अपर्णा कुलकर्णी-देशपांडे

सतत इंटरनेटशी ‘कनेक्ट’ असणाऱ्या अनेकांचं आयुष्य ‘फोमो’ अर्थात ‘फीयर ऑफ मिसिंग आऊट’ने अस्वस्थ केलं आहे. आपल्या पोस्टला न उंचावले गेलेले अंगठे अनेकांची झोप उडवत आहेत. विविध समाज माध्यमांतून, सोशल मीडियावरून सतत येणारे फोटो, ‘आम्ही आज काय केलं’चे अपडेट्स, अनेकांमध्ये ‘आपण काही तरी हरवलंय, काही तरी निसटून जातंय’ची भीती निर्माण करते आणि या भ्रामक कल्पनेपोटी, त्या क्षणभंगुर आनंदासाठी कायमस्वरूपाचा आनंद उपभोगणंही राहून जातंय.. यासाठी गरज आहे, तेवढय़ाच मारक शस्त्राची.. ‘जोमो’ची.. ‘जॉय ऑफ मिसिंग आऊट’ची..

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
salman khan house firing case abhishek ghosalkar wife
सलमान खानच्या घरावरील गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल; म्हणाल्या, “मला सुरक्षा का नाही?”
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!

लांब पाय करून मी शांतपणे टी. व्ही. बघत होते.. म्हणजे तशी माझी भाबडी समजूत होती, कारण टी. व्ही. चॅनेलचा वारू तुफान उधळलेला होता. ज्याचा लगाम होता चिरंजीवांच्या हाती. मी दर दोन मिनिटांनी बदलणारं चित्र बघत होते फक्त..

‘‘काही तरी एक बघ ना रे! गरगरतंय मला इतके भराभर चॅनेल्स बदलतोयस तू. आणि त्यातही मध्ये मध्ये सारखी तुझी फोनवर नजर.’’

‘‘चिल मॉम! अगं, इकडे धोनी षटकार मारेल म्हणून वाट बघायची तर तिकडे ऑस्कर अवॉर्ड कार्यक्रम ‘मिस’ होईल, नाही तर नवीन रॅप येणारेय आज ‘डिव्हाइन’चं ते ‘मिस’ होईल.’’

‘‘अरे, पण ते बघायचं राहून जाईल या हुरहुरीपायी तू काहीच नीट निवांत बघत नाहीयेस ना! कुठे तरी तर शांत चित्ताने टिकून राहा ना.’’ त्यातल्या त्यात काही तरी सुचवायची माझी आपली केविलवाणी धडपड..

‘‘मॉम, आमची सगळी ‘जेन’ (म्हणजे पिढी म्हणायचंय त्याला) या सुपर फास्ट पेसशी जुळवून घेण्यात एक्स्पर्ट झालीये आता.

सो.. चील.’’

ज्या घरात तरुण अपत्य आहे तिथे हे वरचे संवाद घडत असणारच. आत्ता आपण एक आनंद उपभोगत असताना आणखी दुसरीकडे काही तरी याहीपेक्षा जास्त आकर्षक घडतंय, ते हातचं सुटायला नको, ही मानवी लालसेची भावना मानवजातीत खूप आधीपासून आहेच, पण आजच्या ‘फोर जी’च्या जमान्यात धुमाकूळ घालत असणाऱ्या सोशल मीडियाने अशाच तऱ्हेच्या भावनांना खतपाणी घातलं आणि एका मानसशास्त्रीय संकल्पनेला जन्म दिला, ती म्हणजे ‘फोमो’. ‘फीयर ऑफ मिसिंग आऊट’. यात इतरांच्या आयुष्यात काय चाललं आहे हे समजून घेण्याची अनिवार्य ओढ आपल्याला सतत सोशल मीडियाशी जोडून ठेवते. आपल्या अतिशय मौल्यवान वेळेच्या नियोजनावर आपलाच ताबा राहत नाही.

याची काही उदाहरणं बघितल्यावर आपल्या लक्षात येतं की, फक्त तरुण पिढीच नाही तर त्या आधीची आज पन्नास-पंचावन्नच्या घरात असलेली पिढीदेखील या ‘फोमो’ची शिकार (शब्द वाचून दचकायला झालं असेल तर चांगलंच आहे.) झालीये. हे ‘फोमो’चं भूत आपल्या घरात आगंतुक पाहुण्यासारखं आलं आणि आता कायमचं बस्तान बसवून आपल्याला गिळायची तयारी ठेवून आहे. आंतरजाल, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट या माध्यमांमुळे अतिशय माफक खर्चात माहितीचा प्रचंड मोठा डोंगर उपलब्ध होतो, संपर्क ठेवणं सहजसोपं होतं हे नक्की, पण या तंत्रज्ञानाच्या समुद्रमंथनात ज्या वाईट गोष्टी निघाल्या त्यात ‘फोमो’ (फीअर ऑफ मिसिंग आऊट ) उच्चस्थानी आहे. काही तरी हातून निसटण्याची भीती इतकी फोफावली की २०१३ मध्ये ‘फोमो’ला रीतसर ‘ऑक्स्फोर्ड डिक्शनरी’ मध्ये जागा मिळाली. यावरून त्याची व्याप्ती लक्षात येते. गांभीर्याचा भाग हा की, तो अगदी आपल्या घरात येऊन आदळलेला आहे.. तुम्ही तुमच्या घरात अतिशय आरामात बसलेला आहात आणि तुमच्यावर मित्राची पोस्ट येऊन आदळलीये. त्यांचे फोटो आलेत.. काही मित्र एका ठिकाणी क्लिबगला गेले आहेत. तुमची तिथे जाण्याची काडीमात्र इच्छा नव्हती, पण आपल्या अनुपस्थितीत ते किती मजा करत असतील या नुसत्या कल्पनेने तुम्ही अस्वस्थ होता. आपण गेलो असतो तर हे सगळं गमावलं नसतं या अनावश्यक भावनेने मग हातातील वेफर्सपण कडवे लागायला लागतात. शक्य आहे की, त्या मित्रांबरोबर काही वेगळंही घडलेलं असेल, प्रत्यक्षात त्यांना अडचणी आल्या असतील, नीट जेवायला मिळालं नसेल, अपेक्षेपेक्षा खूप जास्त खर्च झाला असेल, पण त्यांच्या नुसत्या फोटोवरून किंवा सेल्फीजवरून तुम्ही कल्पनेनेच खूप काही गमावल्याचं दु:ख कवटाळून बसता, हे आहे, ‘फोमो’ ..फीअर ऑफ मिसिंग आऊट!

बरं हे सोशल मीडियाचे राक्षस अतिशय बुद्धिमान आहेत. आजकालच्या कुठल्याही कॉलेज तरुणीचे उदाहरण घ्या. मायबापाच्या खिशाला कात्री लावून ही बया एक छानसा ड्रेस आणते. मग असा ओठाचा चंबू करून (त्याला पाऊट म्हणायचं!) अतिशय महागडा फोन घेऊन धडाधड फोटो काढते. ते पोस्ट करते आणि निष्क्रिय माणसासारखं सगळं सोडून किती लाइक्स येतात, कोण कोण ‘फॉलो’ करतंय हे अतिशय अधीरपणे दर पाच मिनिटांनी तपासत राहते. मग अपेक्षित लाइक्स नाही आले की जगबुडी झाल्यासारखं तोंड घेऊन बसायचं. नवीन ड्रेसचा आनंद वगरे काही असतो याची तर जाणीवही नाही. त्यात जर एखादीने तिच्यापेक्षा जास्त सुंदर ड्रेस घालून फोटो टाकला की मग झालं.. आणि जर ती हिच्यापेक्षा बारीक दिसत असेल तर मग जळून कोळसा. मग आणखी सुंदर ‘भारी’ फोटो अपलोड करण्याची केविलवाणी धडपड. म्हणजे तुम्ही आनंदी राहायचं की नाही हे या माध्यमांनी ठरवायचं का? काही लाइक्स (काही अंगठे) कमी होऊन तुमच्या समाधानी दिवसाची वाट लावणार का? आपल्या सुखाच्या चाव्या नकळत आपणच या राक्षसांच्या हाती देऊन बसतो आहोत.

आपल्या करमणुकीसाठी ही माध्यमं आहेत, त्यांनी आपल्या सुखावर ताबा मिळवता काम नये याचं भान असायलाच हवं ना! आज सतराशे अ‍ॅप्स उपलब्ध आहेत ज्यात फोटो काढून हवे तसे डोळे, बारीक शरीरयष्टी, गोरं, नितळ दिसणं, मेकअप नव्याने करणं शक्य होतं हे माहिती असूनही का मग त्या कुणा एकीबद्दल या पोरी इतकी असूया बाळगून असतात? ‘फोमो’मुळे ही अवाजवी असूया निर्माण होते. (मुळात बाह्य़ सौंदर्याला किती महत्त्व द्यावं हाही मुद्दा आहेच) आपणही इतकेच किंबहुना जास्त सुंदर दिसतो, ही इमेज तोडून मोडून बनवलीये हे समजत असतं, पण तिच्याजवळ काही तरी वेगळं आहे जे माझ्याकडे नाही ही खंत अशा मुलींना शांती लाभू देत नाही. त्यांच्या झोपेवर, आहारावर परिणाम करते.

एखादा उच्चशिक्षित तरुण नोकरीला लागतो. बारा बारा तास काम करून लठ्ठ पगार कमवतो. मग एखाद्या मित्राचे कुठे तरी परदेशातील फोटो किंवा सेल्फीज् येतात. तो तिथे काही प्रशिक्षण घ्यायला गेला असतो. हा ते फोटो बघतो आणि तो मित्र आपल्यापेक्षा किती पुढे गेला या भ्रामक कल्पनेनेच प्रचंड ताण घेतो. वास्तविक याची नोकरी अतिशय उत्तम असते, भरपूर पगार असतो, आपली माणसं अवतीभवती असतात, पण नाही! तो मित्र किती मजेने जगतोय आणि मी पाहा इथे कसा ‘झिजतोय’ (शब्दप्रयोगासाठी माफी असावी) या विचाराने स्वत:ला पोखरून घेतो. माझी करिअरची दिशा चुकली तर नाही? मी आयुष्यात कधी अशी मजा करू शकेन का? ही भीती त्याला व्यापून टाकते. तो मित्र नेमका काय करतोय? त्याच्यापेक्षा तुमचा प्रोफाइल किती जबरदस्त आहे, कशा कशाचा विचारच नाही. ‘फोमो’मुळे तुमची सारासार बुद्धी गहाण टाकली जाते. म्हणजे केवळ त्याचा सोशल मीडियातील असा वावर तुमची झोप उडवतोय. ‘फोमो’मुळे ही अशी शेंडाबुडखा नसलेली भीती निर्माण होते.

आपण हे लक्षात घेतलंच पाहिजे की, स्मार्ट फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक छोटासा हिस्सा आहे, आपलं अख्ख जीवन नाही. सकाळी डोळे उघडत नाही की लगेच फोन हातात घेऊन आदल्या रात्री इतरांनी आपापल्या मनोरंजनासाठी काय काय केलं हे बघायची उत्सुकता गप्प बसू देत नाही. त्यांचं काय चाललंय, हे जाणून नाही घेतलं तर आपलं त्या विषयावरचं नियंत्रण सुटेल अशी भ्रामक भीती आपल्याला स्क्रीनशी चिटकवून ठेवते. कुठलीही व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टीचंच फक्त आणि फक्त सोशल मीडियावर प्रदर्शित करणार हे नक्की. आपण जेव्हा निवांत असतो, कामाचा व्याप नसतो नेमकं तेव्हाच त्यांच्या जीवनातील रोमांचक गोष्टी आपल्याला कळतात. कारण त्या वेळीच आपण सोशल मीडियाशी जोडले जातो.

याचा अर्थ आपण निव्वळ बुळबुळीत कंटाळवाणं आयुष्य जगतो असा होतो का? नक्कीच नाही. हे समजून घेतलं तर हा ‘फोमो’ आपल्या मनाशी खेळू शकणार नाही. आपल्या जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीची तुलना आपण दुसऱ्याच्या परमोच्च परिस्थितीशी करतो आणि मग अनेक दु:खी वलयं आपला पाठलाग करू लागतात. सोशल मीडियाचं डिझाइन अशाच पद्धतीने केलंय की, वापरणाऱ्याला वेळेचा विसर पडावा. प्रसिद्धीची भुरळ पडावी, यंत्रवत त्यात तो रुतत जावा.

आपण ठरवणार की आपली सीमारेषा कोणती आणि या ‘फोमो’ला आपल्यावर किती स्वार होऊ द्यायचं. अभ्यासपूर्ण आकडेवारी असं सांगते की, १६ ते १९ या वयातील मुलं/मुली हे साधारणत: सहा तास सोशल मीडियावर ‘फिरत’ असतात, जे चिंताजनक आहे. टक्केवारीत सांगायचं तर ३७ टक्के युवा वर्ग यात येतो. त्यानंतरचा वयोगट हा किमान चार तास आंतरजालात अडकलेला असतो. टक्केवारीत किमान २५ टक्के प्रौढ या भुताने पछाडलेले आहेत. आपले ज्येष्ठ नागरिकही यात मागे नाहीत बरं का! मुळातील बुद्धिमत्ता, फावला वेळ (वेळच वेळ) आणि अत्यल्प मोबदल्यात मिळणारी बेसुमार करमणूक. या कारणांमुळे ज्येष्ठ वर्गदेखील साधारण २ ते ३ तास सहजच या मीडियाची सर करून येतात.

फक्त या वयोगटाच्या बाबतीत फार काळजीचं कारण नाहीये कारण या वयोगटाने एक अतिशय रम्य, वेगळा काळ अनुभवलाय. ‘फीयर ऑफ मिसिंग आऊट’ यांना छळत नाही. कुठे थांबायचं याचं भान त्यांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना सांगतो. पण त्यांच्याकडूनच चार महिन्यांच्या बाळाला गुंगवण्यासाठी जर मोबाइलचा वापर होत असेल तर बसायला लागल्याबरोबर ते मूल मोबाइल दाखवल्याशिवाय जेवणारच नाही. याचं तारतम्य आपणच ठेवायला हवं.

आज आपलं आयुष्य किती सुंदर वळणावर आहे, पुढे किती आव्हानं किती रचनात्मक कार्य येऊ घातलं आहे, याकडे आपलं लक्ष केंद्रित केलं तर इतरांशी नाहक तुलना आणि ‘फोमो’ यावर सहज मात करता येईल. माणसातील याच ‘फोमो’चा फायदा विपणन (मार्केटिंग) क्षेत्रातील लोक उचलतात. घर असंख्य कलात्मक वस्तूंनी भरलेलं असूनही आत्ता ही ऑफर गमावली तर आपण बऱ्याच स्वस्तात मिळणाऱ्या गोष्टींना मुकणार या ‘फोमो’चा फायदा जाहिरातदार उचलतात. विशेषत: स्त्रीवर्ग अशा प्रकारच्या ‘फोमो मार्केटिंग’च्या बळी ठरतात. आणि मग विविध मॉल सेलच्या जाहिरातींनी आणि स्त्रियांच्या खरेदीने ओसंडून वाहू लागतात.

या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी स्वत:तली खरी ताकद ओळखणं आवश्यक आहे. माझ्याकडे अतिशय सुंदर आयुष्य आहे, ते मी माझ्या पद्धतीनेच फुलवणार, तिसरा कुणी ‘व्हर्चुअल फ्रेण्ड’ नाही, हे स्वत:ला ठासून सांगणं गरजेचं आहे. आपल्याजवळ असणाऱ्या अनेक गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. एक गोष्ट मनापासून करताना दुसरं काही तरी ‘मिस’ होईलच, पण त्याचा ‘फीअर’ असता काम नये. ही मानसिकता प्रबळ झाली तर त्या ‘फोमो’चं भूत आपल्याला कधीच गिळंकृत करू शकणार नाही.

आता याचा विपर्यास बघा. आपण या माध्यमांशी किती तास जोडलेले असतो याचा अभ्यास करून आपल्यालाच गदागदा हलवणारे अ‍ॅप खुद्द गुगलनेच ताटात वाढून आपल्या समोर ठेवलंय. ‘बघ रे बाबा, तू किती वेळ आमच्या माध्यमांतून जगाशी जोडलेला आहेस, बघून घे हा!’ असा वेधक संदेश हे अ‍ॅप देतं.

मुलाच्या सुपर हिरोजमध्ये कसे अक्राळ विक्राळ दुष्ट ‘डेमन’ला शह द्यायला वेगवेगळे सुपर हिरोज असतात, तसे या ‘फोमो’ भुतासाठीदेखील नवीन फायटर आहे. मानसशास्त्रीय भाषेत त्याला ‘जोमो’ (JOMO- जॉय ऑफ मिसिंग आऊट) म्हणतात.

हे एक प्रकारचं डिजिटल डिटॉक्स आहे आणि गम्मत म्हणजे लोकांना यासाठी प्रवृत्त करणारंदेखील हेच आहेत गुगल आणि इन्स्टाग्राम! त्यांच्या असं लक्षात आलं की, त्यांचाच ७० टक्के स्टाफ (एम्प्लॉयी) हा सुट्टीवर असतानादेखील

ई मेल, स्लॅक, जीआयएफ हे तपासत असतो आणि कामाशी जोडलेलाच असतो. मग यातून ‘जॉय ऑफ मिसिंग आऊट’ जन्माला आलं.

एका प्रसिद्ध वार्ताहराने म्हटलंय, ‘‘मी विमानात प्रवास करत असताना अचानक वाय फाय बंद झालं. काही क्षण अस्वस्थतेत गेले, पण लगेच भानावर आलो. मी विमानातून पडलो नव्हतो, जागेवरच होतो, अतिशय मोकळं वाटत होतं. शरीर आणि

मन शुद्ध व्हावं असं काहीसं! जाणवलं की, सतत लोकांशी जोडलेलं असण्याची गरज नसतेच मुळी.’’ तेव्हा मंडळी, आपणही अनुभवू या की हा जोमो. शरीरशुद्धीसारखंच ‘नेटा’ने थकलेल्या मेंदूला वेबशुद्धधीची अनुभूती देवू या.

मला पार्टीला नाही बोलावलंय? नकोच मुळी! म्हणायचं ..जोमो! गेलं खड्डय़ात. मी घरच्या ढगळ्या कपडय़ात मुलांबरोबर कॅरम, बुद्धिबळ खेळेन. बाकी जग कुठे जातंय, काय मौज करतंय करू देत! ते मिस करून मी इथे अत्यानंद लुटणारेय ..जोमो!

माझ्या फोटोला किती लाइक्स आले, नाही आले काय फरक पडतो? मला माहितेय आई-बाबा मला प्रिन्सेस म्हणतात. माझ्या आनंदासाठी फोटो काढायचेत, काही अंगठे मिळवण्यासाठी नाही. ते अंगठे नसणंही मी एन्जॉय करतेय.. द जॉय ऑफ मिसिंग!

माझा बॉस माझ्या कामावर जाम खूश आहे. मीपण माझं काम मनापासून करतोय/करतेय, मग मी दुसऱ्या कुणाबद्दल ईर्षां का बाळगावी? ती ईर्षां, ते सततचे अपडेट्स आणि आपण मागे पडतोय का ही अवाजवी भीती ..हे सगळं मी आनंदाने ‘मिस’ करेन.. द रिअल जॉय ऑफ मिसिंग आऊट!

थोडंसं ‘ऑफ द नेट’ जाऊ या मंडळी! सोप्पं! एक दिवस मोबाइल फोन, कम्प्युटर, इंटरनेट उघडूयाच नकोत. कडकडीत उपवास करू या. आणि व्हर्च्युअल नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातला खराखुरा आनंद अनुभवू या.

dabholkard@dataone.in

chaturang@expressindia.com