आयुष्य जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्थातच तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीसुद्धा ज्या समाजात आपण वाढलो, जगलो, घडलो, त्या समाजाला आपण काही देणे लागतो. या भावनेतून ‘आयुष्य जगणे’ यामध्ये एक प्रकारचे सुख आणि समाधान आहे. ते मी आज अनुभवत आहे. वयाची साठी पार केल्यानंतरसुद्धा आज काही वर्षे लोटली असताना, इतकेच काय व्यग्र जीवनशैली, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानासुद्धा आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण आपले जीवन आनंदाने व्यतीत करू शकतो हा माझा अनुभव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणि अशा पद्धतीने जगताना एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. समाजकार्य, लेखन, रक्तदान यांसारख्या सामाजिक उपक्रमाचे बाळकडू गिरगावातून मिळत गेले. त्या वेळेस प्रसिद्ध वक्त्यांची भाषणे ऐकून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशातून स्व. प्रमोद नवलकर, विलास अवचट यांच्या सहकार्याने ‘उद्यान व्याख्यानमाला’ सुरू केली. ती आजही सुरू आहे याचा अभिमान वाटतो. वर्तमानपत्रात लेखन करण्याची आवड निर्माण झाली. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ‘सी’ वॉर्ड मेडिकल असोसिएशन व डॉ. सुरेश मावळकर यांच्या रक्तदानाच्या उपक्रमात भाग घेऊन त्याबद्दल लोकांच्या मनात जागृती निर्माण करत असतो. आजही सांगताना नक्कीच अभिमान वाटतो की, आमच्यापैकी पाच/ सहा जणांनी पन्नासपेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. वय वाढणे आपल्या हातात नसते, पण ते निरोगी, सुदृढ, आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे तर आपल्या हातात नक्कीच असते.

म्हणूनच आपले छंद, कला, आवड हे जपले पाहिजे. मगच ते आपल्याला अनुभवाच्या शिदोरीवर दुसऱ्याला भरभरून देता येईल आणि तेच खरे जगण्यातील समाधान आहे जे मी अनुभवत आहे.

– पुरुषोत्तम आठलेकर

 

मराठीतील सर्व भरभरून जगताना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social work by purushottam athalekar
First published on: 10-02-2018 at 01:08 IST