मृणालिनी चितळे

१९७४ वर्ष होतं ते. मी एस.एस.सी.ला होते. तो जमाना प्रत्येक विषयासाठी क्लास लावायचा नव्हता. माझ्याही मनात क्लासविषयी नावड होती आणि तरीही वडिलांनी सांगितलं म्हणून मी सु. द. तांबे सरांच्या मराठी विषयाच्या स्कॉलर बॅचला जायला लागले आणि चक्क रमले. तांबे सर पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयातले शिक्षक. क्लासमध्ये सर पाठय़पुस्तकातल्या फक्त कविता वा धडा शिकवायचे नाहीत; तर संपूर्ण कवी नि लेखक आपल्या ओघवत्या शैलीत आम्हाला उलगडून दाखवायचे. एस.एस.सी.ला असूनही अवांतर वाचनाचा मी धडाका लावला आणि केवळ त्यांच्यामुळे शास्त्र शाखेकडे जायचा निर्णय बदलून कलाशाखेकडे वळले. आमची परीक्षा झाली त्याच वर्षी सरांनी ‘युवास्नेह’ या संस्थेची स्थापना केली. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, साहस, सामाजिक प्रश्न अशा नानाविध विषयांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, चर्चा घडाव्यात, त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, हा त्यामागचा उद्देश. ‘युवास्नेह’च्या माध्यमातून सर अनेक कल्पना आमच्यापुढे मांडायचे. कधी अभिनेत्यांच्या मुलाखती, तर कधी कुलगुरू वा मान्यवर संपादकांच्या भेटीगाठी, असे कार्यक्रम आखले जायचे. या कार्यक्रमांमध्ये काहीही प्रश्न विचारले तरी सर कधी आक्षेप घ्यायचे नाहीत. स्वतंत्रपणे विचार करण्याचे आपोआप संस्कार घडायचे आणि त्याची जबाबदारी स्वीकारण्याचेही. सुट्टीमध्ये जुनी वह्यापुस्तकं गोळा करून खेडोपाडी पोहोचवण्यासाठी केलेली धडपड, मुलामुलींच्या प्रतिभेतून साकार झालेलं हस्तलिखित, गाण्याचे कार्यक्रम, नाटय़वाचन, सामाजिक कार्यासाठी निधी संकलन, पावसाळी सहली, अशा किती तरी कार्यक्रमांची वर्षभर रेलचेल असायची. त्यामध्ये आम्ही मुलंमुली आपला वकूब आणि आवडीप्रमाणे सहभागी व्हायचो. प्रत्येक कार्यक्रमामागे प्रेरणा असायची ती सरांची. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्यातल्या ‘स्व’ची ओळख करून देण्याचं, त्यांच्या आयुष्याला वळण लावण्याचं आणि बिघडलेलं वळण सावरण्यासाठी मदत करण्याचं विलक्षण कसब त्यांच्यापाशी होतं. सरांमुळे कॉलेजमध्ये असताना अनेक क्षेत्रांशी आणि व्यक्तींशी आमची ओळख झाली. काम करायची संधी मिळाली. त्याबरोबरच जिवाभावाचे मित्रमैत्रिणी जोडले गेले.

Success story
शेळ्या चरवून अभ्यास; परिस्थितीवर मात करीत जिद्दीने JEE Advanced परीक्षेतील उत्तुंग यशाला गवसणी! मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
controversy over ajit ranade appointment as vc of gokhale institute
गोखले संस्थेतील वाद शमवण्याचे प्रयत्न; पत्र‘फुटी’चीही चौकशी
astrology budha gochar 2024 mercury transit in leo these zodiac sign will be shine an happy
बुधाचा सिंह राशीत प्रवेश; २९ जुलैपासून ‘या’ तीन राशींची श्रीमंती वाढणार! व्यवसायात नफा तर नोकरीत प्रमोशनची शक्यता
five years old children ideal screen time
पाच वर्षांच्या मुलांनी किती वेळ स्क्रीन पाहावी? नेत्रतज्ज्ञ काय सांगतात, वाचा…
NEET exam, NEET exam Crisis, Uncertainty for 23 Lakh Medical Aspirants, Court Delays neet exam, Regulatory Failures, Regulatory Failures in neet exam, neet exam, neet medical exam, neet exam news, neet news
‘नीट’ दिलेल्या २३ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याविषयी काहीच गांभीर्य नाही?
Girls well educated female family Sanskar life
मार्ग सुबत्तेचा : सुकन्येची समृद्धी
It is necessary to educate children in their mother tongue says Senior Kannada writer Dr S L Bhairappa
डॉ. भैरप्पा यांची स्पष्ट भूमिका; म्हणाले, मातृभाषेत शिक्षण….
Students' life-threatening journey commute to school
शेवटी शिक्षण महत्त्वाचं! शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यांच्या इच्छाशक्तीसाठी…”

 ‘युवास्नेह’ची धुरा सांभाळताना सर त्यांच्या आवडत्या क्षेत्रात अखंड कार्यरत होते. त्यांनी मुलांसाठी पुस्तकं लिहिली. ‘शालापत्रक’ मासिकाचं संपादकपद सांभाळलं. अनेक कार्यक्रमांचं अध्यक्षपद भूषवलं. अध्यापनाचं काम तर चालूच होतं. त्यामुळे नित्य नवे विद्यार्थी ‘युवास्नेह’शी जोडले जात होते. सुरुवातीच्या बॅचचे विद्यार्थी नोकरी, करिअर, घर, संसार यामध्ये व्यग्र झाले, तरी ‘युवास्नेह’चं काम चालू राहिलं. सरांचं वैशिष्टय़ असं, की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं त्यांच्या जोडीदारांशी, विद्यार्थ्यांच्या मुलांशी स्नेहाचं नातं जोडलं आणि त्यांना आपल्या परिवारात सामील करून घेतलं. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात सर आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्या कुटुंबासह जेवायला बोलवायचे. आज त्यांचे असंख्य विद्यार्थी डॉक्टर, इंजिनीअर, लेखक, सी.ए., व्यावसायिक, खेळाडू, कलाकार म्हणून आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. एवढंच नाही, तर जगभरात कुठेही असले, तरी त्यातले बहुसंख्य जण कायम सरांच्या संपर्कात राहिले. सरांची अजून एक वैशिष्टय़पूर्ण कृती म्हणजे कुणीही आपल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं, की त्यांचं, टपोऱ्या अक्षरांत शाबासकीचं पत्र यायचं! त्याबरोबर घरी कॉफी घेण्यासाठीचं आमंत्रण. तांबेबाईंचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व नि अगत्य, यामुळे सरांच्या घरी गप्पा रंगायच्या. अनेक जण भेटायचे. बाईंच्या हातच्या कॉफीची चव विसरणं केवळ अशक्य. सर आपल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख कायम ‘माझी मुलं’ असा करायचे. बाईही असंच समजायच्या. त्यांच्या घराचं आणि मनाचं दार सर्वासाठी कायम खुलं असायचं. अनेक विद्यार्थी त्यांच्याकडे यायचे, मन मोकळं करायचे. न मागता सरांनी कुणाला सल्ला दिला नाही, पण विचारलं तर कानउघाडणी करायलाही कमी केलं नाही. अनेकांना त्यांनी पुस्तकं भेट दिली. पैशांची मदत केली. त्यांच्या अडीच खोल्यांच्या वास्तूत अनेकांनी अनुभवलेला ‘घरपणाचा’ अनुभव शब्दातीत आहे.

 सरांना आदर्श शिक्षक पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले. शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या नावानं दिला जाणारा ‘मधुसंचय’ पुरस्कार प्राप्त झाला. एकदा बोलता बोलता सर म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांमुळे मी मोठा झालो. विद्यार्थी हीच माझी श्रीमंती आहे. त्यांची आलेली पत्रं मला पुरस्कारासमान वाटतात!’ कारणपरत्वे स्नेही, विद्यार्थी, पालक, मान्यवर व्यक्ती यांची अनेक पत्रं सरांना यायची. सर त्यांना उत्तरं तर द्यायचेच, शिवाय हा पत्रव्यवहार त्यांनी जपून ठेवला. त्यांच्या दृष्टीनं तो अनमोल ठेवा होता. त्यांच्या भावना बाई जाणत होत्या. ही श्रीमंती स्वत:जवळ साठवून ठेवण्यापेक्षा ती वाटण्यात किंवा इतरांनाही त्यामध्ये सहभागी करून घेण्यात आपल्या दोघांचा आनंद आहे, हे बाईंनी ओळखलं. स्वखर्चानं ‘एका शिक्षकाची श्रीमंती’ या नावानं निवडक पत्रसंग्रह प्रसिद्ध केला.

 मुलांना घडवण्याचं काम सरांनी नि:स्पृहपणे केलं. त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या पंचाहत्तरीचं निमित्त साधून सारे युवास्नेही पुढे सरसावले. सगळय़ांनी मिळून सरांची ग्रंथतुला केली. शेवटची काही वर्ष सर अंथरुणाला खिळून होते; परंतु कधीही त्यांच्या बोलण्यातून नकारात्मक भाव उमटला नाही. फोनच्या माध्यमातून त्यांनी आपला स्नेहसंपर्क कायम ठेवला. शब्दोच्चार अस्पष्ट झाले, हात चालेनासा झाला, तेव्हा बाई त्यांचे शब्द झाल्या, लेखणी झाल्या. विद्यार्थिमित्रांचा घरातला राबता कायम राहिला.

 विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये आपल्या आयुष्याचा आनंद समजणारी तांबे सर ही व्यक्ती आता अनंतात विलीन झाली असली तरी त्यांची वृत्ती आम्ही विद्यार्थ्यांनी मनीमानसी जपली आहे. त्यांच्या मनाची श्रीमंती, विद्यार्थ्यांबद्दल वाटणारं प्रेम नि आपुलकी, त्यांचं आणि बाईंचं अर्थपूर्ण सहजीवन आम्हाला कायम दिशादर्शक ठरत आहे.

सफाईदार इंग्रजीचा आत्मविश्वास!

नीता शेरे

मला १९८२ मध्ये खूप चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. पहिल्या दिवशीच एकूण कंपनीचं वातावरण पाहता माझ्या लक्षात आलं, की मला इंग्रजीवर बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. हे कसं काय करायचं याचा विचार करतच घरी आले. एकदम आठवले ते बोरिवलीतल्या चोगले हायस्कूलचे  लीलानाथ शंकर जोगळेकर सर. निवृत्त मुख्याध्यापक. त्यांचं इंग्रजी आणि गणित खूप चांगलं होतं आणि त्यांच्याकडे    १२ वीपर्यंतची मुलं शिकवणीला येत. मी सरांकडे गेले आणि माझी ओळख करून दिली. माझं त्यांच्याकडे येण्याचं कारण सांगितलं. मी त्यांना म्हटलं, की मला इंग्रजी व्याकरणापासून इंग्रजी शिकायचं नाहीये; पण मी रोज काही तरी अनुवाद करून आणीन किंवा काही मनातले विचार इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करीन. सरांना ही कल्पना खूपच आवडली. ते म्हणाले, ‘‘मी इतकी वर्ष शैक्षणिक क्षेत्रात आहे; पण मलाही हा विचार नवीन आहे. मात्र मला यासाठी मदत करायला आवडेल.’’ 

दुसऱ्या दिवशीपासून ऑफिसमधून आल्यावर माझं सरांकडे जाणं सुरू झालं. मी रोज रात्री मराठी वर्तमानपत्रामधल्या एका बातमीचं भाषांतर करत असे, तर कधी तरी ऐकलेले विचार इंग्रजीत मांडण्याचा प्रयत्न करत असे. असं करता करता दिवस, महिने जात होते. माझी लिखाणाची वही प्रथम लाल अक्षरांच्या सुधारणांनी भरून जाऊ लागली. मी थोडी नाराज होऊ लागले होते, आत्मविश्वास ढळू लागला होता; पण सर न कंटाळता माझी वही तपासत असत. सुरुवाती-सुरुवातीला सर मला कधीही काही म्हणाले नाहीत; पण हे करता करता हळूहळू लाल पेनाच्या खुणा कमी होऊ लागल्या. सर मला मध्येमध्ये इंग्रजीत संभाषणही करायला सांगत असत. माझ्या चुका कमी होत आहेत हे पाहून सर खूश होत होते. नंतर हळूहळू सरांनी मला आठवडय़ातून एकदाच यायला सांगितलं. नंतर महिन्यातून एकदा जाणं होऊ लागलं; पण मी आणि सर दोघांनीही प्रयत्न सोडले नाहीत. असं करता करता दोन वर्ष गेली. माझा आत्मविश्वास वाढला होता. हळूहळू मी ऑफिसमध्ये अंतर्गत परीक्षा देऊन प्रगती करत होते.

एक दिवस मी माझ्या प्रमोशनची बातमी द्यायला सरांकडे गेले. सर्व घटना जवळ जवळ दहा मिनिटं सविस्तरपणे त्यांना इंग्रजीमध्ये सांगितली. सरांनी पूर्णपणे माझं बोलणं ऐकून घेतलं आणि समाधानानं म्हणाले, ‘‘तुला शंभरपैकी शंभर गुण!’’

कालांतरानं असिस्टंट मॅनेजर म्हणून प्रमोशन झालं आणि माझी पुण्याला बदली झाली. मी चार वर्ष (२००५ ते २००९) पुण्यात होते. दरम्यानच्या काळात मुंबईमध्ये आल्यावर मी सरांना भेटायला जायचे. ते म्हणायचे, ‘‘नीता, मला तुझ्यासारखी विद्यार्थिनी दुसरी नाही मिळाली!’’ माझं पुण्यात वास्तव्य असतानाच सरांचं निधन झाल्याचं कळलं आणि खूप वाईट वाटलं. ते शेवटपर्यंत विद्यादानाचं कार्य करत होते. पुस्तकांचा त्यांचा खूप मोठा व्यासंग होता.

 सरांनी मला एक अतिशय महत्त्वाचा सल्ला दिला होता, की कोणतीही भाषा शिकताना त्याचा मनामध्ये प्रथम विचार करायला शिका. हा विचार मला अजूनही उपयोगाचा ठरतो. मी इंग्रजी बोलताना प्रथम इंग्रजी वाक्य मनात तयार होतं आणि मग बोललं जातं. सरावानं मी बोलताना इंग्रजी आणि मराठी दोन्ही एकत्र सफाईनं बोलू लागले. काही ठिकाणी मला उगाच किती इंग्रजी येतंय हे दाखवण्यासाठी असं बोलतेय, अशी टीकासुद्धा ऐकावी लागली. असो!

 मला इंग्रजीबद्दल आत्मविश्वास आला, तो सरांनी दिलेल्या शिकवणीमुळे आणि त्यांनी कधीही कंटाळा न करता दीर्घकाळ केलेल्या मार्गदर्शनामुळे. त्यांना ही एक लहानशी गुरुदक्षिणा!

 npshere@gmail.com

 chitale.mrinalini@gmail.com