रोहिणी हट्टंगडी hattangadyrohini@gmail.com

‘अर्थ’ या चित्रपटामुळे दिग्दर्शक महेश भट यांच्याशी ओळख होण्याआधी माझं हिंदी ‘फिल्म इंडस्ट्री’बद्दलचं ज्ञान शून्य होतं. ‘अर्थ’मधली माझी भूमिका लहानशी होती खरी, पण ‘एवढीशी भूमिका स्वीकारावी का?’ असा विचार मनात कधी आला नाही. ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबांच्या भूमिके नंतर माझ्याकडे माझ्या वयापेक्षा वयस्कर भूमिकाच येऊ लागल्या. त्यातली एक वेगळी आणि चांगली भूमिका होती ‘सारांश’मधली; पण माझ्यापेक्षा वयानं मोठय़ा असलेल्या कित्येक हिरोंच्या आईच्या भूमिकाही मी के ल्या आहेत. समोरचा चांगलं काम करणारा असेल, तर चित्रपट कसाही असला तरी काम करायला हुरूप येतो!    

What Abu Azmi Said?
अबू आझमींचं पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उत्तर, म्हणाले; “होय मी नाराज आहे”
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
CIDCO lottery winners, possession of home
दोन वर्षांपासून ताबा न मिळालेले लाभार्थी सिडकोच्या दारी

‘गांधी’ चित्रपटाचं शूटिंग संपलं आणि मी मुंबईत परत आले. बरेच दिवस घरापासून लांब होते. सासूबाई सांभाळत होत्या सर्व. आता थोडं तिथे बघायला हवं, त्यामुळे ‘आता काय?’ असा प्रश्न मनात आला नाही किंवा ‘काम असं लवकर थोडंच मिळणार आहे?’ हे कदाचित गृहीत धरलं होतं, त्यामुळे असेल, पण त्याचा फार विचारच करत नव्हते. ती ‘इनसिक्युरिटी’ तेव्हा जाणवली नाही हे खरं. (आता माझ्या दूरचित्रवाणीवरच्या दोन मालिका अचानक बंद झाल्या आहेत, तर तो प्रश्न माझ्या मनात क्षणभर का होईना, डोकावून गेलाच! असो.)

तर अचानक एक दिवस दिग्दर्शक महेश भट यांच्याकडून निरोप आला, ‘भेटायला येऊ शकता का?’ मला निरोप पोहोचवणारी किरण वैराळे (त्या चित्रपटात तीपण काम करणार होती.) तिनंच दुसऱ्या दिवशीची भेटायची तारीख ठरवली आणि मी महेश भट यांच्या घरी गेले. तोपर्यंत माझं ‘फिल्म इंडस्ट्री’तलं ज्ञान शून्य होतं. त्यांनी ‘अर्थ’मधली कामवाल्या बाईची भूमिका मला देऊ के ली. आता मागे वळून पाहाताना जाणवतंय, ‘मी एवढय़ा मोठय़ा ‘गांधी’मध्ये काम केलंय, एवढासा रोल मी स्वीकारू की नको?’ असा कोणताच विचार माझ्या मनात आला नाही. भूमिका छोटी होती, पण महत्त्वाची होती. शबाना (आझमी), स्मिता (पाटील), कुलभूषण खरबंदा असे नामांकित कलाकार त्यात काम करत होते, विषयही खूप छान होता. मी तयार झाले, चित्रीकरण दोन-चार दिवसांतच सुरू होणार होतं. फिल्म ‘स्मॉल बजेट’ होती. माझा पहिला दिवस, शबानाच्या घरातला प्रसंग.  महेशच्या स्वत:च्या घरात चित्रीकरण होतं. युनिटही छोटंच! मला सीन दिला गेला. मी फरशी पुसता पुसता शबानाशी बोलते, असा प्रसंग होता. मी तो वाचला. बी. आर. इशारांनी लिहिलेले संवाद. यूपी-बिहारकडची भाषा. मग साडी-ब्लाऊज आला, तर साडी नऊवार होती. मी बुचकळ्यात! नऊवार आणि ‘हे’ संवाद? असिस्टंटला बोलावून विचारलं, ‘‘अरे, मी महाराष्ट्रीय बाई आहे का?..’’ ‘‘हो.’’ त्याचं उत्तर. ‘‘मग हे असे संवाद ती कशी बोलणार?’’ तो किंचित गोंधळला. मी म्हटलं, ‘‘मी महेशजींशी बोलू का?’’ त्यानं त्यांना बोलावून आणलं. म्हटलं, मला सगळी ‘बॅकग्राऊंड’ द्या. मी झोपडपट्टीत राहाणारी, मराठी, नवरा दारूत पैसे उडवणारा, पण हिला आपल्या मुलीला शिकवायचं आहे वगैरे महेशनं सांगितलं. म्हटलं, ‘‘मुद्दा असा आहे, की झोपडपट्टीत राहाणारी मराठी बाई थेट ‘यूपी’ची भाषा कशी बोलेल? मी मध्ये-मध्ये मराठी शब्द टाकू का?’’ ‘‘हो चालेल,’’ तो  म्हणाला. तरी मला पटेना. म्हटलं, ‘‘मी जे आहे तेच अर्थ न बदलता मराठी-हिंदी बोलले तर चालेल?’’ ‘‘म्हणजे कसं?..’’ मी एक वाक्य म्हणून दाखवलं महेशला. त्याला पटलं. म्हणाला, ‘‘असिस्टंटला पूर्ण सीन कसा म्हणशील ते सांग. तो लिहून घेऊन मला दाखवेल.’’ प्रत्येक भाषेत आपापले वाक् प्रचार, म्हणी असतात आणि अनेकदा त्या-त्या भागातल्या रूढी-परंपरा त्यात प्रतीत होतात. आता बघा, विधी तेच असले तरी, आपल्याकडे लग्नात सप्तपदी, कन्यादान याचं जास्त महत्त्व. तिकडे ‘सात फेरे’. ‘ज्याच्याबरोबर सात पावलं चालले आहे’ किंवा ‘ज्याच्याशी पदराची गाठ बांधली आहे’ हे आपण म्हणतो किंवा ‘ज्याच्या नावाचं कुंकू लावलंय’ हे आपल्याकडे आणि ‘माँगमें सिंदूर’ तिकडे! आपण विचार ज्या भाषेत करतो, तेच वेगळ्या भाषेत बोलताना भाषांतरित होणार ना! अडाणी मराठी बाई, ऐकून हिंदी बोलणारी, कसं बोलेल तसं मी बोलले. गावरान भाषा, हेल आणि हिंदी. गमतीदार मिश्रण. माझ्या लहानपणी आमच्याकडे कामाला असलेल्या शांताबाईंची मुलगी माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान. माझ्याच शाळेत जायची. तिला आणि आपल्या धाकटय़ा मुलाला शिकवायचं हे शांताबाईंच्या मनाशी पक्कं होतं. हे उदाहरण समोर असताना ‘अर्थ’मधली बाई साकारणं फार अवघड नव्हतं.

महेश भटबरोबर दुसरा उल्लेखनीय चित्रपट ‘सारांश’. फार मजा आली तो सिनेमा करताना. सुरुवातीला जेव्हा महेशनं मला सांगितलं, की हा चित्रपट म्हातारा-म्हातारीचा आहे, तेव्हा मी नाहीच म्हटलं. कारण तोपर्यंत कस्तुरबाच्या ‘इमेज’मुळे मला फक्त आईच्याच भूमिका ‘ऑफर’ केल्या जात होत्या. म्हटलं, ‘‘महेश तूसुद्धा?’’ ‘‘अगं बाई, तू स्टोरी तरी ऐकशील? मग सांग मला!’’ तो म्हणाला. त्यानं पटकथा सांगितली आणि मी तिथल्या तिथे ‘करणार!’ म्हणून सांगितलं. त्यातली ‘मि. प्रधान’ची भूमिका कोण करणार ते ठरत नव्हतं. कानावर आलं, की ‘राजश्री फिल्म्स’- जे निर्माते होते त्यांना त्या भूमिकेसाठी संजीव कुमार हवे होते. वॉव! माझा जीव सुपाएवढा! डोळ्यांत चांदण्या चमकल्या. संजीव कुमारबरोबर काम करायला मिळणार.. पण महेशला त्याआधी बरोबर काम करूनही संजीव कुमार नको होता. त्याचं म्हणणं होतं, की स्टारला पडद्यावर पाहाताना तो कितीही चांगला अभिनेता असला तरी तो खरा वाटत नाही. ‘स्टार’चं ‘बॅगेज’ त्या भूमिकेला त्याला नको होतं. हो-नाही करता करता शेवटी राजजी (बडजात्या) म्हणाले, की दिग्दर्शकाला जे हवं आहे ते होऊ दे आणि अनुपम खेरच्या पदरात ती भूमिका पडली. आम्ही दोघेही आमच्या भूमिकेसाठी वयानं लहान, पण सुहास भालेकर भाऊंच्या भूमिकेत आले आणि गणितच जमून गेलं. मदन जैन आमच्या ‘मजमा’ ग्रुपमध्ये होता आणि सोनी राजदानशी गोविंद निहलानींच्या ‘पार्टी’ चित्रपटात ओळख झाली होती. राजकीय नेत्याच्या भूमिकेत निळू फुले. मग काय मज्जाच मज्जा! कॉस्च्यूमसाठी अमाल अलाना. ‘गांधी’मध्ये ती ‘सेट डेकोरेटर’ होती! तिला त्यांनी वेशभूषा करायची विनंती केली आणि आमची नावं ऐकून असेल किंवा चित्रपटाची कथा ऐकून म्हणा, ती राजी झाली.  तिचं बालपण मुंबईतच गेलेलं. शिवाजी पार्क तिला नवीन नव्हतंच. पूर्ण चित्रपटात कुठेही मराठी पार्श्वभूमी आपण विसरू शकत नाही. तिनं मला जेव्हा दोरव्याचा ब्लाऊज आणि त्यावर घालायला बिनहाताचा लोकरीचा स्वेटर दिला तेव्हा मी उडीच मारली! म्हटलं, ‘‘हे कसं गं सुचलं तुला?’’ त्या एका स्वेटरनं वेगळाच उठाव मिळाला मला. एक ‘कॅरेक्टर’ मिळालं. आमचा सेट उभारला होता मेहबूब स्टुडिओमध्ये, पण आम्ही जेव्हा ‘आऊटडोअर’चे सीन करायला प्रत्यक्ष शिवाजी पार्कच्या ‘गायत्री निलायम’ला गेलो तेव्हा सेट केवढा हुबेहूब असू शकतो ते समजलं. शिवाजी पार्कला पोहोचलो, तयार झालो. शॉट लागत होता, बराच वेळ होता हातात. बोलता बोलता मनात आलं, अशीच एक चक्कर मारावी त्या रस्त्यावर. अनुपमनं दुजोरा दिला आणि आम्ही ‘म्हातारा-म्हातारी’ चक्क कॅडल रोडच्या नाक्यापर्यंत जाऊन आलो, ‘कॅरेक्टर’मध्ये. दुपारची ४ ची वेळ होती. रहदारी होती. आम्ही मेकअपमध्ये होतो, पण कोणी वळूनसुद्धा पाहिलं नाही! आम्हाला मात्र गंमत वाटत होती.

चित्रीकरण सुरू झालं. झपाटल्यासारखे काम करत होतो. सकाळी आम्ही आलो की सीन हातात मिळायचा. लगेच तयार न होताच सेटवर जायचं. कॅमेरामन अदीप टंडन आणि महेश असायचेच. सीन हालचालींसकट बसवायचा. त्याबरहुकूम किंवा अँगलच्या दृष्टीनं थोडे फेरबदल करून मग तयार व्हायला जायचं. असं केल्यामुळे सर्वानाच सीन लक्षात यायचा, कुठे काय करायचं हे ठरवता यायचं. सीन संपेपर्यंत आम्ही कोणीच सेटवरून हलत नसू. आपला शॉट नसेल तरी कॅमेऱ्यामागे किंवा महेशजवळ बसून एकमेकांचे शॉट्स बघायचो. कधीकधी काही सुचवायचोही. त्यात कोणाला कधी काही वावगं वाटलं नाही. कधी सुचवलेलं चांगलं असलं, ते आवडलं, तर महेश, ‘‘इसके लिये मेरी तरफसे पाँच रुपिया!’’ असं म्हणायचा. आम्ही सर्वानीच आपापली बक्षिसं जपून ठेवली आहेत. खजिनाच तो!

बी. व्ही. प्रधान आणि पार्वती प्रधान या जोडप्याच्या आयुष्यात आलेल्या मोठय़ा वादळाला दोघे आपापल्या परीनं सामोरे जातात.  मुलाच्या मृत्यूमुळे जीवनातली आशा हरवलेला बाप, पण त्याच वेळी मुलगा परत येणार आहे या एकाच आशेवर जगणारी आई. नंतर जीवनात घडलेल्या प्रसंगांना सामोरं जात असताना जीवनाचा अर्थ सापडलेला बाप आणि ज्या आशेवर जगत होती ती आशा हिरावून गेल्यावर आयुष्यातला रस हरवून गेलेली आई. पण शेवटी जीवन पुढे जात असतं, ते संपत नाही, वेगळ्या रूपात आपल्या पुढे येत असतं. अशा सकारात्मक ‘नोट’वर हा चित्रपट संपतो. मला वाटतं, वयस्कांची प्रमुख भूमिका असणारी ही फिल्म धाडसाची होती. बॉक्स ऑफिसवर फार न चालूनही आपण एक चांगला चित्रपट केल्याचं समाधान वेगळंच असतं.

महेशबरोबर मी आणखी एक चित्रपट के ला, ‘ठिकाना’. स्मिता पाटील, अनिल कपूर, अमृता सिंग वगैरे नावं होती त्यात. मी स्मिता आणि अनिल कपूरची आई! यातली आई आणखी वेगळी. काहीशी हट्टी, मुलांच्या सुखासाठी आपणच बरोबर करतोय, या संभ्रमात राहाणारी. हा चित्रपट करतानाही मजा आली. काही म्हणा, समोर काम करणारा चांगला कलाकार असेल ना, तर एखादा प्रसंग म्हणा, चित्रपट म्हणा, कसाही असेल, तरी काम करायला एक हुरूप येतो. तो कलाकार तुमच्या ओळखीचा नसला तरी समोरच्यानं बोललेल्या पहिल्या शब्दावरून, त्याच्या पहिल्या हालचालीवरून हे कळतं. आम्ही सीन करण्याआधी एकमेकांबरोबर तो वाचतो. त्या वेळी एकमेकांच्या आवाजाचा, त्यातल्या चढउताराचा अंदाज येतो आणि त्याप्रमाणे ‘टय़ुनिंग’ होतं. सीन करताना देवाणघेवाण होत असते. हे जरुरीचं असतं. बऱ्याचदा समोर एखादी मोठी व्यक्ती ‘स्टार’ असते, तेव्हा दडपण येतं. साहजिक आहे, पण ते सीनवर, तुमच्या सादरीकरणावर वरचढ  होऊ देता कामा नये. भीतीनं पोटात गोळा आला, तरी तो आपल्यापाशी ठेवून विश्वासानं काम केलं, तर तुमच्याच फायद्याचं असतं. मी अनेक चित्रपटांमध्ये माझ्यापेक्षा वयानं मोठय़ा असलेल्या हिरोंची आई झालेली आहे. अगदी धर्मेद्र, जितेंद्र, अमिताभ बच्चन यांसारख्या हिरोंची. प्राणसाब, दिलीपकुमार यांच्या पत्नीच्या भूमिका केल्या आहेत. नाही म्हटलं तरी दडपण होतंच त्या वेळी. पण अनुभव असा, की कोणीही ते जाणवूनही आणखी ‘कॉन्शस’ केलं नाही.  तुम्ही दिलेलं काम चोख करताना दिसलात की मग सगळं सुरळीत चालतं. त्यामुळे आजही एखादा नवशिका समोर आला, तर त्याला आत्मविश्वास देण्याचं माझं काम आहे असं मी मानते. प्रयत्न करताना दिसला तर बरंच वाटतं. नाही तर मग.. ‘तुझा तू बाबा’ असं म्हणून गप्प राहाणं पसंत करते! असो.

असेच काही चित्रपट, नाटकांबद्दल.. त्यातल्या अनुभवांबद्दल.. पुढच्या लेखात!