प्रियदर्शिनी कर्वे, संशोधक

‘‘अमेरिकेतला ‘मागास आणि माथेफिरू’ लोकांचा प्रदेश, अशी मला ओळख करून दिलेल्या माँटाना राज्यात व्यतीत केलेले चार दिवस विचारांचं काहूर निर्माण करणारे होते. अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणातले गटतट आणि काही अमेरिकी लोकांनाच आपल्या सरकारबद्दल वाटणारा कमालीचा अविश्वास हे मी जवळून अनुभवलं. माझ्याशी अतिशय प्रेमानं आणि अगत्यानं वागलेल्या या शहाण्या माणसांच्या डोक्यावर छद्म माहितीनं कसं गारूड केलं आहे,याचं ते विस्मयकारक दर्शन होतं..’’

जानेवारी २०१०. जिम फार्ले, ‘एसओएस जनरल स्टोअर’, हॅमिल्टन, माँटाना, युनायटेड स्टेट्स यांच्याकडून एक ई-मेल आला. ग्रामीण तंत्रांबाबतची ‘डीव्हीडी’ विकत हवी असल्याचा. मी डीव्हीडी पाठवून दिली, त्याचे पैसेही आले. थोडय़ाच दिवसांत जिमचा परत ई-मेल- डीव्हीडीत दाखवलेल्या दोन शेगडय़ा नमुना म्हणून हव्या आहेत. शेगडय़ांच्या किमतीच्या तुलनेत त्यांचा वाहतूक खर्च खूपच जास्त होता. पण जिमकडून उत्तर आलं, की आम्ही पैशांची जुळवाजुळव करू. इतर विषयांवर आमचा ई-मेल संवाद सुरू राहिला.

मार्च २०१०. अमेरिकेच्या कोलोरॅडो विद्यापीठात एप्रिलमध्ये होणाऱ्या एका चर्चासत्राचं मला आमंत्रण आलं. मी जिमला कळवलं, ‘मी बोल्डर, कोलोरॅडो इथे येणार आहे. दोन शेगडय़ांचं पार्सल बरोबर आणू शकते. तुमच्या ओळखीचं कुणी त्या भागात असेल तर त्यांच्याकडे देईन.’ यावर जिमचं उत्तर आलं, ‘शेगडय़ा घेऊन तूच आमच्याकडे ३-४ दिवसांसाठी ये.’ मी फार विचार न करता होकार कळवला.एप्रिल २०१०. मी बोल्डरला पोहोचले. मी इथून माँटानाला जाणार आहे म्हटल्यावर माझ्याशी बोलणाऱ्या अमेरिकी लोकांच्या तोंडाचा ‘आ’ वासला जात होता! ‘केवळई-मेल ओळखीच्या जोरावर अशा ‘मागास भागातल्या’ अनोळखी लोकांकडे कशी जाते आहेस?’ ‘तिथे फार ‘माथेफिरू’ लोक राहतात,’ असं बरंच काही मला ऐकावं लागलं. चर्चासत्र संपलं आणि मी पुढच्या प्रवासाला निघाले. डेनव्हर ते मिसूला. दोनेक तासांची फ्लाइट. विमान लहान होतं. दोन रांगांमध्ये दोन-दोन सीट. विमानात बसल्यावरच जरा वेगळं वाटलं. आतापर्यंत विविध रंगारूपांच्या व्यक्ती एका ठिकाणी दिसणं ही माझ्यासाठी अमेरिकेची ओळख होती. या विमानात मात्र इतर सर्व लोक गौरवर्णीय होते, मी एकमेव वेगळी दिसणारी व्यक्ती होते!

घनदाट देवदार वृक्षांचं जंगल आणि डोंगरदऱ्या अशा प्रदेशात मिसूलाच्या विमानतळावर विमान उतरलं. जिम व त्याची पत्नी स्टार मला घ्यायला आले होते. आम्ही हॅमिल्टन या त्यांच्या गावाकडे निघालो. वाटेत लाल दिव्यामुळे गाडी थांबली आणि क्षणभर मला हॉलीवूडचा मसाला चित्रपट पाहतोय की काय असं वाटलं. मळकट जीन्स आणि बूट्स, चौकडीचा शर्ट, चामडय़ाचं जाकीट, कमरेला लटकवलेलं पिस्तूल आणि डोक्यावर काऊबॉय हॅट अशा वेशातल्या, उंच, दणकट आणि रापलेल्या चेहऱ्याच्या तरुणानं गाडीपुढून रस्ता ओलांडला. मग जिम आणि स्टारशी गप्पा मारता मारता मी खिडकीतून निरखून पाहू लागले, तर उघडपणे कमरेला पिस्तूल किंवा खांद्याला बंदूक लावून फिरणारे इतरही लोक दिसले. अमेरिकेचं एक वेगळंच रूप पाहात आहोत याची खात्री पटली.

हॅमिल्टन हे तीन-चार हजार लोकवस्तीचं गाव. जिम आणि स्टार फार्ले हे जोडपं. त्यांचा थोरला मुलगा आणि सून शेजारीच राहात होते. एक मुलगी आणि तिचा परिवारही हॅमिल्टनमध्येच होता. पण इतर सगळी मुलं इतरत्र होती. मोठं कुटुंब असल्यानं घरही मोठं होते. पण आता तिथे हे दोघंच. मुलं-नातवंडं येऊन जाऊन. घराला जोडून छोटं हरितगृह होतं. त्यात घरच्यासाठी भाजीपाला आणि फळं पिकवली जात होती. मुलाचा कोंबडीपालनाचा व्यवसाय होता. त्यामुळे अन्नाच्या बाबतीत बऱ्यापैकी स्वयंपूर्णता होती. हरितगृहाची उष्णता घरातही आणता येईल अशी व्यवस्था केलेली होती. त्यामुळे घर गरम ठेवण्यासाठी ऊर्जेची गरज बरीच कमी होत होती. दुसऱ्या दिवशी जिमनं मला त्याचं घराइतकंच मोठं फॅब्रिकेशन वर्कशॉप आणि त्यामधली विविध आयुधं दाखवली. मी आणलेल्या शेगडय़ांचं तिथे उत्पादन करता येईल का, असाही एक विचार आम्ही केला. पण हेही खर्चीकच होणार होतं. जिम आणि स्टारचा जावई हॅमिल्टनच्या शेरिफपदाच्या निवडणुकीला उभा होता. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये स्थानिक राजकारणाचीच चर्चा चालू होती. एकंदर हे सारे लोक अमेरिकेतल्या रिपब्लिकन पार्टीच्या बाजूचे होते. २००८ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बराक ओबामा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले होते. त्यानंतर मी ज्या ज्या अमेरिकी लोकांना भेटले होते ते सारे त्या घटनेनं आनंदी झालेले होते. पण जिम आणि त्याच्या समुदायाच्या मनात मात्र ओबामा सरकारबद्दल आत्यंतिक अविश्वास होता. रिपब्लिकन पार्टीतही एक नवा विचारप्रवाह याच सुमाराला जोर धरत होता. ‘सरकारी कायदे, नियम, कर आकारणी म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या मूळ घटनेच्या विरोधी आहे,’ या भूमिकेतून उभ्या राहिलेल्या या चळवळीला ‘लिबर्टेरियन’ किंवा ‘टी पार्टी मूव्हमेंट’ म्हटलं जातं. अठराव्या शतकातल्या ‘बोस्टन टी पार्टी’ या घटनेचा त्याला संदर्भ आहे. अमेरिकी लोकांचा तेव्हाचा संघर्ष ब्रिटिश वसाहतवाद संपवण्यासाठी होता. तर आता एकविसाव्या शतकात आपल्याच सरकारच्या तथाकथित सांस्कृतिक व आर्थिक वसाहतवादाविरुद्ध ही लढाई छेडण्यात आली होती.

अधिकृत अमेरिकी डॉलरला शह देण्यासाठी ‘लिबर्टी डॉलर’ असं खासगी चलन तांबं, चांदी, सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात या लोकांनी काढलं होतं. ओबामांच्या विरोधात (आणि त्यापूर्वीही दोन-तीन वेळा) अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभं राहून हरलेले, रिपब्लिकन पक्षातल्या अतिकडव्या गटाचे प्रतिनिधी रॉन पॉल हेच या साऱ्या लोकांच्या मनातले राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या मते ओबामांनी लबाडीनं सत्ता बळकावलेली होती. रॉन पॉल यांची प्रतिमा असलेली लिबर्टी डॉलरच्या नाण्यांची खास मालिका २००८ मध्ये आली होती. जिम आणि स्टारचं ‘एसओएस स्टोअर’ या नाण्यांचे या परिसरातले अधिकृत वितरक होते. एकंदरीत मी ज्या समुदायाची पाहुणी होते ते टी पार्टी मूव्हमेंटचे सदस्य आणि समर्थक होते. माँटानामधल्या चार दिवसांत मी या स्थानिक समुदायातल्या वेगवेगळय़ा लोकांना भेटले. सरकार आपल्यावर नियंत्रण ठेवू पाहात आहे, आपल्या संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे, या भीतीपोटी हे लोक स्वावलंबी बनू इच्छित होते. भारतात मूलभूत सुविधा ग्रामीण समुदायांपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे उपलब्ध संसाधनांतून त्या मिळवता याव्यात यासाठी भारतात शेती, ऊर्जा इत्यादीविषयक तंत्रं स्वयंसेवी संस्थांनी विकसित केली. पण हीच तंत्रं सरकारी ‘हस्तक्षेप’ टाळण्यासाठी या अमेरिकी लोकांना उपयुक्त वाटत होती.

काहीशे कुटुंबांमध्ये विखुरलेला हा समुदाय खूपच एकोप्यानं राहात होता. साऱ्यांच्या अंगणात काही ना काही अन्नधान्य पिकत होतं आणि त्याची ते आपसात देवाणघेवाण करत होते. आजूबाजूला जंगल असल्यानं लाकूडफाटय़ाला तोटा नव्हता. त्यांच्यातला एकजण लाकडाच्या तुकडय़ांवर चालणारा ‘गॅसिफायर’ (कार्बनयुक्त कच्च्या मालापासून वायूरूप इंधन बनवणारं यंत्र) बनवण्याच्या कल्पनेनं झपाटलेला होता. हिवाळय़ात घरं उबदार ठेवण्यासाठी या भागात मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा वापरावी लागते. आधुनिक जगात यासाठी वीज किंवा नैसर्गिक वायूचा वापर होतो. पण हे दोन्ही ऊर्जास्रोत त्यांच्या मते शासनाच्या नियंत्रणाखाली असल्यानं त्यांना नको होते. उपलब्ध असलेल्या लाकूडफाटय़ाचा अधिकाधिक कार्यक्षमतेनं उष्णता निर्माण करण्यासाठी वापर करणं हा अधिक योग्य पर्याय वाटत होता. मीही गॅसिफायर शेगडय़ांच्या रचनेवर काम केलं असल्यानं आम्ही बरीच चर्चा करू शकलो. या लहानशा वस्तीत अनेकांकडे सर्व अवजारांनी परिपूर्ण असं फॅब्रिकेशन वर्कशॉप तर होतंच, पण ओतीव धातूकाम करणारी एक यंत्रशाळा होती. आपल्याला लागणारी यंत्रसामुग्रीही स्वत:च बनवण्याचा समुदायाचा प्रयत्न होता.

एका संध्याकाळी मी आणलेल्या शेगडय़ांच्या प्रात्यक्षिकासाठी काही लोक एकत्र जमले. कांडी कोळशावर चालणारा वाफेचा कुकर आणि काडीकचऱ्यापासून स्वयंपाकासाठी उष्णता देऊन खाली कोळसा शिल्लक ठेवणारी शेगडी, अशी मी आणलेली दोन साधनं. स्थानिक दुकानात मिळणारा कांडी कोळसा आणि पाईनच्या लाकडांचे तुकडे ही इंधनं. चिकनचा रस्सा आणि भात असा माझ्या मर्यादित पाककौशल्याला साजेसा स्वयंपाकाचा बेत. एकंदर लोकांचा उत्साह आणि सहभाग चांगला असल्यानं प्रात्यक्षिक चांगलं झालं.समुदायातल्या दोन-तीन लोकांच्या घरी छोटय़ा छोटय़ा गटांसमोर मी आमच्या कामाची माहिती दिली. जैविक कचऱ्यापासून कोळसा आणि बायोगॅस निर्मिती या त्यांच्यासाठी पूर्णत: नवीन संकल्पना होत्या. जिम आणि स्टारनं मला स्थानिक जंगलाचीही सफर घडवली. २००० मध्ये माँटाना राज्यात प्रचंड वणवे लागून खूप नुकसान झालं होतं, तर २०१० मध्ये कसलासा रोग पडून मोठय़ा क्षेत्रातले देवदार वृक्ष मरत होते. खरेतर हे सारे जागतिक तापमानवाढीचे परिणाम. पण या सगळय़ामागे आपली स्थानिक अर्थव्यवस्था आणि जीवनपद्धती मोडून काढण्याचा अमेरिकी सरकारचा डाव आहे, अशी या लोकांची ठाम समजूत होती.

आपल्याच देशवासीयांबद्दल इतका अविश्वास असलेल्या या लोकांनी माझी मात्र चांगली बडदास्त ठेवली. जिथे जिथे मी प्रात्यक्षिकं दाखवली आणि व्याख्यानं दिली तिथे तिथे जमलेल्या लोकांनी आपखुशीनं आमच्या कामाला मदत म्हणून पैसे गोळा करून मला दिले. गॅसिफायर बनवणाऱ्या मित्रानं मला पाण्यातून मासा उचलणाऱ्या अस्वलाचं एक सुंदर काष्ठशिल्प भेट दिलं. ओतीव धातूकाम करणाऱ्यानं मला ओतीव लोखंडाचा पाईन कोन भेट दिला.

माझ्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी जिम आणि स्टारनं मला ‘एसओएस’ स्टोअर दाखवलं. वेगवेगळय़ा प्रकारच्या अन्नाचे हवाबंद डबे, पाण्याच्या मोठमोठय़ा बाटल्या, बॅटरीवर चालणारे दिवे, गरम कपडे, निसर्गाच्या सान्निध्यात कँपिंग करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू, असा सर्व साठा असलेलं हे गोदाम होतं. त्यात सगळय़ात शेवटी एक तळघर होतं. कुलूपबंद दार उघडल्यावर मी आत गेले, तर सर्व भिंतींवर जमिनीपासून छतापर्यंत फडताळं विविध प्रकारच्या बंदुकी आणि दारूगोळय़ाच्या पेटय़ांनी भरलेली होती.इतकी शस्त्रास्त्रं एका ठिकाणी पाहण्याची माझी ही आयुष्यातली पहिलीच आणि बहुधा शेवटचीच वेळ!

या स्टोअरचं नेमकं प्रयोजन काय, हे मी जिम आणि स्टारला विचारलं. त्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरानं मी अक्षरश: थक्क झाले. ‘अमेरिकी सरकार ही शहरी सुशिक्षित लोकांची मक्तेदारी आहे. ते आम्हा ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना मागास आणि माथेफिरू मानतात. (विशेष म्हणजे कोलोरॅडोत सुशिक्षित अमेरिकींनी हेच शब्द या लोकांसाठी वापरले होते.) ग्रामीण लोकांना मूलभूत गरजांसाठी सरकारी नियंत्रणाखाली असलेल्या पुरवठा साखळय़ांच्या अधीन करून घ्यायचं आणि मग या पुरवठय़ाच्या नाडय़ा आवळून संपवून टाकायचं, असा हा कट आहे. त्याची अंमलबजावणी सुरू होऊन ऊर्जा, पाणी आणि अन्नधान्याचा तुटवडा पडू लागला, की लोक एकमेकांच्या जीवावरही उठतील. आम्ही आमच्या समूहासाठी हा सारा आवश्यक वस्तूंचा साठा इथे करून ठेवला आहे. पण इतरांना हे माहीत झालं तर आमच्यावर हल्ले होतील. म्हणून आम्ही शस्त्रास्त्रांचीही बेगमी करून ठेवली आहे.’

माझं चार दिवसांचं वास्तव्य संपलं. निरोप देताना लिबर्टी डॉलरची दोन तांब्याची नाणी मला सन्मानपूर्वक भेट देण्यात आली. मी विचारांचं काहूर मनात घेऊन घरी परतले. कोलोरॅडो विद्यापीठातल्या सुशिक्षित, डेमोक्रॅट समर्थक मित्रांना माझी काळजी का वाटत होती, हे माझ्या लक्षात आलं होतं. पण अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाशी मला सोयरसुतक नव्हतं. जिम आणि त्याच्या समुदायासह माझा ई-मेल संवाद चालूच राहिला. यानंतरही इतर कारणांसाठी झालेल्या अमेरिका भेटींच्या वेळी २०१० मध्येच माझे वडील डॉ. आनंद कर्वे आणि २०११ मध्ये पुन्हा मी माँटानाला जाऊन आलो. माझ्या वडिलांनी तिथे रासायनिक खतांविना शेतीबाबत मार्गदर्शन केलं आणि खरकटय़ा अन्नावर चालणारं बायोगॅस संयंत्र उभारून दिलं. मी चुलींच्या रचना, कोळसा निर्मिती इत्यादीसाठी मार्गदर्शन केलं. २०११च्या भेटीत ‘अमेरिकेत छुपा आतंकवाद पसरतो आहे’ ते ‘परग्रहवासीयांकडून आम्हाला सावधगिरी बाळगण्याचे संदेश येत आहेत’ इथपर्यंतच्या बऱ्याच भाकडकथा लोकांनी अगदी विश्वासून सांगितल्या. त्या गंभीरपणे ऐकून घेण्याखेरीज मला पर्याय नव्हता. २०१३ नंतर मी अमेरिकेला गेले नाही. ई-मेल संपर्कही हळूहळू कमी होत गेला.

एकंदर छद्म माहितीचा मारा शहाण्यासुरत्या लोकांच्या मनावरही कसं गारूड करतो याचं प्रात्यक्षिक माझ्या दोन भेटींमध्ये मला मिळालं. याच गारुडाच्या प्रभावाखाली असलेल्या अमेरिकी लोकांनी २०१६ मध्ये डोनाल्ड ट्रंप यांना राष्ट्राध्यक्षपदी बसवलं. ट्रंप समर्थकांचे २०२० च्या निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे दावे वाचण्यात-पाहण्यात येतात, तेव्हा माझी नजर लिबर्टी डॉलरच्या नाण्यांकडे जाते. याच लिबर्टेरियन लोकांनी २०१६ मध्ये ट्रंपची प्रतिमा असलेली नाणीही पाडली होती हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१०-११ मध्ये हे सारं अनुभवल्यानंतरही पुढच्या ५-६ वर्षांतच भारतातही छद्म माहितीची त्सुनामी येऊन माझेच आप्तेष्ट-मित्र त्याला
बळी पडतील हा धोका मला का जाणवला नाही, हा विचार मात्र अजूनही मला सतावत राहिला आहे.
pkarve@samuchit.com