|| डॉ. किशोर अतनूरकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिझेरियन प्रसूतीच्या वेळेस, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा निर्णय घेताना त्या स्त्रीला एक तरी मुलगा आहे किंवा नाही ही बाब रुग्ण, नातेवाईक (काही वेळेस डॉक्टरदेखील) विचारात घेतात. अपत्ये पुरेशी मोठी झाल्यानंतरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेणे योग्य. आजकाल सिझेरियनच्या वेळेस बालरोगतज्ज्ञ उपस्थित असतो.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लगेच करावी की नाही याबद्दल त्यांचा सल्ला घेतला जातो. कुटुंब मर्यादित ठेवणं ही काळाची गरज आहे, हा आजकाल फारसा चच्रेचा विषय राहिलेला नाही. बऱ्याचदा दुसऱ्या किंवा तिसऱ्या सिझेरियन प्रसूतीच्या वेळेस सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याची संधी असते. तसा प्रस्ताव रुग्ण आणि नातेवाईकांकडून येतो, डॉक्टरसोबत चर्चा होते आणि निर्णय घेतला जातो. वर वर पाहता तसा हा निर्णय सोपा वाटतो. वास्तविक पाहता, या निर्णयप्रक्रियेच्या दरम्यान होणारा संवाद, निर्णयापर्यंत येताना रुग्ण, नातेवाईक आणि डॉक्टरांच्या मनातील द्विधा अवस्था, एकंदरीतच येणाऱ्या अडचणीचा जवळून अनुभव घेताना, मनाची अवस्था क्लेशदायक होते. या संदर्भातील एक विचित्र अनुभव आपल्यासमोर ठेवतो.

एक मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री. पहिली नॉर्मल डिलिव्हरी, आधीची १२ वर्षांची मुलगी. दुसऱ्या खेपेस काही कारणास्तव तिला सिझेरियनसाठी घ्यावं लागलं. शस्त्रक्रिया सुरू करण्यापूर्वी मी विचारलं, ‘‘पहिली १२ साल की बेटी है तो फिर अभी सिझेरियन के साथ बच्चे बंद करनेका ऑपरेशन करना क्या?’’

तिने उत्तर दिलं, ‘‘मेरे सास को पूछो’’

‘‘हां! सास को तो पूछेंगे, मगर तुम्हारे दिल में क्या है ये बताव.’’

‘‘ मला वाटतंय तसं करावं पण नवऱ्याला विचारायला हवं, तो तयार असेल तर हरकत नाही.’’ इतक्यात तिच्या सासूबाई तिथे आल्याच होत्या, त्यांना तोच प्रश्न विचारला. सासूबाई, ‘‘मुलगा होतो की मुलगी, काय माहीत?’’ असं म्हणत निघून गेली. हिच्या डोळ्यात पाणी. का रडतेस विचारलं तर म्हणाली, ‘‘त्यांना नाही म्हणायला काय जातंय. मला किती त्रास होतोय.’’ बाळाचा जन्म झाला. मुलगा झाला. बालरोगतज्ज्ञाने पाहिलं. बाळ चांगलं आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायला हरकत नाही. सिझेरियन चालू असताना ऑपरेशन थिएटरच्या नर्समार्फत नवऱ्याला पुन्हा विचारणा. ‘‘मुलगा झालाय, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करायची का?’’ हो म्हणाला म्हणून गर्भनलिका हातात धरली, आता कापणार, इतक्यात बाहेरून आवाज आला- ‘‘ठहरो, ठहरो, अभी मत करो. सास नको बोलरी, एकीच्च लडका हैं, एखादा तो भी और लडका होना ना!’’ जसं काही पुढच्या वेळेस मुलगा होणार हे त्या सासूबाईला माहिती आहे. आम्ही शस्त्रक्रिया केली नाही. जिला स्वत:ची शस्त्रक्रिया व्हावी असं मनापासून वाटत होतं, त्यासाठी नवऱ्याने संमती दिली होती, पण सासूच्या आग्रहास्तव (?) एक मुलगी आणि एक मुलगा असताना तिच्यावर पुढची गर्भधारणा लादण्यात येणार होती.

सिझेरियन सोबत असो वा एरवीदेखील, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा निर्णय हा कायमचा निर्णय असतो. तो विचारपूर्वक घेतला जावा असा अलिखित नियम आहे. सिझेरियनबरोबर ही शस्त्रक्रिया करणं, हा एक सोयीचा भाग असला तरी त्या वेळेस घाईत निर्णय घेतल्याने कधी कधी नंतर पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. अपत्ये पुरेशी मोठय़ा वयाची, म्हणजे किमान एक अपत्य पाच वर्षांचं असेल तर असा निर्णय घेणं सोपं असतं, पण काही वेळेस, पहिलं अपत्य अगदीच दोन वर्षांचं असतानादेखील हे शस्त्रक्रिया करण्याची रिस्क घ्यावी लागते. त्याला कारणंही तशी एका अर्थाने समर्थनीय असतात.

पहिला मुलगा पुरेसा मोठा असेल आणि या खेपेला पुन्हा मुलगाच झाला तर सहसा लोक सिझेरियनसोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यास लगेच संमती देतात. पहिला मुलगा आहे आणि दुसरी मुलगी झाली तरी काही लोक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करा असं म्हणतात. दुसरी मुलगीच झाल्यानंतर मात्र ती स्वत:, नातेवाईक आणि डॉक्टर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची की नाही याबद्दल चर्चाच करत नाही. अगदी सगळेच लोक असंच वागतात असं नाही. खेडय़ात राहणारे, अशिक्षित, गरीबदेखील दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून टाका असा निर्णय घेतात पण तरीही दोन मुलींवर लगेच शस्त्रक्रिया करा म्हणणाऱ्यांची संख्या खूप कमी. भले ते सर्वजण मुलगा व्हावा यासाठी तिसरा चान्स घेणार नाहीत, पण दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी देण्यात येणाऱ्या संमतीमध्ये जी सहजता आहे ती दोन मुलींच्या जन्मानंतर नाही, हे मात्र खरं.

सिझेरियन प्रसूतीच्या वेळेस, कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचा निर्णय घेताना त्या स्त्रीला एक तरी मुलगा आहे किंवा नाही ही बाब रुग्ण, नातेवाईक (काही वेळेस डॉक्टरदेखील) विचारात घेतात. सिझेरियन सेक्शन करत असताना डॉक्टरकडून या विचाराचं कळत-नकळत समर्थन होत असतं, कधी कधी हे डॉक्टरांच्या लक्षात पण येत नाही. ज्या स्त्रीला पहिली मुलगी आहे, तिचं दुसऱ्या खेपेस सिझेरियन करताना, बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याबरोबर ‘‘काय झालं?’’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. अशा प्रसंगी काही हॉस्पिटल्समधे अशी पद्धत आहे; मुलगी झाली की, ते लगेच सांगायचं नाही. माहिती नाही, पाहिलं नाही, बाळाचे डॉक्टर बाळाला बाजूच्या खोलीत घेऊन गेले आहेत. सगळं काही चांगलं आहे. तू शांत झोप, असं म्हटलं जातं. मुलगा झाला असल्यास, काय झालं? या प्रश्नाचं उत्तर लगेच तुला मुलगा झालाय, असं मोठय़ाने ओरडून सांगितलं जातं.

अपत्ये पुरेशी मोठी झाल्यानंतरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेणं योग्य. हे जरी वास्तवास धरून असलं तरी एक समस्या शिल्लक राहतेच. खेडय़ापाडय़ातील, अशिक्षित जनता पहिलं बाळ अगदी दोन वर्षांचं आहे तरी लगेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून टाका असा आग्रह धरतात. मुलं जरा मोठी होऊद्यात, पूर्वीचं बाळ अगदीच दोन वर्षांचं आहे आणि हे बाळ तर आत्ता जन्माला आलेलं आहे, इतक्या छोटय़ा बाळांचं काही सांगता येत नाही असं समजावून सांगितल्यानंतरदेखील, नशिबात जे व्हायचं असेल ते होऊ दे पण आत्ता लगेच शस्त्रक्रिया करून टाका, आम्ही गरीब माणसं आहोत, आम्हाला आमची कामं सोडून, पुढच्या सिझेरियनसाठी येणं परवडत नाही, असं सांगतात. तशी त्यांची संमती घेऊन आम्ही शस्त्रक्रिया करतोदेखील. त्याच वेळेस ते म्हणतात त्याप्रमाणे शस्त्रक्रिया करून टाकणं योग्यच आहे असंदेखील आम्हाला वाटतं, कारण दोन सिझेरियननंतरदेखील मुलं मोठी होईपर्यंत काही वर्ष ‘साधन’ वापरा असं किती कानी कपाळी ओरडून सांगितलं तरी ते वापरतील याची खात्री देता येत नाही. सिझेरियनसोबत शस्त्रक्रिया करावी तर मुलं मोठी नाहीत याबद्दलची रिस्क, नाही केलं तर तिसरी गर्भधारणा घेऊन येऊन आता गर्भपात करून द्या, अशी परिस्थिती निर्माण करणार नाहीतच याबद्दल शाश्वती नाही. दोन सिझेरियननंतर, वैद्यकीय गर्भपात करणंदेखील त्या स्त्रीच्या आणि डॉक्टरच्या दृष्टीने जोखमीचं, गुंतागुंत निर्माण करणारी बाब असते. अशी रिस्क घेण्यापेक्षा अशा केसेसमध्ये सिझेरियनच्या सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून टाकण्याचा साधकबाधक निर्णय घ्यावा लागतो.

आजकाल सिझेरियनच्या वेळेस बालरोगतज्ज्ञ उपस्थित असतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया लगेच करावी की नाही याबद्दल त्यांचा सल्ला घेतला जातो. काही मिनिटांपूर्वी जन्मलेल्या बाळाची तब्येत चांगली असं त्यांनादेखील सांगताना काही मर्यादा असतात. रिस्क घ्यायला नको म्हणून सिझेरियनच्या वेळेस कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आजकाल डॉक्टरदेखील चटकन तयार होत नाहीत. ते एका दृष्टीने योग्यच आहे.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surgery for family planning
First published on: 08-12-2018 at 00:09 IST