डॉ. छाया महाजन

‘विविध छटांच्या निळय़ा पाण्यानं वेढलेल्या इवल्याशा बेटांचं मला नेहमी आकर्षण वाटत आलं आहे. त्यातही सिंगापूरमधल्या कुसु बेटावर प्रसन्न धार्मिक वातावरणाबरोबर निर्मळ शांतता आणि अनाघ्रात निसर्ग भेटला. स्वत:शी संवाद सुरू करून देणारी अशी ठिकाणं असतात. विविध संस्कृतींमधलं आणि माणसांच्या स्वभावांमधलंही सारखेपण कळून घेत, पुन्हा भेटण्याची ओढ लावणारे हे अनुभव!’ 

Artificial shortage of cotton seeds Extortion of cotton farmers
यवतमाळ : कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा; कापूस उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक
Gadchiroli, Naxal supporter,
गडचिरोली : दीड लाखांचे बक्षीस असलेल्या कट्टर नक्षल समर्थकास अटक
three nilgai dies after fell into well
दुर्दैवी… तीन रोहींचा विहिरीत पडून मृत्यू; पाण्याच्या शोधात भटकंती, वनविभागाची उदासीनता
Those who went to see the firefly were crushed under their feet at Kalsubai Harishchandragad Sanctuary
चकाकणारे काजवे पाहायला गेलेल्यांच्या पायाखालीच चिरडले काजवे, भंडारदऱ्यात जे घडले…
Excavation of concrete roads in Aare Dudh Colony mumbai
आरे दूध वसाहतीत काँक्रीट रस्त्यांचे खोदकाम
tiger surrounded by tourists vehicle
लेख : पर्यटकांच्या सापळ्यात वाघ!
nashik 2 brothers drowned marathi news
नाशिक: शेततळ्यात बुडून भावंडांचा मृत्यू
Keep your pets fit and active indoors during the heatwave
तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

पाऱ्याचा मोठा थेंब जमिनीवर पडला तर अनेक थेंब घाईनं वेगवेगळे होतात. त्या प्रत्येक थेंबाला स्वतंत्र अस्तित्व असतं. तसंच मला छोटय़ा छोटय़ा बेटांबद्दल वाटायचं. त्यांना हे स्वतंत्र अस्तित्व कुणी दिलं माहिती नाही. तिथं लोकही अलगद कसे पोहोचले? २८ वर्ष बेटावर एकटय़ा राहिलेल्या रॉबिन्सन् क्रूसोच्या कथेत त्यानं बेट नसतं वसवलं तर काय झालं असतं?.. असे प्रश्न मनात येतात. बेट या गोष्टीबद्दल सुप्त आकर्षण आणि आश्चर्यही मला वाटत राहिलं आहे. त्याचं कारण प्रवासवर्णनांचं वाचन असावं. मी ज्या बेटांवर पर्यटक म्हणून गेले, त्यांची ओळख वेगवेगळी होती. अंदमानला वेदनामय काळा इतिहास जोडला गेलाय. अंदमान म्हटलं, की स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आठवणारच. इंग्लंडजवळच्या ‘आईल ऑफ स्काय’ला आनंद पर्यटन आहे, तर सिंगापूरजवळच्या कुसु आयलंडला प्रसन्न धार्मिकता आहे. निकोबारचा दौरा बसमधूनच करावा लागला. त्यात एक भय आणि दडपणाचा भाग होता, कारण तिथल्या मूळ रहिवाशांना आम्ही त्यांच्या प्रांतात घुसखोरी करतोय असं वाटता कामा नये अशी आम्हाला ताकीद होती. त्या मूळ रहिवाशांचं एकदा तरी, चोरून का होईना दर्शन व्हावं, ही आमची तीव्र इच्छा होती.

या सगळय़ा बेटांमध्ये मला अत्यंत आवडलं ते कुसु बेट. ‘आईल ऑफ स्काय’ ही आखीवरेखीव, नीटनेटकं आणि स्वच्छ होतं. मात्र त्यावर ब्रिटनची छाप होती. कुसु बेट मात्र अनाघ्रात असल्यासारखं वाटलं. निसर्गातही कौमार्य असतं हे जाणवत राहतं! त्या कौमार्यात एक प्रकारची नवजात बालकाची निरागसता असते असं वाटतं. सिंगापूरला जाण्यापूर्वी माझी मैत्रीण म्हणाली होती, ‘‘तू लकी आहेस! पुन्हा एकदा सिंगापूरला चाललीस! तेही तर छोटं बेटच. आता काय बघणार तिथे?’’

‘‘माणसं, मॉल्स, मुलाचं घर, नातू..’’ मी हसून म्हणाले. कारण सिंगापूर माणसाळलेलं. पर्यटनात माणसांपासून दूर जाण्याची इच्छा असते का? की माणसातल्या प्रवृत्तींपासून दूर जावंसं वाटतं? पुन्हा समाजात यावंच लागतं, ही अपरिहार्यतापण असते. आधीच्या सिंगापूर ट्रिपमध्ये सिंगापूर शहर पाहून झालं होतं. भव्य मॉल्स अन् संख्येनं इतकी, की ही माणसं मॉलमध्येच राहतात का अशी शंका वाटावी! सेंटोसा आयलंड, ज्युरांग बर्ड पार्क, नाइट सफारी, ऑर्किड गार्डन व झू पाहिलेलं असल्यामुळे या वेळी कुसु आयलंडला जायचं ठरवलं. ‘क्लिफर्ड पायर’ इथून निघून आम्ही बोटीनं जाणार होतो. बोट निघण्याच्या जागेकडे दुरून नजर टाकली आणि लक्षात आलं, की तिथे एवढय़ा बोटी होत्या.. जणू पाण्यातला टॅक्सी स्टँडच!

आम्ही ‘चेंग हो’ नामक दुमजली चिनी पद्धतीने सजवलेली बोट घेतली. सिंगापूरला अगदी सुरुवातीला आलेल्या एका चिनी राजदूताचं नाव बोटीला दिलं होतं. बोटीची बांधणीही तशीच. छतावर राजाचा पिवळा रंग, बांबूच्या भिंतीवर चिनी पेंटिंग. समोर दुष्ट आत्म्यांची दृष्ट लागू नये म्हणून अन् राजकन्येचं प्रतीक म्हणून ड्रॅगन अन् फिनिक्स! आत एकदम सुंदर सजावट अन् सर्व बोट वातानुकूलित. अफाट पाणी कापत, हिरव्यागार झाडांचे किनारे मागे सारत बोट निघाली. एकीकडे उंचच उंच इमारती. सिंगापूरचा ‘ट्रेडमार्क’ आणि दुरूनच दिसणारा ‘मरलायन’. त्याच्या तोंडातून सतत पडणारा पाण्याचा स्रोत. बोट नंतर एका अवाढव्य पुलाखालून सरकली. बंदरात अनेक बोटी, टँकर, कार फेरी, कंटेनर, जनरल कार्गो व्हेसल, हायस्पीड पॅसेंजर उभ्या होत्या. बोटींचा गजबजाट. देशोदेशींच्या बोटी; पण लांबवर पसरल्यामुळे आवाजाची तीव्रता पातळ.

कुसू बेट आकारानं एक एकरसुद्धा नाही. बेटाची झिरमाळीसारखी दिसणारी किनार सोडली, तर मधला भाग अगदी आखीवरेखीव! अगदी सिंगापूरइतकाच. एखादी बाग अगदी निगुतीनं राखावी, तसं सगळं बेटच एकदम स्वच्छ. तीन-चारच छोटेखानी इमारती. कापलेली हिरवळ. मध्ये मध्ये पाण्याची छोटी तळी. मोतिया पांढरी वाळू. एका बाजूला समुद्रापासून वेगळी झालेली, निळय़ा पारदर्शक रंगाची छोटीशी खाडी. वाळूवर पावलं उमटण्याचा किंवा येणारी पावलं पडण्याचा योग पर्यटक आले आणि चालले तरच!

माझ्या मनात आलं, अतिश्रीमंत लोक अशीच छोटी बेटं विकत घेत असतील.. किती भाग्यवान! मला किंचित ‘जेलसी’ वाटून गेली! एकदम खूप मोकळं वाटलं. इतकी स्वच्छ जमीन पाहणंही आता दुरापास्त आहे. एका मोठय़ा, मोकळय़ा श्वासानं मी छाती भरून घेतली. ती शांतता, तो निसर्ग खोलवर झिरपत गेला. मनानं जमिनीवर गिरक्या घेतल्या. पाय या स्वच्छ वाळूवर उमटून जावेत असं वाटलं. आईची आठवण झाली. ‘जन्म घेतल्यावर प्राण्या-पक्ष्यांसारखं मरून जाऊ नये. वाळूवर का होईना, पाऊलखुणा ठेवल्यासारख्या आयुष्यावर उमटून जाव्यात. मग भलेही काळाची पुढची लाट त्या खुणा पुसू देत..’ असं ती म्हणे. शांतता मनात मुरत चाललेली. षड्रिपू अशाच जागी लपायला जात असावेत! ही उन्मन अवस्था. या बेटावर एकुलतं एक चिनी मंदिर आहे. लाल रंगाच्या उतरत्या छताचं! गर्द हिरव्या खांबावर तोललेलं. लाल रंगाच्या त्या छताकडे माझं लक्ष वेधलं. बाजूच्या विस्तृत पसरलेल्या पाण्याचाही विसर पडला क्षणभर. शाळा, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या सिनेमात पाहिलेले जपानी पॅगोडा डोळय़ासमोर आले. पॅगोडाचं मला नेहमीच आकर्षण वाटत आलंय. कदाचित महाराष्ट्रात राहिल्यानं माळवदाची घरं किंवा सिमेंटच्या गच्च्या पाहिल्याचा परिणाम असेल. खेडय़ात, कोकणात, गोवा किंवा समुद्रकिनाऱ्यावर आणि हिमाचलसारख्या डोंगरी भागातही उतरती छपरं पाहिली नव्हती असं नाही, तरीही पॅगोडासारख्या वास्तूच्या स्थापत्यकलेची मोहिनी कायम होतीच.

आपल्या हिंदू मंदिरासारखेच जराशा उंच चबुतऱ्यासारख्या देवपीठावर मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या देवतांची नावं कळाली नसली तरी त्या पूजल्या जातात हे कळत होतं. समोर उदबत्त्या, फुलं, फळं ठेवलेली. हेही आपल्यासारखंच. एकूण पौर्वात्यांमध्ये हा सारखेपणा असावा. समोरच्या देवतांबद्दल मिथककथाही आहेत. त्या कथांद्वारे नीतिमूल्यांचं शिक्षण मिळतं. जनसेवेचं, दुसऱ्याला मदत करणाऱ्यांचं उदात्तीकरण करणाऱ्या त्या देवतेसंबंधीच्या कथाही ऐकल्या. हे पाहताना आणि ऐकताना मनात सारखी स्वत:च्या देशाची आठवण आणि तुलनाही. देश कोणताही असो, दंतकथा आणि मिथकांचा इतिहास तिथल्या मातीत जरूर असतो.

मंदिरापर्यंतचा भाग फरशीनं बांधलेला होता. मंदिर पाहिलं, मन समृद्ध झालं. धर्म कुठलाही असो, माणसाला नम्र करण्याची क्षमता देवस्थानात निश्चित असते. प्रथम लागते ती विहीर. बाजूनं चार खांब टाकून लाल उतरत्या छतानं विहीर झाकलेली. मध्येच एखादी यज्ञवेदी असावी तशी. तिच्याजवळ मनातली गोष्ट सांगितली, तर ती पूर्ण करते असा श्रद्धाळूचा विश्वास! आम्ही बोर्ड वाचला. आमच्यासह दहा-बारा प्रवासी. डोळे मिटून तिथे उभे राहिलो. विहिरीकडे तेवढय़ा मागण्यांची नोंद झाली! मिटल्या डोळय़ानं मन म्हणालं, ‘एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवूनी..’ अचानक तुकाराम सोबतीला आले! धर्माचा भेद संपला. फक्त मानवी धर्मच त्या शांततेत उगम पावला.

हात जोडून उभी असताना मला एकदम डोंगरगणची आठवण झाली. अहमदनगरजवळ हे स्थळ आहे. तिथे असलेल्या ‘सीता न्हानी’मुळे हे गाव प्रसिद्ध आहे. डोंगरावर शिवमंदिर आहे आणि एक छोटी गुहा. या गुहेतून सातत्यानं पाणी वाहतं. राम-सीता इथे थांबले होते आणि सीतेनं इथे स्नान केलं. त्यामुळे हा झरा अखंड वाहतो, अशी आख्यायिका. वडील नगरला होते. शाळेची छोटी ट्रिप एकदा तरी डोंगरगणला व्हायचीच. शिवमंदिरासमोर एक हौद होता. नेहमी पाण्यानं भरलेला. दगडातच कोरून काढलेला. त्याचंही पाणी आटत नसे. या हौदात मधोमध एक छोटा, गोल टेबलासारखा दगड होता. पाण्यात पूर्ण बुडालेला. हौदातल्या नितळ पाण्यात लोक नाणी टाकत. मधल्या दगडी चबुतऱ्यावर नाणं पडणं भाग्याचं मानलं जाई. तिथे नाणं पडण्यासाठी धडपड चाले. हौदाकडे पाठ करून मागे नाणं फेकण्याची टूमही काढली होती. तसं करून जर नाणं मधोमध दगडावर पडलं, तर अतिभाग्यवान! ही मानसिकता फक्त आपलीच नाही. कारण बव्हंशी वेळेला बव्हंशी देशांमध्ये आपल्या पुरातन संस्कृतीचा आधार घेत अशा अंधश्रद्धा जन्माला आलेल्याच आहेत.

इटलीमध्ये मोठमोठे कलाकार, शिल्पकार, विचारवंत, राजकारणी आणि साहित्यिक घडवण्याची परंपरा शतकानुशतकांची. आधुनिक आणि ऐतिहासिक या दोन्ही गोष्टींसाठी इटली प्रसिद्ध. रोममधल्या एका लहान जागेत नेपच्यून आणि वरुण देवतेचं ‘ट्रेवी फाऊंटन’ (कारंजं) प्रसिद्ध आहे. या छोटय़ा चौकातल्या प्रसिद्ध कारंज्याला पर्यटक आवर्जून भेट देतात. या कारंज्यापुढे उभं राहिल्यावर एखाद्या प्रशस्त व्यासपीठाजवळ उभं असल्याचा भास होतो. याचा वास्तुशास्त्रज्ञ तिथलाच प्रसिद्ध शिल्पकार वर्निनी. कारंज्याकडे पाठ करून आपल्या डोक्यावरून मागे कारंज्यात नाणं टाकलं, की पुन्हा एकदा रोमला भेट देण्याचा योग येतो, असं सांगण्यात आलेले अनेक पर्यटक नाणी फेकताना दिसतात. या पाण्याच्या हौदात पैसे टाकून आम्हीही आमचं भाग्य मापलं होतं! अर्थात परदेशी चलनाचं नाणं टाकलं गेलं. एकीकडे आपण किती भाग्यवान आहोत हे पाहण्याची उत्सुकता, तर दुसरीकडे अतिमर्यादित परकीय चलन बरोबर घेतलेलं. आमचे एक सहप्रवासी गाईडला म्हणाले,

‘‘आपला रात्री मुक्काम इथे जवळपास आहे का?’’

गाईडनं विचारलं, ‘‘का?’’

‘‘नाही. चालून येण्यासारखं असेल, तर रात्री येऊन ही सगळी नाणी गोळा करून घेतली असती! पुढचा प्रवास या पैशांवरच होऊन जाईल!’’

सगळे हसलो. गाईडलाही हसू आलं. तो म्हणाला, ‘‘एवढं सोपं नाहीये ते. कारण अशी दंतकथा आहे, की नाणी चोरून नेणाऱ्या चोराला हौदाबाहेर पडताच अंधत्व आलं. चाचपडत तो इकडेतिकडे फिरायला लागला आणि केल्या गोष्टीचा त्याला पश्चात्ताप व्हायला लागला. तासा-दोन-तासांनं त्यानं परमेश्वराकडे माफीसत्र सुरू केलं. ठेचकाळत तो पुन्हा हौदापाशी येऊन त्यात पडला. त्याच्या हातातली नाण्यांची गाठोडी सुटली, पाण्यात पडली आणि काय आश्चर्य! त्याला पुन्हा दिसायला लागलं. त्यामुळे एक वेळ नाणं टाकू नका; पण चोरायचं मनातही आणू नका!’’ वाटलं, आपण याला अंधश्रद्धा म्हणतो; पण त्या क्षणी तर अतीव श्रद्धेनं नाणं फेकतोच ना? म्हणजे त्या क्षणी ती श्रद्धा हे सत्य आणि भविष्याबद्दलची आशा हेही संघर्षांची तयारी ठेवत समोर ठेवलेलं ध्येय.

कुसु बेटावरच्या खोल विहिरीसमोर उभी असताना झपकन् या आठवणी येऊन गेल्या. ज्ञान आणि माहितीच्या जगातल्या इतर प्रवाशांकडे मी पाहिलं. ज्ञान, दया आणि पाणी यावरच्या कथा आठवल्या. खूप खोल गेल्यावर खरं ज्ञान मिळतं. त्यासाठी खोदणं आणि शोध दोन्ही चालू ठेवावं लागतं. म्हणून ज्ञानाची प्राप्ती आणि विहिरीची सखोलता याची सांगड दंतकथेतून आली असणार.

मंदिराच्या अलीकडे एक छोटा हौद. त्यात असंख्य छोटी छोटी कासवं, ओंजळीच्या आकाराची. कासवगतीपेक्षा चपळपणे हालचाल करणारी! चार विभागांत विभागलेल्या मंदिराच्या विविध भागांत विविध मूर्ती ठेवलेल्या. भारतीय देवदेवतांसारख्या. त्यात बुद्धाचीही एक मूर्ती ठेवलेली. एका सूर्यदेवतेसारख्या दिसणाऱ्या मूर्तीला कुंकू लावलेलं होतं. एकदम स्वदेशी आल्यासारखं वाटलं. मूर्तीना आपल्याकडच्यासारखेच जरीचे कपडे घातलेले. फुलं, फळं, पाणी ठेवलेलं. दिवा लावलेला. एका भांडय़ात राखेचा ढीग. त्यात उदबत्त्या लावलेल्या. आम्हीही उदबत्त्या विकत घेतल्या.

संपूर्ण मंदिरात दोनच शांत चेहऱ्याची चिनी माणसं बसलेली होती. एक म्हातारी आणि दुसरी तरुण मुलगी, खुर्चीतून हललीही नाहीत. मी सवयीनं चपला काढून गेले. उदबत्त्या लावल्या. नमस्कार केला. चपला काढायची गरज नाही, अशी म्हातारीनं खूण केली. माझ्याबरोबर आलेल्या नातवानंही हात जोडले. ते पाहून ती म्हातारी उठली. आत जाऊन एक चॉकलेट आणून त्याच्या हातावर ठेवलं. जणू काही अगदी भारतीय आजीच! मानवी भावभावना सर्वदूर सारख्याच आहेत. पौर्वात्यांच्या संस्कृतीतलं साधम्र्य तर होतंच, पण स्त्रीच्या मातृभावनेची खूणही.

मागच्या बाजूला खडकावर दोन मोठी कासवं कोरलेली होती. त्यामुळे आपल्याकडच्या मंदिरातल्या गाभाऱ्यासमोरच्या दगडी कासवाची आठवण झाली. प्रतिकूल परिस्थितीतही आपले सगळे अवयव एकवटून मोठय़ा कवचाखाली नेणारं कासव माणसाला त्याच्या कवचासाठी प्रार्थना करण्याची बुद्धी देतं. आपल्यामधले रज, तमासारखे गुण आणि लोभ, आकांक्षा, दुष्ट प्रवृत्ती अशाच आकळून घेऊन नि:संगाच्या कवचासाठीची प्रार्थना करायला माणूस प्रवृत्त होण्यासाठी ही कासवं!

कुसु बेटावरच्या देवतांची स्थापना एका चिनी खलाशानं केली आहे. तो आपल्या दर समुद्र प्रवासापूर्वी इथे येऊन दर्शन घेऊन मगच प्रवासाला सुरुवात करायचा. त्याला या देवता पावलेल्या होत्या असा समज आहे. या तुलनेत जाणवतं ते हे, की आपल्याकडे जुन्या शास्त्राप्रमाणे समुद्र पर्यटनच निषिद्ध मानलं गेलं होतं.

आम्ही बेटावरून परतताना भारतीय अन् पॅसिफिक अशा संगम असलेल्या समुद्रातून परतलो. इंडोनेशिया या शेजारच्या देशातलं रिओ आयलंड अवघ्या १०-१५ किलोमीटर अंतरावर होतं अन् तिथली घरं स्पष्ट दिसत होती. पुढे सेंट जॉन बेटही लागलं. इथे पूर्वी असाध्य रोग झालेल्यांना आणून ठेवत. नंतर कैद्यांनाही. आता मात्र हा एक टुरिस्ट स्पॉट आहे. मध्ये आणखी एक छोटं बेट. दोन छोटी बेटं महादेवाच्या दोन पिंडी जोडल्यासारखी समुद्रातून वर आलेली. हे ‘सिस्टर्स आयलंड’. चार इमारती उभ्या राहतील एवढीही जागा नाही, इतकं छोटं बेट. इथे वस्ती नाही. फक्त दिवसभर सहलीला उपयुक्त आहे.

आमची नेणारी बोट खूप सुंदर होती. भडक लाल, पिवळय़ा, हिरव्या रंगांनी रंगवलेली चित्रं आजूबाजूला. त्याहीपलीकडे निळा पारदर्शक समुद्र. सौम्य निळा आणि त्यावरून घोंघावत येणारा, प्रवाशांना सुखावत, गदगदा हलवण्याची शक्ती जाणवून देणारा वारा. या सगळय़ानं मन तृप्त झाल्यासारखं सुखावलेलं. कठडय़ावर रेलत मी डोळे मिटून घेतले. समुद्री वाऱ्यानं श्वास भरून घेत राहिले. डोळे उघडले तशी जवळ उभी असलेली सून हलकेच म्हणाली,

‘‘आपण त्या विहिरीपाशी उभ्या होतो. तेव्हा तुम्ही समोर बघत होतात. नंतर डोळे मिटून बऱ्याच वेळ उभ्या होतात. तुम्ही तिथे काय मागितलं?’’

सौम्य आकाशी निळय़ा समुद्राच्या पाण्यावरून गडद निळय़ा आभाळाकडे पाहत मी हसले. म्हणाले, ‘‘पुन्हा भेट!’’