रझिया पटेल
दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर कोचरब आश्रम ते आगाखान पॅलेसमधला शेवटचा तुरुंगवास सोसताना झालेल्या मृत्यूपर्यंतच्या काळातील कस्तुरबा गाधींचे योगदान नतमस्तक करणारे आणि प्रत्येक भारतीयाचे मन भरून यावे असे आहे. सुरुवातीच्या काळात पतीशी सामना करणारी ही पत्नी हळूहळू सार्वजनिक सत्याग्रही बनत गेली. महात्मा गांधींच्या सत्याग्रही लढय़ात भारतातील स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर उतरल्या हे खरे आहे, पण कस्तुरबांचा वाटा त्यात मोठा आहे, असे सत्याग्रहाचा इतिहास बघता दिसून येते. आज त्यांचं योगदान काहीसं विस्मरणात गेलं आहे. कस्तुरबांच्या जयंतीला नुकतीच दिडशे वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या आठवणींना थोडं ताजं करण्याचा हा प्रयत्न..
कस्तुरबा गांधी हे भारताच्या आणि स्त्रीच्या स्वातंत्र्यलढय़ाच्या पुस्तकातलं एक चमकणारं पान आहे. घरातील हुकूमशाहीपासून ते ब्रिटिश साम्राज्यवादाशी लढा- कस्तुरबांच्या लढय़ाचा इतका विशाल पट आहे. अर्थात स्वामित्व गाजवणाऱ्या पतीमध्ये देखील कस्तुरबांनी आपल्या अहिंसक सत्याग्रहाने बदल घडवून आणले, असे गांधीजी स्वत:च मान्य करतात. निर्भयता, स्पष्टपणा हा कस्तुरबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग होता. त्यांचं दिडशेवं जयंती वर्ष सध्या सुरू आहे. त्यानिमित्ताने कस्तुरबांच्या आयुष्याचा नव्याने आढावा घ्यायला हवाच.
वनमाला परीख आणि सुशीला नय्यर यांच्या ‘हमारी बा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजींनी लिहिलंय, ‘वे निरक्षर थी, स्वभाव की सीधी, स्वतंत्र, मेहनती और मेरे साथ कम बोलनेवाली.’ आपल्या ‘सत्याचे प्रयोग’ अथवा ‘आत्मकथा’मध्ये गांधीजी म्हणतात, ‘माझी पत्नी कोठे जाते हे मला नेहमी माहीत झालेच पाहिजे, म्हणून तिने माझ्या परवानगीशिवाय कोठेही बाहेर जाता कामा नये, असे मी सांगितल्यामुळे आमच्यात दु:खदायक बेबनाव होऊ लागले. परवानगीशिवाय कोठेही जायचे नाही ही एक प्रकारची कैदच झाली. परंतु कस्तुरबा अशा प्रकारची कैद सहन करणारी स्त्री नव्हती. मी जसजसा दबाव घाली तसतशी ती अधिकच मोकळीक घेई.’ गांधीजी आणि कस्तुरबांचा बालविवाह. गांधीजींच्या मनात चोरांची, सापांची, भुतांची भीती घर करून बसली होती. रात्री झोपताना अंथरुणाजवळ दिवा ठेवल्याशिवाय त्यांना झोप लागायची नाही. त्या उलट कस्तुरबांना सापांची, भुतांची वगैरेची कधीच भीती वाटली नाही. ती अंधारातही कुठेही जाऊ शकत असे. अशा कस्तुरबांनी अनेक वेळा गांधीजींची कानउघाडणी देखील केली आहे.
गांधीजी जेव्हा इंग्लंडहून खर्चीक शिक्षण घेऊन बॅरिस्टर होऊन परत आले तेव्हा साहजिकच आपल्या शिक्षणाचा वापर करून कुटुंबातील खर्चाचा मोठा वाटा उचलावा, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. कारण त्यांच्या भावांनी त्यांच्या शिक्षणावर खर्च केला होता. तेव्हा कस्तुरबांनी सडेतोडपणे त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. गांधीजींनी घरात केलेल्या पाश्चात्त्य पद्धतीच्या बदलांमुळे खर्च वाढला आहे त्याऐवजी भावांना मदत करावी, असे त्यांनी सांगितल्यावर संतापलेल्या पतीने त्यांची रवानगी माहेरी करून टाकली. अर्थात नंतर त्यांना आपली ही चूक उमगली. गांधीजी सांगत असलेला साधेपणा कस्तुरबांमध्ये अंगभूत होता. बॅरिस्टर झाल्यावर सुरुवातीला केला जाणारा पाश्चात्त्य डामडौल सोडण्याचा निश्चय करणे हा गांधीजींसाठी बदल होता.
दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांसाठी केलेल्या कामामुळे गांधीजींना तेथील भारतीयांनी बहुमूल्य भेटी दिल्या. त्या न स्वीकारता त्याचा ट्रस्ट करावा, असे गांधीजींनी ठरवले. आणि विरोध करणाऱ्या कस्तुरबांना सांगितले, ‘‘मी केलेल्या सेवेमुळे हे मिळाले आहे.’’ त्यावर ‘‘पण मी तुमच्या कामासाठी घरात दिवसरात्र राबले, मला आवडत नसलेल्या गोष्टीही तुम्ही मला करायला लावल्या त्याचे काय!’’ असा खडा सवाल कस्तुरबांनी केला. तेव्हा ‘‘पतीची कमाई ही पती-पत्नीची सामायीक जिंदगी होय. कारण पत्नी घरकाम करून त्याला द्रव्यार्जनासाठी मदत करत असते,’’ असे गांधींजीनी सांगितले. केलेल्या सेवेचा मोबदला घेणे योग्य नाही हे नंतर कस्तुरबांनाही पटले. ही पतीशी सामना करणारी पत्नी हळूहळू सार्वजनिक सत्याग्रही बनत गेली.
गांधीजींसोबत दक्षिण अफ्रिकेत गेलेल्या कस्तुरबांना गांधीजींवर झालेल्या हल्ल्याचा आणि असुरक्षिततेचा सामना करावा लागला. तेव्हाच खरे म्हणजे कस्तुरबांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली होती आणि कस्तुरबा त्या सगळ्या आव्हानांना सामोऱ्या गेल्या. या काळात त्यांचं संघटनकौशल्य, समाजाशी संवाद साधण्याचे आणि रचनात्मक कामाचे कौशल्य याची ओळख होऊन आपल्या पत्नीच्या अद्वितीय गुणांचा प्रत्यय गांधीजींना आला. पुढे त्या दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहात पहिल्या स्त्री सत्याग्रही ठरल्या. गांधीजींच्या तुरुंगवासाच्या काळात फिनिक्स आश्रम चांगल्या पद्धतीनं सांभाळला. त्या काळात कस्तुरबा गांधीजींच्या तत्त्वांना जगण्यात बाणवण्याचा प्रयत्न करत होत्या.
नंतर गांधीजींसोबत भारतात परतल्यानंतर मोठा परीक्षेचा प्रसंग आला तो कोचरब येथील आश्रमात अस्पृश्य समाजातील कुटुंबाला गांधीजींनी राहण्यासाठी प्रवेश दिला तेव्हा. कस्तुरबांसाठी हा कठीण प्रसंग होता. पण कस्तुरबांनी विचारपूर्वक स्वत:ला बदलले. आणि या कुटुंबातील मुलीला आपली मुलगी मानून सांभाळलंही. पुढे कस्तुरबांनी मद्रास येथे झालेल्या अस्पृश्यताविरोधी परिषदेत गांधींजींचे प्रतिनिधित्व केले. नंतर अनेक स्त्रियांना सोबत घेऊन हरिजन हक्कांचा प्रचार केला. तेव्हा कर्मठ हिंदूंनी कस्तुरबांवर टीका सुरू केली. इतकेच नाही तर त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. एकदा गांधीजीवर एका सभेत कर्मठ हिंदुत्ववादी हल्ला करणार असे कळल्यावर कस्तुरबा त्या सभेत प्रयत्नपूर्वक जाऊन गांधीजींसोबत राहिल्या. त्यानंतर भारतात स्वातंत्र्यासाठी झालेल्या अनेक सत्याग्रहांमध्ये त्या सहभागी झाल्या. अनेक वेळा तुरुंगवास सोसला. गांधीजी तुरुंगात असताना स्वातंत्र्यलढय़ाचं नेतृत्वही केलं. चंपारण इथे झालेल्या सत्याग्रहासाठी कस्तुरबांनी पुन्हा रचनात्मक, पायाभूत कामाचा नमुना निर्माण केला. त्यांनी चंपारण सोडले तेव्हा खेडय़ातील रस्ते स्वच्छ झाले होते, दरुगधी येत नव्हती, माशा, डास गायब झाले होते. लोकांना निरोगी राहण्याच्या सवयी लागल्या होत्या, असं वर्णन गांधीजींचे नातू अरुण गांधी यांनी केले आहे.
सत्याग्रही कस्तुरबांच्या जीवनातला एक अलक्षित पैलू म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या वेळेला जनतेशी साधलेला संवाद. बिजलपूर येथे झालेल्या एका सभेत त्या म्हणाल्या, ‘‘अपने देश के इतिहास के एक बहुत नाजूक मौके पर हम यहा इकठ्ठे हुए है। इस वक्त हमारे पास लंबे चौडे भाषण करने का वक्त नहीं है, इसलिए आजकी सभा का अध्यक्षपद देने के लिए बहुत थोडे में आपका आभार मान लेती हूँ। इस वक्त मुझे आपसे एक बात कहनी है की आपसी झगडों को भूल जाईए। इस मोके पर सब एक हो जाईये.’’
दांडी मार्चच्या वेळी तेथील स्त्रियांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘बहनों में जितनी समझ होती है उतनी पुरुषों में नही होती, क्योंकि बहने दुख की भाषा को समझती है। धरासणाके अत्याचारों से बहनो के दिल को चोट पहुंची है। जब जब देशहित के खिलाफ कोई भी हलचल शुरू हो, तब तब धरासणा को याद रखिए।’’
गांधीजींवर देशद्रोहाचा आरोप ठेवून जेव्हा सहा वर्षांची शिक्षा देण्यात आली तेव्हा कस्तुरबांनी ‘यंग इंडिया’मध्ये जे आवाहन केले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘‘भारत जागा होईल आणि काँग्रेसचे विधायक कार्य पुढे नेण्याचे गंभीर प्रयत्न करील याबाबत माझ्या मनात शंका नाही. आपण त्यांची सुटका करून घेण्यात यशस्वी तर होऊच आणि ज्या प्रश्नांसाठी आपण झगडत आहोत ते आपले समाधान होईल अशा पद्धतीने सोडवू शकू. यावरचा उपाय आपल्याच हाती आहे. आपण जर असफल झालो तर त्याला आपणच जबाबदार असू. तेव्हा विधायक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करा आणि ते यशस्वी करा.’’ ब्रिटिश सरकारने जेव्हा रौलेट विधेयक आणले तेव्हा गांधीजी म्हणाले, ‘‘रौलेट कायदा पास झाला तर कोणीही देशद्रोहाचा आरोप असलेल्या भारतीयावर मुक्तपणे न्यायाधीशाशिवाय खटला चालवता येईल, तसेच अपील करायचा अधिकार राहणार नाही. बंडखोरांना सार्वजनिकरीत्या बोलायचा अधिकार असणार नाही. केवळ छापील मजकूर बाळगणे हा देशद्रोह मानून त्यांना तुरुंगात पाठवले जाईल. जेव्हा हा कायदा पास करण्यात आला तेव्हा गांधीजींनी देशाला हरताळ पुकारण्याची हाक दिली.
दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यावर कोचरब आश्रम ते आगाखान पॅलेसमधला शेवटचा तुरुंगवास सोसताना झालेल्या मृत्यूपर्यंतच्या काळातील कस्तुरबांचे योगदान नतमस्तक करणारे आणि प्रत्येक भारतीयाचे मन भरून यावे असे आहे. महात्मा गांधींच्या सत्याग्रही लढय़ात भारतातील स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर उतरल्या हे खरे आहे, पण कस्तुरबांचा वाटा त्यात मोठा आहे असे सत्याग्रहाचा इतिहास बघता दिसून येते. चंपारण नंतर खेडा सत्याग्रहात त्यांनी स्त्रियांना आवाहन केलं, ‘हमारे मर्दो ने सत्य के लिए सरकार के साथ जो लडाई ठानी है उस में हमे उनका उत्साह बढाना चाहिए, सरकार के नौकरों से मत डरिये बल्कि हिंमत रखिए और अपने भाईयों, पतियों ओर बेटें को हिंमत दिजिए।’ कस्तुरबांच्या येण्याने तिथल्या स्त्रियांना खूप आधार मिळाला. राजकोट येथे संस्थानिक ठाकूरांकडून स्त्रियांच्या केल्या जाणाऱ्या छळ आणि विनयभंगाच्या विरोधात स्त्रिया संतापून रस्त्यावर उतरल्या. या राजकोटच्या सत्याग्रही स्त्रियांना पाठिंबा देण्यासाठी कस्तुरबा तिथे पोचल्या. तिथे इतर स्त्रियांसोबत कस्तुरबांनाही अटक केली गेली. त्याच वेळी जनतेच्या राजकीय हक्कांची मागणी ठाकूर फेटाळत होते. त्याविरोधातही स्त्रिया अहिंसक सत्याग्रहात उतररल्या. तेव्हा ‘यावेळेला राजकोटमध्ये जे घडतंय तो केवळ राजकीय हक्कांचा प्रश्न राहिलेला नसून स्त्रियांच्या शीलाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे’ असे कस्तुरबांनी जाहीर केले. जेव्हा ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू झाले आणि गांधीजींना अटक करण्यात आली त्यावेळेला गांधीजींच्या जागी कस्तुरबांनी भाषण केले. कस्तुरबा काही कसलेल्या वक्त्या नव्हत्या पण त्यांच्या व्यक्तिमत्वातला आणि भाषेतला साधेपणा ऐकणाऱ्यांच्या हृदयाला हात घालत असे. शिवाजी पार्कवर गांधीजींच्या ऐवजी त्यांनी केलेले भाषण हे शेवटचे भाषण होते. त्यात त्या म्हणाल्या, ‘‘अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात काल रात्री गांधीजींनी दोन तास आपलं मन तुमच्यासमोर मोकळं केलं त्यात मी काय भर घालणार? त्यांच्या ध्येयाला जागणं हेच आपल्या हाती आहे. भारतातल्या स्त्रियांनी आपले स्वत्व दाखवले पाहिजे. या लढय़ात सर्व स्त्रियांनी, मग त्या कुठल्याही जातीधर्माच्या असोत सहभागी झाले पाहिजे. सत्य आणि अहिंसा आपण पाळली पाहिजेत. ‘छोडो भारत’ या लढय़ासाठी आश्रम सोडतांना कनू गांधी जेव्हा ‘करो या मरो’ घोषणेचा बिल्ला कस्तुरबांना लावायला निघाले तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘हा मंत्र तर माझ्या काळजावर कोरलेला आहे, याची आठवण करून देण्यासाठी मला कागदी बिल्ला कशाला हवा?’’
देशाच्या स्वराज्यासाठी अतीव कष्ट आणि असीम त्याग केलेल्या कस्तुराबांचा शेवटचा तुरुंगवास खूप कठीण होता. या ब्रिटिश सरकारला माणुसकी आणि नैतिकता नाही, अशी त्यांची खात्री पटली होती. गांधीजी आणि कस्तुरबांचा आगाखान पॅलेसमध्ये तुरुंगवासातील संवाद सुशीला नायर यांनी नमूद केला आहे. कस्तुरबा गांधीजींना म्हणाल्या होत्या, ‘‘सरकार की ताकत का पार नहीं हैं, वह लोगों को कुचल रही है, लोग बेचारे कहाँ तक सहेंगे? इसका परिणाम क्या होगा? गांधीजी त्यांना जोखण्यासाठीच जणू म्हणाले, ‘‘तू कहे तो मैं वाईसरॉय को माफी के लिए पत्र लिखू?’’ बा गुस्से में आकर बोली, ‘‘सुकुमार लडकियां जेल में पडी है, वे माफी नहीं मांगती और आप मांगेंगे?’’ या तुरुंगवासात त्यांच्या आजारावर उपचार करण्याबाबत सरकारने अक्षम्य हेळसांड केली. आगाखान पॅलेसच्या तुरुंगवासात शेवटी त्यांना मृत्यू आला. ‘गांधीजींनी लिहिलंय ‘कष्ट सहते सहते कस्तुरबाने अपनी देह छोडी।’ लक्षात घ्या याही परिस्थितीत सरकारकडे माफीपत्र पाठवायचा विचारही त्यांच्या मनात आला नाही.
कस्तुरबा भारताच्या इतिहासातलं एक चमकणारं पान आहेत हे खरं आहे, पण आज त्यावर विस्मरणाची धूळ साठली आहे. सगळा देश जणू त्यांना विसरून गेला आहे. चळवळी त्यांना विसरून गेल्या आहेत. कस्तुरबा कधी स्वत:बद्दल बोलल्या नाहीत, लिहून ठेवलं नाही. त्यांना ते आवडत नव्हतं. त्या फक्त झोकून देऊन काम करीत राहिल्या. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत जे अनेक महापुरुषांच्या पत्नींचं होतं, तेच कस्तुरबांचं झालं. गांधीजींचे पणतू तुषार गांधी म्हणतात, ‘‘महात्मा गांधी यांच्या आणि त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकांची एक मोठी इंडस्ट्री उभी राहिली आहे असे दिसते पण त्या तुलनेत कस्तुरबांविषयी फारशी माहिती मिळत नाही, पोरबंदरला लोक जातात तेव्हा लोक बापूंचं घर पाहतात, पण बांच्या घराकडे जात नाहीत.’’ गांधीजींचे नातू अरुण गांधी यांनी कस्तुरबांवर पुस्तक लिहिलं तेव्हा, ‘मुलाखती घेताना लोक गांधीजींच्याच आठवणी सांगायचे तेव्हा त्यांची गाडी रुळावर आणावी लागायची.’ असा उल्लेख केला आहे.
तेव्हा कस्तुरबांना, त्यांच्या देशाच्या आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्यलढय़ाला दुय्यम लेखणं आणि कस्तुरबांसारख्या स्त्रियांना विसरून जाणं हे कुठल्याही समाजाचं मृतवत होत जाणं आहे. विशेषत: जेव्हा आजच्या काळात लोकशाहीलाच धोका निर्माण झाला आहे. जे स्वातंत्र्य आणि लोकशाही आपण कस्तुरबांसारख्यांच्या अनेकांच्या बलिदानानंतर आपण मिळवले आहे अशा काळात कस्तुरबांचे स्मरण करण्याची कधी नव्हे इतकी गरज आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.