दुर्मीळ ‘दस्तावेज’

सुमित्रा भावे यांचा १६ नोव्हेंबरच्या अंकातील ‘दस्तावेज’ हा सुंदर लेख वाचला. चित्रपटाच्या समाजशास्त्रावर मराठीत लिहिलेला कदाचित हा पहिलाच लेख असेल. इतका समृद्ध, सशक्त लेख लिहिल्याबद्दल सुमित्राताईंचे मनापासून अभिनंदन.

स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘शिंडलर्स लिस्ट’ हा अंतर्मुख करणारा चित्रपट १९९३ ला पाहिल्यावर ‘चित्रपटातील समाजशास्त्र’ या विषयाची ओळख झाली. हा चित्रपट मनात एवढा खोलवर जाऊन बसला, की पुढे त्या चित्रपटाबद्दल मी खूप वाचत गेलो. दिग्दर्शक स्पीलबर्ग हे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी स्वत: बराच काळ त्यावर संशोधन करत होते असे वाचनात आले. त्यासाठी पोलंडमधील क्रोकाव शहरातील ‘पोमोरस्का स्ट्रीट’वरील गेस्टापो हेडक्वार्टर्स, शिंडलर्सचे अपार्टमेंट आणि आमोन गॉथचा व्हिला या स्थळांना स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी अनेक वेळा भेट दिली. चित्रपटात दाखवलेला प्लाझू हा स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी ‘रिक्रिएट’ केला होता हे वाचून एकीकडे स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्याबद्दलचा आदर प्रचंड वाढला व दुसरीकडे आपल्याकडील समकालीन चित्रपटांबद्दल अत्यंत टोकाची नकारात्मक भूमिका मनात घर करून राहिली. ‘तपशिलांकडे अभ्यासपूर्ण पद्धतीने लक्ष न देणं ही आपल्याकडच्या चित्रपटांची ओळख आहे.’ असा समज मनात पक्का बसला होता. मात्र हा लेख वाचून तो विचार काहीसा बदलला. शिवाय लेखिकेबद्दल असलेला आदर शतपटीने वाढला. हा लेख चित्रपटविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थांनी आवर्जून त्यांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायला हवा.

– प्रा. शंतनू काळे

नवी ऊर्जा मिळाली

‘सर्वासाठी शिक्षण’ या सदरातला ९ नोव्हेंबरच्या अंकातील ‘पहिलीतले पुस्तक पहिलीतच’ हा रजनी परांजपे यांचा लेख वाचला. मी स्वत: बालसाहित्य लिहीत असल्याने लेखाचे शीर्षक वाचूनच त्याकडे लक्ष वेधले गेले. नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी केलेल्या १५ हजार मुलांवरील संशोधनाचे कौतुक वाटले. अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाली. लेखात मांडलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आणि बालमनाला अधिक समृद्ध करणारे आहेत. ‘पुढचे पाठ मागचे सपाट’ ही प्रवृत्ती शिक्षणक्षेत्रात वाढत असताना वाचनसंस्कृती वाढवून पाया पक्का करण्याविषयी लेखिकेने नोंदवलेले मत महत्त्वाचे आहे. मुलांच्या सर्वागीण विकासासाठी शाळा, शिक्षकांसोबतच पालकांचा सहभागदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे हे अगदी खरे आहे. शालेय वयातच वाचनाची आवड लागावी म्हणून आम्ही शाळाशाळांमधून बालगीतांचा सांगीतिक प्रयोग, विशेषत: मराठी शाळांमधून करत आहोत. याला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा कृतिशील प्रतिसाद मिळतो आहे. या प्रवासात मला हा लेख महत्त्वाचा आणि ऊर्जा देणारा वाटला.

– गणेश घुले, औरंगाबाद</p>

वाचन सराव महत्त्वाचाच

‘वाचनाचाही सराव हवा’ हा १२ ऑक्टोबरच्या अंकातील रजनी परांजपे यांचा लेख भावला. आजच्या शिक्षणपद्धतीत मुलांना एखाद्या संकल्पनेबद्दल स्वत:ला विचार करण्याची संधी मिळत नाही, असे माझे मत आहे. भाषा विषय शिकत असताना शुद्धलेखनावर भर द्यावा, असे सांगितले जाते. एखाद्या मुलाने संकल्पनेचे आकलन करून एखादे वाक्य उत्तरात, निबंधात, पत्रलेखनात लिहिले तर त्याच्या विचारक्षमतेला प्राधान्य देण्याऐवजी त्याचे लिखाण किती शुद्ध आहे हेच पाहिले जाते. विज्ञान, भूगोल हे विषय शिकवतानासुद्धा शिकवणाऱ्यांचा कल संकल्पना स्पष्ट करून देण्याकडे फार कमी असतो. मुळात तीस मिनिटांच्या तासात त्यासाठी वेळ पुरतच नाही. प्रयोगशाळा, तक्ते यांचा वापर फारच कमी होतो. मूळ संकल्पनेचे आकलन, विचार करण्याची क्षमता, यांस गुण मिळायला हवेत. काही शाळांतून तर, वर्गात लिहून दिलेले उत्तरच एकाही शब्दात बदल न करता परीक्षेत जसेच्या तसे लिहिण्याचे बंधन असते. आपण शाळा पाठांतराचा सराव करण्यासाठी तर उघडल्या नाहीत ना? असे वाटून जाते. त्या पाश्र्वभूमीवर हा लेख अधिकच महत्त्वाचा वाटला.

– हेमंत श्रीपाद पराडकर

प्रत्ययकारी लिखाण

रजनीताईंचे ‘सर्वासाठी शिक्षण’ हे सदर मी नियमित वाचतो. त्यातील त्यांचे अनुभव इतके प्रत्ययकारी व वास्तव असतात की त्याचा प्रत्यय अगदी आपल्याच घरातील पाल्याकडे बघतानाही येतो. वाचन व त्यानंतर चौफेर वाचन हा ज्ञानरचनेचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. तो मजबूत असेल तर मग लेखन, वाचलेल्या गोष्टींची फेरमांडणी, स्वत:चे लेखनप्रयोग, आदी प्रयत्न विद्यार्थी करतो. पहिली ते पाचवीपर्यंत वाचन समस्या खरोखर गंभीर आहे. याचं मुख्य कारण शिक्षण व्यवस्थेत सापडते. शिक्षकांचा दिनक्रम, रोजची कर्तव्यं यात शासन, प्रशासकीय हस्तक्षेप दिसतो. शिक्षक रोजच्या अहवालांनी कमालीचा वेढलेला आहे. कोणी प्रयोगशील वा होतकरू शिक्षक वाचन सराव किंवा आवड निर्माण करण्यासाठी काहीएक प्रयत्न करत असतील तर प्रोत्साहन, मदत सोडाच तर त्यात अनेक अडथळे निर्माण केले जातात. म्हणूनच अशासारखे सदर महत्त्वाचे आहे, त्याने फरक पडावा, ही इच्छा.

– प्रा. अभिजित पं. महाले, सिंधुदुर्ग