सुमित्रा भावे / सुनील सुकथनकर  

पूर्वी जेमतेम तीस मिनिटांच्या फिल्मसाठी पिक्चरचे सात-आठ डबे, संवाद, संगीत, इतर ध्वनी यांच्या रिळांचे डबे असे तीसेक डबे घेऊन आम्ही हिंडायचो. वाहन नसताना, टॅक्सी महाग पडत असताना एका स्टुडिओनं नाकारलं तर सारं डबोलं घेऊन दुसरीकडे जायला लागायचं. या सगळ्यातून तयार झालेली फिल्म १६ मि.मी.चा प्रोजेक्टर खांद्यावर घेऊन जाऊन दाखवावी लागायची. तंत्रज्ञान बदलतच राहणार आहे, पण शोध चालू राहणार आहे तो माध्यमाचा..

आम्ही पहिला लघुपट ‘बाई’ बनवला तेव्हापासून चित्रपट माध्यमाच्या प्रेमात तर पडत चाललोच होतो, पण त्याचबरोबर बदलतं तंत्रज्ञान कधी अडचण म्हणून तर कधी साथीदार बनून समोर येत होतं. पहिल्याच लघुपटाने आम्हाला याची जाणीव करून दिली होती की, माध्यमावर हुकमत हवी असेल तर तंत्र समजून घेण्याला पर्याय नाही. आजच्या तुलनेत तो काळ तंत्र समजून घ्यायच्या दृष्टीने अवघड होता. प्रयोग करणं खूप महाग होतं.

‘बाई’, ‘पाणी’ हे चित्रपट बनवले तेव्हा १६ मि.मी.ची निगेटिव्ह चित्रीकरणासाठी वापरली. या निगेटिव्हवर चित्रीकरण होताना फक्त कॅमेऱ्याला डोळा लावलेल्या कॅमेरामनला ते चित्रित होताना दिसत असे. आम्ही दिग्दर्शक एकदा फ्रेम पाहिली की बाजूला उभे राहणार. मग ते दृश्य कसं ‘उतरलंय’ हे कळण्यासाठी मोठी प्रतीक्षा..! मुंबईच्या लॅबमध्ये पाठवा.. मग त्याचं एक कच्चं काम करण्याचं प्रिंट बनवा.. ते एक तर लॅबमध्ये पडद्यावर बघायचं नाही तर संकलनाच्या यंत्रावर.. त्यातही गरीब फिल्मवाले त्या रंगीत निगेटिव्हवरून ३५ मि.मी. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट कच्चं प्रिंट बनवायचे. कारण ३५ मि.मी.वर काम करण्याच्या सुविधा जास्त होत्या, पण रंगीत प्रिंट महाग पडायचं. ते कच्चं प्रिंट इतकं धुरकट दिसायचं की कसंबसं त्यावर संकलन व्हायचं. ध्वनी वेगळ्या स्पूल्सवर (टेप गुंडाळण्याचं एक साधन) मॅग्नेटिक टेपवर मुद्रित व्हायचा. तो स्टुडिओमध्ये ३५ मि.मी. मॅग्नेटिक फिल्मवर ‘टाकावा’ लागायचा आणि मग कच्चं प्रिंट आणि हा ध्वनी एका टेबलवर हाताने कापून जोडावा लागायचा. ध्वनिमिश्रण होऊन आणि तो ध्वनी पिक्चरबरोबर प्रिंट होऊन ज्याला ‘मॅरिड प्रिंट’ म्हणायचे ते तयार झालं की मग आम्हाला ते बघायला मिळणार..

संकलन करताना प्रत्येक ध्वनीचा तुकडा ‘पाहून’ डोळ्याला काहीच कळत नसल्यामुळे पांढऱ्या पेन्सिलने त्या ‘साऊंड फिल्म’च्या मागे ‘लिहून’ ठेवायला लागायचं. वाजवलेल्या ‘क्लॅप’प्रमाणे तो पिक्चरला जोडावा लागायचा. जास्तीचे टेक्स नावं लिहून गुंडाळून ठेवायला लागायचे. आमचे संकलक जावेद सय्यद मला किंवा सती भावेला गुंडाळ्या करायला बसवायचे. फिल्म किंवा साऊंडची नीट गुंडाळी करता येणं, ती निसटून खाली पडून खराब न होणं, हवा तो तुकडा संकलकाला पटकन काढून देता येणं या आमच्या परीक्षा होत्या. फिल्म निदान उलगडून बघितली तर कुठलं दृश्य आहे हे कळायचं तरी! पण साऊंडचे सर्व तुकडे सारखेच दिसायचे. त्याच्यावरचं लिहिलेलं नाव पुसलं गेलं तर तो तुकडा यंत्रावर चालवल्याशिवाय कळायचं नाही. महागडय़ा संकलनाच्या मशीनवर पिक्चर आणि साऊंड दोन्ही एकत्र चालवायचं आणि फक्त मार्किंग करायचं आणि स्वस्त टेबलावर त्याप्रमाणे कापायचं. मग परत संकलनाच्या टेबलवर पुन्हा पाहायचं. अशी सगळी गुंतागुंतीची प्रक्रिया होती. पिक्चर आणि साऊंडचे खूप डबे तयार व्हायचे. सगळी रिळं एका वेगळ्या मशीनवर हातानं फिरवून गुंडाळायला लागायची. त्यात जर हॅन्डल निसटलं तर फिल्म गुंतून तुटण्याची शक्यता असायची. प्रिंट तुटलं तर पुन्हा महागडी छपाई करावी लागणार आणि साऊंड तुटला तर पुन्हा स्टुडिओमध्ये जाऊन ट्रान्स्फर करावा लागणार. संकलन केलेलं रीळ गुंता होऊन फाटलं तर केलेलं काम पुन्हा करावं लागणार..!

प्रत्येक काम जपून करावं लागे. चित्रीकरण करताना एकेक शॉट विचारपूर्वक, नेमका चित्रित करणं आणि संकलनाचा प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणं या अत्यावश्यक बाबी होत्या. जणू एक पावित्र्य त्या प्रक्रियेत होतं. पिक्चरबरोबर साऊंड एकमेकांबरोबर चालण्यासाठी मध्ये-मध्ये साऊंडचे ‘रिकामे’ न वाजणारे तुकडे लागायचे. म्हणजे दोन्ही रिळं सोबतीनं चालतील. तसे ‘न वाजणारे तुकडे’ असणारी रिळं घेऊन संकलनाच्या स्टुडिओमध्ये विक्रेते डोकवायचे, चहावाल्यासारखे! फिल्म जोडण्याच्या टेप्स, फिल्मवर लिहिण्याच्या पेन्सिलीसुद्धा ते आणायचे.

आमची कामं बऱ्याचदा मुंबईच्या जुन्या स्टुडिओमध्ये चालायची. जिथे गरीब मराठी सिनेमावाले किंवा तिसऱ्या दर्जाचे हिंदी सिनेमे बनवणारे असायचे. आमच्या ‘संवाद’ फिल्ममधली विनोबांची प्रार्थना आमच्या संकलनाच्या मशीनवर चालू असताना शेजारच्या छोटय़ा केबिनमधून दिवसभर बलात्कार होतानाच्या एका बाईच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या. एका भलत्याच चित्रपट व्यवसायाशी नातं ठेवून आमचं काम चालायचं.

जेमतेम तीस मिनिटांच्या फिल्मसाठी पिक्चरचे सात-आठ डबे, संवाद, संगीत, इतर ध्वनी यांच्या रिळांचे डबे असे तीसेक डबे घेऊन आम्ही हिंडायचो. वाहन नसताना, टॅक्सी महाग पडत असताना एका स्टुडिओनं नाकारलं तर सारं डबोलं घेऊन दुसरीकडे जायला लागायचं. या सगळ्यातून तयार झालेली फिल्म १६ मि.मी.चा प्रोजेक्टर खांद्यावर घेऊन जाऊन दाखवावी लागायची.

मग हळूहळू व्हिडीओ आला. घरगुती वापराची व्हीएचएस कॅसेट परिचयाची झाली होती. भाडय़ाने आणलेल्या व्हीसीआरवर लायब्ररीतून आणलेली फिल्म पाहण्याची आम्हाला सवय झाली होती; पण हीच कॅसेट घालून चित्रीकरण करणारी यंत्रणा पाहिल्यावर आमचे डोळे हरखून गेले. आमच्या परिचयाच्या एक प्राध्यापक बाई म्हणाल्या, ‘‘आमच्या विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण करायला आम्ही एक व्हिडीओ कॅमेरा घेतलाय. तो तुम्ही मधूनमधून वापरा.’’ आम्ही तो कॅमेरा आनंदानं घेऊन आलो. त्यात कुठून बघायचं, समोरचं दृश्य दिसणार कसं, काहीच कळेना. मग लक्षात आलं, आम्ही त्याच्यासोबतचा रेकॉर्डर आणलाच नव्हता. तो जोडल्यावर एकदाचं ‘इलेक्ट्रॉनिकली’ दिसू लागलं. तोपर्यंत फिल्म किंवा स्टिल कॅमेरा डोळा लावला की समोरचं दाखवत तरी होता. हा कॅमेरा तसा नव्हता हे आता कळलं. मग काय? आम्हाला खेळणं सापडलं. एकाच कॅसेटवर दृश्य आणि ध्वनी मुद्रित होतो? म्हणजे जोडाजोडी नाही.. काही नाही.. टीव्हीला जोडलं की बघायला तयार. चमत्कारच..! आम्ही त्या वेळी पुणे अंधशाळेमध्ये अंधमित्रांचं एक नाटक बसवलं आणि ती प्रक्रिया या कॅमेऱ्यानं चित्रित केली. हे आमचं व्हिडीओ वर्कशॉपच होतं. त्या कॅमेऱ्याचा फोकस जायचा, रंग बिघडायचे, केबल हलायच्या.. पण खर्च न करता चित्रीकरणाची ट्रायल करण्याची शक्यता त्या व्हिडीओ कॅमेऱ्यानं आमच्या आयुष्यात आणली. किती लांब कॅमेरा ठेवायचा, किती आकाराचं दृश्य असावं, कुठल्या बाजूनं लाइट येतोय हे पाहून कसा कॅमेरा लावायचा याचा अभ्यास सुरू झाला.

पुढे ‘एफटीआयआय’मध्ये शिकताना मला ३५ मि.मी. कॅमेरा वापरता आला. नवीन आलेला ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट, थोडा प्रोफेशनल व्हिडीओ कॅमेरा आम्हाला सरावासाठी मिळाला. तेव्हा लक्षात आलं, मला त्याची खूपच माहिती होती.. इतर मुलांसमोर मी भाव खाऊ शकत होतो. त्याच काळात माझ्या आई-वडिलांनी मला एक व्हीएचएस कॅम-कॉर्डर घेऊन दिला. यात तर कॅसेट घातली की त्यातच रेकॉर्ड व्हायचं. मग आमच्या प्रतिभेला धुमारेच फुटू लागले. घरगुती शूटिंगपासून, शाळांची स्नेहसंमेलनं, सत्कार समारंभ – वाट्टेल ते आम्ही शूट करू लागलो. आज नावारूपाला आलेल्या ‘आयुका’ या अवकाश-संशोधन केंद्राच्या पायाभरणी समारंभाचं चित्रीकरण जयंत नारळीकरांच्या सांगण्यावरून आम्ही केलं. कुठलंही शूटिंग आपल्या माध्यमजाणिवा विकसित करतंच, हे कळायला लागलं.

सुमित्राच्या ‘स्त्री-वाणी’ संस्थेच्या महिला-मेळाव्याचीही शूटिंग्स केली. त्यातूनच सुमित्राच्या डोक्यात कल्पना आली. सत्यवान-सावित्रीच्या कथेवर व्हिडीओपट बनवण्याची. चित्रीकरण करणारे आम्हीच, कलाकारही आम्हीच; पण मग प्रश्न आला की, ही दृश्यं एकाला एक जोडून संकलन कसं करायचं? कारण तेव्हाची बिचारी पद्धत म्हणजे कॅमेऱ्यातून दृश्य सोडायचं आणि त्याच वेळी दुसरा रेकॉर्डर सुरू करायचा.. अशी एकामागे एक दृश्यं जोडत जायचं; पण त्यात चुका व्हायची खूप शक्यता असे आणि दुसरा रेकॉर्डर होताच कुठे? मग आम्ही अफाट कल्पना केली. आम्ही सत्यवान-सावित्रीच्या कथेची दृश्यं क्रमाने शूट करायचं ठरवलं. पुण्यातल्या आयएलएस लॉ कॉलेजच्या जंगलात एक दृश्य.. मग कॅमेरा थांबवून स्कूटरवर बेलबागेतल्या मंदिरात.. तिथे आधीचं दृश्य पॉज करून योग्य वेळी सोडून पुन्हा पुढच्या दृश्याच्या चित्रीकरणाला सुरुवात.. मग पर्वतीच्या टेकडीवर पुढचं दृश्य.. दृश्य चालू असताना पाश्र्वसंगीत एका कॅसेट प्लेअरवर चालवायचं.. त्याचा व्हॉल्युम कंट्रोल करत करत..! एक प्रकारे चित्रपट क्षेत्र नवीन असताना ज्या आदिम पद्धतीनं चित्रीकरण चालायचं त्याच्या जवळ, १९८५ मध्ये, आम्ही पुन्हा पोचलो होतो; पण मुद्दा हा होता, की यातूनही एक परिणामकारक लघुपट जन्माला येत होता. ही आमची फिल्म बघून किती तरी महिला मेळाव्यातल्या बायांना सावित्री ही इतकी विद्वान होती आणि तिनं यमाशी संवाद केला होता हे प्रथमच उमजलं..!

मी ‘एफटीआयआय’मधून बाहेर आल्यावर आम्ही ‘मुक्ती’ हा व्यसनमुक्तीवरचा चित्रपट केला तेव्हा व्हिडीओवर चित्रीकरण केलं. आज नाहीशी झालेली ही मोठ्ठी दिसणारी कॅसेट तेव्हा उत्तम मानली जायची. माझी एक ‘एफटीआयआय’ मधली मैत्रीण संकलन करणार होती; पण दोन-तीन दिवस ती खूप अडकून पडली.. आम्ही स्टुडिओत जाऊन बसायचो.. समोर मशीन्स होती.. पण करणार काय? शेवटी सुमित्रानं धाडस केलं. मशीनवर सगळ्या बटणांवर ते कसलं आहे ते लिहिलेलं होतं. आपली चित्रीकरणाची कॅसेट जोपर्यंत आपण ‘प्लेअर’ऐवजी ‘रेकॉर्डर’मध्ये घालत नाही तोपर्यंत ती काही ‘पुसली’ जाणार नाही, ही खात्री धरून आम्ही एकेक बटण समजावून घेत संकलन करू लागलो. बघता-बघता ते जमायला लागलं. माझ्या ‘एफटीआय’मध्ये शिक्षणाने मला थोडं घाबरट बनवलं होतं; पण ती तंत्रज्ञानाची दहशत गळून पडली. ‘युक्ती’ करता करता तंत्रज्ञानाच्या खोटय़ा बडेजावापासून मुक्ती मिळाली.

पुढे याच धाडसाने ‘संवाद’, ‘चाकोरी’ संकलन आम्ही स्वत: केलं. ते संकलन फिल्मवर होतं तरीही. सुमित्रा आणि मी संकलन मशीनवर मार्किंग करण्यापासून ते टेबलावर कापाकापी आणि पट्टय़ावर गुंडाळ्या करण्यापर्यंत स्वत: हातानं काम करत होतो. अनेक लघुपट दिग्दर्शक आमच्या टीमकडे बघून आश्चर्यचकित होत होते. ‘सरशी’ लघुपटाच्या वेळी एकाही कॅमेरामनला वेळ मिळेना म्हणून मीच ‘यु-मॅटिक’ कॅमेरा चालवला. त्याच विश्वासावर ‘लाहा’च्या वेळी १६ मि.मी. कॅमेराही चालवला. अगदी पुढे ‘दोघी’चं संकलनही आम्ही स्वत: केलं.

उमेश कुलकर्णी आणि सचिन कुंडलकर हे महाविद्यालयीन युवक ‘दोघी’ला साहाय्यक म्हणून काम करत होते. बरेच साहाय्यक ‘शूटिंग’ नावाची पिकनिक संपताच पळ काढतात असा आजही अनेक दिग्दर्शकांचा अनुभव आहे; पण या दोघांनी संकलनासाठी मुंबईला यायची इच्छा व्यक्त केली. बरोबर दहा वर्षांपूर्वी संकलक जावेद मला जसे  गुंडाळ्या करायला लावायचे तसे आता आम्ही या दोघांना सांगू लागलो..! अमुक फूट लांबीचा पक्ष्याचा आवाज हवाय किंवा एवढय़ा लांबीचं ‘रडणं’ हवंय किंवा ‘जेजुरीहून येतानाच्या बलगाडीच्या लाँग शॉटचा तिसरा टेक हवाय,’ असं म्हणताच ते तसा काढून देऊ लागले.. वरवर पाहाता कंटाळवाण्या वाटणाऱ्या या गोष्टी करता करता आमच्याप्रमाणेच तंत्रज्ञानाच्या वाटेवर प्रवास करत ते आता माध्यमाच्या शोधला निघाले होते..

नंतर कॅसेट्सचे असंख्य प्रकार आले-गेले. बेटा, डीजी-बेटा, डीव्ही, मिनीडीव्ही.. त्यावर छोटे चित्रपट करत आणि मोठे चित्रपट फिल्मवर करत काम चालू राहिलं. ‘वास्तुपुरुष’ फिल्मच्या वेळी संकलन कॉम्प्युटरवर होऊ लागलं. फिल्मवरचं शूटिंग संकलनापुरतं व्हिडीओवर टाकण्याचं तंत्र. कच्च्या प्रिंटऐवजी व्हिडीओ आणि संगणक..! तेव्हाही ते यंत्र चालवणारा भाव खाऊ लागताच आम्ही ती बटणे समजून घेत त्याला रामराम ठोकून तेही संकलन हातात घेतलं आणि ते जमूही लागलं. तेव्हा शॉट्स किंवा साऊंडच्या गुंडाळ्या ज्यात टाकायचो त्या मोठ्ठय़ा टोपलीला ‘बिन’ म्हटलं जायचं.. आज कॉम्प्युटरवर ‘बिन’ हेच फोल्डर असतं आणि त्यातून शॉट्स शोधावे लागतात. महागडय़ा निगेटिव्हऐवजी मेमरी कार्ड असतं. पस्तीस जड डब्यांऐवजी एक हार्ड डिस्क असते. अख्खी फिल्म पेन ड्राइव्हमध्ये मावते. इवल्याशा कार्डावर संपूर्ण चित्रपटाचा ध्वनी मुद्रित (चित्रपटाचं ध्वनिमुद्रण होतं.) चित्रीकरण करणारे चिमुकले डिजिटल कॅमेरे आलेत. मोबाइलसुद्धा ‘फोर के’ चित्रीकरण करू लागलाय.

या सगळ्या प्रवासानंतर वाटतं की, तंत्रज्ञान बदलतच राहणार आहे; पण शोध चालू राहणार आहे तो माध्यमाचा.. आपल्याला जे म्हणायचंय ते कसं मांडायचं याची ती धडपड असणार आहे. तंत्रज्ञान बदललं की नव्या शक्यता निर्माण होणार आहेत इतकंच..!

sunilsukthankar@gmail.com

chaturang@expressindia.com