|| सविता दामले

कोणतीही भाषा व्यापक, प्रगल्भ होत जाते ती तिच्या सर्वसमावेशकतेमुळे. मराठी भाषाही अशीच अनेक भाषांचे ओहोळ पोटात घेत प्रवाही बनलेली आहे. अनेक लेखकांनी देशी वा परदेशी भाषेतील साहित्याला मराठीत अनुवादित करून ती समृद्ध केली  आहे. अशाच काही लेखिकांचे अनुभव  २७ फेब्रुवारीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज  यांच्या जन्मदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त..

once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

एका भाषेतून पुस्तक जेव्हा दुसऱ्या भाषेत येतं तेव्हा अनुवादक केवळ शब्दाला शब्द लिहीत नसतो तर तो त्या मूळ भाषेतील माणसांना आणि सांस्कृतिक अवकाशाला नव्या भाषेत घेऊन येत असतो. मुळात माणसं, भाषा आणि संस्कृती यांचा परस्परांशी घनिष्ट संबंध असतो. तो अनुवादात उतरायला हवा. चांगल्या अनुवादाचं तेच कौशल्य असतं. मूळ लेखनानं अनुवादकाला दिलेल्या चौकटीत त्याला स्वभाषेचे रंग सफाईनं भरायचे असतात. अनुवाद वाचताना वाचकाला तो अनुवाद आहे असं वाटता कामा नये, यातच अनुवादकाचं खरं यश असतं.  

अनुवादकाला परकाया प्रवेश करावा लागतो, कारण  वेगवेगळय़ा लेखकांची शैली, हाताळणी, विषय वेगवेगळे. मूळ लेखकाच्या लेखनाचा बाज अनुवादात आणताना विषयानुसार चपखल भाषा वापरावी लागते. विशेषत: वेगळय़ा भाषेतील कादंबरीचा अनुवाद करताना कस लागल्यासारखं होतं. हल्लीच मी

हार्पर ली यांच्या ‘गो सेट अ वॉचमन’ कादंबरीचा अनुवाद केला. या कादंबरीचा काळ १९६०चा. अमेरिकेतील अलाबामा राज्यातील गौरवर्णीय- कृष्णवर्णीय संघर्ष आणि गोऱ्यांमधील  सामाजिक उतरंड याची पार्श्वभूमी यात आहे. त्यामुळे कादंबरीचा अनुवाद करताना ही सगळी सामाजिक- ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागली. एके ठिकाणी दोन कवींच्या ओळी आणि शेक्सपियरचं एक वाक्य वापरून वाक्यांची गुंफण केली होती, अशा वेळेस खाली तळटीप देणं उचित ठरतं आणि तसं मी केलं. काही तुर्की कादंबऱ्यांचाही मी अनुवाद केला आहे. तेव्हा तिथल्या माणसाची मनोधारणा, स्थानिक प्रथा, निसर्ग अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. कधी कधी ती संकल्पनाच आपल्या इथे नसते, तिथेही तळटीप द्यावी लागते. तुर्की गायन संस्कृतीत रागांना ‘मकाम’ असं म्हणतात, एका कादंबरीत चक्क मैफिलीचं वर्णन होतं. तेव्हा मी त्यातले ‘मकाम’ इंटरनेटवर शोधून ऐकलेही.

प्रसिद्ध लेखिका अंबई यांच्या तमिळ कथांचा इंग्रजीच्या मदतीनं अनुवाद केला, तेव्हा त्यातील एका कथेचं इंग्रजीतलं शीर्षक होतं, ‘गिफ्ट्स’. सरळसोट मराठीत अनुवाद होतो ‘भेटवस्तू’. कथा वाचल्यावर लक्षात आलं, की कथेतील स्त्रियांनी पाहुणीला भेटवस्तू नव्हे, तर प्रवासासाठी ‘शिदोरी’ दिली होती. त्यामागे त्यांचं प्रेम होतं, त्याचं मोल पैशात होणार नव्हतं. म्हणून मी कथेचं नावही ‘शिदोरी’ ठेवलं. अंबईंनाही तमिळमध्ये तोच अर्थ अभिप्रेत होता. पण काही भारतीय संकल्पना इंग्रजीतून व्यक्त करता येत नाहीत, तसं काहीसं त्या इंग्रजी अनुवादकाचं झालं असावं. अशा वेळेस पुढल्या अनुवादकाला आपल्या भाषेतील समर्पक शब्दाकडे जावं लागतं. म्हणूनच मी अनुवाद प्रक्रियेला ‘अनुसर्जन’ म्हणते.

‘जेरूसलेम एक चरित्रकथा’ या ८५० पानी महाग्रंथाचा अनुवाद करायला घेतल्यावर कधी कधी अख्ख्या दिवसात अर्धंच पान होई, त्यातल्या सगळय़ा संकल्पना समजून घेतल्याशिवाय पुढे कसं जाणार? ज्यूंच्या इतिहासाचा अनुवाद करताना मला वारंवार आपल्या रामायणाची आणि महाभारताची आठवण होत होती. नावं आणि भौगोलिक परिसर वेगळा होता, पण सगळय़ा घटना तशाच उत्कंठावर्धक,अद्भुत होत्या. त्यामुळे  त्याचा अनुवाद करणं कंटाळवाणं झालं नाही.

अनुवाद प्रवासातील एक सुखद अनुभव म्हणजे गुलजारजींच्या साहित्याच्या अनुवादाची संधी. २००६ मध्ये ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकासाठी गुलजारजींचा ‘फॅमिली ट्री’ हा लेख अनुवादित केला होता. निसर्गवर्णन करताना गुलजारजींची भाषा तरल, काव्यात्मक आणि लयबद्ध होते. ती भाषा पकडायची म्हणजे अनुवादाच्या रांगोळीत नाजूक हातांनी रंग भरायचे. हा अनुवाद करताना मला भारल्यासारखं झालं. त्यातलं बदामाच्या झाडाच्या पानांचं वर्णन आणि गुलमोहराच्या लाल पऱ्या जमिनीवर उतरतानाचं वर्णन अनुवादात आणताना मी  हरखून गेले होते. पुढे हा लेख इयत्ता दहावीच्या मराठीच्या पुस्तकात घेण्यात आला. त्यांच्या सात पटकथांचा अनुवादही मला करायला मिळाला. गुलजारजींनी केवळ संवादांच्या रूपात कथा पुढे कशा नेल्या हे अभ्यासनीय होतं. पटकथेतील पात्रांप्रमाणे विनोदी, गंभीर, करुण अशी चपखल वाक्यरचना त्यात आहे, तिचा बाज न बदलता ती मराठीत आणायची हे मोठं कौशल्याचं काम होतं. पण ते करताना खूप मजा आली. डोळय़ांसमोर जणू तो चित्रपटच घडतोय असं वाटत होतं.

कधी कधी एखाद्या पुस्तकात कथेशिवाय आणखीही काही घटक असतात. ‘मनगंगेच्या काठावर’ या पुस्तकात तसा अनुभव आला. सबिता गोस्वामी या आसामात ‘बीबीसी’च्या वार्ताहर होत्या. १९७५च्या काळात आसामात घुसखोरीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विद्यार्थी संघटनांनी आसाम हादरून सोडला होता, ‘उल्फा’सारख्या दहशतवादी संघटनांमुळे तरुण भरकटले होते. अशा काळात सबिताजी ‘बीबीसी’च्या स्थानिक वार्ताहर होत्या. जीव धोक्यात घालून सबिताजी बातम्या मिळवत. हे काम करत असताना स्किझोफ्रेनियानं आजारी पती आणि दोन कन्यांना सांभाळण्याचं शिवधनुष्यही त्यांना पेलावं लागलं. त्यांनी आत्मचरित्र आसामीत लिहिलं होतं. त्याचं नाव होतं, ‘मोनगोंगार तीरोत’. इंग्रजी अनुवाद त्यांचीच कन्या त्रिवेणी माथूर यांनी केला होता. त्रिवेणी ही त्या आत्मचरित्राची अनुवादिका होती आणि त्याच वेळेस त्यातील एक पात्रही होती. हे पुस्तक वाचताना मी विस्मयचकित झाले. एवढे आघात होऊनही कुठेही आक्रस्ताळेपणा न करता सबिताजींनी संयत लेखन केलं होतं. त्यांनी जे लिहिलं होतं तेही आणि जे लिहिलं नव्हतं तेही अनुवादात आणायचं म्हणजे मोठं कसबच होतं. माझ्या लक्षात आलं, की सबिताजींच्या आत्मचरित्रात केवळ त्यांचा संसार आणि त्यातली माणसंच नाहीत, तर आसाम आणि आसाममधील राजकारण हीसुद्धा दोन पात्रं या आत्मचरित्रात आहेत. त्यामुळे हा अनुवाद नीट व्हायचा असेल तर अर्थातच आपल्याला त्या काळातील आसामचं राजकारण समजून घ्यावं लागेल. मी सबिताजी आणि त्रिवेणींना भेटले आणि शंकांचं निरसन करून घेतलं. अशी आत्मचरित्रं म्हणजे जणू त्या त्या काळातील समाजजीवनाचा आरसाच असतो. ऐतिहासिकदृष्टय़ाही ती मोलाची ठरतात.

या अनुवादाची एक गंमत म्हणजे आसामी-मराठी या दोन्ही भाषा संस्कृतोद्भव असल्यामुळे शीर्षकापासूनच दोन्ही भाषांचे पूल चांगले बांधले गेले (म्हणजे ‘मोनगोंगार तीरोत’ या आसामी नावाला ‘मनगंगेच्या काठावर’ हे मराठीतलं नाव चपखल बसलं). शिवाय त्रिवेणी गेली कित्येक वर्ष पुण्यात राहात असल्यामुळे तिला मराठी चांगलं येतं. तिनं मला सांगितलं, की आईचे आसामीतले काही शब्द माझ्याकडून मराठीत तसेच्या तसे आपोआपच वापरले गेले आहेत. खरं तर मला आसामी भाषा येत नाही, परंतु या दोन्ही भाषा संस्कृत कुळातल्या असल्यामुळेच इंग्रजीचा पूल वापरूनही तसं घडलं असावं.

अनुवादक त्या पुस्तकाच्या प्रेमात पडला तर अनुवाद करताना त्यालाच मजा येते. मग ती मजा तो वाचकांपर्यंत पोचवू शकतो. हे झपाटलेपण अनुभवणं हाही अनुवाद प्रक्रियेचा भाग आहे.

मूळ पुस्तक बारकाईनं वाचणं, त्याचे संदर्भ शोधणं, परभाषेतील शब्दांसाठी स्वभाषेतील चपखल शब्द शोधणं आणि ते करता करता ती संस्कृतीच उचलून आपल्या भाषेत आणणं, अशी अनुवादाची प्रक्रिया सांगता येईल. या सर्व प्रक्रियेत एक लेखिका आणि अनुवादिका म्हणून माझ्याही जाणिवेचं क्षितिज विस्तारलं आहे आणि मी स्वत: मनानं समृद्ध झाले आहे हे मात्र निश्चित.

savitadamle@rediffmail.com