डॉ. शुभांगी पारकर
आपल्या देशात २०२० मध्ये १८ वर्षांखालच्या ११,३९६ मुलामुलींनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं. केरळमध्ये मुलांच्या आत्महत्यांसंबंधी झालेल्या एका संशोधनात असं दिसून आलं, की २३ टक्के मुलांनी त्यांच्या घरीच आत्महत्या केली होती. हे आकडे पालकांची चिंता वाढवणारे आहेत. म्हणूनच मुलांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याकडे बारकाईनं लक्ष ठेवणं आज महत्त्वाचं ठरू लागलं आहे. काय करायला हवं मुलांची भावनिक प्रगल्भता वाढवण्यासाठी, या प्रश्नाचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..
आत्महत्या ही तरुण आणि प्रौढ माणसंच करतात, असा समज आहे. सहा वर्षांखालची मुलं तर आत्महत्येचा विचारसुद्धा करू शकत नाहीत, असा गैरसमज पाश्चात्त्य संस्कृतीत होता. अगदी आशियाई देशातही मुलांच्या मनात असा विचार येणारच नाही, कारण मृत्यू वगैरे कल्पना त्यांच्या मनात येत नाहीत, असा लोकांचा विश्वास आहे. यामुळे मुलांच्या आत्महत्यांकडे सर्व जगभर तसं दुर्लक्षच झालं होतं, मात्र आज मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण संपूर्ण जगात पूर्वीच्या तुलनेत वाढताना दिसत आहे.
अमेरिकेत ५ ते ११ वर्षांच्या मुलांमध्ये आत्महत्येनं होणारे मृत्यू हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतात २०२० मध्ये प्रत्येक दिवशी ३१ लहान मुलं आणि शालेय विद्यार्थी आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडत होते, अशी सरकारची अधिकृत माहिती आहे. १८ वर्षांच्या खालच्या मुलांमध्ये कौटुंबिक समस्या, आजार, प्रेमप्रकरणं ही प्रमुख कारणं होती. काही मुलांच्या आत्महत्येमागे अमली पदार्थाचं सेवन, बेरोजगारी, आर्थिक समस्या, वैचारिक भेद ही सर्वसामान्य कारणंही होती. अर्थात २०२० हे करोनाकाळाचं संकटमय वर्ष होतं. लहान मुलांच्या मनातले आत्महत्येचे विचार त्यांच्या मानसिक आणि सामाजिक समस्यांचे गंभीर संकेत देतात. नैराश्यग्रस्त मुलं आत्महत्येचा विचार करतात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही; पण नैराश्य आणि आत्महत्या हे नेहमी एकत्रच असतात असं गृहीत धरणं थोडंसं चुकीचं ठरेल. आत्महत्येचे विचार असलेली सगळी मुलं नैराश्यात असतात असं नाही. बुलेमिया ऑटिझम (अति प्रमाणात अन्नसेवन करून वजन वाढण्याच्या भीतीनं ते उलटीवाटे बाहेर टाकण्यासारखे प्रकार, स्वमग्नतेशी जोडलेले), बौद्धिक अपंगत्व, शिक्षणाची अक्षमता असणाऱ्या मुलांच्या इतर मानसिक समस्यांचाही विचार गांभीर्यानं करायला पाहिजे. अनपेक्षित अपयश हे मुलांच्या आत्महत्येचं महत्त्वाचं कारण आहे. घरात आईवडिलांमधला तणाव, क्लेशदायक भांडणं वा घरगुती हिंसा हेसुद्धा आत्महत्येला प्रवृत्त करणारे जोखमीचे घटक आमच्याकडे उपचारासाठी येत असणाऱ्या मुलांमध्ये दिसतात. माझ्या व्यवसायात मीही काही लहान मुलांची आत्महत्या प्रकरणे हाताळली. सुनील- वय साडेचार ते पाच वर्ष. त्यानं आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केल्यामुळे त्याला त्याची आई माझ्याकडे घेऊन आली होती. तो तीन भावंडांमधला सर्वात धाकटा मुलगा. वडील दारूच्या व्यसनात बुडालेले. घरात मोठी आर्थिक भ्रांती. तीनही भावंडांचं पालनपोषण आई घरकामं करून कसंबसं करत होती. अशा विस्कटलेल्या आणि भावनिक घुसमट होत असलेल्या घरात ही मुलं भीत भीत जीवन कंठत होती. लहानगा सुनील त्याच्या आईला प्रिय होता आणि तोही आईच्या अवतीभोवती असायचा. आईचे हाल त्याला सहन व्हायचे नाहीत. तिचं रडं त्याला बघवायचं नाही. तोही तिच्याबरोबर रडायचा, तिचे डोळे पुसायचा. अलीकडे त्याची आई ‘मला आता काही जगायचं नाही. तुम्ही एकमेकांना सांभाळा,’ असं मुलांना सांगायची. आपल्या बहिणीबरोबर आई अशी निर्वाणीची भाषा करताना त्यानं ऐकलं होतं. एकदा वडिलांचं आणि आईचं खूप कडाक्याचं भांडण झालं. आई ओक्साबोक्शी रडली. त्या दिवशी सुनील घाबरून आईला सोडून शाळेत गेलाच नाही. नंतर आई तिच्या घरकामाला निघून गेली. भावंडं शाळेत गेली तेव्हा त्यानं आपल्या बहिणीच्या औषधाच्या गोळय़ा शोधून खाल्ल्या. आई जेव्हा घरी आली तेव्हा तो पोट दुखत आहे म्हणून उलटय़ा करू लागला. त्याला रुग्णालयात नेल्यावर त्यानं गोळय़ा खाल्ल्याचं कळलं. त्याला नैराश्याचा आजार झाला होता म्हणून त्याच्यावर उपचार केले, कौटुंबिक समुपदेशनही केलं; पण त्याच्या आईवडिलांना त्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याला नैराश्य आलंय हे काही केल्या पटत नव्हतं. एवढया लहान मुलाला हे सुचलंच कसं, असा त्यांचा उलट प्रश्न होता.
अनेक लोक ही मानसिक स्थिती गंभीर असू शकते असं मानत नाहीत. त्यांना तो पोरकटपणा वाटतो. प्रौढांच्या तुलनेत आत्महत्येचं वर्तन असलेल्या मुलांमध्ये कौटुंबिक कलह, शाळेशी निगडीत त्रास किंवा इतर मुलांनी केलेली गुंडगिरी (Bullying) अशा परिस्थितीजन्य घटकांचा अधिक हस्तक्षेप असतो. शाळेत, घरात किंवा शेजारीपाजारी मुलांचा मानसिक आणि शारीरिक छळ होत नाही ना याचं निरीक्षण पालकांनी गंभीरपणे करायला पाहिजे. बऱ्याच वेळा मुलं अशा गोष्टी बोलून दाखवत नाहीत. काही वेळा गुंडगिरीमुळे छळ होत असलेली मुलं त्या मुलांच्या दहशतीमुळे चकार शब्द काढत नाहीत.
कष्टाचं काम करत आपल्या आठ आणि दहा वर्षांच्या मुलांबरोबर राहाणाऱ्या सुमतीला आपल्या दोन्ही मुलांचा लैंगिक छळ होतोय हे कळलंच नव्हतं. मुलं अभ्यासात मागे पडत असल्यानं ती त्यांना खूप रागवत असे. मोठय़ा मुलानं या सगळय़ा जाचाला कंटाळून आत्महत्या केली, तेव्हा लहान मुलानं ‘मला इथे राहायचं नाही,’ असं म्हणत खरी गोष्ट काय आहे ते सांगितलं. अलीकडच्या काळात मुलांचं रॅगिंग, लैंगिक छळ आणि गुंडगिरी यावर पालकांनी चाणाक्षपणे नजर ठेवली पाहिजे. एका निष्कर्षांनुसार १२ ते १४ वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी लैंगिक अत्याचार हा त्यांना आत्महत्येकडे ढकलणारा एक प्रमुख घटक आहे. शाळेत अभ्यास नीट झाला नाही, परीक्षेत नापास झाल्यानं १४ वर्षांखालची बरीच मुलं आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्या वेळी परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे या मुलांना कळत नाही. त्यांना समवयस्क आणि पालकांचा दबाव वाटतो. शैक्षणिक अपयश आणि आजूबाजूच्या स्पर्धात्मक वातावरणामुळे ती चिंतित आणि तणावग्रस्त असतात. त्या कोवळय़ा वयात त्यांना असं वाटतं, की त्यांचं जीवन वेदना आणि दु:खानं भरलेलं आहे. अनेक मुलांना त्यांच्या आक्रस्ताळी पालकांशी बोलण्याची इच्छाही नसते. एक मोठी भावनिक दरी त्यांच्यात असते. शिवाय या मुलांना वाटतं, की ते त्यांच्या भावना पालकांकडे व्यक्त करण्यासाठी सक्षम नाहीत. पालक काय म्हणतील, या सर्व गोष्टींबद्दल त्यांची प्रतिक्रिया कशी असणार आहे, याबद्दल मुलं धास्तावलेली असतात. सद्य:स्थितीत हेही खरं आहे, की बहुतेक पालक शैक्षणिक अपयशासाठी मुलांना दोष देतात. आज शैक्षणिक खर्च वारेमाप वाढला आहे. संसार चालवत मुलांचं शिक्षण पूर्ण करायच्या विवंचनेनं अनेक पालक धास्तावलेले असतात. प्रौढांच्या हातून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जाताना अनेक मुलं निराशेच्या किंवा क्रोधाच्या भरात आपलं आयुष्य पुढे चालू ठेवू इच्छित नाहीत. त्यांच्या अप्रगल्भ, अननुभवी मनाला ताप होतो. शिवाय सर्वसामान्य मुलं हल्ली पालकांच्या अतिसुरक्षित देखरेखीखाली वाढत असतात. भावनिक पातळीवर अशा कठीण परिस्थितीत ती खूप नाजूक आणि कमकुवत ठरतात. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २१ टक्के वाढ होण्यामागे हे महत्त्वाचं कारण आहे. करोनाकाळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांत झालेली वाढ बघितली, तर या काळात अचानक ऑनलाइन शिक्षणपद्धती राबवली गेली हेही लक्षात घ्यायला हवं. ज्या देशात फक्त ८ ते ९ टक्के मुलांना इंटरनेट उपलब्ध होणं शक्य आहे, अशा ठिकाणी शिक्षणासाठी अनेक मुलांना प्रवेश बंदच झाला होता. शिक्षकांनी कष्ट करून या परिस्थितीवर मात करायचा प्रयत्न केला, तरी अनेक मुलं या सोयीपासून दुरावली गेली आणि दुखावली गेली. दुसरी गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आजच्या मुलांचं मोबाइल वेड. एका आईनं आपली मुलगी अभ्यास न करता मोबाइलवर वेळ वाया घालवते म्हणून मोबाइल काढून घेतला आणि मुलीनं रागानं आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केला. दुसऱ्या एका प्रसंगात बाबांनी सांगितलेल्या दिवशी मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी मुलानं गळफास लावून घेतला. अशा वेळेस पालकांना कळत नाही, की आपलं काय चुकलं? माझ्या मुलानं असं का केलं? माझ्या मुलासाठी मी किती कष्ट घेतले. बरेच पालक स्वत:लाच दोष देतात. दहा-बारा वर्षांची ही सगळी मुलं. त्यांच्यामध्ये सहनशीलतेचा अभाव दिसून येतो. त्यांची प्रतिक्रिया उथळ असते. आज जगात ज्या वेगानं तांत्रिक बाबी विकसित होत आहेत, तिथे या मुलांच्या भावनिक प्रगल्भतेचा मात्र ऱ्हास होताना दिसत आहे.आत्महत्या एखाद्या प्रसंगाशी जितकी निगडित असते तितकीच ती मुलांच्या व्यक्तिमत्त्वातली परिपक्वता, शिस्तबद्धता आणि सहिष्णुता या स्वभाववैशिष्टय़ांवरही अवलंबून असते.
काही मुलांमध्ये एखादा महत्त्वाचा मानसिक आजार दिसून येतो. पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. काही पालक मुलांवर शैक्षणिक तयारीसाठी प्रचंड दबाव अणतात. एकंदरीत मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्याचा विचार होताना दिसत नाही. आनुवंशिकदृष्टया कुटुंबात मानसिक आजार आणि आत्महत्या यांचे प्रसंग घडले असल्यास मुलांची सुरुवातीपासून विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांचं भावनिक संवर्धन कसं करावं, कठीण परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी त्यांनी काय तयारी करावी, याबद्दल शाळांमधून समुपदेशकांनी मार्गदर्शन करायला हवं. मुळात मुलं भावनिक समस्या त्यांच्या भाषेत व्यक्त करण्यास असमर्थ असतात. पालकांनी अशा स्थितीत स्वत:च्या अंत:प्रेरणेवर विश्वास ठेवावा. मुलांना कळू द्या, की तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत आहात. त्यांना कशी मदत करावी या विचारात तुम्ही आहात. त्यांना दाखवा, की ते त्या कठीण क्षणांत एकटे नाहीत. बऱ्याच वेळा मायबाप म्हणून आपल्या मुलांमधले सामान्य चढउतार आणि आत्महत्येच्या दिशेनं होणारे बदल ओळखणं कठीण असतं. तेव्हा त्यांच्यातल्या बदलांचं निरीक्षण करणं आवश्यक ठरतं. हे बदल सामान्यत: लक्षात येण्यासारखे स्पष्ट असतात. आत्महत्येच्या विचारांमध्ये त्यांचं स्वारस्य, टेलिव्हिजनवर ते पाहात असणारे कार्यक्रम, संगणकावर भेट देत असलेल्या वेबसाइटस्, विशिष्ट कपडे, गृहपाठात ते काय लिहीत असतात, त्यांच्या दिनक्रमातला खास बदल, निरोपाची भाषा, त्यांच्यात आलेली संवेदनशीलता, अचानक शांत होणं किंवा उगाच चिडचिड करणं, अशा अनेक गोष्टींतून त्यांची आत्महत्येसंबंधीची लक्षणं दिसत असतात.
सामाजिक जागरूकतेच्या अभावामुळे आत्महत्येची चर्चा करणं समाजात निषिद्ध मानलं जातं. आत्महत्यांविषयी आपण इतक्या लहान मुलांबरोबर बोलावं की नाही? त्याबद्दल बोलल्यानं लहान मुलं त्याविषयी मुद्दाम विचार करतात, असा एक सामाजिक गैरसमज आहे. सत्य असं आहे, की त्याबद्दल न बोलल्यानं त्यांच्या मनातल्या या विचारांचा थांगपत्ता लागणार नाही. म्हणून मुलांशी याबद्दल कौशल्यानं संवाद साधला पाहिजे.
केरळमधल्या एका संशोधनात असं दिसून आलं आहे, की आत्महत्याग्रस्तांतील २३ टक्के मुलांनी त्यांच्या घरीच आत्महत्या केली आहे. यासाठी त्रस्त मुलांना घरी एकटं सोडू नये. आत्महत्या टाळता येण्याजोग्या आहेत. तरीही सत्य हे आहे, की ज्या मुलांनी पूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, ते भविष्यातही तसं करायचा धोका अधिक असतो. म्हणूनच मुलांच्या आत्महत्या गंभीरपणे घ्यायला हव्यात. मानसिक समुपदेशक आणि मनोचिकित्सकांची व्यावसायिक मदत घ्यायलाच हवी.
मुलांचं मानसिक आरोग्य लहानपणापासूनच जोपासायला हवं. त्यांच्यावर येणाऱ्या तणावावर त्यांनी मात कशी करावी हे शिकवणं आवश्यक आहे. त्यांच्या भवितव्याला दर्जेदार मानसिक आरोग्याशिवाय पर्याय नाही.
shubhangi@gmail.com