मंजिरी

डिसेंबरमध्ये एका विमानातल्या हवाईसुंदरीचा आणि प्रवाशाचा जेवणावरून झालेला वाद समाजमाध्यमाद्वारे प्रकाशात आला आणि त्यानंतर अनेकांनी आपले अनुभव व्यक्त केले, बरेचसे प्रवाशांच्या विचित्र मानसिकतेचे. विमान भारतातच प्रवास करणारं असो वा परदेशात, काही प्रवाशांची मानसिकता ‘आम्ही राजे’ अशीच असते. हवाईसुंदरी या शब्दालाच ‘ग्लॅमर’चा स्पर्श आहे. ती ‘प्रेझेंटेबल’ असावी, हा मापदंड त्यांनीही मान्य केला असला, तरी जेव्हा एखादा प्रवासी ‘आम्ही तिकिटाचे पैसे भरलेत, हवाईसुंदरी चांगल्या दिसणाऱ्याच हव्यात,’ अशी विचित्र भूमिका घेतो किंवा ‘प्रवाशांची सेवा हे त्यांचं कामच आहे’ असं म्हणत गैरवर्तन करतो, तेव्हा ती समस्या होते. नोकरीच्या अनियमित वेळा, घरापासून दूर राहणं, हे हवाईसुंदरींनी स्वीकारलंच आहे, पण प्रवाशांकडून किमान सौजन्याची आणि स्त्री म्हणून आदराची अपेक्षा त्यांना निश्चितच आहे.

trees, Eastern Expressway,
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग, पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
panvel dr sujay vikhe patil marathi news,
पारनेरचा प्रचार कामोठेमध्ये
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

‘देवियों और सज्जनों, कुर्सी की पेटी बांध लीजिए..’एकदा का विमानात बसलो, की आपण एका वेगळय़ाच जगात जातो. तिथे आपलं पहिलं स्वागत होतं ते ‘एअर होस्टेस’ किंवा आपण ज्यांना हवाईसुंदरी म्हणतो त्यांच्याकडून. त्या सर्वकाही मनापासून सगळय़ा प्रवाशांना सांगत असतात. कुणाचं सामान नीट बसत नसतं, कुणाला जागा नीट ‘अॅडजस्ट’ होत नसते, अनेकांना विमान सुटण्यापूर्वी ‘सेल्फी’साठी स्वत:ला अॅडजस्ट करायचं असतं.. ‘एअर होस्टेस त्याचं सांगण्याचं काम करताहेत, आपला काय संबंध त्यांच्या सांगण्याशी’, असाच बहुतेकांचा आविर्भाव असतो. वारंवार सूचना देऊनही अनेकांनी ‘कुर्सी की पेटी’ बांधलेलीच नसते. सगळे नियम सांगून होतात आणि हवाईसुंदरी प्रत्येकाच्या जागेपर्यंत पोहोचतात. ज्यांनी बेल्ट लावलेला नाही, त्यांना थांबून सूचना देतात. ‘मला नाही जमत बेल्ट बांधणं, तुम्हीच बांधून द्या’, ‘माझं साहित्य तेवढं वर लगेज रॅकमध्ये ठेवा’, ‘मला लगेच पाणी हवंय’- ‘एअर होस्टेसचं कामच आहे ते’ या विचारधारेखाली अशा अनेक मागण्या सुरूच होतात आणि मग वागण्यातली अरेरावी अनेकदा वादाला कारण ठरू शकते.

हवाईसुंदरी या फक्त आणि फक्त प्रवाशांच्या सेवेसाठीच आहेत, असं मानणारा एक वर्ग अगदी प्रत्येक विमानात असतोच, असा हवाईसुंदरींचा सार्वत्रिक अनुभव आहे. गोष्टी जेव्हा गैरवर्तनापर्यंत, नको त्या थराला जातात तेव्हा मात्र त्या अनुभवामागची मानसिकता अधोरेखित होते. प्रवाशांचं गैरवर्तन आणि हवाईसुंदरींचा ‘पेशन्स’ हा विषय अलीकडच्या काळातल्या घटनांपुरता सीमित नक्कीच नाही. एक वर्षांचा कामाचा अनुभव असलेली हवाईसुंदरी असो किंवा २५ वर्षांचा दीर्घ अनुभव असलेली, प्रत्येकीला कधी ना कधी प्रवाशांचं गैरवर्तन किंवा अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलंच आहे. आता अनेक जणी या विषयावर उघडपणे बोलत आहेत. पूर्वी या घटना नव्हत्या असं अजिबात नाही. परंतु आता व्यक्त होण्याला समाजमाध्यमांची जोड मिळाल्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचतं, असं म्हणता येईल. २५ वर्ष ‘ब्रिटिश एअरवेज’ मध्ये काम करणाऱ्या तनुश्री रक्षित आणि सध्याची प्रसिद्ध अभिनेत्री आणि पूर्वी हवाईसुंदरी म्हणून काम करणारीअभिज्ञा भावे या त्यास दुजोरा देतात.

हवाईसुंदरींचा प्रवास कुठून सुरू झाला हे बघितलं, तर तिला ‘बाई’ म्हणून विशिष्ट(लैंगिक) दृष्टिकोनातून समोर आणणं हा इतिहास आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अगदी सुरुवातीच्या काळात विमानांमध्ये सेवा देण्यासाठी फक्त पुरुषांना संधी दिली जात होती. १९३० मध्ये पहिल्यांदाच एका स्त्रीची विमानसेवेसाठी निवड झाली. ‘युनायटेड एअरलाइन्स’नं ही निवड केली होती आणि सेवा देणारी ती पहिली स्त्री होती एलन चर्च. प्रवाशांच्या सोयीसाठी नर्सची भूमिका बजावेल अशा स्त्रीची हवाईसुंदरी म्हणून निवड, असा तेव्हा उद्देश होता. नंतर काही काळ निवड करताना ती आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत करू शकेल, असा उद्देश कायम राहिला. हळूहळू स्त्री म्हणून, ‘मार्केटिंग’च्या उद्देशानं तिच्याकडे बघितलं जाऊ लागलं. १९६० मध्ये अमेरिकेत एअरलाइन्सच्या ज्या जाहिराती केल्या गेल्या, त्यात हा उद्देश स्पष्ट दिसत होता. हवाईसुंदरी म्हणून काम करणाऱ्या बाईची ‘फिगर’ कशी असावी, अगदी फिगरच्या साइझ काय असतील, इथपर्यंत स्पष्टपणे आणि जाहीरपणे जाहिराती केल्या गेल्या. नंतर संपूर्ण जगानं त्याचं अनुकरण केलं. भारतात हवाईसुंदरी म्हणून स्त्रियांनी काम करायला सुरुवात झाली ती साधारण १९४० पासून. सुरुवातीला पूर्णपणे पाश्चिमात्य पद्धतीचं अनुकरण भारतीय हवाई सुंदरींच्या बाबतीतही केलं गेलं. हवाईसुंदरी अधिकाधिक ‘प्रेझेंटेबल’ राहील अशीच अपेक्षा राहिली. १९६० मध्ये यात बदल झाला आणि भारतीय हवाईसुंदरी साडी किंवा सलवार-कमीज अशा भारतीय पोशाखात आली. जागतिकीकरणानंतर पुन्हा या गोष्टींत बदल झाल्याचं दिसतं. लोकांच्या मागणीनुसार हवाईसुंदरी पुन्हा ‘प्रेझेंटेबल’ होऊ लागली. पाश्चिमात्य पेहराव तिला आकर्षक बनवतो आणि तिला आकर्षक राहणंच गरजेचं आहे, हा हवाईसुंदरींसाठी नियम होत गेला.

हवाईसुंदरींसाठी छान राहणं किंवा ‘फिगर मेन्टेन करणं’ ही समस्या नव्हती आणि आजही दिसत नाही. समस्या आहे ती त्यांच्याकडे पाहणाऱ्या नजरेची आणि त्यांच्यावर दाखवल्या जाणाऱ्या मालकीहक्काची. ‘आम्ही प्रवासासाठी अधिक पैसे मोजले आहेत, हवाईसुंदरी चांगल्याच हव्यात,’ अशा पद्धतीनं एखादा प्रवासी मागणी करतो तेव्हा ती समस्या होते. हवाईसुंदरी म्हणून व्यवसाय निवडणं म्हणजे बाईपणाचा स्वाभिमान विकणं नाही. समोरच्या माणसानं तिकिटाचे पैसे देऊन दोन-पाच किंवा दहा-पंधरा तासांसाठी तो स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न केला तर ती समस्या होते.
कशा येतात समस्या? एक घटना सांगता येईल. लंडनहून मुंबईला येणारं विमान. परदेशी प्रवासात एका मर्यादेपर्यंत अल्कोहोल मोफत पुरवलं जातं. एका प्रवाशानं जरा जास्तच अल्कोहोलचं सेवन केलं होतं. त्याला गोष्टी समजेनाशा झाल्या आहेत हे हवाईसुंदरींना जाणवलं होतं. वरिष्ठांना त्यांनी त्याबाबत कल्पना दिली गेली होती. यापुढे त्याला ड्रिंक्स न पुरवण्याच्या सूचना आल्या होत्या. विमानात सॅटेलाइट फोन असतात. त्या व्यक्तीनं तसा फोन उपलब्ध करून देण्याची विनंती हवाईसुंदरींना केली. त्यासाठीचे चार्जेस कार्डद्वारेच भरावे लागतात. एअरलाइन्सच्या नियमानुसार हवाईसुंदरी ते कार्ड स्वत: स्वाइप करत नाहीत. सगळं नियमानं होतं. अचानक त्या व्यक्तीचं कार्ड सापडेना. ती उंच व्यक्ती अचानक हवाईसुंदरीच्या बाजूस झुकली. हवाईसुंदरी सावध होती म्हणून सावरली. ती व्यक्ती अतिशय उद्धट आणि आक्रमकपणे वागत होती. कार्ड घेतल्याचा आरोप त्या हवाईसुंदरीवरच करण्यात आला. अशा प्रसंगाची वरिष्ठांना कल्पना असेल तर ते तातडीनं कारवाई करतात आणि त्या व्यक्तीस विमान उतरवल्यानंतर पोलिसांच्या ताब्यातही देता येतं. पंचवीस वर्षांपूर्वी तनुश्री रक्षित यांच्याबाबतीत घडलेला हा प्रसंग त्या जसाच्या तसा सांगतात. त्या आता विमानसेवेत नाहीत, मात्र अशा अनेक प्रसंगांतून मार्ग काढावे लागतात असं त्या सांगतात. त्या सांगतात, ‘‘विमानाच्या उड्डाणाबरोबर बाई कितीतरी गोष्टी मागे टाकत उंच झेपावत असते.’’ विमानात रोजचा दिवस नवा, अशा वृत्तीनं जगलेल्या तनुश्री यांच्याकडे अनुभवांची खाण आहे. ‘ब्रिटिश एअरवेज’मध्ये सहज निवड झालेल्या तनुश्री सांगतात, ‘‘पेशन्स तो चाहिएही, और आगे वाले कों हँडल करना आना चाहिए. हेच आहे समस्यांचं उत्तर. हवाईसुंदरीशी गैरवर्तणूक करणं हे जगभरात सगळीकडे दिसतं. पण मला वाटतं, की प्रत्येक क्षेत्रात अशा काही काळय़ा बाजू असतात.’’ तनुश्री आपल्या अनुभवांवरून दिसलेल्या, भारतीयांमधल्या एका विशिष्ट मानसिकतेबद्दल मात्र राग व्यक्त करतात. ‘फुकट मिळतंय म्हणून प्या’ या वृत्तीचा तिटकारा वाटतो, असं त्या सांगतात. दिल्लीहून निघालेल्या विमानात सुरुवातीच्या अध्र्या तासात बार उघडल्यासारखं वाटायचं. अशा अनुभवांनी तयार झालेला हा तिटकारा आहे. पूर्वी विमानात ‘स्मोकिंग झोन’ असायचे. त्या काळातल्या आठवणीही भयानकच होत्या, असं त्या सांगतात. अभिज्ञा भावे सांगतात, ‘‘विमान प्रवासात प्रवाशांचं गैरवर्तन, उद्धट वागणूक याला अल्कोहोलचं सेवन हे कारण आहेच. पण लोकांची मनोवृत्ती अधिक कारणीभूत आहे.’’ या व्यवसायामधल्या अनेक जणी भेटतात तेव्हा त्यांची व्यवसायाबद्दल तक्रार नसते. त्यांना भीती वाटते ती लोकांच्या मानसिकतेची.

प्रत्येक हवाईसुंदरीचा प्रवास सुरू होतो, घरच्या लोकांबरोबर फारसं राहायला न मिळणं, कुटुंबीयांच्या समारंभांना उपस्थित नसणं, खाण्याची आबाळ, वेळांची बिघडणारी गणितं, या सगळय़ांचं दु:ख न मानता ती आपल्या स्वप्नांसह सर्व प्रवाशांसह आकाशात झेपावते. प्रत्यक्षात काम करताना मात्र असा एखादा अनुभव तिला दुखावतो. अशा वेळी स्वत:च्या कामाला दर्जा आहे हे तिला स्वत:ला पटवून द्यावं लागतं. पण काही वेळा प्रवाशांची मनोवृत्ती तिच्या स्वप्नांचं विमान क्षणात ‘लँड’ करते!

प्रणवी चंदनासुद्धा असेच अनुभव सांगतात. देशांतर्गत आणि परदेशी विमानसेवेत प्रणवी यांना १६ वर्षांचा अनुभव आहे. त्या म्हणतात, ‘‘विमानात असताना अनुभवास येणारा ‘टब्र्युलन्स’सारखाच अनुभव आमच्याही प्रत्येक प्रवासात असतो, कधी प्रवाशांचे खूप चांगले अनुभव येतात. पण कधी एखादा प्रवासी पूर्ण प्रवासाची मजा घालवतो. आमच्याच बाबतीत नव्हे तर इतर प्रवाशांनाही काही त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.’’ मात्र विमानात सेवा देणाऱ्या सर्वासाठी कायदे खूप चांगले आहेत. त्यांचं नियमन करणंही सहज शक्य असतं. त्यामुळे तसा खूप त्रास होत नाही, असं त्यांना वाटतं. त्रास झालाच तर तो आपल्या जवळच्या माणसांना फार वेळ देता येत नाही, अशा गोष्टींचा. जो वेगवेगळय़ा क्षेत्रांत असतोच. आपणही विमान प्रवास करतो. कधी छान, गोड हसणारी हवाईसुंदरी सर्वाना केवढी मदत करतेय असं पटकन जाणवतं. एखादं मूल रडत असेल तर त्याला हसवायचा प्रयत्न करते. इथपासून ते जेव्हा मोठय़ा दंगलींसारख्या घटना घडतात, तेव्हाही विमान प्रवास सुरू असतोच. ९/११ च्या घटनेनंतर न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमान प्रवासात हवाईसुंदरींना लोकांना सतत धीर द्यावा लागत होता. असं असलं तरी वागताना मात्र त्यांनी अजिबात चुकायचं नाही, अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. याबद्दल हवाईसुंदरी रसिका वोरा म्हणतात, ‘‘आम्ही आमच्या परीनं चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी ते समजून घ्यायला हवं.’’
‘‘आपण मॉलमध्ये गेलो तरी तिथल्या सफाई कर्मचाऱ्याला कधी साधं थँक्यू म्हणत नाही. लहानपणापासून आपल्यावर असे संस्कार रुजतात. म्हणून मोठेपणी हवाईसुंदरीची सेवा देणाऱ्या व्यक्तीलाही आपण त्याच नजरेनं वागवतो,’’ अभिज्ञा प्रवाशांच्या मानसिकतेबद्दल सांगतात. ‘‘लहानपणासून शिष्टाचाराच्या काही गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत. इंग्रजांनी आपल्याला असं तुच्छतेनं वागवलं आणि इतक्या वर्षांनंतर आपण तेच मनात ठेवून समाजात रुबाबानं वागण्याच्या काही संकल्पना घेऊन वागतो. लंडनमध्ये अशा गोष्टी चालत नाहीत. पण भारतीयांना त्यांच्याकडून अशी वागणूक मिळाली आणि तीच आपण पुढे सुरू ठेवली.’’ हे अभिज्ञांचं ठाम मत.

हवाईसुंदरींबाबत गैरवर्तन होण्याच्या घटना याआधीही होत्या आणि आताही आहेत. फरक इतकाच आहे, की आता त्या बंद दाराआड लपून राहात नाहीत. कोणत्याही गोष्टीचा व्हिडीओ होतो आणि तो ‘व्हायरल’ होतो. याचा फायदा हवाईसुंदरींना नक्कीच आहे, जेणेकरून त्रास देणाऱ्या मनोवृत्ती जगापुढे येतात. भविष्यात त्रास कमी होऊ शकतात. न्याय मिळण्यासाठी मदत होते. मात्र त्याचा एक तोटाही दिसतो.

नाव उघड न करण्याच्या अटीवर एका हवाईसुंदरीनं सांगितलं, ‘‘एखाद्या दिवशी मेकअप कमी केला असेल तरी काही लोक लगेच ‘ट्वीट’ करतात. ‘तुमच्या कंपनीचा केबीन क्रू व्यवस्थित नव्हता’ किंवा ‘आम्ही अधिक पैसे मोजतो ते चांगल्या हवाईसुंदरी आणि सेवा मिळण्यासाठी’ असं हे लोक कंपनीतल्या महत्त्वाच्या व्यक्तींना टॅग करून समाजमाध्यमांवर पोस्ट करतात. कंपनीला व्यवसाय करायचा, वाढवायचा असतो. त्यामुळे त्यांना ग्राहकांना नाराज करता येत नाही.’’ तिथे उघडपणे गैरव्यवहार होत नसला तरी बाई ही ‘प्रेझेंटेबल’ वस्तू ठरते. हा अपमान सहन करणं हवाईसुंदरींना त्रासदायक वाटतं. हे मानसिक गैरवर्तनच म्हणावं लागेल.

१८५७ मध्ये स्त्रियांना घोडय़ावर बसणं, तलवारबाजी याचं प्रशिक्षण मोठय़ा प्रमाणात दिलं गेलं, तिला लढवय्यी बनवलं गेलं, असं इतिहास सांगतो. दीडशे वर्षांनंतरही आपण स्त्री सक्षमीकरणाच्या, सशक्तीकरणाच्या गोष्टी करतो आहोत. हवाईसुंदरी असो अथवा अन्य कोणत्याही व्यवसायातील स्त्री; तिला हवी आहे सुरक्षा आणि आदराची वागणूक.प्रत्येक हवाईसुंदरीच्या मनात येतं, की ‘आम्ही सक्षम आहोत. आमच्यासाठी कायदे आहेत. विमानात आम्ही एकटे नसतो हेदेखील आम्हाला माहीत आहे. सेवा देण्याची आमची तयारी आहे. आमचं घरदार, नाती दूर सारत आम्ही रोज नवा विचार घेऊन प्रवाशांबरोबर झेपावतो. नवा माणूस जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. नव्या नव्या संस्कृती बघतो. त्या झेपावण्याला आदराच्या पंखाचं बळ मिळू दे.’
ही झेप घेणारी स्त्री आता फक्त सेवा देण्यापुरतीच नाही, ती पायलटसुद्धा झाली आहे. तिच्या हातात तुमचं सारथ्यही अनेक ठिकाणी आलं आहे. ती सक्षम झाली आहे. गरज आहे तिला आदरानं वागणूक देण्याची. कितीही अडथळे आले तरी ती लढते आहे. तितक्याच मनापासून तुमच्यासाठी शुभेच्छा देते आहे, ‘आप की यात्रा सफल हो!’

chaturang@expressindia.com