|| रवींद्र चुनारकर

BSP turned Congress leader Kunwar Danish Ali
पंतप्रधान मोदींचा हल्ला दानिश अलींसाठी कौतुकाचा विषय, काय म्हणाले अली?
British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
another sort of freedom 2
काळाबरोबर वाहणं..
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

करोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदी या काळात ऑनलाइन शिक्षणाचा खूप गाजावाजा झाला, पण जिथे ऑनलाइन शिक्षण हा पर्यायच उपलब्ध नव्हता, अशा आदिवासी गावांमधील अशिक्षित स्थानिकांनीही लहान मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. गावातल्याच शिक्षित तरुणांनी शिक्षक व्हायचं ठरवलं आणि लहान मुलांचं शिक्षण थांबवायचं नाही, हा निश्चय तडीस नेला. दुर्गम अशा कोरची या आदिवासीबहुल तालुक्यातील हे असेच काही शिक्षणाचे प्रयोग अत्यंत प्रेरणादायी.

पडियालजोब हे कोरची तालुक्यातील एक आदिवासी गाव. आदिवासींचे हक्क, परंपरा, चालीरीती यांचा वारसा अभिमानानं पुढे नेणारं हे गाव. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जगात करोना महासाथीनं शिरकाव केला आणि देशात फे ब्रुवारी-मार्च २०२० मध्ये त्याची चिन्हं दिसूही लागली.

२१ मार्च २०२० पासून टाळेबंदी लागली आणि काही भागांमध्ये आजतागायत परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. या टाळेबंदीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला, पण त्यातही शिक्षण क्षेत्रात खूप गंभीर परिणाम दिसून आला. शहरातील शिकलेले पालक वर्ग या टाळेबंदीत मिळालेला वेळ आपल्या मुलांना शिकवण्यासाठी वापरू शकले असतीलही, पण गावखेड्यातील मुलांचं काय आणि त्यातसुद्धा आदिवासी भागातील मुलाचं काय, जिथे इंटरनेट नाही, मोबाइल नाही ती मुलं ऑनलाइन शिक्षण कसं घेऊ शकतील, हे प्रश्न भेडसावले. पण या यक्षप्रश्नाचं कोडं एका आदिवासी गावातील ग्रामसभेनं सोडवले व मुलांच्या शिक्षणासाठी एक दालन खुलं करून दिलं.

पडियालजोब हे गाव मसेली या मुख्य गावापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. कच्ची वाट तुडवत गावापर्यंत पोहोचावं लागतं. गावात एकूण सत्तेचाळीस कुटुंबं राहतात आणि गावाची लोकसंख्या २२५. त्यात स्त्रिया ११९ व पुरुष १०६ आहेत. म्हणजे देशाच्या स्त्री-पुरुष गुणोत्तराच्या प्रमाणात जास्त आहे. गावात राजाराम नैताम हे अतिशय उत्साही असे पन्नाशीचे गृहस्थ राहतात. राजाराम यांनी गेल्या बावीस वर्षांत ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यपद अशी वेगवेगळी पदे सांभाळली आहेत. आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरा, कायदे यांच्या अनुभवानं संपन्न असं हे व्यक्तिमत्त्व. ग्रामसभा आणि वनहक्क यांच्यात मुरलेला माणूस. टाळेबंदीत बाहेर शिकणारी सगळी मुलं घरी परतली आणि शिक्षणाचा खोळंबा झाला. एकतर मोबाइलला नेटवर्क नाही, गावात येऊन कुणी शिक्षक शिकवायला तयार नाही. मुलांसमोर हा प्रश्न ‘आ’ वासून उभा राहिला. राजाराम नैताम हे बघून फारच अस्वस्थ झाले. दिवसेंदिवस टाळेबंदीचा कालावधी वाढतच होता. आता मात्र काहीतरी करणं गरजेचं वाटायला लागलं आणि त्यांनी हा प्रश्न ग्रामसभेसमोर मांडला. एकूण विद्यार्थ्यांची मोजणी करण्यात आली. त्यात बाहेर जाऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २५ व गावातील पहिली ते चौथीच्या वर्गांच्या मुलांची संख्या १३ होती.

ग्रामसभेसमोर हा विषय आल्यानंतर नेमका हा प्रश्न कसा सोडवायचा या विषयावर चर्चा होऊ लागली. हीसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कधीही शाळेची पायरी न चढलेले ग्रामस्थ आज मुलांच्या शिक्षणासाठी एकत्र बसले होते. एकमतानं असं ठरवण्यात आलं की गावातील शिक्षित तरुणांना ग्रामसभेमार्फत महिन्याला तीन हजार रुपये मानधन देऊन रोज सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत सामाजिक अंतर व योग्य ती खबरदारी घेऊन शिकवणी वर्ग चालवले जातील. हा अनोखाच प्रयोग आहे. एका आदिवासी गावानं पुढाकार घेऊन मुलांच्या शिक्षणासाठी अशा प्रकारचा प्रयोग केला. मग अशा ग्रामस्थांना अशिक्षित म्हणायचं का, हाही एक प्रश्न आहे! राजाराम यांनी आपल्या घराचे दरवाजे या विधायक कामासाठी उघडे केले. त्यांचं घरच मुलांसाठी शाळा बनली. गावातीलच दोघे तरुण जोहन पोरेटी व शामबाई पोरेटी यांना या कामासाठी निवडलं गेलं आणि आता मुलांचं शिक्षण निरंतर सुरू आहे. या आदिवासी गावात चाललेला हा अभिनव उपक्रम अनुकरणीयच!

 अशीच काहीशी गोष्ट नांदळी गावाची. कोरची तालुका हा गडचिरोली जिल्ह्यातील एक आदिवासीबहुल तालुका. छत्तीसगढ व गोंदियाची हद्द लागलेला हा तालुका. भौतिक सुविधांच्या बाबतीत तितकासा न पुढारलेला. या गावातही टाळेबंदीच्या काळात झालेला शिक्षणाचा प्रयोग जाणून घेण्यासारखा आहे.  या गावाला ५३३.७६ हेक्टर क्षेत्र सामूहिक वनहक्काअंतर्गत मिळालं आहे. खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच ग्रामसभा आणि एकंदरीत सगळेजण बसून विचारविनिमय करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

बाबूराव मडावी हा नांदळी गावातील एक सुजाण, जबाबदार तरुण. ‘जीवन शिक्षण’ या ‘टाटा ट्रस्ट’ व ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेमार्फत चाललेल्या उपक्रमाचा तो समन्वयक होता. सुमारे १२ वर्षं- म्हणजे २००४ ते २०१६ या काळात तो या उपक्रमाचा भाग होता. त्यामुळे त्याला शिक्षण व लहान मुलांची शैक्षणिक जडणघडण या विषयाची आवड होतीच. टाळेबंदीत बाहेर शिकणारी व गावात शिकणारी सगळी मुलं घरीच होती. नेटची सुविधा किंवा इतर सुविधांच्या अभावी ऑनलाइन शिक्षण वगैरे गोष्टी इथे नाहीत. मार्च २०२० पासून सुरू झालेली टाळेबंदी थांबता थांबेना आणि मुलांचं अपरिमित नुकसान होत होतं. बाबूराव मडावी यास हे असह्य वाटायला लागलं आणि आपल्या शिक्षणाचा वापर गावातील मुलांसाठी करायचं त्यानं ठरवलं. त्याचं शिक्षण  ‘बी.ए.’पर्यंत झालं आहे. पण शिक्षणापेक्षा अनुभवांचा महाडोंगर त्याच्याजवळ आहे. मी जेव्हा त्याच्या उपक्रमास भेट दिली तेव्हा चौथी-पाचवीच्या मुलांना गणितातील समीकरणं  सोडवता येत होती, हे बघून फार आश्चर्य वाटलं. याचं श्रेय बाबूराव भाऊलाच जातं.

बाबूराव भाऊनं सुरुवातीला मुलांची परीक्षा घेतली आणि निष्कर्ष निघाला की खंड पडल्यामुळे अगोदर मुलांना जे येत होतं तेच ती विसरली होती. पहिल्या वर्गातील मुलांची तर फारच दयनीय अवस्था होणार होती. कारण पुढल्या वर्षी कदाचित ती सरळ दुसऱ्या वर्गात जाऊन बसतील. एक वर्ग पुढे जाता येईल, पण ज्ञानाचं काय?- हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे बाबूराव यानं असं ठरवलं की या मुलांचं नुकसान होऊ द्यायचं नाही. आपल्या परीनं होईल ती मदत आपण करायची आणि तेही कोणतीही अपेक्षा न ठेवता.

बाबूरावचं व्यक्तिमत्त्व दानशूरच. आपल्याकडूनच पेन-पुस्तक देऊन त्यानं या उपक्रमास सुरुवात केली. सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास असा हा उपक्रम चालतो. त्याच्याकडे पहिली ते सातवी वर्गापर्यंतची सुमारे

४० मुलंमुली शिक्षण घ्यायला येतात. बाबूराव भाऊ अतिशय प्रेमानं, उत्साहानं त्यांना शिकवतो. त्याचप्रमाणे लोकेश नैताम हा युवकही सुमारे

२० मुलामुलींना गावातच शिकवतो. या दोघांचं काम बघून खूप आनंद वाटला. खरं तर तरुण पिढी असं काम करते आहे ते पाहून खूप आनंद होतो. आणि आशावादही निर्माण होतो. 

वेगवेगळ्या शिक्षण पद्धतींचा अवलंब येथे केला जातो. पंचायत समितीकडून त्यांना ‘टीव्ही’वर शिकवायचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. बाबूराव भाऊ दोन्ही पद्धतींचा वापर  करून (म्हणजेच ‘टीव्ही’च्या आधारे व प्रत्यक्ष) शिकवतो. बाबूरावची गावातील मुलांच्या शिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून खूप उत्साह वाटतो,

प्रेरणा मिळते.

गावातील या अनोख्या उपक्रमांना खूप शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. अशाच प्रामाणिक प्रयत्नांमुळे या दुर्गम भागातील मुलांची शाळा जरी बंद असली तरी शिक्षण नेहमीसाठी सुरू आहे.

chunarkarravi@gmail.com