प्रज्ञा शिदोरे

भारतीय वंशाच्या कोणीही भारताबाहेर काही मोठी कामगिरी करून दाखवली की आपल्याला अभिमान वाटतो आणि साहजिकच आहे ते. नुकतीच भव्या लाल यांची अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्ती झाली. या संस्थेचं नाव आणि त्यांच्या कामाचं महत्त्व माहीत नसलेली व्यक्ती सापडणं विरळाच. त्यामुळे त्यांच्या या नियुक्तीनंतर व्यक्त करण्यात आलेला आनंद खास होता. भव्या लाल यांच्याविषयी २८ फेब्रुवारीच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने..

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
New policy, MHADA, MHADA officers,
म्हाडा अधिकारी, कर्मचाऱ्यांची मक्तेदारी संपविण्यासाठी नवे धोरण
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

‘नासा’ ही संस्था अनेक अर्थानी त्या त्या काळात प्रगत मानले जाणारे निर्णय घेत आलेली आहे. काही मोठं ध्येय साध्य करायचं साधन म्हणून का होईना, पण संस्थेत सर्व वांशिक भेदभाव मोडले गेले. हे होण्यासाठी अर्थात अनेक कृष्णवर्णीय स्त्रियांचं मोठं योगदान आहे. यामधली तीन महत्त्वाची नावं म्हणजे गणितज्ञ कॅथरीन जॉन्सन, डोरोथी व्हॉगन आणि मेरी जॅक्सन.

अमेरिकेत गेल्या वर्षी ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ ही चळवळ सुरूअसताना किंवा कदाचित त्यालाच प्रतिसाद म्हणून ‘नासा’ने २४ जून २०२० मध्ये आपल्या वॉशिंग्टन डीसी येथील मुख्यालयाचं नामकरण ‘मेरी डब्ल्यू जॅक्सन नासा हेडक्वार्टर्स’ असं केलं. सकारात्मक बदलांना प्रतिसाद देणाऱ्या याच संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी आता भव्या लाल असणार आहेत.

भव्या या मूळच्या दिल्लीच्या. रोझरी आणि दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये शिकलेल्या. अतिशय हुशार. गाणं, चित्रकला यामध्ये प्रवीण. त्यांच्या आई-वडिलांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे त्यांना फार मित्रपरिवार नव्हता. काही मोजक्या मैत्रिणींमध्ये त्या रमायच्या. मितभाषी, कायम काही ना काही वाचत बसलेल्या असायच्या. १९८० मध्ये इयत्ता  ७ वीत असताना रशियन सरकारनं आयोजित केलेल्या एका चित्रकला स्पर्धेत बक्षीस मिळवून त्या सोव्हिएत रशियाला जाऊन आल्या होत्या. १९८५ मध्ये १२ वीनंतर दिल्या जाणाऱ्या एका शिष्यवृत्तीतर्फे त्यांना अमेरिकेमधील ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये (एमआयटी) पदवीचं शिक्षण घेण्याची संधी मिळाली. ‘‘१९८० च्या दशकातल्या अमेरिकेबद्दल, तिथल्या एकूणच संस्कृतीबद्दल, अति खुल्या वातावरणाबद्दल खूप ऐकून होतो. अशा वातावरणात आपल्या एकुलत्या एका मुलीला पाठवण्याची खरंच गरज आहे का?, असा प्रश्न आम्हाला अनेकांनी विचारला. यावर आम्हीही खूप विचार केला, पण तिची जिद्द आणि तिच्या शाळेतून तिला मिळणारं प्रोत्साहन पाहाता भव्याला अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला.’’

असं स्वत: गणित आणि भौतिकशास्त्रात पदवी शिक्षण पूर्ण केलेली त्यांची आई सांगते. ‘एमआयटी’चा परिसर भारावून टाकणारा आहे. तिथे गेल्यावर, तिथल्या मित्रमंडळींमध्ये मिसळल्यावर भव्याला आपल्याला अजून खूप उंची गाठायची आहे, असं लक्षात आलं आणि आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली, असं त्यांचे वडील सांगतात. केवळ तंत्रशिक्षण घेऊन आपलं काम अर्धवट राहील, आपल्याला जर आपल्या विचारांप्रमाणे बदल घडवायचा असेल तर सरकार कसं चालतं, धोरणं कशी आखली जातात याचंही ज्ञान हवं, असं भव्या यांना वाटायचं. त्यामुळे ‘न्युक्लियर इंजिनिअरिंग’मध्ये पदवी घेतल्यावर त्यांनी तंत्रज्ञान आणि धोरण या विषयांतही एमआयटीमधूनच पदवी घेतली. पुढे जॉर्जटाऊन विद्यापीठातून याच विषयात पीएच.डी.देखील मिळवली.

त्यामुळे भव्या यांना अभियांत्रिकी, अवकाश संशोधन आणि यामधील धोरण या क्षेत्रातील शिक्षणाचा भक्कम पाया आहे. त्यांनी गेली २० वर्ष अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात विविध पदांवर काम केलं. अंतराळ क्षेत्रातील संशोधनामध्ये भव्या यांनी गेली अनेक वर्ष मोठं योगदान दिलं आहे. त्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस’, ‘सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इन्स्टिटय़ूट’मध्ये (एसटीपीआय) ‘रिसर्च स्टाफ’ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान काम करत होत्या. त्याआधी ‘इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ अ‍ॅस्ट्रोनॉटिक्स’च्या प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. त्यापूर्वी त्यांनी केंब्रिजमधल्या ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजी’च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचं संचालकपद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्युक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. भव्या नासाच्या ‘इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम’ म्हणजे नवीन संकल्पनांवर काम करणाऱ्या उपक्रम आणि सल्लागार समितीच्या सदस्य राहिल्या आहेत.

अमेरिकेत अध्यक्षपदासाठीची निवडणूक झाल्यानंतर नवीन अध्यक्ष आपलं पद भूषवू लागण्याआधी काही काळाचा अवधी दिला जातो. याला ते ‘ट्रान्झिशन पिरिअड’ म्हणतात. नवीन अध्यक्षांना प्रशासकीय यंत्रणेतील बारकाव्यांची माहिती व्हावी, विविध धोरणांबद्दल माहिती व्हावी, यासाठी हा वेळ घेतला जातो. यामध्ये नवीन अध्यक्षाला प्रत्येक क्षेत्राबद्दल माहिती तर दिली जातेच, पण त्याबरोबरच त्या त्या क्षेत्रातील आव्हानांना सामोरं जाण्याची तयारीही करून घेतली जाते. या संक्रमणकाळानंतर नवीन अध्यक्ष आपल्या प्रशासनाचा प्राधान्यक्रम आणि उद्दिष्ट ठरवत असतो. या उद्दिष्टांच्या दृष्टीनं हे प्रशासन विविध नियुक्त्याही करतं. ‘नासा’मध्ये वरिष्ठ पदावर काम करत असल्यानं भव्या लाल या बायडन प्रशासनाच्या संक्रमणकाळात ‘नासा’च्या परीक्षण समितीच्या सदस्य होत्या. यानंतर प्रशासनानं नवीन नियुक्त्या करताना भव्या यांची ‘अ‍ॅक्टिंग चीफ ऑफ स्टाफ’ किंवा कार्यकारी अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ‘नासा’मध्ये वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम पाहणार आहेत.

विविध अंतराळ मोहिमांचा प्राधान्यक्रम ठरवणं, नवीन प्रकल्प हाती घेणं, त्यासाठी किती खर्च करण्यात यावा, यासंबंधी आर्थिक सल्ले देणं, ही जबाबदारी आता भव्या लाल यांच्यावर असणार आहे.

साधारण साठेक वर्षांपूर्वी याच संस्थेमध्ये श्वेतवर्णीय अमेरिकन स्त्रिया सोडून इतर स्त्रियांना सामावून घेताना नाकं मुरडली जायची. मग विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये वंशभेदाची भिंत नको, म्हणून श्वेतेतरवर्णीयांना ‘नासा’मध्ये सामावून घेण्यास सुरुवात झाली. आज याच संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी भारतीय वंशाच्या स्त्रीची निवड झाली आहे.

जेव्हा जेव्हा भारतीय वंशाच्या कोणीही जगातल्या मोठय़ा आणि महत्त्वाच्या पदांवर रुजू होतो तेव्हा एक भारतीय म्हणून अर्थातच आपल्याला अभिमान वाटतो. हा अभिमान वाटतो तो त्यांच्या कर्तबगारीचा. पण अनेकदा आपण एक व्यवस्था म्हणून अशा लोकांना योग्य संधी मिळवून देऊ शकलो नाही, याचं दु:खही होतं. भारतानं अंतराळ संशोधनात घेतलेली भरारी आणि त्यात शास्त्रज्ञांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. पण भव्या लाल यांच्यासारखे गुणवान अधिक संख्येनं निर्माण होण्यासाठी  विशेषत: स्त्रियांनाही अशा उच्चपदांवर पोहोचता यावं यासाठी  एका विशिष्ट पद्धतीची शिक्षणव्यवस्था, संधी निर्माण करून देण्यासाठी, व्यक्तींच्या बौद्धिक क्षमतेचा वापर करून घेण्यासाठी पोषक राजकीय व्यवस्था लागते. ज्या समाजातून ही माणसं वर आली त्या संपूर्ण समाजाला त्यांच्या बुद्धिमत्तेचा फायदा व्हावा, यासाठी लागते ती प्रोत्साहनात्मक सामाजिक व्यवस्था. या व्यवस्थांचा आपल्या देशात अभाव आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. भव्या लाल यांना शुभेच्छा देतानाच असंही वाटतं, की अधिकाधिक लोक आपलं कार्यक्षेत्र म्हणून जेव्हा भारताला निवडतील तेव्हा भारतीय असण्याचा अभिमान अधिक वाढेल.

pradnya.shidore@gmail.com