ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर नियमित कसून सराव करणारा प्रणव देसाई सर्वाच्याच कौतुकाचा विषय आहे. कारण तो उत्तम स्केटिंग करतो, शिवाय धावण्याच्या अनेक स्पर्धामध्ये त्यानं बक्षिसं मिळवली आहेत. इतकंच नव्हे तर दहावीतही ८० टक्के गुण मिळवून तो उत्तीर्ण झाला आहे. प्रणव २०२० मध्ये होणाऱ्या पॅरालिंपिकमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याला जन्मत: गुडघ्याच्या खाली एक पाय नाही आणि दोन्ही हातांच्या बोटांची वाढ झालेली नाही. त्याच्या प्रगतीमागे असणारी मेहनत त्याच्या आईच्या शब्दांत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणत: सात महिने पुरे होण्यापूर्वीच प्रणवचा जन्म झाला. वेळेपूर्वी जन्माला आल्यामुळे तो इनक्युबेटरमध्येच होता. तो जन्माला आला तेच उजव्या गुडघ्याखाली पायाची आणि दोन्ही हातांच्या काही बोटांची वाढ न झालेल्या अवस्थेत. त्याची प्रकृतीही नाजूकच होती. त्यातच त्याला कावीळ झाली. त्याच्या प्रकृतीमुळे साधारणत: महिनाभराने मला त्याला जवळ घेता आलं. त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा धक्काच बसला. त्यातून सावरणं बराच काळ कठीण गेलं मला. मात्र एवढय़ा दिव्यातून तो जन्माला आला होता आणि काळाशी चिवट टक्कर देऊन तग धरून राहिला याचा अर्थ तो काही तरी करून दाखवायलाच, असं आता प्रकर्षांने वाटतं.

माझी आई, भाऊ आणि प्रणवच्या बाबांनी मला समजावत, धीर देत सावरलं. एवढंच नाही तर प्रणवही सर्वसामान्य मुलांप्रमाणे कसा वाढेल यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीच्या काळात अपंग प्रणवला कुठे घेऊन जायची मला लाज वाटायची, मात्र ठाण्याचे डॉक्टर साने यांनीही वेळोवेळी प्रोत्साहित केलं, त्याचप्रमाणे त्याच्या उपचारांसाठीही मार्गदर्शन केलं. या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे मी खंबीरपणे उभी राहिले. इतकी खंबीर की, कित्येकदा मला विचारलेल्या उलटसुलट प्रश्नांना मी तितक्याच ताकदीनं तोंड दिलं. ‘हा असाच राहणार का?’, ‘त्याला कुठपर्यंत सांभाळणाऱ?, अशा प्रश्नांना मी झेलू शकले आणि त्याच्या प्रगतीसाठी अधिक सकारात्मक होत गेले.

प्रणव सहा महिन्यांचा झाल्यावर त्याला पायाची उणीव न भासता त्याचं रांगणं, चालणं इतर मुलांप्रमाणेच व्हावं यासाठी त्याला जयपूर फूट लावायचा निर्णय घेतला. त्याहून अत्याधुनिक साधनांची माहिती तोपर्यंत आम्हाला मिळालीच नव्हती. पाय किंवा हात अर्धवट असलेल्या मुलांच्या त्या हाता-पायांच्या हाडांची बरेचदा अनियंत्रित वाढ होते ज्यामुळे त्यांना कृत्रिम हातपाय लावणे अवघड जाते. मग बरेचदा शस्त्रक्रिया करावी लागते. प्रणवच्याही हाडांची वाढ होत असल्याने सातव्या महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. पुढे नववीत असतानाही त्याच्यावर अशाच प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागली. जयपूर फूटमुळे त्याला चालता तर येऊ लागलं, मात्र तो पाय जड असल्यानं त्याला हालचाली करणं अवघड जायचं. त्यानं चालावं यासाठी मी प्रयत्न करायची, त्याचं खाणं-पिणं सांभाळायची, जेणेकरून तो आजारी पडून त्याच्या शारीरिक प्रगतीमध्ये कुठलाही अडथळा यायला नको.

त्याच्या पायांची समस्या काही प्रमाणात सोडवली होती, मात्र हातांची अजूनही तशीच होती. डॉ. शशी र्मचट यांनी त्यावर उपाय सुचवले. ते म्हणाले, ‘त्याच्या निकोप वाढीसाठी त्याला आनंदी ठेवणं महत्त्वाचं आहे. त्याच्या बोटांनी सहज पकड घ्यावी म्हणून पेन, खडू, पेन्सिल ज्याने कशाने तो रेघोटय़ा मारेल, भिंती, वह्य़ा रंगवेल तर ते त्याला करू द्या.’ मग मी त्याप्रमाणे त्याला तसं करू दिलं. त्याला रंगाचा मनसोक्त वापर करू दिला. त्याचप्रमाणे त्याला हातात जे काही धरता येईल ते त्याच्या हातात देऊन त्याची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्याला चित्रकलेची आवड निर्माण झाली. तो चांगली चित्रं काढतो. माझी आई त्याला नियमित मालिश करायची. त्यामुळे त्याचे हातपायही बळकट झाले. दरम्यानच्या काळात आम्हाला ऑट्टोबॉक सेंटरची माहिती समजली होती. या सेंटरमध्ये वजनाला हलका आणि वापराला सोपा असा पाय त्याला मिळाला. त्याला खेळाची आवड लहानपणापासूनच होती. ती आवड लक्षात घेऊन एकदा त्याच्या मामाने त्याला बालवाडीत असताना स्केटिंग आणले. प्रणवने खूप लवकर स्केटिंग करणं आत्मसात केलं. राहुल पंदिरकर यांनी त्याला स्केटिंगचे धडे दिले, त्याची आवड निर्माण केली. तो जवळपास ९ वीपर्यंत नियमित स्केटिंग करायचा. त्याला इयत्ता पहिलीसाठी वसंत विहार शाळेत प्रवेश घेतला. दहावीपर्यंत त्याचं शिक्षण त्याच शाळेत झालं. हाताला इतर बोटं नसली तरी अंगठे असल्याने लिहिणं किंवा इतर गोष्टी करणं त्याला अवघड जात नाही. त्याला अभ्यासाचीही आवड लहानपणापासूनच होती, मात्र इतर मुलांसारखा त्याचाही ओढा खेळाकडे अधिक असल्यानं अभ्यासासाठी मला त्याच्या नेहमी मागे लागावं लागतं. तो शाळेत असताना त्याचं जाणं-येणं पाहणं, घराबाहेर खेळत असताना त्याच्याकडे लक्ष देणं मी आवर्जून केलं. त्याच्या अपंगत्वावरून त्याला कुणी काही बोललं तर तो अंतर्मुख होणार नाही हे मी पाहिलं.

प्रणव सात वर्षांचा झाल्यावर खूप विचारांती आम्ही दुसऱ्या मुलाचा विचार केला आणि प्रणवला बहीण मिळाली. गौरीचा तिच्या दादावर आणि दादाचा गौरीवर भारी जीव आहे. त्यांच्यात आठ वर्षांचं अंतर असल्यामुळे तिच्याविषयी आपसूकच जबाबदारीची जाणीव त्याच्यामध्ये आहे. तर गौरी लहान असल्यानं दादाबद्दल पझेसिव्ह आहे. दादाला कोणी काही बोललं, अभ्यासासाठी रागावलं की तिलाही राग येतो. प्रणव शांत आहे. तो मैदानावर, त्याच्या मित्रांमध्ये खुलतो. मात्र अपरिचित लोकांमध्ये अजूनही तो बुजतो. त्याचं हे बुजरेपण जावं म्हणूनही मला प्रयत्न करावे लागतात.

दोघांना वाढवताना माझी मुळीच कसरत झाली नाही, कारण मी प्रणवलाही अपंग किंवा वेगळा समजतच नाही. त्यामुळे इतर घरांत ज्या पद्धतीनं दोन सामान्य मुलांना वाढवलं जातं त्याचप्रमाणे मी वाढवलं. मुळात एवढय़ा वर्षांत मला अपंग हा शब्द टोचायला लागलाय. खरं तर प्रणवसारखी मुलं सामान्यपणे जगू शकतात. त्यांना सहानुभूतीपेक्षा सहकार्याची गरज असते, तीही निर्मळ मनानं केलेली.

त्याचा अभ्यास, शारीरिक तंदुरुस्तीसाठीची काळजी मी घेत असते, तर त्याच्या खेळातल्या प्रगतीसाठी त्याचे वडील प्रशांत दक्ष असतात. वेगवेगळ्या स्पर्धासाठी त्याला तयार करणं, मैदानावर सरावासाठी सोडणं, नीलेश पाटकर सरांकडे सोडणं, सरावाकडे लक्ष देणं हे सगळं तेच करत असतात. आज प्रणव

मुलुंडच्या केळकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकतो आहे, त्याचप्रमाणे पॅरालिंपिकची तयारी करतो आहे. २०१७ आणि यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत १०० मीटर व २०० मीटर धावण्या शर्यतीत त्याने सुवर्णपदक पटकावलं आहे. दुबईत झालेल्या पॅरा अ‍ॅथलेटिक्स वर्ल्ड गॅ्रन्ड प्रिक्स चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर मेडल मिळवलं आहे.

मला वाटतं, एकूण मग ते सामान्य असो वा विशेष, मूल वाढवताना सगळ्या कुटुंबाचा सहभाग असेल तर त्याची निकोप वाढ होते. माझ्या अनुभवावरून मला समजलं की, तुम्हीच जर तुमच्या मुलाला जगासमोर आणायला लाजलात तर सगळं जग तुम्हाला टोचायला कमी करत नाही, मात्र तुम्ही ठाम असाल तर तुमचं मूलही तितकंच खंबीर आणि निश्चयी होतं. होता होईल तेवढं मुलाला सामान्यपणे वाढवलं तरी अनेकदा समाजात त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सामान्य नसतो. विशेष मूल आपल्यातल्या उणिवांवर मात करून सामान्यपणे जगू पाहात असते, मात्र काही नतद्रष्ट लोक त्यांना तसं जगू देत नाहीत. तुम्ही मुलांच्या व्यंगाकडे न पाहता त्यांच्या जगण्याची उमेद बघा, म्हणजे तेही त्यांच्यातल्या कमतरतेची लाज बाळगणार नाहीत. समाजात ते मोकळेपणाने वावरू शकतील.

prashantdesai25@gmail.com 

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व अपूर्णांक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of athlete pranav desai handicap athlete pranav desai
First published on: 14-04-2018 at 00:15 IST