scorecardresearch

जगण्याची ‘आत्मचरित्री’ ओळख!

कर्करोग एक आजार, पण एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद त्यात आहे. त्याच्या येण्यानं आयुष्याला काय मिळालं, हे सांगणारी अमेरिकेतले संगणकशास्त्राचे प्रसिद्ध प्रोफेसर रॅण्डी पॉश आणि त्यांची पत्नी जे. पॉश या दोघांची दोन स्वतंत्र आत्मचरित्रं.

जगण्याची ‘आत्मचरित्री’ ओळख!
रॅण्डी पॉश आणि जे. पॉश (‘पॅनक्रिअ‍ॅटिककॅन्सर अ‍ॅक्शन नेटवर्क’च्या यूटय़ूबरून साभार

सुनीती देव

कर्करोग एक आजार, पण एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलण्याची ताकद त्यात आहे. त्याच्या येण्यानं आयुष्याला काय मिळालं, हे सांगणारी अमेरिकेतले संगणकशास्त्राचे प्रसिद्ध प्रोफेसर रॅण्डी पॉश आणि त्यांची पत्नी जे. पॉश या दोघांची दोन स्वतंत्र आत्मचरित्रं. रॅण्डींचं आत्मचरित्र त्यांच्या वैज्ञानिक, विवेकवादी वृत्तीला अनुसरून, वस्तुनिष्ठ, तर ‘जे’चं आत्मचरित्र भावनिक पातळीवर लिहिलेलं. ती आगळीवेगळी अशासाठी, की जिथे रॅण्डी यांचं आत्मचरित्र संपतं, तिथपासून ‘जे’ यांच्या आत्मचरित्राला सुरुवात होते! जगण्याचा पुरेपूर उपभोग घ्यायला शिकवणाऱ्या, पती-पत्नींनी लिहिलेल्या आत्मचरित्रांचं हे कदाचित एकमेव उदाहरण असावं.. 

एक दिवस पुस्तकांच्या एका मोठय़ा दुकानात खरेदीसाठी गेले होते. हवी ती पुस्तकं घेतल्यावर एखादं चांगलं पुस्तक गवसतं का, हे शोधत होते. अचानक ‘ड्रीम न्यू ड्रीम्स: रीइमॅजिनिंग माय लाइफ आफ्टर लॉस’ (२०१२) हे लेखिका जे. पॉश यांचं आत्मचरित्र सापडलं. मलपृष्ठावरचा मजकूर वाचला. ‘दी लास्ट लेक्चर’ (२००८) या सर्वाधिक खप असलेल्या आत्मचरित्राचे लेखक रॅण्डी पॉश यांच्या त्या पत्नी होत हे समजलं. रॅण्डी पॉश यांचं हे पुस्तक मी पूर्वीच वाचलं होतं. आता पत्नीनंही लिहिलेलं आत्मचरित्र हाती पडल्यावर मी ते विकतच घेतलं. मला खूप उत्सुकता ही होती, की असा काही प्रयोग मराठीत केला गेला आहे का? मराठीच्या काही अभ्यासकांकडे, दर्दी वाचकांकडे याविषयी विचारणा केली; पण नकारार्थी उत्तर मिळालं.

रॅण्डी यांच्या आत्मचरित्राचं शब्दांकन त्यांचे घनिष्ठ मित्र आणि त्यांच्या ‘अखेरच्या व्याख्याना’ला जे हजर होते, ते जेफ्री झास्लो यांनी केलं आहे. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चे ते स्तंभलेखक आहेत. पुस्तकाचा मराठी अनुवाद अविनाश दर्प यांनी केला आहे. मराठीसहित एकूण पंचेचाळीस भाषांमध्ये हे आत्मचरित्र अनुवादित झालं आहे.

रॅण्डी आणि ‘जे’ या दोघांनीही अतिशय प्रांजळपणे आपापला जीवनप्रवास रेखाटला आहे. अनेक घटना, प्रसंग यांचं वर्णन दोघांच्याही आत्मचरित्रांत वाचायला मिळतं.  कुणावर आगपाखड नाही, की दूषणं देणं नाही. ‘जे’ला कधी रॅण्डीच्या वागण्याबद्दल तक्रार असायची, तर ती डायरीत लिहून ठेवत असे. रॅण्डीचं आत्मचरित्र त्यांच्या वैज्ञानिक, विवेकवादी वृत्तीला अनुसरून वस्तुनिष्ठपणे तुमच्यासमोर येतं. ‘जे’चं आत्मचरित्र हे भावनिक पातळीवर लिहिलेलं आहे. पारदर्शता हे दोन्ही आत्मचरित्रांचं वैशिष्टय़ आहे. रॅण्डीनं मोकळेपणानं स्वप्नं पाहू देणाऱ्या, त्याला खतपाणी घालणाऱ्या आपल्या आईवडिलांना पुस्तक अर्पण केलं आहे. तर ‘जे’नं आपलं आत्मचरित्र ज्या सर्व व्यक्तींनी अक्षरश: मृत्यूच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या प्रिय व्यक्तींची काळजी घेतली, सेवा केली, त्यांना अर्पण केलं आहे.

कोलंबियातल्या मेरीलॅण्ड इथे एका मध्यमवर्गीय, ख्रिश्चन कुटुंबात रॅण्डीचा जन्म झाला. आई-वडील, मोठी बहीण टॅमी, असं खाऊनपिऊन सुखी चौकोनी कुटुंब होतं. आई इंग्रजीची शिक्षिका, स्वभावानं कडक, हट्टी होती. तिचा रॅण्डीवर विलक्षण जीव होता. वडिलांनी द्वितीय महायुद्धात डॉक्टर म्हणून काम केलं. समाजकार्याची आवड म्हणून देशांतरीच्या मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी संस्था सुरू केली. तसंच थायलंडच्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केलं. मुलींचं शिक्षण व्हावं, त्यांच्यावर देहविक्रय करण्याची वेळ येऊ नये, हा उद्देश त्यामागे होता. आईवडील दोघंही काटकसरी. चिक्कूच होते वृत्तीनं! म्हणजे, एकदा सर्कस पाहिल्यावर पुन:पुन्हा ती पाहाण्याचं काय कारण? असं त्यांचं म्हणणं असे, पण याच आईवडिलांनी मुलांसाठी ‘वर्ड-बुक’ हा शब्दकोश आणि त्याच्या वेळोवेळी निघणाऱ्या पुरवण्या मात्र आनंदानं खरेदी केल्या होत्या. (कालांतरानं रॅण्डीला याच ‘वर्ड-बुक’मध्ये लिहिण्याची संधी मिळाली.) आईवडिलांचा, विशेषत: वडिलांचा रॅण्डींच्या व्यक्तिमत्त्वावर, जडणघडणीवर विलक्षण प्रभाव होता. सदैव खरं बोलावं, कारण शब्द हे तुमचं व्यक्तिमत्त्व असतं, कोणतंही शारीरिक काम कमी प्रतीचं नसतं, जवळचे कपडे निरुपयोगी झाल्याशिवाय नवीन खरेदी करायची नाही, इत्यादी त्यांची शिकवण रॅण्डीनं अंगी मुरवली होती. प्रतिष्ठेचं मानलं गेलेलं व्याख्यान द्यायलाही त्यांनं स्वत:जवळ होते तेच कपडे घातले होते.

‘जे’चं मूळ गाव व्हर्जिनिया. आईवडील, आजी, भाऊ, वहिनी, त्यांची दोन मुलं असं भरगच्च कुटुंब, नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात ‘तौलनिक साहित्य’ या विषयावर ती ‘आचार्य’ पदवीसाठी संशोधन करत होती. तसंच संगणक विभागात अंशकालीन नोकरीही करत होती. तिथे रॅण्डी ‘कॉम्प्युटर ग्राफिक’ शिकायला आला होता. तो पीटर्सबर्गला ‘कार्निजी मेलन विद्यापीठा’त ‘आभासी वास्तव आणि मानव-संगणक संबंध’ या विषयावर संशोधन करत होता. सहा फूट उंच, देखणा,  बुद्धिमान, विनोदाची उत्तम जाण असणाऱ्या रॅण्डीच्या प्रथम दर्शनातच ‘जे’ त्यांच्या प्रेमात पडली. ‘लव्ह अ‍ॅट फस्र्ट साईट’! परंतु तिचा कॉलेजमधल्या मित्राबरोबर प्रथम विवाह आणि नंतर घटस्फोट झालेला होता. या कटू अनुभवामुळे एकदम कुणावर विश्वास ठेवायला तिचं मन तयार होत नव्हतं. प्रियाराधन सुरू होतं. दोघांचंही बौद्धिक, भावनिकदृष्टय़ा जुळतही होतं. २० मे २००० रोजी पीटर्सबर्गमधल्या सुप्रसिद्ध व्हिक्टोरियन मॅन्शनच्या हिरवळीवर, शंभर वर्षांच्या जुन्या ओक वृक्षाच्या छायेत, अगदी जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत, साधेपणानं ते दोघं विवाहबद्ध झाले. विवाहानंतर चॅपेलहिलचं जुनं आयुष्य सोडून ‘जे’ पीटर्सबर्गला स्थलांतरित झाली. रॅण्डीशी विवाह हा अतिशय शहाणपणाचा निर्णय होता. त्याबद्दल ‘जे’ला कधीही पश्चात्ताप झाला नाही.

रॅण्डी ‘कार्निजी मेलान विद्यापीठा’त संगणक शास्त्रज्ञ, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक होता. त्याचं सर्व लक्ष त्याच्या करिअरवर केंद्रित होतं. ‘एम.ए.’च्या विद्यार्थ्यांना शिकवणं, आचार्य पदवीसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, परिषदांना उपस्थित राहाणं, निबंधवाचन करणं आदी. त्याचं त्याच्या व्यवसायावर विलक्षण प्रेम होतं; परंतु याचबरोबर तो गुणी मुलगा होता, प्रेमळ पती होता आणि वत्सल पिताही होता. त्यांना डिलन, लोगन आणि क्लोई ही मुलगी अशी तीन अपत्यं झाली. ‘जे’च्या बरोबरीनं तो घरकामात मदत करत असे. ब्रेकफास्ट तयार करणं, मुलांना सांभाळणं, त्यांना ‘अ‍ॅल्फिन पार्क’मध्ये नेणं, हे तो अतिशय आवडीनं करत असे.

सगळं छान, आनंदात सुरू असताना रॅण्डीला ‘पॅनक्रिअ‍ॅटिक कॅन्सर’नं गाठलं (२००६). यापुढे सुरू झाला तो कर्करोगाशी लढा. आता विद्यापीठात न जाता रॅण्डी घरूनच काम करत होता. मुलं वयानं इतकी लहान होती, की आपल्या वडिलांना गंभीर आजार झाला आहे हे त्यांना उमजतही नव्हतं. रोगाचं निदान झाल्यानंतर सर्व कुटुंब पीटर्सबर्गहून ‘जे’च्या माहेरगावी- व्हर्जिनियात स्थलांतरित झालं. रॅण्डी प्रचंड आशावादी होता. मरणाच्या दारात असूनही तो जीवनातला प्रत्येक क्षण आनंदानं जगत होता. रॅण्डी ब्लॉग लिहून आपल्या आजाराविषयी त्याच्या आजी/माजी विद्यार्थ्यांना, तसंच प्राध्यापक मित्रांना वेळोवेळी महिती देत होता.

  १८ मार्च २००७ ला रॅण्डीला ‘कार्निजी मेलन विद्यापीठा’त ‘अखेरचे व्याख्यान’ या मालिकेत व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केलं गेलं. अशा तऱ्हेची व्याख्यानमाला आयोजित करण्याची परंपरा त्या विद्यापीठात आहे. उद्देश हा, की वक्त्यानं आपल्या आयुष्याची संध्याकाळ जवळ आली आहे असं समजून आयुष्याचा ताळेबंद मांडावा. अनुभवांची, बौद्धिक संपत्ती पुढच्या पिढीच्या सुपूर्द करावी. रॅण्डीनं निमंत्रण स्वीकारलं खरं, परंतु त्याआधीच कर्करोगानं बरेच हातपाय पसरले होते. रॅण्डीजवळ खरोखरीच अल्पकाळ होता. तरीही त्यानं व्याख्यानाची चोख तयारी केली. भरपूर स्लाइड्स तयार केल्या. व्याख्यानाचं शीर्षक होतं ‘बालपणीची स्वप्ने’. त्या दिवशी ‘जे’चा वाढदिवस होता आणि खरं तर रॅण्डीच्या उपस्थितीतला तिचा हा शब्दश: शेवटचा वाढदिवस होता. जे व्याख्यानाच्या दिवशी विद्यापीठात पोहोचली. व्याख्यान ऐकायला विद्यापीठातले सहकारी, माजी विद्यार्थी, इतर विद्यापीठांमधले प्राध्यापक आमंत्रित होते. ऑनलाइनदेखील हे व्याख्यान ऐकता येणार होतं. सभागृह श्रोत्यांनी खचाखच भरलेलं होतं. ‘जे’ पहिल्या रांगेत बसली होती.

रॅण्डी स्टेजवर आला. संगणक, स्लाइड्स नीट तपासून, पुन्हा आत जाऊन सोफ्यावर थोडी विश्रांती घेऊन नंतर पूर्ण उत्साहानं व्याख्यान देण्यासाठी स्टेजवर उभा राहिला. एकीकडून ‘बर्थ डे केक’ आला. सर्व सभागृहानं ‘जे’ला ‘हॅपी बर्थडे’ म्हटलं. ‘जे’ आनंदातिरेकानं गोंधळून गेली. तिच्यासाठी हे सर्व ‘सरप्राइज’ होतं. तिनं रॅण्डीला मिठी मारली. दोघंही एकमेकांच्या घट्ट मिठीत.. जणू विश्वात ते दोघंच होते!

‘‘रॅण्डी, नको ना जाऊ मला सोडून.. तू गेल्यावर माझ्या जीवनातली जादूच जाईल रे!’’ ‘जे’ म्हणाली. दोघांच्याही आत्मचरित्रात या प्रसंगाचं चित्रदर्शी आणि हृद्य वर्णन आलं आहे. ते वाचताना आपलेही डोळे पाणवतात..

 त्यानंतर रॅण्डीनं खूप उत्साहात आपलं व्याख्यान दिलं. ते जरी खरोखरीच शेवटचं असलं तरी खऱ्या अर्थानं जगण्याविषयीचं होतं. ते केवळ सभागृहातल्या श्रोत्यांसाठीच नव्हतं, तर त्याच्या स्वत:च्या मुलांसाठीही होतं. आपली मुलं मोठी होताना पाहाण्याची त्याला अत्यंत उत्कट इच्छा होती; पण ती केवळ वय वर्ष सहा, तीन आणि धाकटी अठरा महिन्यांची होती.

  ‘विद्यार्थ्यांना स्वत:च्या कामाचं मूल्यमापन करायला सांगा, त्यांना स्वप्नं पाहू द्या, त्याला खतपाणी घाला, तुमच्याविषयी इतर काय विचार करतात ते बाजूला ठेवा, शब्दांपेक्षा कृती बोलकी असते, जिंकणं/ हरणं महत्त्वाचं नाही, तर खेळ कसा खेळता हे अधिक महत्त्वाचं, आयुष्यात प्रगतीसाठी अपयश खूप महत्त्वाचं आहे, कुणी आपल्यासाठी काही केलं तर कृतज्ञ राहा, तसंच तुम्हीही इतरांसाठी करा..’ असे खूप सारे मुद्दे त्यानं स्लाइड्सच्या सहाय्यानं मांडले. त्याचे मित्र त्याला चेष्टेनं ‘संत रॅण्डी’ चिडवायचे.

 या व्याख्यानानंतरही रॅण्डीला अनेक ठिकाणी आमंत्रित केलं गेलं. तोही तब्येतीची तमा न बाळगता जात असे. ‘जे’ अस्वस्थ व्हायची. हाती असलेले दिवस तिच्या आणि मुलांबरोबर त्यानं घालवावेत, अशी तिची स्वाभाविक इच्छा होती. रॅण्डीलाही ‘जे’साठी आणि मुलांसाठी जगायचं होतं, परंतु व्यावसायिक निष्ठाही प्रबळ होती. रॅण्डी खूप व्यवहारी (प्रॅक्टिकल) होता. मृत्यूपूर्वी आत्मचरित्र लिहीत असताना, ते वर्तमानकाळातलं आहे..  एक एक दिवस आपण मृत्यूच्या समीप जातोय हे त्याला स्वच्छपणे कळलं आहे. त्यानं ते स्वीकारलंही आहे. तो कधी तरी ‘युथेनेशिया’चा (इच्छामरणाचा) विचार ‘जे’जवळ बोलून दाखवतो. तीन मुलांचं करण्याचा ताण होत असेल, तर क्लोईला दत्तक देण्याचंही सांगतो. (अर्थात ‘जे’ यातलं काहीच करत नाही.) स्मशानभूमीत आपलं थडगं कुठे असावं, त्यावर काय लिहिलेलं असावं यासंबंधीही तो ‘जे’शी बोलतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘जे’ला पुनर्विवाह करण्याचंही सुचवतो.

मला उभयतांची आत्मचरित्रं वाचताना, विशेषत: हा भाग वाचताना नारायण सुर्वे यांच्या ‘माझे विद्यापीठ’ या कवितासंग्रहातली

‘तेव्हा एक कर’ ही कविता आठवली.

‘जेव्हा मी अस्तित्वाच्या पोकळीत नसेन

तेव्हा एक कर

तू नि:शंक मनाने डोळे पूस

ठीकच आहे,

चार दिवस धपापेल जीव गदगदेल!

उतू जाणारे हुंदके आवर

कढ आवर, नवे हिरवे चुडे भर

उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको!

खुशाल; खुशाल तुला आवडेल

असे एक नवे घर कर

मला स्मरून कर,

हवे तर, मला विस्मरून कर!’

रॅण्डी दिवसेंदिवस तब्येतीनं खचत चालला होता. अखेर २५ जुलै २००८ रोजी, वयाच्या  ४६ व्या वर्षी झोपेतच त्याची प्राणज्योत मालवली. इथून पुढे आपल्याला ‘जे’ भेटते, कारण तिनं आत्मचरित्र लिहिलं तेच मुळी रॅण्डीच्या निधनानंतर! तेव्हा ती फक्त ४२ वर्षांची होती. स्वत:चं करिअर सोडून ती रॅण्डीबरोबर पीटर्सबर्गला आलेली होती. विवाहानंतरची सुरुवातीची वर्ष छान आनंदात गेल्यावर, रॅण्डीच्या आजाराच्या निमित्तानं त्याला लागलेला ब्रेक! घर, मुलं सांभाळणं, रॅण्डीचं औषधपाणी, डॉक्टरांकडे जाणं, तपासण्या करणं, यात ती पार थकून जायची. अन् आता एकल पालकत्व! रॅण्डीच्या नसण्यानं आयुष्यातल्या स्थित्यंतराला सामोरं जाणं खूप कठीण होतं तिच्यासाठी. स्वत:साठी जगण्याचा ती विचारही करू शकत नव्हती; परंतु हळूहळू तिनं स्वत:ला सावरायला सुरुवात केली. ‘आज’कडे ‘काल’च्या चष्म्यातून पाहून तिला स्वत:चा ‘उद्या’ बिघडवायचा नव्हता. ‘जे’नं स्वत:च्या आयुष्याची पुनर्रचना करायला सुरुवात केली. तिनं घराचं रूप पालटून टाकलं. मुलांना सांभाळायला बाई ठेवली, टेनिस क्लबला जायला लागली, मैत्रिणींबरोबर भरपूर भटकंती सुरू केली. पॅरिस, फ्रान्स, इटली, रोम इथे हिंडून आली. प्रचंड वाचन करायला लागली. मुलांना वेगवेगळय़ा ठिकाणी फिरायला घेऊन गेली, त्यांच्यात रॅण्डीनं जोपासलेल्या मूल्यांची रुजुवात करायला ती विसरली नाही. मुख्य म्हणजे एकटेपणा जाणवायला लागला, तेव्हा ‘ऑनलाइन डेटिंग सव्‍‌र्हिस’मध्ये नाव नोंदवलं आणि रिश एस्सनमाखर याच्याशी विवाहबद्ध झाली. (रॅण्डीनं तिला तसं सुचवलं होतंच.) मुलांना ‘डॅडी’ मिळाले. ‘जे’, रिश आणि तीन मुलं अशा नवीन सुंदर कुटुंबाची तिनं उभारणी केली. 

आणखी एक महत्त्वाची गोष्ट तिनं केली. ‘पॅनक्रिअ‍ॅटिक कॅन्सर अ‍ॅक्शन नेटवर्क’च्या संचालक मंडळात ‘जे’ला सहभागी होण्याची संधी मिळाली. या आजाराविषयी सर्वसामान्य व्यक्तींमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी, तसंच ज्यांच्या घरी असे रुग्ण आहेत त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी व्याख्यानं द्यायला तिनं सुरुवात केली. त्याच वेळी निधी उभारण्यासही ‘जे’नं मदत केली. मुलांना सहभागी करून घेणं जेव्हा इष्ट वाटलं तेव्हा त्यांनाही बरोबर नेलं. इतरांना मदत करता करता ती स्वत:लाही मदत करत होती. ‘नॅशनल कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर नेटवर्क वेबसाइट’वर तिनं ‘‘जे’ला विचारा’ या ऑनलाइन स्तंभलेखनाचं काम सुरू केलं. तिला तिच्या कठीण समयी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तिचा प्रयत्न होता. कर्करोगामुळे विधवा, विधुर झालेल्यांसाठी ‘सपोर्ट सिस्टीम’ म्हणून ‘जे’ उभी राहिली.

  जीवन ही आपल्याला मिळालेली अमूल्य देणगी आहे. ती वाया घालवू नका. स्वत:वर कोसळलेल्या दु:खाचा बाऊ न करता, ते उगाळत न बसता ‘जे’नं उंच भरारी घेतली. म्हणूनच ‘जे’ म्हणते ‘ड्रीम न्यू ड्रीम्स’! स्वप्नं पाहा, रोज नवी स्वप्नं पाहा. पती-पत्नींनी लिहिलेली ही दोन्हीही आत्मचरित्रं, एक वेगळा प्रयोग याहीपेक्षा प्रतिकूल परिस्थतीतही जगण्याला आलिंगन देण्याचा, जगणं जसं येईल तसं स्वीकारण्याचा उत्तम मार्ग दाखवतात.

sunitideo51@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 00:05 IST

संबंधित बातम्या