पणती तेवत ठेवा

आज समाजात अशी असंख्य मुलं आहेत ज्यांना कुटुंबं, स्वत:चं घर नाही. नातेसंबंधांमधल्या तणावाचे पडसाद त्यांच्या भावविश्वावर होऊन ही मुलं उद्ध्वस्त झालेली आहेत.

आज समाजात अशी असंख्य मुलं आहेत ज्यांना कुटुंबं, स्वत:चं घर नाही. नातेसंबंधांमधल्या तणावाचे पडसाद त्यांच्या भावविश्वावर होऊन ही मुलं उद्ध्वस्त झालेली आहेत. आपण समाज म्हणून अशा मुलांच्या पाठीशी उभं राहायला हवं. दिवाळी संपली असली तरी प्रेमाची, सहसंवेदनाची पणती अशीच तेवत राहू देत.
दिवाळीचा आनंद अजून आसमंतात भरून राहिला आहे. कोणी पणत्या तर कोणी दिव्यांच्या माळा लावून अंधाराला पळवून लावलं. पण मनात साठून राहिलेल्या अंधाराचं काय? मला बोलायचंय ते आपल्या छोटय़ा दोस्तांबद्दल. वरून अल्लड, अवखळ, खिलाडू वाटणारी मुलं अनेकदा आत्ममग्न तर कधी चिडचिडे, भांडखोर वाटतात. आपले हे छोटे दोस्त असे का वागत असतात?
आपण क्वचितच याचा विचार करतो. नीट विचार केला तर जाणवेल की यांच्याही मनात खदखदत असतो राग, असंतोष. दाटलेला असतो अंधार. त्याला दूर करणं अगदी सोपं असतं. त्यांना हवं असतं प्रेमानं विचारपूस करणारं, पाठीवरून हात फिरवणारं, दोन गोड शब्द बोलणारं कोणी तरी. त्यांचा अहं न दुखवता मदतीचा हात देणारं. आपण हे काम करू शकता. आपल्या आणि छोटय़ांच्या हृदयातील पणती या मार्गाने तेवत ठेवू शकता, विनातेल-वातीनं!
हे आज सुचायला कारण ठरली एक बातमी ‘बायको परपुरुषाबरोबर पळून गेल्यानं नवऱ्याची आत्महत्या’. या कुटुंबात दोन छोटी मुलं आहेत. बातमी वाचून संपली आणि कधी न भेटलेल्या त्या छोटय़ांची आठवण अस्वस्थ करू लागली. या मुलांना आता कोण सावरेल?
 आज स्वातंत्र्याच्या कल्पना, हक्कांची जाणीव जागृती यामुळे वा अन्य काही कारण म्हणा, विभक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. घरातले कलह वाढलेत. आणि त्याचबरोबर लहानग्यांची घुसमट. त्यांना बोलतं करणं मात्र कठीण.. मला जमलं. कारण मी त्यांच्या संपर्कात असते म्हणून. पण या नाजूक विषयावर मात्र मी प्रथमच बोलत होते. घटस्फोटित मातापित्यांच्या मुलांचा प्रश्न होता, ‘असंच वागायचं होतं तर आम्हाला जन्मालाच का घातलं?’ ती कोणीच आपल्या आई किंवा बाबांना माफ करण्याच्या मूडमध्ये नाहीत. ‘आम्ही आता आहे ते स्वीकारायला शिकलोय. आता त्यांनी परत येऊ नये.’ ‘यानं मुलांचं भावविश्व उद्ध्वस्त होतं आणि भविष्य अंधकारमय होतं हे कळत नाही का?’  हे या मुलांचेच उद्गार आहेत. खरं नाही वाटत? मग भेटा तृप्ती, मेधा, धीरज, अक्षय, शिल्पा यांना.
तृप्ती हैराण आहे. मधूनच ती बरी असते. मधे आपल्याच तंद्रीत वहीत चित्र काढत राहते. मुलींना आणि मुलांनाही मारते. त्यांचे डबे चोरून खाते. तिचं डोकं फिरलं की सारे तिच्याजवळ जायला घाबरतात. तिच्या वडिलांची आठवण आली की तिचं बिनसतं. तृप्ती- एकूण चार बहिणी. पाचव्या वेळी आई बाळंतपणासाठी हॉस्पिटलमध्ये गेली ती परत आलीच नाही. बाबांनी आपल्या मुलींची नातलगांत वाटणी केली आणि स्वत: बोहल्यावर चढले. तृप्ती आत्याकडे रहाते. आत्यालाही हैराण करते. बाबांनी नवी आई आणली याचा तिला राग कमी, पण भावंडांची ही ताटातूट ती नाही सहन करू शकत.
दुसरी मेधा. तिचा राग तिच्या बाबांवर आहे कारण त्यांच्यामुळे तिच्या बहिणीला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. आईला आणि म्हाताऱ्या आजीलाही लोकांकडे कामाला जावं लागलं. इतर भावंडांनाही अकाली प्रौढत्व आलं. तिच्या बाबांचा रिक्षाचा धंदा. एकत्र कुटुंब. बाबा दारूच्या आहारी कधी आणि कसे गेले कोणाला कळलंच नाही. घरात पैसा येणं थांबलं. भांडणं सुरू झाली. रागाच्या भारात एकदा बाबा जे घराबाहेर पडले ते परत आलेच नाहीत. रिक्षाही गेल्या. मेधा यंदा दहावीला आहे. हुशार आहे. पण तिला शंका, वाटते की तिच्या मनासारखं शिक्षण आणि व्यवसाय तिला करता येईल?
धीरजला तर बाबांच्या आठवणीही नकोशा वाटतात. तो रोज देवाला प्रार्थना करतो, ‘माझ्याच काय कोणाच्याच आयुष्यात असे बाबा यायला नकोत आणि त्याच्यासारखी कोणाच्याच आयुष्याची फरपट व्हायला नको.’ त्याला आणि त्याच्या भावंडांना शाळेत यायला कधी उशीर होतो तर कधी त्यांचा गृहपाठ झालेला नसतो. मग ओरडा बसतो. पण खरं कारण कोणाला कसं सांगणार? त्याचं वय १४.  इयत्ता सातवी. बाकीची छोटी भावंडं. सारी मिळून स्वयंपाक धुणी-भांडी, पाणी भरणं सारी कामं उरकून येतात. त्यांची आई दोन शिफ्ट करते. तिची भेट होते केवळ सुट्टीच्या दिवशी. मधल्या काही वर्षांनंतर हल्लीच ते एकत्र राहतात. यापूर्वी ही सारी भावंडं वाढत होती वेगवेगळ्या अनाथाश्रमांत. ही वेळ त्यांच्यावर आली होती त्यांच्या बाबांमुळे. त्यांची आई जळगावजवळच्या एका खेडय़ातली. ठेंगणी, ठुसकी, ठसठशीत. वय जेमतेम १५-१६. एका तिच्यापेक्षा वयानं खूप मोठय़ा माणसानं तिला पटवलं, पळवलं, शहरात आणलं. त्यांनी लग्न केलं की नाही ठाऊक नाही. पण ही चार पोरं अगदी पाठोपाठची पदरात टाकून धीरजचे बाबा पळून गेले. त्यांनी दुसरा घरोबा केला. आईवर आकाश कोसळलं. एका सामाजिक संस्थेनं मदत केली. आईला नर्सिगचं शिक्षण दिलं. मुलांना वेगवेगळ्या अनाथाश्रमांत ठेवावं लागलं. आज धीरजचं वय चौदा पण त्याला धड लिहिता वाचता येत नाही. शाळा अर्धवट सोडून चार पैसे कमवण्याचा विचार याच्या डोक्यात घोळतो. ही सारी मंडळी थोडी गरीब घरातली म्हणून इतरत्र सर्व आलबेल आहे असं नाही.
अक्षय पाटीलचे बाबा खरेखुरे पाटील, पण बडा घर पोकळ वासा. त्याची आई मुंबईची. कॉलेजात होती. घरची गरिबी. पण श्रीमंत नवरा मिळाला, पण पुढे लग्नानंतर वर्षांतच तो असाध्य रोगानं वारला. अक्षयच्या आईला घराबाहेर काढलं गेलं. आईचे आईबाबा त्या धक्क्यानं वारले. मधल्या काही वर्षांत एका भल्या कुटुंबानं दोघांना आसरा दिला. शिकलेली असून अक्षयच्या आईनं केवळ अक्षयसाठी ही नोकरी स्वीकारली. अक्षय ६ वीत आला.
ते कुटुंब कायमचं परदेशात गेलं आणि अक्षय आणि त्याच्या आईचं पुन्हा दुर्दैव ओढवलं. अक्षयला एका लांबच्या मावशीच्या घरी ठेवून त्याची आई जगण्याची धडपड करतेय. मावशी ना त्याला धड जेवायला देत ना प्रेमानं वागवत. तो वर्गातही सारखा रडत असतो. अभ्यासात त्याचं लक्ष लागत नाही. सारे सांगतात तो हल्ली खोटं बोलतो. पण का हे कोणाला समजून घ्यावंसं वाटत नाही. त्याची आठवण आली की कासावीस व्हायला होतं. घर-आई-बाबांच्या छत्राविना कुठे असतील हे मायलेक?
शिल्पाचे बाबा स्मार्ट, हुशार, व्यवसायानं चार्टर्ड अकौंटंट. ती बाबांची कार्बन कॉपी. लहानपणी याचा तिला अभिमान वाटायचा. आता राग येतो. घरी आई, आजी-आजोबा तिला बजावतात ‘दिसतेस बाबांसारखी, पण त्यांच्यासारखी वागू नकोस.’ शिल्पाची आईपण नोकरी करते, पण साधी-भोळी, दिसायला अगदी सामान्य. आईवडिलांची एकुलती एक. स्वत:च्या मालकीचं घर. गरीब घरातून खेडय़ातून आलेल्या बाबांनी ओळखीनं घरात प्रवेश मिळवला. लग्न केलं. काही वर्षांनी ते परदेशात गेले. सुरुवातीला बाबा सुट्टीवर येत. नंतर मात्र व्हिसाचं निमित्त सांगत त्यांचं येणं कमी होत गेलं. नंतर कानावर आलं त्यांनी तिकडे लग्न केलंय. त्यांना मुलंही झाली आहेत.
 बाबांवर विलक्षण प्रेम करणाऱ्या शिल्पाला हे सारं सुरुवातीला कठीण गेलं. ती आपल्या कोषात शिरली. तिनं सर्वाशी बोलणं सोडलं. तिला वाटायचं सारे आपल्या वडिलांवरून आपल्याला चिडवत आहेत. आता ती सावरली आहे. पण तिनं निश्चय केलाय कॉमर्स डिग्रीवाल्यांपासून दूर राहायचं. लग्नाला उशीर झाला तरी चालेल पण मी फसवणूक होऊ देणार नाही.
अर्पिताचे बाबा बिल्डिंग कॉन्ट्रक्टर. नक्की काय झालं तिला स्मरत नाही पण ती आई-बाबांबरोबर आजीकडे आली. मग प्रथम आई घरातून निघून गेली. त्यानंतर बाबा. आई तिला परत भेटायला कधीच आली नाही. बाबा तिला भेटायला आलेले आजीला आवडत नाही. बाबा तिला शाळेच्या वाटेवर गाठतात. भेटतात. हॉटेलमध्ये नेतात. भेटवस्तू देतात. ती गोंधळते. शाळेला बुट्टी मारते. आजी आणि शाळेत काय थापा माराव्यात तिला समजत नाही. घरी आजी म्हणते ‘पोरगी वाया जाणार.’ बाई शाळेत समजावतात, ‘अगं, जरा नीट वाग. नाही तर तुझं काही खरं नाही.’ त्यांना कसं आणि काय सांगावं तिला कळत नाही.
अशी एक नाही अनेक मुलं तुमच्या अवतीभवती असतील. ते आपले प्रश्न आपण होऊन तुमच्या समोर मांडणार नाहीत. त्यांच्या बोलण्यातून तुम्ही जाणून घ्या. त्यांच्या आई-बाबांसारखे तुमच्या आसपास कोणी असतील तर केवळ गॉसिपमध्ये रमू नका. हा कुटुंबातील कलह तुम्हाला कमी करता आला तर उत्तमच, किमान अशा लहान मुलांचं, ज्यांचा वर्तमान आणि भविष्यकाळही अंधारला आहे त्या अंधाराला दूर करण्याचा प्रयत्न करा.
त्यासाठी कष्ट नकोत, खर्च नको, हवी फक्त अंतरीची तळमळ. त्यासाठी प्रथम तुमच्या मनात पणती तेवत राहायला हवी. इतर मग त्यांच्या मनातील पणत्या आपोआप पेटवून घेतील. आसपास आणि अंतर्मनातला अंधारही मग दूर पळून जाईल.    
chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Childrens behave roude or weired

ताज्या बातम्या