गर्भावस्थेच्या १२ आठवड्यांनंतर दुसरं त्रैमासिक सुरू होतं. या कालावधीत बाळाचे अवयव पूर्णपणे तयार होऊन काही प्रमाणात कार्यरत होतात. या दिवसांत गर्भवतीला होणाऱ्या शारीरिक, मानसिक त्रासांची लक्षणं आणि त्यावरील उपायांची माहिती देणारा लेख.
गर्भावस्थेचे पहिले १२ आठवडे पूर्ण झाल्यानंतर प्रथम त्रैमासिक संपतं व दुसरं त्रैमासिक सुरू होतं. १२ आठवडे झाल्यानंतर गर्भ गर्भाशयामध्ये स्थिरस्थावर झाला असं समजलं जातं. यानंतर गर्भपाताचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो. यामुळे अनेकदा बाळ होणार असल्याची आनंदाची बातमी तिसऱ्या महिन्यानंतरच इतरांना दिली जाते.
गर्भावस्थेच्या दुसऱ्या त्रैमासिकात बाळाचे अवयव पूर्णपणे तयार होऊन काही प्रमाणात कार्यरत होतात. पहिल्या त्रैमासिकात होणारी मळमळ, उलटी, चक्कर येणं यासारखे त्रास कमी होतात. यामुळे गर्भवतीसाठी हा काळ बऱ्यापैकी आरामदायक असतो. या त्रैमासिकात तिला काही वेगळी लक्षणं जाणवू लागतात, याविषयीची ही माहिती.
गर्भाशयामध्ये बाळ वाढत असतं, त्यामुळे गर्भाशयाचा आकार वाढू लागतो. बारा आठवड्यांच्या सुमारास वाढणारं गर्भाशय कटी भागातून ओटीपोटात येतं. यानंतर गर्भवतीच्या पोटाचा आकार हळूहळू वाढताना जाणवतो. गर्भावस्थेच्या २४व्या आठवड्यात गर्भाशय नाभीपर्यंत येतं, तर ३६व्या आठवड्यात छातीपर्यंत पोहोचतं. गर्भावस्थेच्या साधारणत: २०व्या आठवड्यात त्या आईला बाळाची हालचाल जाणवू लागते. सुरुवातीच्या काळात टिचकी मारल्यासारखी किंवा बुडबुडे आल्यासारखी वाटणारी हालचाल काही काळाने स्पष्टपणे कळू लागते.
काव्याचा पाचवा महिना चालू आहे. हल्ली तिच्या ओटीपोटात अधूनमधून दुखत असतं. पोटात दोन्ही बाजूला ताण पडल्यासारखं वाटतं. कालच तपासणीमध्ये डॉक्टर सर्व काही छान आहे असं म्हणाले. पण मग पोटात का दुखतंय? काही काळजीचं तर नसेल ना? पोटात दुखणं ही गर्भवतीसाठी गोंधळात टाकणारी समस्या. गर्भारपणात पोट दुखण्याची अनेक कारणं असतात. त्यातलं सर्वात कॉमन ‘स्ट्रेच पेन’. गर्भाशयाचा आकार वाढताना त्याच्या स्नायूंवर व आजूबाजूच्या लिगामेंट्सवर (अस्थिबंधन) ताण पडतो. यामुळे ओटीपोटात दोन्ही बाजूला ओढ बसल्यासारखं दुखतं. यासाठी वैद्याकीय उपचारांची गरज नसते.
वाढणाऱ्या गर्भाशयाचा दाब व आतड्यांची हालचाल मंदावल्यामुळे अनेकदा वात, पित्त, अपचन व बद्धकोष्ठाचा त्रास होतो. अशा वेळी पचायला सोपं अन्न खावं व वैद्याकीय सल्ल्याने औषधं घ्यावीत. गर्भावस्थेत अधूनमधून पोट कडक झाल्याचं जाणवतं. ही गर्भाशयाची आकुंचनं (Braxton Hicks Contractions) असतात. हे आकुंचन साधारणत: १५ ते २० सेकंद राहतं व वेदनारहित असतं. ही आकुंचनं तीव्र झाल्यास पोटात दुखू लागतं. दर थोड्या वेळाने पोटात कळा येऊ लागतात. साधारणत: या कळा पाठीत सुरू होऊन पोटाकडे सरकतात. कळा आल्यावर गर्भाशय कडक झाल्याचं जाणवतं. अशा वेळी गर्भपाताची किंवा लवकर प्रसूती होण्याची शक्यता असल्याने ताबडतोब दवाखान्यात जावं.
अनूचा सातवा महिना चालू होता. कालच डोहाळ जेवणामुळे बराच प्रवास व दगदग झाली होती. आज अचानक तिच्या पोटात दुखू लागलं. कळा येऊ लागल्या. दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी कळा थांबवायची औषधं दिली, पण काही उपयोग झाला नाही. प्रसूती झाली, पण बाळाचं वजन जेमतेम एक किलो होतं. बाळाला नवजात अतिदक्षता विभागात जवळजवळ दोन महिने ठेवायला लागलं. गर्भावस्थेच्या विसाव्या आठवड्यानंतर व ३७व्या आठवड्यांआधी प्रसूती झाल्यास त्याला अपुऱ्या दिवसांची प्रसूती (Preterm Delivery) समजली जाते. जुळी-तिळी बाळं असल्यास, गर्भजलाचं प्रमाण वाढल्यास, गर्भाशयमुख सैल झाल्यास, जंतुसंसर्ग किंवा अति परिश्रम झाल्यास अपुऱ्या दिवसांची प्रसूती होण्याची शक्यता वाढते.
३७व्या आठवड्याच्या आधी बाळाची वाढ पूर्ण झालेली नसल्याने त्याच्या जिवाला धोका संभवतो. ही बाळं श्वासोच्छ्वास करण्यास असक्षम असू शकतात. अशा बाळांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची, व्हेंटिलेटर लावण्याची गरज भासू शकते, पोटात कळा येणं, योनिमार्गातून रक्तस्राव अथवा पाणी जाणं, यासारखी लक्षणं जाणवल्यास दवाखान्यात त्वरित जायला हवं. अशा वेळी औषधोपचारांच्या साहाय्याने अपुऱ्या दिवसांची प्रसूती टाळण्याचा प्रयत्न केला जातो.
गर्भाशयात वार खालच्या भागात असल्यास ( Placenta Previa) किंवा गर्भाशयातून वार सुटल्यास (Abruption) गर्भावस्थेत रक्तस्राव होतो. अशा वेळी आई व बाळाच्या जिवाला गंभीर धोका निर्माण होण्याची भीती असल्याने ताबडतोब डॉक्टरांकडे जायला हवं. योनिमार्गातून पाण्यासारखा स्राव (Leak) गेल्यास लगेच वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा. बाळाच्या भोवतालच्या पाण्याने भरलेल्या संरक्षक पिशवीला (Amniotic Sac) छिद्र पडल्याने गर्भजल (Amniotic Fluid) योनिमार्गाद्वारे वाहून जातं. अशा वेळेस प्रसूतिवेदना सुरू होण्याची, जंतुसंसर्ग होण्याची किंवा बाळ कोरडं पडण्याची भीती असते. योनिमार्गातून घट्ट पांढरा, हिरवा-पिवळा स्राव जात असल्यास जंतुसंसर्गाची शक्यता असल्याने वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा.
अवनी धावत-पळत दवाखान्यात आली. रात्री झोपताना बोटात अंगठी तशीच राहिली आणि आता सूज आल्याने अंगठी बोटातच अडकली होती. खूप प्रयत्न करूनही अंगठी निघेना व बोटाची सूज वाढतच होती. आता बोट काळं-निळं पडू लागलं होतं. अखेरीस अंगठी कापून काढायला लागली. गर्भारपणात संप्रेरकांतील बदलांमुळे शरीरात पाणी साठून अनेकदा सूज येते. चेहरा व हाता-पायावर ही सूज जास्त प्रमाणात जाणवते. अचानक सूज आल्यास किंवा आराम केल्यानंतरही सूज कमी होत नसल्यास रक्तदाब तपासायला हवा. हे रक्तदाब वाढल्याचं लक्षण असू शकतं.
रक्तदाब वाढणं ही गर्भारपणातील एक गंभीर समस्या आहे. पायावर अचानक सूज येणं, डोकं दुखणं, डोळ्यापुढे अंधारी येणं, अस्पष्ट दिसणं ही त्याची काही लक्षणं. रक्तदाब अनियंत्रित वाढल्यास आई व बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. उच्च रक्तदाबामुळे गरोदर स्त्रीच्या महत्त्वाच्या अवयवांना इजा पोचू शकते. तिला झटके येऊ शकतात. बाळाकडे जाणारा रक्तपुरवठा खंडित झाल्यास बाळाच्या जिवाला धोका होऊ शकतो. रक्तपुरवठा कमी झाल्यास बाळाची वाढ कमी होते. उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास योग्य औषधोपचारांनी त्यावर नियंत्रण ठेवायला हवं.
ऋताला अधूनमधून छातीत धडधडतं, छातीवर दाब पडल्यासारखं वाटतं. काही वेळेस दम लागतो. दीर्घ श्वास घेतल्यावर किंवा शांतपणे बसल्यावर थोडं बरं वाटतं, पण कधी कधी याचा मानसिक ताण येतो. हे गर्भारपणामुळे होतंय की हृदयाचा त्रास आहे हे कळतंच नाही. गर्भावस्थेत शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. यामुळे हृदयाला जास्त काम करायला लागतं. वाढणाऱ्या गर्भाशयामुळे हृदयावर दाब येतो व हे त्रास जाणवतात. जास्त त्रास झाल्यास वैद्याकीय सल्ला घ्यायला हवा. गर्भारपणात वाढणाऱ्या पोटामुळे पाठीवर, पायांवर ताण येतो. यामुळे कंबर-पाठ-पायदुखीचा त्रास होतो. एका ठिकाणी जास्त वेळ बसून काम करणाऱ्या स्त्रियांना जास्त त्रास जाणवतो. पाठ-कंबरदुखी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम करायला हवा, तसेच कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला हव्या.
गर्भारपणाच्या काळात पोटावरील त्वचा ताणली गेल्याने स्ट्रेच मार्क्स येतात. त्वचा कोरडी असल्यास त्याचं प्रमाण वाढतं. कधी कधी त्वचा कोरडी होऊन खाज सुटते, पुरळ येतं. अशा वेळी तेल किंवा मॉइश्चरायझर वापरायला हवं. गर्भारपणात त्वचा जास्त संवेदनशील बनल्यामुळे अॅलर्जी येऊ शकते. म्हणूनच सौदर्यप्रसाधनं, साबण, शॅम्पूचा व वापर करताना काळजी घ्यायला हवी. उन्हात वावरणाऱ्या काही गर्भार स्त्रियांच्या चेहऱ्यावर काळे डाग (Chloasma) पडू शकतात. म्हणून उन्हापासून संरक्षण देणारं ‘सनस्क्रीन’ वापरावं. संप्रेरकांमधील बदलांमुळे गर्भवती स्त्रियांच्या नाकातून, हिरड्यांमधून रक्तस्राव होतो. अशा वेळी आहारात ‘क’ जीवनसत्त्वाचा समावेश करायला हवा.
गर्भारपणाच्या पाचव्या महिन्यात मानसीचा नवरा रोहित तिला घेऊन दवाखान्यात आला. मानसीच्या वागण्याने तो चिंतित झाला होता. नेहमी आनंदी, उत्साही असणारी, खूप बडबड करणारी मानसी सध्या खूप शांत झाली होती. सारखी झोपून राहत होती. एकटीच खोलीत बसून राहायची. तिला काय होतंय, काही त्रास होतोय का याविषयी कुणाशीच मोकळेपणानं बोलायला तयार नव्हती. सारखी चिडचिड करायची, छोट्या-छोट्या गोष्टींत रागवायची, रडायची. बाळ होऊ देण्याचा निर्णय खरं तर मानसी व रोहित दोघांनी एकत्रितपणे घेतला होता. नोकरीचं ठिकाण लांब असल्याने मोठी सुट्टी घेण्याचा निर्णयही मानसीचाच होता. आता मानसीला काय खुपतंय हे रोहितला कळतच नव्हतं. तिच्या मनाचा थांगपत्ता त्याला लागत नव्हता. या तिच्या वागण्याचा बाळावर काही वाईट परिणाम तर होणार नाही ना, अशी भीती त्याला वाटत होती.
गर्भारपणातील मानसिक समस्या ही खरं तर अनेकदा आढळणारी, परंतु त्याविषयी फारसं बोललं न जाणारी समस्या. भीती वाटणं, काळजी वाटणं, नैराश्य येणं, एकाग्रता न होणं, नीट झोप न लागणं, चिडचिड होणं ही त्याची लक्षणं. संप्रेरकांमधील चढ-उतार, शरीरात होणारे बदल व त्यामुळे होणारे त्रास, गर्भारपणामुळे घातले गेलेले निर्बंध आणि त्याचबरोबर प्रसूतीबद्दल वाटणारी भीती, आईपण झेपेल का याविषयी वाटणारी शंका ही त्याची काही कारणं. गरोदरपणात खूप ताण असणाऱ्या, सामाजिक किंवा कौटुंबिक आधार नसलेल्या व गर्भारपणापूर्वी मानसिक समस्यांचा त्रास असणाऱ्या स्त्रियांना ही समस्या जास्त प्रमाणात भेडसावते.
अनेकदा मानसिक असंतुलनासाठी घेत असलेली औषधं बाळासाठी सुरक्षित नसल्याने बंद केली जातात. यामुळे त्रास वाढतात. गर्भवती व गर्भावर मानसिक समस्यांचे अनिष्ट परिणाम होऊ शकतात. नैराश्यात असलेली, मानसिक संतुलन ढळलेली स्त्री गर्भारपणात स्वत:ची काळजी नीटपणे घेऊ शकत नाही. यामुळे तिला शारीरिक व्याधी होऊ शकतात. बाळाची वाढ नीट होत नाही. मानसिक समस्यांमुळे आई व बाळामध्ये चांगले भावनिक नातं निर्माण होऊ शकत नाही. गर्भारपणात मानसिक अस्वास्थ्य असणाऱ्या स्त्रियांच्या मुलांमध्ये नंतरही वर्तणुकीच्या व मानसिक समस्या जास्त प्रमाणात आढळतात.
मानसिक समस्या जाणवत असल्यास त्याविषयी मोकळेपणाने बोलायला हवं. अशा वेळी गर्भवतीला भावनिक आधाराची गरज असते. कुटुंबीयांनी, मित्र-मैत्रिणींनी तिला आधार द्यायला हवा. तिच्या भावना समजून घ्यायला हव्या. मोकळेपणाने केलेल्या संवादाने, समुपदेशनाने मानसिक समस्या कमी होतात. व्यायामाने मानसिक ताणतणाव कमी होतात. ध्यानधारणा, प्राणायाम व वेगवेगळे छंद जोपासण्याने मन शांत होतं. ते करायला हवं. सुखी, आनंदी, निरोगी आई तितक्याच सुदृढ, आनंदी मुलांना जन्म देत असते.
vaishalibiniwale@yahoo.com