scorecardresearch

‘लॉकर रूम’ची चावी कुणाकडे ?

काही दिवसांपूर्वी १८ वर्षांखालच्या मुलांचा ‘बॉइज लॉकर रूम’ हा ‘इन्स्टा ग्रुप’ त्यावरच्या विकृत चर्चामुळे एकदम प्रकाशझोतात आला.

पुन्हा एकदा इंटरनेटचा काळा चेहरा, सायबर जगातले धोके आणि वेब विश्वातले गैरव्यवहार हे सगळं समोर आलं आहे.
उन्मेष जोशी – unmesh@responsiblenetism.org

काही दिवसांपूर्वी १८ वर्षांखालच्या मुलांचा ‘बॉइज लॉकर रूम’ हा ‘इन्स्टा ग्रुप’ त्यावरच्या विकृत चर्चामुळे एकदम प्रकाशझोतात आला. आणि त्यानिमित्ताने पुन्हा एकदा इंटरनेटचा काळा चेहरा, सायबर जगातले धोके आणि वेब विश्वातले गैरव्यवहार हे सगळं समोर आलं. मुलामुलींच्या हातात अगदी लहानपणापासूनच मोबाइल आणि इंटरनेट येण्याच्या सध्याच्या काळात अशा अनेक आभासी ‘लॉकर रूम’ त्यांना खुणावतात आणि जाळ्यातही ओढतात.  मुलं अशा विकृत चर्चा करण्यापर्यंत कशी येऊन पोहोचतात, यामागच्या मानसिकतेचा विचार करणं तर गरजेचं आहेच, पण या ‘लॉकर रूम्स’ची चावी कुणाकडे असते हे शोधताना थोडंसं आत्मपरीक्षणही करायला हवं.

मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ‘करोना’च्या बातम्यांनी वेग घेतलेला असताना, आणि सगळं जग आपापल्या घरी टाळेबंदी होऊन अडकून पडलेलं असताना, एका खळबळजनक घटनेनं अचानक प्रसारमाध्यमांमध्ये डोकं वर काढलं. ही घटना होती ‘बॉइज लॉकर रूम’ या ‘इन्स्टा ग्रुप’बद्दलची. दक्षिण दिल्लीतल्या १८ वर्षांखालच्या मुलांचा हा ग्रुप अचानक प्रकाशझोतात आला, कारण या ग्रुपवरचं संभाषण!  हे संभाषण होतं वर्गातल्या एका मुलीबाबतचं, आणि या मुलीबद्दल केवळ अश्लील शेरेबाजी करून मुलं थांबली नव्हती, तर पुढे जाऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार करायच्या गोष्टीही त्यांनी केल्या होत्या. हे संभाषण समाजमाध्यमांवर ‘व्हायरल’ झालं आणि एकच गोंधळ उडाला.

कुणी या मुलांना दोषी ठरवून तात्काळ शिक्षा सुनावून मोकळं झालं, तर कुणी त्या मुलीबाबत शंका व्यक्त करायलाही कमी केलं नाही. समाजमाध्यमांवरच्या चर्चाची दखल घेऊन पोलिसांना त्यात लक्ष घालणं भाग पडलं, आणि आता या प्रकरणानं वेगळंच वळण घेतल्याचं समोर येत आहे. त्या ग्रुपमध्ये नव्यानं सामील झालेला मुलगा (ज्यानं हा प्रकार फोडला) हा खरंतर एक मुलगी होती, आणि ‘फेक प्रोफाइल’ वापरून त्या ग्रुपमध्ये आली होती. त्या ग्रुपमध्ये वर्गातल्या मुलींची ‘मॉर्फ’ केलेली छायाचित्रं टाकली जातात, मुलींबद्दल कायम अश्लील आणि हिंसक बोललं जातं, हे कळलं म्हणून ही मुलगी खोटं प्रोफाइल घेऊन या ग्रुपमध्ये सामील झाली, आणि अशा प्रकारच्या चर्चेला मुलांना उद्युक्त करून पाहिलं, असं आता अधिक तपासात समोर आल्याचं कळतंय.

या घटनेमुळे पुन्हा एकदा इंटरनेटचा काळा चेहरा, सायबर जगातले धोके आणि वेब विश्वातले गैरव्यवहार हे सगळं समोर आलं आहे. गेली  आठ-नऊ वर्षे आम्ही ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या चळवळीच्या माध्यमातून प्रामुख्यानं शालेय विद्यार्थी आणि इंटरनेट व सायबर सुरक्षा याबाबत जागृती आणि प्रबोधनाचं काम करत आहोत. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या शाळांत सर्वेक्षण करून जमवलेल्या माहितीवरून काही

(कदाचित धक्कादायक) गोष्टी समोर आल्या आहेत. एकतर सध्याची पिढी- म्हणजे बारा ते अठरा र्वष या वयोगटातली मुलंमुली त्यांच्या पालकांपेक्षा जास्त ‘टेक्नो सॅव्ही’ आहेत (अपवाद माहिती तंत्रज्ञानात काम करणाऱ्या पालकांचा). म्हणजे असं, की आज बहुतेक शाळांमध्ये पालकांचे ‘व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप’ आहेत, पालकांचे आपापले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आहेत, पण त्यांची तारुण्याच्या काठावर असलेली मुलं मात्र ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘स्नॅप चॅट’वर आहेत. मुलं ‘डिजिटल’ माध्यमांच्या बाबतीत आपल्या पालकांच्या दोन पिढय़ा पुढे आहेत. त्यामुळे बहुसंख्य पालकांना आपली मुलं समाजमाध्यमांवर नेमकं काय करतात, हेच माहिती नसतं. त्यात या पालकांना समाजमाध्यमांच्या व्याप्तीची आणि परिणामांची फारशी जाणीव नाही, असंही आमच्या पाहणीत आढळून आलं आहे. ‘बॉइज लॉकर रूम’ हा एक ‘इन्स्टाग्राम’वरचा खासगी ग्रुप होता. तिथे बाहेरच्यांना खुलेआम प्रवेश नव्हता. जर तुम्हाला ग्रुपकडून आमंत्रण मिळालं, किंवा ‘ग्रुप अ‍ॅडमिन’नं तुम्हाला त्यात सामावून घेतलं, तरच अशा खासगी ग्रुपमध्ये तुम्ही जाऊ शकता. त्यामुळे या ग्रुपवर काय चर्चा होतात, कोणत्या विषयांवर होतात, कोणती माहिती दिली-घेतली जाते, कशा प्रकारची छायाचित्रं आणि ‘लिंक्स’ त्यावर टाकल्या जातात, हे बाहेरच्यांना कळूच शकत नाही. थोडं वेगळ्या पद्धतीनं सांगायचं, तर आज चाळीस ते पन्नास या वयोगटात असलेले पालक- विशेषत: वडील जेव्हा १४-१५ वर्षांचे होते, तेव्हा जसे ते संध्याकाळी चाळीच्या मागच्या बाजूला, मैदानाच्या कोपऱ्यात घोळका करून उभे राहायचे, आणि वर्गातल्या मुलींबद्दल, चित्रपटांतल्या अभिनेत्रींबद्दल जे आणि जसं बोलायचे, ते बोलणं जितकं ‘खासगी’ असायचं, तितकंच अशा ग्रुपवरचं बोलणं बंदिस्त आणि कोणताही धरबंद नसलेलं (‘अनसेन्सॉर्ड’) असतं. पौगंडावस्थेतले मुलगे सर्वसाधारणपणे स्त्रीदेहाविषयी जे बोलतात, त्याच प्रकारचं संभाषण आजची मुलं ‘इन्स्टाग्राम’ किंवा अन्य समाजमाध्यमांवर आपल्या ग्रुपमध्ये करत असतात. मग ‘बॉइज लॉकर रूम’मधल्या संभाषणाचा गाजावाजा का झाला, आणि त्याची बातमी का बनली? तर त्या संभाषणाचा ‘सूर’ हा अतिशय चुकीचा आणि घृणास्पद होता.

आपल्याच वर्गातल्या एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार करूयात, असं या मुलांना वाटूच कसं शकतं?.. त्यामुळेच समाजमाध्यमांवर भर(व)लेल्या न्यायालयांमध्ये या मुलांना दोषी ठरवून, लगेच शिक्षाही सुनावण्यात आली. पण या प्रकरणातल्या मुलांना दोषी ठरवताना ती असं कशामुळे वागली, त्यांना हा विचार सुचला कुठून, हे न शोधता जर फक्त त्या मुलांना शिक्षा दिली किंवा झाली तर त्यानं कदाचित चुकीच्या वागण्याला शिक्षा केल्याचं समाधान मिळेल, पण अशा वर्तनाला, विचारांना पायबंद बसेल का?

आज जेव्हा हातातल्या मोबाइलमुळे इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आलंय, असं आपण म्हणतो तेव्हा ते फक्त चांगलं, सोज्वळ आणि आदर्श विचारांचं जग नसतं, त्याबरोबरच वाईट विचार, घृणास्पद कृत्यं,ओंगळवाणी विचारसरणी आणि भयानक संकल्पनांचंही जग याच इंटरनेटवरून आपल्या जवळ आलेलं असतं. अर्थात हे जग काही आता निर्माण झालेलं नाही, तर हे जग आपल्या अवतीभोवती होतंच. फक्त आपण त्याचं अस्तित्व नाकारत होतो, किंवा नकळत स्वीकारत होतो. ‘बॉइज लॉकर रूम’मधील मुलांची विचारसरणी कशामुळे अशी विकृत झाली असेल, याचा शोध घेताना हेच जाणवतं. एकतर मुलांना आपण ओल्या मातीचे गोळे मानतो. जसा आकार देऊ तशी ती घडणार. मग या ओल्या मातीवर जर पुरुषप्रधान समाजरचनेतल्या चुकीच्या विचारांचे ठसे उमटले तर दोष कुणाचा? मुलांचं वर्तन हे सुरुवातीला अनुकरण असतं. त्यांचे पालक, आजूबाजूचे लोक कसे वागतात, काय बोलतात, यावरून त्यांच्या वागण्याची शैली ठरत असते. त्यात आता भर पडली आहे ती ‘डिजिटल’ माध्यमांची, या माध्यमांवरील बातम्या, करमणूक, माहिती हे सगळं मुलांची मनं स्पंजप्रमाणे शोषून घेत असतात. साहजिकच स्त्रियांविषयीचा त्यांचा दृष्टिकोन, स्त्रीदेहाबद्दलचे विचार, ‘सेक्स’बाबतच्या त्यांच्या कल्पना घडवण्यात, त्याला आकार देण्यात हे सगळे घटक जबाबदार असतात. मोबाइलच्या माध्यमातून जग जवळ आलंय आणि माहितीचा महास्रोत एका क्लिकवर आलाय, हे म्हणताना, या माहितीच्या धबधब्याला गाळणी लावणं जरुरीचं असतं, हे मात्र विसरलं जातं. पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मनात स्त्रीदेहाविषयी, कामक्रीडेविषयी जे कुतूहल असतं ते नैसर्गिकच आहे, पण त्याला योग्य वळण मिळालं नाही तर मात्र ‘लॉकर रूम’सारख्या विकृती निर्माण होऊ शकतात.

अशा प्रकरणांचा विचार करताना पुन्हा एक जुनाच मुद्दा नव्यानं समोर येतो, तो म्हणजे ‘लैंगिक शिक्षणाचा अभाव’. आपल्या भारतीय समाजरचनेत वयात येणाऱ्या मुलांना कामभावनेबद्दल, कामव्यवहाराबद्दल योग्य मार्गदर्शन मिळण्याची सुविधा आजही नाहीये. घराघरातल्या मुलींना निदान पाळी सुरू झाल्यावर आई, आजी, मावशीकडून शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल तोडकीमोडकी का होईना माहिती मिळते (तीही पुरेशी नसते, पण काहीच नसण्यापेक्षा बरी.). पण मुलांना मात्र याबाबतची माहिती स्वत:ची स्वत:च मिळवावी लागते. आज चाळीस ते पन्नासच्या वयोगटातल्या वडिलांनी आपले ‘ते’ दिवस आठवून पाहावेत. चाळीतल्या, शाळेतल्या, वस्तीतल्या जरा मोठय़ा मुलांकडून मिळणारं ‘ग्यान’(?), पिवळ्या पुस्तकांतील वर्णनांची जोड, आणि चोरून बघितलेल्या ‘व्हिडीओ कॅसेट्स’ यातून जे काय मिळायचं ते ‘कामज्ञान’ त्या पिढीनं मिळवलं. मात्र त्यांच्या मुलांकडे आज मोबाइल आहेत. त्यात इंटरनेटमुळे ‘पॉर्नो’ संकेतस्थळं आणि ‘क्लिप्स’चा मोठा प्रवाह खुला झाला आहे. वाढाळू वयात पॉर्नो फिल्म्स , क्लिप्स बघणाऱ्या मुलांना हेच माहिती नसतं, की ती बघतात त्या फिल्म्स आहेत, ती एक ‘इंडस्ट्री’ आहे आणि तिचं एक अर्थकारण आहे. हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटातली मारामारीची किंवा थरारक दृश्यं जशी आणि जितकी खोटी

असतात तितकीच या ‘पॉर्न फिल्म्स’मधली दृश्यं खोटी आहेत. ती सादर करणारे कलाकार अभिनयच करत आहेत, फक्त तो कामक्रीडेचा आहे. मात्र ही गोष्ट लक्षात न घेतल्यानं अनेक मुलांच्या मनातल्या कामक्रीडेच्या कल्पना या अशा फिल्म्सवर आधारित असतात. साहजिकच पुढे खऱ्या जीवनात जोडीदार निवडताना, निवडलेल्या जोडीदाराबरोबर वैवाहिक जीवनाचा आनंद लुटताना या कल्पना आडव्या येतात आणि पती-पत्नीमधली सर्वात सुंदर गोष्ट नासून जाते.

इंटरनेटच्या माध्यमातून ‘पॉर्नोग्राफी’कडे वळलेल्या मुलांचं मानसिक आरोग्य हा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. साधारणत: दोन वर्षांपूर्वी दक्षिण मुंबईतल्या एका शाळेनं आमच्या ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेची एका प्रकरणात मदत घेतली होती. प्रकरण असं होतं, की त्या शाळेतल्या समुपदेशकाकडे एका यत्तेतल्या काही मुलांनी तक्रार केली, की त्यांच्याच वर्गातली काही मुलं ग्रुपवर मोठय़ा प्रमाणावर ‘सेक्स्टिंग’(अर्थात ‘सेक्स’विषयक ‘चॅटिंग’) करतात. या तक्रारीमुळे शाळेनं संस्थेला आमंत्रित करून हे प्रकरण सोडवायची विनंती केली. त्यासाठी त्या सगळ्या मुलांचे मोबाइल तपासले (अर्थात त्यांच्या पालकांच्या परवानगीनं), तेव्हा लक्षात आलं की त्यातले काही जण हे शाळेतल्या मित्रांबरोबरच बाहेरच्या लोकांशीही ‘सेक्स्टिंग’ करत होते. वेबजगतात असे ग्रुप आहेत, जिथे एकमेकांना न ओळखणारे लोक फक्त ‘सेक्स्टिंग’ करायला एकत्र येतात. मात्र यातले अनेक ग्रुप पैसे भरून सेवा पुरवणारे असतात, त्यामुळे त्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी ‘ऑनलाइन’ माध्यमांवर पैसे भरावे लागतात. या शाळेतल्या एका मुलाला याची चटक लागली होती, मात्र त्यासाठी लागणारे पैसे त्याला मिळत नव्हते. मग शोधाशोध करून विनाशुल्क ‘सेक्स्टिंग’ करता येणाऱ्या ग्रुपमध्ये तो सामील झाला. पण त्या ग्रुपवर तुमची नग्न छायाचित्रं टाकावी लागतात. ‘सेक्स्टिंग’ला चटावलेल्या त्या मुलानं तेही केलं. अमली पदार्थाचं जसं लोकांना व्यसन लागतं, तसंच ‘सेक्स्टिंग’चंही व्यसन लागू शकतं, हे आता जगभर सिद्ध झालं आहे. मग त्या मुलासाठी आम्ही स्वतंत्र समुपदेशन सुरू केलं आणि त्याला त्या व्यसनातून बाहेर यायला मदत केली. या सगळ्या प्रकरणात लक्षात आलं, की त्या मुलांचे पालक सांपत्तिकदृष्टय़ा अतिशय उत्तम स्थितीतले होते, पण त्यांना शैक्षणिक पाश्र्वभूमी नव्हती. त्यामुळे त्यांनी मुलांना अगदी महागडे फोन दिले होते. पण मुलं त्याचा वापर कसा करतात याबद्दल ते अनभिज्ञ होते. एकूणच आताची पिढी तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत अद्ययावत असते. आमच्या संस्थेनं मुंबईतल्या मालवणी भागात काही शाळांमध्ये मुलं आणि सायबर विश्व याबाबतचं सर्वेक्षण केलं, तेव्हा असं आढळून आलं, की या शाळेतल्या अनेक मुलांना ‘डीप वेब’, ‘डार्क वेब’ या संकल्पना माहिती आहेत. कदाचित त्यांच्या पालकांना हे काय असतं हेच माहीत नसेल. पण हा वेब विश्वाचा काळा चेहरा आहे. या ‘डीप’ आणि ‘डार्क’ वेबच्या माध्यमातून अमली पदार्थाचे व्यवहार चालतात, शस्त्रास्त्रांचा चोरटा व्यापार केला जातो, पॉर्नोग्राफिक जाळी चालवली जातात. अशा काळ्या जगाच्या संपर्कात आलेल्या कोवळ्या, तरुण, अननुभवी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीनं जाळ्यात ओढलं जातं, आणि अनैतिक, बेकायदेशीर व्यवहारांसाठी त्यांना वापरलं जातं.

अशा प्रकारचं प्रकरण घडलं, किंवा खरंतर उघड झालं, की हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘याबाबत कायदा काय करतो?’ हा प्रश्न विचारण्यामागचा रोख प्रामुख्यानं अशा प्रकारातल्या दोषींना शिक्षा होते का, किती कठोर शिक्षा होते, हे जाणून घेण्याचा असतो. आपल्याकडे अशा गुन्ह्य़ांसाठी ‘पॉक्सो’ कायद्यामधली (‘प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अ‍ॅक्ट , २०१२’) कलमं वापरली जातात. मात्र वेबवर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये, मग ते आर्थिक असोत किंवा लैंगिक शोषणाचे, गुन्हेगाराचा माग काढणं, अस्तित्व सिद्ध करणं, ओळख पटवणं अतिशय कठीण असतं. शिवाय कायद्याचा वापर हा गुन्हा घडून गेल्यावर करण्यासाठी असतो. त्यामुळे अशा प्रकरणांसाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना  करायला पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. त्यातला एक भाग तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. मुलांना आकर्षित करणारी, जाळ्यात ओढणारी संकेतस्थळं बंद केली तरी ती नव्या नावानं, चोरदरवाजानं पुन्हा पुन्हा डोकं वर काढतातच असा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे मोबाइल बनवणाऱ्या कंपन्यांची मदत घेऊन मुलांसाठी सुरक्षित असे मोबाइल तयार करणं, मुलांच्या हातात येणाऱ्या मोबाइलमध्ये अशा संकेतस्थळांना प्रतिबंध करणारी ‘सॉप्टवेअर्स’ टाकणं, असे काही उपाय करण्याची आता निकड भासू लागली आहे.

मध्यंतरी आपल्या उपराष्ट्रपतींनी या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्यसभेची एक समिती स्थापन केली होती आणि या समितीनं भारतात काम करणाऱ्या विविध संस्थांकडून याबाबत माहिती, सूचना आणि उपाय मागवले होते. या सगळ्यांच्या जोडीला गरज आहे ती मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्याची आणि पालकांचं, मुलांचं प्रबोधन करण्याची. हा विषय एखादं प्रकरण झालं की मगच प्रसारमाध्यमांच्या पटलावर येतो. तसं न होता सातत्यानं याबाबतचे माहितीपूर्ण लेख, मुलाखती, आकडेवारी लोकांसमोर मांडली पाहिजे. तसंच मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या मुलांशी संवाद सुरू ठेवला पाहिजे. केवळ मुलांना साधनं, वस्तू दिल्या, महागडे फोन आणि ‘गॅजेट्स’ दिली की जबाबदारी संपली, असं मानता कामा नये. तुमच्या अतिशय व्यग्र वेळापत्रकात तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही वेळ काढू शकत नसाल, त्यांच्याबरोबर मैत्रीचं-विश्वासाचं नातं जोडू शकत नसाल, तर तुमची ऑफिसमधली कार्यक्षमता आणि व्यवस्थापनाच्या पदव्या फुकट आहेत. त्यामुळे आता ‘पालक संस्कार’ कार्यशाळा घेण्याची गरज आहे. मुळात पालकत्व हे कसरतीचं काम आहे, त्यात सध्याच्या डिजिटल युगातलं पालकत्व तर अधिकच लक्षपूर्वक करायची गोष्ट बनली आहे.

या सगळ्याचा समारोप करताना काही वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवतेय. एका मुलीनं एका मुलासंबंधी समाजमाध्यमांवर त्यानं आपलं लैंगिक शोषण केलं, असा आरोप केला होता. त्यामुळे त्या मुलाला मोठय़ा प्रमाणावर ‘ट्रोल’ करण्यात आलं आणि त्या सगळ्याचा ताण सहन न होऊन त्या मुलानं आत्महत्या केली होती. समाजमाध्यमांवरील ‘कमेंट्स’, टीका-टिप्पणी कोणत्या थराला जाऊ शकते, याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे. ‘बॉइज लॉकर रूम’चं प्रकरण उघडकीला आलं, पण याच पद्धतीच्या ‘गर्ल्स लॉकर रूम’देखील समाजमाध्यमांवर अस्तित्वात आहेत. मुळात या ‘लॉकर रूम्स’ची चावी पालकांकडे आणि समाजाकडे आहे हे लक्षात घेऊन तशी पावलं उचलली, तर मग तिथे घडणाऱ्या चर्चाची भीती बाळगायचं कारण राहणार नाही. समाजातली पुरुषी मानसिकता, स्त्रीकडे बघण्याची भोगवादी दृष्टी आणि कामभावनेला निषिद्ध मानून लपवण्याची वृत्ती हे सगळं बदलण्याची गरज या डिजिटल युगात अधिक प्रकर्षांनं जाणवू लागली आहे. तंत्रज्ञानानं आपल्या जीवनशैलीची पुनर्रचना होत असताना आपल्या समाजाची रचनाही नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. हे ओळखून आपण त्यासाठी जितके अधिक प्रयत्न करू तितक्या लवकर या ‘लॉकर रूम्स’ची भीती वाटेनाशी होईल.

#BoisLockerRoom

वाढत्या वयात पॉर्नो फिल्म्स, क्लिप्स बघणाऱ्या मुलांना हेच माहिती नसतं, की ती बघतात त्या फिल्म्स आहेत, ती एक ‘इंडस्ट्री’ आहे आणि तिचं एक अर्थकारण आहे. हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटातली मारामारीची किंवा थरारक दृश्यं जशी आणि जितकी खोटी असतात तितकीच या ‘पॉर्न फिल्म्स’मधली दृश्यं खोटी आहेत. ती सादर करणारे कलाकार अभिनयच करत आहेत, फक्त तो कामक्रीडेचा आहे. मात्र ही गोष्ट लक्षात न घेतल्यानं अनेक मुलांच्या मनातल्या कामक्रीडेच्या कल्पना या अशा फिल्म्सवर आधारित असतात. साहजिकच पुढे खऱ्या जीवनात जोडीदार निवडताना, निवडलेल्या जोडीदाराबरोबर वैवाहिक जीवनाचा आनंद लुटताना या कल्पना आडव्या येतात आणि पती-पत्नीमधली सर्वात सुंदर गोष्ट नासून जाते.

(लेखक ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’ या संस्थेचे सहसंस्थापक आहेत.)

शब्दांकन – मकरंद जोशी

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Boys locker room instagram group internet black side dd70