सुखदा भट्टे-परळकर
पॅकबंद पदार्थ खरेदी करणं टाळता न येण्याच्या सध्याच्या काळात ग्राहकाला अन्नाच्या पौष्टिकतेविषयी अधिक जागरूक व्हायला लागणार आहे. त्यासाठी केवळ वेष्टनाची पुढची बाजू किंवा केवळ ‘एक्सपायरी डेट’ तपासून चालणार नाही. शोधक नजरेनं पदार्थातल्या घटकांचाही विचार करावा लागेल. आजच्या (२४ डिसेंबर) ‘राष्ट्रीय ग्राहक दिना’च्या निमित्तानं..
बाजारात सहजपणे उपलब्ध असलेले पॅकबंद खाद्यपदार्थ हे विविध दृष्टिकोनांतून सोईचे असतात. बिस्किटं, चिप्स, चिवडा, फळांच्या ज्यूसचे बॉक्स असं काही तरी घेऊन घराबाहेर पडणं बहुसंख्यांना सोईचं ठरतं. मात्र ‘पॅकेज्ड फूड’बद्दल मनात एक शंका उरतेच- ती म्हणजे चवदार असलं, तरी आरोग्याला चांगलं आहे ?
या खाद्यपदार्थाचं उत्पादन करणाऱ्या कंपन्या त्यांचा पदार्थ कसा ‘हेल्थी’ आहे, हे जाहिरातींमधून बिंबवत असतात. मात्र या ‘हेल्थी’ पदार्थाचं वचन देणारे हे शब्द फसवेही असू शकतात. अशा वेळी ग्राहकाला चोखंदळपणे निवड करावी लागणार आहे. त्यामुळे त्या त्या पाकिटावर त्या त्या पदार्थासाठी वापरलेले घटक पदार्थ (इन्ग्रिडिएंट्स) काळजीपूर्वक पाहावे लागतील. वेष्टनीकृत खाद्यपदार्थावर त्यांची ‘एक्सपायरी डेट’ किंवा ‘यूझ बाय’ वा ‘बेस्ट बीफोर’ ही तारीख लिहिलेली असते, ती बहुतेकजण खरेदीपूर्वी पाहू लागले आहेत. मात्र पदार्थातल्या घटकांची यादी आणि तो विशिष्ट पदार्थ बनवण्यात काय काय केलं जातं याची माहिती ग्राहकानं जाणून घेणंही आवश्यक असतं. या घटक पदार्थाचा क्रम सामान्यत: उतरत्या क्रमानं दिलेला असतो- म्हणजे पदार्थात मोठय़ा प्रमाणावर वापरलेला किंवा पदार्थ बनवण्यात वरचढ असलेला घटक प्रथम लिहिला जातो. तसंच या यादीत महत्त्वाच्या घटक पदार्थाचं प्रमाणही टक्क्यांमध्ये दिलेलं असतं. पदार्थात ‘एफएसएसएआय’नं मंजूर केलेले कोणते ‘अॅडिटिव्हज्’ वापरलेले आहेत- उदा. खाद्यरंग, स्वाद (फ्लेव्हर्स), पदार्थ टिकवण्यासाठीचे रासायनिक पदार्थ वगैरे, हेही घटक पदार्थाच्या सूचीत मिळतात. यावर नजर टाकणं आवश्यक असतं, कारण गर्भवतींना आणि लहान मुलांना यातले काही पदार्थ वज्र्य असू शकतात किंवा उच्च रक्तदाब वा मधुमेह असलेल्या व्यक्तीला सोडियम अधिक प्रमाणात वापरलेले पदार्थ घेताना सावधगिरी बाळगावी लागते.
घटकांच्या यादीत पर्यायी घटक- म्हणजे ‘अल्टरनेटिव्ह इन्ग्रिडिएंट्स’ असतातच. यात साखर, गूळ, मध, कॉर्न सिरप, हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप, फ्रुक्टोज, खजूर अशा गोडी आणणाऱ्या घटकांचा प्रामुख्यानं समावेश होतो. त्यामुळे ते वापरलेले खाद्यपदार्थ ‘हेल्थी’ किंवा पौष्टिक असतीलच असं मानण्याचं कारण नाही. उदा. साखरेत १०० टक्के सुक्रोज असते, तर गुळात साधारणत: ८५ टक्के सुक्रोज असते. त्यामुळे या दोन्हीचा शरीरावर, रक्तातली साखर वाढवण्यावर जवळपास समानच प्रभाव पडतो. काही ‘हेल्थी’ छापाच्या खाद्यपदार्थात कृत्रिम गोडवा- म्हणजे ‘आर्टिफिशयल स्वीटनर’ वापरलेलं असतं. ते हानीकारक असू शकतं. शिवाय साखर न वापरता कृत्रिम गोडवा वापरलेला असला, तरी त्या पदार्थातलं चरबीचं प्रमाण, सोडियमचं प्रमाण हे काही बदललेलं नसतं. त्यामुळे पॅकेज्ड अन्नपदार्थ आरोग्यदायी असल्याचा प्रचार जरी केला जात असला, तरी ते अति खाऊ नयेत.
‘हेल्थी’ असल्याचा दावा करणारे खाद्यपदार्थ खरोखर पौष्टिक आहेत का, याची खात्री करण्यासाठी पाकिटावर दिलेली घटक पदार्थाची यादीच कामी येते. उदा. पीनट बटर हे ‘प्रोटीन रिच’ आणि ‘हेल्थी’ आहे असा प्रचार केला जातो. मात्र बाजारात मिळणाऱ्या बहुसंख्य पीनट बटर्समध्ये रीफाइंड तेल वापरलेलं असतं. तीच गोष्ट ‘चॉकलेट स्प्रेड्स’ची. मेयोनीज, विविध स्प्रेड्स आणि डिप्स यातही रीफाइंड तेल हा मोठा घटक असतो. तेलबियायुक्त स्प्रेड्समध्ये पीनट बटरसह कॅश्यू बटर, हेझलनट स्प्रेड असे विविध पदार्थ येतात. यात जाहिरातीत ज्यावर भर दिलेला असतो, ते ‘नट्स’ कमी आणि साखर, चरबीचं प्रमाण अधिक असू शकतं. अशा वेळी पदार्थाच्या बरणीवरची घटक यादी वाचायला हवी. उदा. जिथे पीनट बटरमध्ये शेंगदाणे १०० टक्के वापरलेले आहेत आणि यादीत रीफाइंड तेलाचा समावेश नाही, ते पीनट बटर तुलनेनं चांगलं म्हणता येईल. ‘हेल्थ फूड’च्या श्रेणीत ‘नॅचरल’, ‘फ्रेश’, ‘प्युअर’, ‘रिअल’, ‘ओरिजिनल’, ‘ट्रॅडिशनल’ ही शब्दावली दिसते. त्यांचा सारासार विचार करताना शोधक नजर, अन्न व आरोग्याबद्दल माहिती आणि तुलनात्मक दृष्टिकोन हवा.
सध्या ‘डेअरी फ्री’ दुधानं बाजारपेठ गजबजलेली आहे. म्हणजे ज्यात दूध वा दुग्धयुक्त पदार्थ वापरलेले नाहीत असे पदार्थ. उदा. सोया मिल्क, आल्मंड मिल्क, ओट्स मिल्क वगैरे. प्रथम एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की डेअरीमुक्त दुधाच्या तुलनेत डेअरीच्या दुधात कॅल्शियम, प्रथिनं आणि उष्मांक जास्त असतात. शिवाय डेअरीमुक्त दूध सामान्यांच्या खिशाला सहजासहजी परवडणारं नाही. ज्यांना ‘लॅक्टोज इन्टॉलरन्स’ आहे त्यांना मात्र डेअरीमुक्त दूध वापरावं लागतं. तिथे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी फोर्टिफाइड दूध निवडलं पाहिजे. खूपशा डेअरी-फ्री पदार्थामध्ये ‘हायड्रोजनेटेड फॅट’ वापरलेलं असतं. उदा. डेअरी फ्री कॉफी प्रीमिक्स. हायड्रोजनेटेड फॅटचा वापर केल्यामुळे संबंधित पदार्थ चवीला ‘क्रीमी’ लागतो, मात्र तो वारंवार किंवा जास्त प्रमाणात पोटात जाणं आरोग्याला चांगलं नाही. अशा वेळी वेष्टनावर ‘ट्रान्स फॅट’ आणि ‘कोलेस्टेरॉल’चं प्रमाण पाहता येईल.
अनेक अन्नपदार्थाची ‘हेल्थी व्हर्जन्स’ बाजारात विक्रीस आहेत. उदा. मिलेट्स वा ओट्सयुक्त पदार्थ. अशा पदार्थामध्येसुद्धा ओट्स, बाजरी, नाचणीचं प्रमाण किती टक्के हे पाहायला हवं. त्यातही सोडियम आणि ट्रान्स फॅट्सचं प्रमाण जास्त असू शकतं.
आणखी एक लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे पदार्थ पामतेलात बनवलेला आहे का? तुमच्या लक्षात येईल की, बाजारात मिळणारी बहुसंख्य बिस्किटं, इतर बेकरी पदार्थ, फरसाणातले पदार्थ वगैरेंत पामतेल हा घटक दिसतो. पामतेलयुक्त पदार्थात संपृक्त चरबी (सॅच्युरेटेड फॅट्स) आणि ट्रान्स फॅट जास्त असू शकतात आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतं. ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेला आहार ‘फॅटी लिव्हर’चा धोका वाढवू शकतो. अनेक पॅकेज्ड अन्नपदार्थामध्ये खूप मोठय़ा प्रमाणावर मीठ आणि साखर वापरलेली असते. ‘एफएसएसएआय’तर्फे (फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस ऑथॉरिटी ऑफ इंडिया) अशा पदार्थाचं ‘एचएफएसएस’ (हाय फॅट शुगर सॉल्ट) म्हणून वर्गीकरण केलं आहे. म्हणजे त्यांचं सेवन कमी प्रमाणात करायला हवं.
‘जागतिक आरोग्य संघटने’नं आपण सेवन करत असलेल्या असलेल्या एकूण दैनंदिन उष्मांकांपैकी फक्त पाच टक्के- म्हणजे १०० उष्मांक किंवा २५ ग्रॅमपर्यंत इतकीच साखर मर्यादित ठेवावी असं म्हटलं आहे. म्हणजे जर एखाद्या अन्नपदार्थात प्रत्येक ‘सर्व्हिंग’मध्ये १० ग्रॅमपेक्षा (किंवा ४० उष्मांक) जास्त साखर असल्याचं नमूद केलं असेल, तर तो पदार्थ फार खाऊन चालणार नाही. आपण पॅकबंद पदार्थ खरेदी करतो, तेव्हा त्यातलं प्रथिनं, साखर यांचं प्रमाण, वापरलेल्या चरबीचा प्रकार, सोडियमचं प्रमाण आणि प्रत्येक पॅकचे उष्मांक या गोष्टींचा विचार करता येईल. उदा. नाचणीचे चिप्स आपल्याला आरोग्यदायी वाटतात. मात्र पदार्थाच्या पॅकवर दिलेल्या घटकांच्या मोजमापांची माहिती सहसा १०० ग्रॅम पदार्थासाठीची असते. तुम्ही जर २०० ग्रॅमचं चिप्सचं अख्खं पाकीट संपवणार असाल, तर त्या माहितीतले आकडे- उदा. उष्मांक दुप्पट असतील, हे लक्षात घ्या.
घरी बनवलेल्या पौष्टिक अन्नाची सर कशालाच येणार नाही! परंतु टाळता येणारच नसेल तर पौष्टिक पॅकेज्ड अन्नपदार्थ निश्चित निवडता येतील. तोच यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचा धडा.
sukhada.bhatte@gmail.com
(लेखिका आहारतज्ज्ञ आहेत.)