सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातलं अणसूर हे छोटं गाव. एकीकडे सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि दुसरीकडे मोचेमाड खाडी, यांमध्ये गाव वसलेलं आहे. निसर्गसौंदर्यानं नटलेले हिरवेगार डोंगर, सपाट माळरानं, सखल भागात शेतमळे, खाडीकिनारी नारळीच्या बागा, असा रम्य परिसर आहे. तिथे १९५६ मध्ये पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये जयराम नाईक या शिक्षकाची नेमणूक झाली होती. त्या काळचा शिक्षकांचा वेश म्हणजे धोतर, काळा कोट आणि डोक्यावर टोपी! नाईक गुरुजींना हा वेश अगदी शोभून दिसायचा. खरोखरच हाडाचे शिक्षक वाटायचे!

६ वी आणि ७ वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्याचं काम त्यांना करावं लागायचं. त्यांचे आवडते विषय मराठी, हिंदी, इतिहास आणि अंकगणित. त्यांच्या शिकवण्याच्या सुरेख पद्धतीमुळे अनेक मुलांना इतिहास आणि मराठी विषयात गोडी निर्माण झाली. चित्रकलेत अनेक मुलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. हुतुतू, खो-खो या खेळांसाठी उत्तेजन दिलं. खेळाच्या वार्षिक स्पर्धामध्ये अणसूर शाळेचा विजय ठरलेला असायचा.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची, लिहिण्याची रुची निर्माण व्हावी म्हणून गुरुजींनी हस्तलिखित मासिक काढण्याची प्रथा सुरू केली. त्याचं नाव ठेवलं होतं- ‘विकास’. मुलांचे लेख, कविता, लोकगीतं, चित्रं, यांचा त्यात समावेश करण्यात आला. हा शाळेतला पहिलाच यशस्वी प्रयोग होता. गुरुजींनी अणसूर गावचा नकाशा तयार करून तो भिंतीवर टांगून ठेवला होता. गुरुजी त्यांचे विद्यार्थी पदवीधर झाल्यावर त्यांचं अभिनंदन पत्र पाठवून जरूर करायचे.

त्याकाळी ‘फायनल’च्या परीक्षेला खूप महत्त्व होतं. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर शिक्षकाची नोकरी मिळवण्याची संधी असे. फायनलच्या परीक्षेला तालुक्यातलं एकमेव केंद्र वेंगुर्ले. तालुक्यातले सर्व शाळांतले विद्यार्थी तिथेच परीक्षेसाठी येत. शहराला मोठय़ा जत्रेचं स्वरूप येई. आपल्या शाळेतली मुलं उत्तीर्ण व्हावीत म्हणून नाईक गुरुजी खूप परिश्रम घ्यायचे. पुण्याहून त्यांनी मासिकं मागवून गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य केलं होतं.

त्या काळी तालुक्यातल्या अनेक शाळांमध्ये ‘शारदोत्सव’ उत्साहानं साजरा व्हायचा. मुलं पौराणिक अथवा ऐतिहासिक नाटकं सादर करीत असत. गुरुजी मुलांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून भाषण तोंडपाठ करून घ्यायचे. गावकरी मंडळी आपल्या पाल्याचं नाटक पाहायला मुद्दाम हजर राहायचे आणि आनंद घ्यायचे.

वर्षांला एखादी सहल शेजारच्या तालुक्यामध्ये नेली जायची. आमची १९५६ ची सहल सावंतवाडी शहरात काढण्यात आली होती. श्रीमंत पंचम खेमराज यांचं सोन्याचं सिंहासन आणि राजवाडा दाखवला होता. त्याच वर्षी मुलांनी वेंगुल्र्यातल्या चित्रपटगृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा चित्रपट पाहिला होता. तो आम्हाला खूपच आवडल्याचं स्मरतं. गुरुजींनी जैन मंदिराकडे शाळेतल्या मुलांचा वनभोजनाचा कार्यक्रमसुद्धा घडवून आणला होता.

त्यांनी अभ्यासाबरोबर नाटक, खेळ, हस्तलिखित मासिक. पर्यटन अशा सर्व क्षेत्रांमध्ये मुलांची प्रगती घडवली होती. माझ्या शैक्षणिक जीवनात त्यांचा मोठाच वाटा आहे, हे नमूद करायला आजही आनंदच वाटतो.

 chaturang.loksatta@gmail.com