प्रतिभा वाघ – plwagh55@gmail.com

कापडावरील नक्षीकामाचा आकर्षक रंगांनी सजलेला सुंदर कला प्रकार म्हणजे ‘बांधणी’. ही पुरातन कला तिच्या पारंपरिक स्वरूपाला धक्का न लागता नवं आकर्षक रूप ल्याली, ती या क्षेत्रात काम करणाऱ्या अमिनाबेन खत्री यांसारख्या चित्रकर्तीमुळे. अमिनाबेन यांनी या पुरुषप्रधान क्षेत्रात खंबीरपणे पाय रोवले, बांधणीला जागतिक स्तरावर नेलं आणि भारतातही अनेक स्त्रियांना त्याचं प्रशिक्षण देऊन त्यांचे भूकंपानं उद्ध्वस्त झालेले संसार सावरण्यास मदत केली, तर नव्या पिढीची चित्रकर्ती तायना खत्री हिनं या कलेला उज्ज्वल भविष्याची नवी आशा दिली.

lokrang , cherry blossome, poet on cherry blossome, poet and cherry blossome, cherry blossome poetry, Japan cherry blossom, cherry blossom hyko, Japan cherry blossom culture, cherry blossom season, cherry blossom tradition, world s poerty on cherry blossom, hanami,
निमित्त : चेरीचा बहर आणि कवी
A vision of changing politics in Chandrakat Khaire campaign
चंद्रकात खैरे यांच्या प्रचारात बदलत्या राजकारणाचे दर्शन
bullcart race sculpture created in bhosari
भोसरीत बैलगाडा शर्यतीच्या शिल्पाची उभारणी
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

लांबच लांबपर्यंत पसरलेल्या सुती पांढऱ्या, रंगीत साडय़ा.. रंगानं भरलेली मोठमोठी पिंपं..  टेबलावर पसरलेल्या काही साडय़ांवर सुंदर छापलेली डिझाईन्स,तर काहींवर नक्षी असलेले ट्रेसिंग पेपर पसरवून ठेवलेले.. आपापल्या कामात मग्न असलेले कारागीर.. हे सगळं ओलांडून पुढे गेल्यावर तीन मोठय़ा खोल्या असलेल्या तळमजल्यावरच्या घरात एकावर एक रचून ठेवलेले पंजाबी सूटच्या कापडांचे,  साडय़ांचे गठ्ठे.. पहावं तिकडे सुंदर सुंदर रंगीबेरंगी कापडं.. प्रत्येक रंगसंगती, प्रत्येक नक्षी सुंदर, मनाला मोहवणारी..  ही सारी किमया अमिनाबेन यांच्या ‘बांधणी’ वस्त्रकलेची! बांधणीच्या बंधनात स्वत:ला आयुष्यभर बांधून घेतलेली कच्छमधील भूजची पारंपरिक बांधणी कला जपणारी ही चित्रकर्ती.

बांधणी ही खूप पुरातन कला आहे. सिकंदरच्या काळात लिहिल्या गेलेल्या हिंदुस्थानविषयक लेखनात या कलेचा उल्लेख आढळतो. तसंच सिंधू संस्कृतीमध्ये कपडे रंगवण्याची कला अस्तित्वात असल्याची नोंद आढळते. ‘बंध’ या संस्कृत शब्दावरून ‘बांधणी’ हा शब्द आला. या कलेला इंग्रजीत ‘टाय अ‍ॅन्ड डाय’ म्हणतात. जसंच्या तसं भाषांतर करायला गेलो तर मराठीत ‘बांधा आणि रंगवा’. असं म्हणण्याचं कारण म्हणजे आधी कापड चिमटीत- म्हणजे अंगठा आणि तर्जनी यांच्या नखांच्या साहाय्यानं पडकून त्याला सुती दोरा गुंडाळला जातो- अर्थात बांधला जातो. त्यानंतर ते वस्त्र रंगात बुडवलं जातं आणि बाहेर काढून निथळत ठेवलं जातं. यात दोरा गुंडाळताना तो कापडावर अगोदरच काढलेल्या नक्षीप्रमाणे गुंडाळलेला असतो. रंगात बुडवलेला कपडा वाळल्यावर त्यावरचा दोरा काढला जातो. दोऱ्यानं रंग शोषल्यामुळे आतल्या कापडाला रंग लागत नाही. त्यामुळे आपोआपच कापडावर पांढरी (पांढरे कापड असल्यास) किंवा रंगीत (रंगीत कापड असल्यास) ठिपक्यांची नक्षी तयार होते. ‘नखलो’ नावाच्या छोटय़ाशा धातूच्या रिंगचा उपयोग थोडं-थोडं कापड चिमटीत पकडण्यासाठी करतात. हे अतिशय वेळखाऊ आणि जिकिरीचं काम आहे. स्त्रियांनाच ते चांगलं जमतं आणि घर सांभाळून त्या हे करतात.

गुजरात, राजस्थान, पंजाब, सिंध या ठिकाणी हा वस्त्रप्रकार आढळतो. त्याला ‘बंधेज’, ‘पिलीया’, ‘चंगडी’, तर तमिळनाडूत ‘सुरगडी’ म्हणतात. अठराव्या शतकातही ‘ईस्ट इंडिया कंपनी’द्वारे बांधणी परदेशात निर्यात होत होती. पूर्वी त्यात नैसर्गिक रंगांचा वापर होत असे. उदाहरणार्थ बीट, डाळिंबाची साल, हळद, लोखंडाचा गंज, पळसाच्या फुलांपासून केशरी रंग. कपडा रंगवला की कोरडय़ा हवेत वाळवतात. पावसाळ्यात मात्र दोन दिवस लागतात. भडक रंग हे बांधणीचं वैशिष्टय़ आहे. पिवळा, तांबडा, हिरवा, निळा, काळा हे रंग असतात. ठिपके, लहरिया, मोथरा, एकदाली, सिकरी ही नावं- वेगवेगळ्या पद्धतीनं बांधण्याच्या तंत्रांची आणि तयार झालेल्या वेगवेगळ्या बांधणींची नावं पतोरी, खोम्बी, चंद्रशेखनी अशी असतात. पूर्वी नैसर्गिक रंगात होणारं हे काम १९५६ मध्ये कच्छमध्ये झालेल्या भूकंपानंतर कृत्रिम रंगात होऊ लागलं. कारण ते रंग तयार करण्यात वेळ लागत नाही, शिवाय स्वस्तही पडतात. अनेक नवनवीन गोष्टींची भर काळानुरूप होत असली तरी बांधणीचा मूळ ‘ठिपका’ मात्र आजही मूळ धरून आहे. ठिपक्यांमधून मोर, नर्तक, रासमंडळ, प्राणी आणि किती तरी आकार तयार केले जातात.

‘खत्री समाज’ हे मूळचे बांधणी बनवणारे. आजही त्यांची तरुण पिढी या व्यवसायात आहे. नवनवीन प्रयोग करत आहे. गुजराती, जैन, हिंदू विवाहांमध्ये बांधणीचं स्थान खूप महत्त्वाचं मानलं जातं. पारंपरिक पद्धतीची बांधणी ओढणी म्हणून घेतात तिला ‘घरचोलू’ म्हणतात. मुस्लीम वधू ‘चंद्रखानी’ ओढणी घेते. विवाहात बांधणीचं महत्त्व अनेक वर्षांपूर्वीपासून असल्याचं सांगितलं जातं.  राजा हरिश्चंद्राच्या लग्नात राजेशाही बांधणी वापरल्याचा उल्लेख आढळतो. धार्मिक आणि आनंदाच्या प्रसंगी बांधणी हवीच. राजस्थानात प्रत्येक ऋ तूसाठी त्याचे रंगही ठरलेले असतात. वसंत ऋतूत पिवळा रंग, वर्षां ऋ तूत हिरवा आणि गुलाबी, लग्नप्रसंगी पवित्र मानला जाणारा केशरी, गुजराती विवाहात लाल रंग. काही समाजांमध्ये स्त्री पहिल्यांदा आई झाल्यावर तिला पतीकडून पिवळ्या रंगाची बांधणी दिली जाते. साडी, चनिया-चोली, सलवार कमीज, कुर्ता, ओढणी हे स्त्रियांसाठी, तर पुरुष सण, उत्सव आणि लग्नसमारंभात ‘बंधेज’च्या पगडय़ा वापरतात.

बांधणीमधील विविध गाठींवरूनही वेगवेगळ्या डिझाईन्स तयार के ल्या जातात. ‘एकदाली’ म्हणजे एक गाठ, ‘त्रिकुंटी’ – तीन गाठी, ‘चौबंधी’ – चार गाठी, ‘डुंगरशाही’ – डोंगरासारखी, ‘बूंद’ – मध्यभागी गडद रंग असलेला छोटा ठिपका, ‘कोडी’ – अश्रूच्या थेंबाचा आकार. मिठाईची नावंही काही डिझाईन्सना आहेत. उदा. लड्डू , जलेबी. एकंदरीत बांधणी म्हणजे रंगच रंग आणि आनंदच आनंद! त्यामुळेच नवरात्रीच्या सणाशी तिचं खूप जवळचं नातं आहे. केवळ गुजरात, राजस्थानपुरती बांधणी मर्यादित नसून मध्य प्रदेश, आसाम, बंगाल, दक्षिण भारत इथेही रोजच्या वापरासाठी बांधणी बनवली जाते. भूजमध्ये पिढय़ान्पिढय़ा हे काम करणारी खत्री समाजाची कुटुंबं आहेत. त्यांपैकी फातिमा खत्री यांना १९९३ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांची नात तायना अब्दुलअझीझ खत्री. तायनाचे वडील हे ११ व्या पिढीतले असून २० वर्षांची तायना बांधणीचं तंत्र पाहातच मोठी झाली. हे कुटुंब ‘राईदाणा बांधणी’ म्हणजे राई वा मोहरीप्रमाणे खूप छोटे ठिपके असलेल्या बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक बांधणीच्या वैशिष्टय़ांना धक्का न लावता समकालीन स्पर्श असलेली वस्त्रं तयार करण्याचे नवनवे प्रयोग हे कुटुंब करतं. तायनाला बांधणीची सर्व माहिती असूनही तिच्या शब्दांत सांगायचं तर तिनं ‘बांधणीची भाषा’ शिकण्यासाठी कच्छमध्ये गांधीधामजवळ आदीपूर येथील ‘सोमय्या कला विद्या’ या संस्थेत खास प्रशिक्षण घेतलं. ‘लॅक्मे फॅशन शो’मध्ये ‘बांधणीची डिझायनर’ म्हणून भाग घेतला. त्याचप्रमाणे २०१९ मध्ये अमेरिकेतल्या ‘जागतिक लोककला उत्सवा’तही तिनं सहभाग घेतला होता. त्यामुळे जागतिक बाजारपेठेची माहिती करून घेता आली , असं तिनं सांगितलं. आपल्या वडिलांबरोबर कार्यशाळांमध्ये सहभागी होऊन पाश्चात्त्य देशातील लोकांना ती बांधणीचं प्रशिक्षण देते. तिची स्वत:ची, तिला आवडलेली एक कलाकृती म्हणजे तीन प्रकारच्या बांधणी डिझाईन्स एकाच दुपट्टय़ासाठी वापरून केलेला प्रयोग. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला. ती म्हणते, ‘‘बांधणीनं आम्हाला बरंच काही दिलं.’’ सध्या त्यांच्याकडे २७५ स्त्रिया बांधणीचं काम करतात. आपण शिकलेल्या नव्या गोष्टींची भर आपल्या वडिलांच्या व्यवसायात घालून आपण एक चांगली चित्रकर्ती, डिझायनर व्हायचं, हे तायनाचं स्वप्न तर आहेच, पण आपल्या गावातल्या अनेक स्त्रियांना ‘स्वयंसिद्धा’ बनविण्याचंही स्वप्न आहे. ही नव्या युगाची प्रतिनिधी असलेली तायना पाहिली, की ‘बांधणी’चं भवितव्य उज्ज्वल आहे अशी खात्री पटते.

जागतिक पातळीवर बांधणी लोकप्रिय करणाऱ्या अमिनाबेन इस्माईल खत्री यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. खत्री समाजातली ज्येष्ठ चित्रकर्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमिनाबेन यांचा जन्म १९५९ मध्ये भूजमधील पारंपरिक बांधणी कलाकारांच्या कुटुंबात झाला; पण त्या अडीच वर्षांच्या असतानाच त्यांच्यावरील वडिलांचं छत्र हरपलं. भूज येथील भूकंपात त्यांचं राहतं घर जमीनदोस्त झालं. घरातल्या साऱ्या वस्तूही चोरीला गेल्या. त्यामुळे गांधीधाम येथे काकांच्या घरी त्यांचं कुटुंब आलं. दहा माणसांचं कुटुंब होतं. त्यांची आजी बांधणी बांधे. काकी सुराबाई इब्राहिम खत्री कच्छमधील प्रसिद्ध कारागीर होत्या. त्यांच्या हाताखाली अमिनाबेननं शिकायला सुरुवात केली आणि वयाच्या २६ व्या वर्षीच एक कुशल कारागीर म्हणून नाव मिळवलं. परंपरागत सुंदरतेसाठी प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या बांधणीच्या कलाकृती म्हणजे ‘जद पुतली’, ‘संगत ओढणी’, ‘अंकडा ओढणी’. अमिनाबेन यांनी भूकंपानंतर अनेक स्त्रियांना प्रशिक्षण दिलं. त्यांचे उद्ध्वस्त  झालेले संसार मार्गी लावले. घरात बसून, मुलाबाळांना सांभाळत, संसार सांभाळून या स्त्रिया बांधणी बांधू लागल्या. त्यांना आर्थिक हातभार मिळाला. त्या काळी आपली कला दुसऱ्यांना शिकवायची नाही, असा समज रूढ होता. त्यामुळे अमिनाबेनच्या प्रशिक्षण देण्याला खत्री समाजाकडून खूप विरोध झाला; पण त्यांनी आपलं कार्य नेटानं सुरू ठेवलं. या व्यवसायात पुरुष अधिक असल्यामुळे व्यवसाय करताना अमिनाबेन यांना एक स्त्री म्हणून अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं; पण त्यांच्या जिद्दीचा विजय झाला. बांधणीविषयीच्या तळमळीनं, प्रेमानं त्यांचं पूर्ण आयुष्य जणू व्यापून टाकलं. त्यामुळेच अमिनाबेन यांनी विवाहबंधनात न अडकता बांधणीच्या बंधनात स्वत:ला बांधून घेतलं. त्यांना १९८५ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘दिल्ली नॅशनल म्युझियम’मध्ये कार्यशाळा घेण्यास आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर बांधणी कार्यशाळा घेण्यासाठी भारत सरकारतर्फे त्यांना अमेरिके त पाठवण्यात आलं होतं.

बांधणी पूर्वी प्रामुख्यानं फक्त सुती कापडावर केली जाई. अमिनाबेन यांनी सिल्क, जॉर्जेट, क्रेप अशा पोतांवरही खूप काम केलं. यात काम करताना प्रत्येक वस्त्राचा स्वभाव ओळखून ते वस्त्र किती वेळ रंगात बुडवायचं हे अनुभवामुळेच शक्य होतं, असं त्यांचं मत आहे. पूर्वी लाल, काळा आणि मरून या रंगात बांधणी तयार होई. आता मात्र फॅशनप्रमाणे रंगही बदलत जातात. एकेक जॉर्जेटची साडी बांधणीत पूर्ण करायला सतत सहा महिने तिच्यावर काम करावं लागतं. त्यामुळे तिची किंमतही जास्त असते. इटालियन क्रेप, बनारसी हातमागाची साडी, खूप काम असलेली ‘भरती बांधणी’ या अमिनाबेनच्या सिद्धहस्त हातातून तयार झालेल्या विविध प्रकारच्या बांधणी साडय़ा म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांचा सुरेख मिलाफ आहे. भारतीय बांधणीला परंपरेपासून दूर न नेता आधुनिक साज चढवणाऱ्या अमिनाबेन यांना सलाम!

विशेष आभार – मनोज दांडेकर