माधुरी ताम्हणे

madhuri.m.tamhane@gmail.com

आपत्तीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीने ‘१००’ या हेल्पलाइनवरून संपर्क साधताच कंट्रोल रूममधील पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. या हेल्पलाइनवर नैसर्गिक आपत्ती, आग, दंगल, भूकंप, चोऱ्या, ध्वनिप्रदूषण, स्त्रियांची छेडछाड, कौटुंबिक भांडणतंटे अशा कारणांसाठी संपर्क साधून मदत मागता येते. आपत्कालीन परिस्थितीत मदतीला तात्काळ धावून जाणारी ही हेल्पलाइन खूप उपयुक्त सिद्ध होत आहे.

अपरात्री कामावरून घरी परतणारी एक अभियंता तरुणी! आडबाजूच्या रस्त्यावरून काही गुंड तिचा पाठलाग करत असतात. ती चटकन मोबाइलवरून नंबर फिरवते. ‘एक शून्य शून्य. क्षणांत नंबर लागतो. पलीकडून आवाज येतो, ‘‘जय हिंद!, ठाणे शहर (अथवा तत्सम स्थानिक) पोलीस विभागातर्फे आपलं स्वागत आहे!’’ कृपया मदतीसाठी १ नंबर दाबा. १ नंबरचं बटन दाबून कंट्रोल रूममधील पोलिसांशी संपर्क साधून त्यांना घडणारी घटना सांगताच काही क्षणांत इच्छित स्थळी पोलीस सायरनचा आवाज ऐकू येतो. पाठलाग करणारे गुंड पळून जातात. पोलीस सुरक्षितपणे त्या तरुणीला घरी पोहोचवतात. ती तरुणी पोलिसांना मनापासून धन्यवाद देते..

आपत्तीत सापडलेल्या कोणत्याही व्यक्तीने ‘१००’ या हेल्पलाइनवरून संपर्क साधताच कंट्रोल रूममधील पोलीस यंत्रणा कार्यान्वित होते. सर्वप्रथम आपत्तीग्रस्ताला स्थळ विचारून आपत्तीचं स्वरूप जाणून घेतलं जातं आणि त्यावरून मदतीचं स्वरूप लक्षात घेतलं जातं. त्यानंतर वायरलेसचे कर्मचारी बीटमार्शलला कॉल देतात. प्रत्येक पोलीसठाण्याला बीटमार्शल कार्यरत असतात. स्थळ कळताच जवळचे बीटमार्शल तातडीने मदतीसाठी धावून जातात. आपत्तीग्रस्तांसाठी पोलीस व्हॅन्स, बिनतारी यंत्रणा सुसज्ज असते. त्यामुळे ‘१००’ या हेल्पलाइनवर फोन करताच पुढील पाच ते सात मिनिटांत योग्य ती मदत पोहचवली जाते.

ठाणे शहर अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय ऐनापुरे ‘एक शून्य शून्य’ या पोलीस हेल्पलाइनविषयी विस्ताराने माहिती देतात. ‘‘शासनाने आणि समाजाने आपल्याला अनेक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र या सेवांचा फायदा घेण्याचा आपला हेतू स्वच्छ आणि पारदर्शक असावा. शासनाची भूमिका लक्षात घेऊन ‘१००’ ही हेल्पलाइन उपलब्ध साधनसामुग्रीचा प्रभावी वापर करून अत्यंत यशस्वीपणे आणीबाणीची परिस्थिती हाताळत आहे. ही पोलीस हेल्पलाइन पारंपरिक आहे. मात्र त्यात काळानुसार वेळोवेळी अनेक बदल करण्यात आले आहेत. त्यामुळेच या हेल्पलाइनची विश्वासार्हता आजही टिकून आहे. सध्या आम्ही ‘जीआयएस’ आणि ‘जीपीएस’ या दोन आधुनिक तंत्रप्रणालीचा त्यासाठी वापर करतो. त्यामुळे संगणकाच्या पडद्यावर आपत्कालीन परिस्थितीची नेमकी जागा, जवळपासच्या खुणांच्या जागा हे सर्व तात्काळ कळतं आणि सात ते आठ मिनिटांत पोलिसांची मदत तिथे पोहोचू शकते. ‘१००’ या हेल्पलाइनसाठी ३० टेलिफोन लाइन्स २४ तास तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. ही सेवा वर्षभर २४ तास विनाव्यत्यय चालू असते. कॉल येताच तिसऱ्या रिंगच्या आत फोन उचलला गेला पाहिजे, अशी कंट्रोलरूमला सक्त सूचना असते. ही हेल्पलाइन ऑपरेट करणाऱ्या पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. रेकॉर्डिग, रिपोर्टिग, व्यावसायिक कौशल्य, कायद्याचं सम्यक ज्ञान या सर्वाचा या प्रशिक्षणात समावेश आहे. आपत्तीत सापडलेल्या माणसाला मदत करण्यासाठी जवळपास ७०० कायद्यांची मदत घेतली जाते. तक्रारदारांच्या तक्रारीची तीव्रता, निवेदनातील सत्यता त्याच्या स्वरांतून, त्या व्यक्तीचं बोलणं ऐकत असतानाच पोलिसांना नेमकी जाणवते आणि त्यानुसार तात्काळ मदत पाठवली जाते. ‘१००’ या हेल्पलाइनवर आलेला प्रत्येक कॉल तपासला जातो. पोलिसांना चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देणं कायद्याने गुन्हा आहे आणि तसे घडल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.’’

‘‘१०० या हेल्पलाइनवर नैसर्गिक आपत्ती, आग, दंगल, भूकंप, चोऱ्या, ध्वनिप्रदूषण, स्त्रियांची छेडछाड, कौटुंबिक भांडणतंटे अशा असंख्य कारणांसाठी दरदिवशी प्रत्येक शिफ्टमध्ये किमान हजार ते दीड हजार कॉल्स येतात. मदतीसाठी आलेल्या प्रत्येक तक्रारीची वहीत नोंद केली जाते आणि तक्रारदाराकडून त्याचा ‘फिडबॅक’सुद्धा घेतला जातो.’’ असं पोलीस उपनिरीक्षक मयूरी गोते यांनी सांगितलं.

अडचणीत सापडलेल्या व्यक्तीने ‘१००’ या हेल्पलाइनवर फोन केल्यास अचूक स्थळ सांगणं अत्यंत गरजेचं असतं. तसंच त्या व्यक्तीने त्याचा ‘व्हॉट्स अ‍ॅप’ नंबर दिल्यास गूगल सर्च करून पोलीस व्हॅन मदतीसाठी त्या स्पॉटवर अचूक पाठवता येते. तसंच त्या स्थळावर पोहोचण्याचा सर्वात जवळचा आणि बिनट्रॅफिकचा जलदमार्गही पोलीस व्हॅनला शोधता येतो. समजा गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगार गाडीतून पळाले तर त्यांची जाण्याची दिशा, गाडी क्रमांक पोलिसांना कळला तर नाकाबंदी करून ते वाहन पकडताही येते. तसंच अशावेळी प्रसंगावधान राखून गुन्हेगारांचे वर्णन, उंची, वय, पोशाख, त्याने वापरलेली हत्यारं, त्याची बोली, त्याने वापरलेल्या गाडीचं मॉडेल अशी माहिती जर आपत्तीग्रस्ताला देता आली तर गुन्हेगाराचा माग काढणं पोलिसांना सोपं जातं. त्याचप्रमाणे घटनास्थळाच्या आजूबाजूच्या खुणा कॉल करणाऱ्याने सांगितल्या तर ते त्याच्या फायद्याचं ठरतं. उदाहरणार्थ एखादी आपत्कालीन घटना एखाद्या मॉलच्या शेजारी होत असेल तर कंट्रोलरूमकडून मॉलच्या सुरक्षारक्षकांना घटनास्थळी तातडीने पाठवता येतं. आगीची परिस्थिती असेल तर जवळच्या अग्निशमन दलाला तातडीने वर्दी दिली जाऊ शकते. एखाद्या ठिकाणी कोणी संशयित व्यक्ती वा वस्तू आढळल्यास त्याची अचूक आणि वस्तुनिष्ठ माहिती या हेल्पलाइनवरून दिली जावी. अशावेळी कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शब्द न् शब्द खूप महत्त्वाचा असतो. त्यातून पोलिसांना काहीतरी धागा मिळतो आणि संबंधित गुन्हेगारापर्यंत नेमकं पोहोचता येतं.

‘१००’ या पोलीस हेल्पलाइनवरून पोलीस नागरिकांना जो सल्ला देतात त्याची कॉल करणाऱ्याने तात्काळ अंमलबजावणी करावी, असंही संजय ऐनापुरे, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) कळकळीने सांगतात. उदाहरणार्थ, दंग्याच्या वेळी घराबाहेर मोठा जमाव जमला आहे असं कळताच पोलीस सूचना देतात, तुम्ही घराबाहेर पडू नका. घरातील लाईट बंद करा. जेणेकरून जमावाला वाटेल, घरात कोणीच नाही आणि ते निघून जातील. याउलट घरात हल्लेखोर घुसला असेल, तर पोलीस घरातील व्यक्तीला सूचना देतात की तुमचा मोबाइल घेऊन बाथरूम वा बेडरूममध्ये जा. तिथून शेजाऱ्यांना फोन करा. पोलीस येईपर्यंत धीर सोडू नका. संयमाने वागा. समजा इमारतीला आग लागली असेल तर रेफ्युजी एरियात जमा व्हा. लिफ्टने न जाता जिन्याने उतरा. ब्लँकेट पांघरून घराबाहेर पडा वगैरे. पोलीस अनुभवी आणि प्रशिक्षित असतात. त्यांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्यात जनतेचं हित आहे! ‘१००’ या हेल्पलाइनवरून फोन करताना कमीत कमी वेळ आणि शब्द वापरून आपत्कालीन परिस्थितीची पोलिसांना माहिती द्यावी. कारण ही हेल्पलाइन अधिक काळ बिझी ठेवल्यास दुसरा आपद्ग्रस्त पोलिसांच्या मदतीपासून वंचित राहू शकतो. कदाचित त्याचा जीवही धोक्यात येऊ शकतो.’’

सध्या मोबाइल क्रांतीमुळे आणि जनतेला कायद्यांचं ज्ञान, सामाजिक हक्कांची जाणीव अधिक तीव्रतेने झाल्यामुळे ‘१००’ या हेल्पलाइनवर येणाऱ्या कॉल्सची संख्या खूप वाढली आहे. सायबर गुन्ह्य़ांच्या तक्रारींबरोबरच मॉर्फिग करून अश्लील छायाचित्र तयार करणे आणि अश्लील पोस्ट टाकून मुलींना बदनाम करणे या तक्रारींमध्येही खूप वाढ झाली आहे. अशावेळी तक्रारदार व्यक्तींना ‘१००’ या हेल्पलाइनवरून योग्य ती मदत दिली जाते.

एक महिला पोलीस शिपाई आपला अनुभव सांगतात, ‘‘१०० या हेल्पलाइनवर काम करत असताना खूप चांगले अनुभवही येतात. एकदा एका स्त्रीचं मंगळसूत्र चोराने खेचलं. तिने फोन करताच डय़ुटीवरील पोलिसांनी चोराचा पाठलाग करून ते तिला मिळवून दिलं. एकदा पंचवीस मुलं जंगलात हरवल्याची तक्रार ‘१००’ या हेल्पलाइनवर आली. तात्काळ पोलिसांची कुमक पाठवून या मुलांचा शोध घेतला गेला. अशावेळी आम्हा महिला पोलिसांचा पोलीस विभागातर्फे गौरव करण्यात येतो. तेव्हा आम्हाला खूप अभिमान वाटतो. जनता आम्हाला दुवा देते, तेव्हा कर्तव्यपूर्तीचा वेगळाच अभिमान आणि आनंद वाटतो.’’

दिवस असो वा रात्र, जनतेच्या आपत्कालीन परिस्थितीत मदतीला तात्काळ धावून जाते ती तारणहार ‘१००’ ही हेल्पलाइन खूप उपयुक्त सिद्ध होत आहे, एवढं नक्की.

माहिती पुरवण्यापासून लोकांचं म्हणणं ‘ऐकून’ घेण्यापर्यंत अनेक गोष्टी करण्याचं काम ‘हेल्पलाइन्स’ करत असतात. आज समाजात अनेक समस्यांविषयी मदत वा मार्गदर्शन करणाऱ्या विविध ‘हेल्पलाइन्स’ कार्यरत आहेत. उदा. मुलांवरील वा स्त्रियांवरील अत्याचार, रॅगिंग, सायबर गुन्हे, खंडणी, हुंडा, मानसिकदृष्टय़ा अपंग, आत्महत्याप्रवण मानसिकतेचे लोक यांच्यासाठी. कोणकोणत्या ‘हेल्पलाइन्स’ आज कार्यरत आहेत, त्याचं नेमकं काम काय , काय आहे त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव, हे सांगणारं ‘हेल्पलाइनच्या अंतरंगात’ हे सदर  दर पंधरवडय़ाने.