहे. चांगले पालक होण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. काळ किती पटकन निघून जातो! आम्ही पुन्हा भेटू, आमचं लग्न होईल, आम्हाला मूल असेल, सुंदर कुटुंब असेल, असं पूर्वी आम्हाला वाटलं नव्हतं. हे सर्व घडलं, कारण, ‘इतनी शिद्दत से मैंने..!’
atul.kamble88@gmail.com
velvetkavisha@gmail.com