शहर असो वा ग्रामीण भाग, स्त्रीची घोडदौड चहूबाजूने सुरू आहे. यातीलच एक क्षेत्र अर्थकारण. कुठलीच गोष्ट पैशांशिवाय शक्य नाही. पण तो आणायचा कुठून आणि वाढवायचा कसा? या प्रश्नावर एक उत्तर म्हणजे बँकांतील बचत आणि तिथून मिळणारं कर्ज. आज सहकारी बँका आणि विशेषत: महिला सहकारी बँकांच्या माध्यमातून स्त्री हे आर्थिक स्वातंत्र्य मिळवते आहे. याचीच पुढची पायरी म्हणजे या बँकांच्या अधिकारी पदावर असणाऱ्या स्त्रिया आणि त्यांचं कर्तृत्व. स्त्रियांनी स्त्रियांसाठी दिलेलं हे योगदान स्त्रीच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचं ठरावं. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने सहकारी बँकेच्या नऊ अधिकारी स्त्रियांच्या कार्याची ओळख.
 ‘विना सहकार नाही उद्धार’
या वचनाच्या भावनांचा आदर करून सहकार क्षेत्र महाराष्ट्रात सर्वतोपरी मार्गक्रमणा करीत आहे. आíथक ध्येयाप्रती काम करून समाजाचे रंगरूप बदलून टाकायचे या विचाराने प्रभावित होऊन स्वत:हून पुढे आलेल्या लोकांची एक स्वायत्त संस्था म्हणजे सहकारी संस्था. समाज उत्थापन करून व्यक्तीव्यक्तींची पतवृद्धी करायचा प्रयत्न सहकारी बँकांकडून केला जातो. या बँकांवर सहकार खाते, राज्य सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया यांचे वर्चस्व असते. त्यांनी आखून देलेल्या नियमांनुसार बँकिंग कार्य करायला सगळ्याच सहकारी बँका बांधील असतात. याच सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रियांमध्ये आर्थिक भान आणणाऱ्या, त्यांना बचतीसाठी आणि कर्जाच्या माध्यमातून उद्योगधंद्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या सहकारी बँका, महिला बँका वाढत आहेत. उद्योगाच्या क्षेत्रात स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग हे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यातलं महत्त्वाचं पाऊल ठरावं.
असा लाभ देणाऱ्या सहकारी बँकांच्या सध्याच्या अध्यक्षपदाची धुरा आज अनेकजणी यशस्वीपणे सांभाळत आहेत. त्या आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या सर्व महिला बँक कर्मचारी आपापले कसब पणाला लावून बँकेप्रती योगदान देताना दिसत आहेत. दिवसेंदिवस त्याचा लाभ घेणाऱ्यांची कक्षाही रुंदावत आहे. असाच लाभ मिळवून देणाऱ्या नऊ अधिकारी स्त्रियांच्या कार्याची ओळख आजच्या जागतिक महिला दिनानिमित्ताने.   
महिलांना  कर्ज देणे तसे अवघड जाते, कारण बहुसंख्य वेळा घरादारातील कुठलीच संपत्ती त्यांच्या नावावर नसते. अशा वेळी नवऱ्याला सहकर्जदार करून घ्यावेच लागते. चंद्रपूर येथील सन्मित्र महिला सहकारी बँकेच्या पदाधिकारी आणि सध्याच्या अध्यक्षा जया द्वादशीवार यांनी सांगितले, की ‘‘समाजातील अनेकांना आपल्या पत्नीचे नाव आपल्याबरोबर घर, दुकान, व्यवसाय यांमध्ये लिहून घ्या, म्हणजे आम्हाला कर्ज देणे सोपे जाईल, असे वारंवार सांगूनही एकही पुरुष असे करायला तयार झाला नाही. आहे ती संपत्ती माझीच, या स्वकेंद्रित पुरुषी वृत्तीनेही बँक अनेकींना कर्ज देऊ शकली नाही आणि फक्त महिलांनाच कर्ज द्यावयाचे असा रिझव्‍‌र्ह बँकेचा आदेश असल्याने बँकेचा कारभार सांभाळून विस्तार करणे जड गेले. मग युक्त्या-क्लुप्त्या लढवून महिलांची खाती वाढविण्यात आली.    
महानगरपालिकेत यंदा महापौरांसह ३३ महिला नगरसेविकांकडे सहकार्य मागितले. त्यांच्यासाठी राज्यशास्त्र अभ्यासवर्ग घेतला. त्या सगळ्यांनी बँकेला सहकार्य केले. विदर्भात दोन वर्षांपूर्वी दुष्काळ पडला तेव्हाची गोष्ट. सरकारी मदतीचे धनादेश आले होते, तेव्हा चेक घेऊन बँकेत बोलावले, शून्य शिलकीचे खाते काढून देऊन सगळ्यांना मदतीची पूर्ण रक्कम देऊ केली. शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांना आपल्या आईबाबांना बँकेत घेऊन या, तुमचे खाते काढून घ्या, असे सांगून मुलांची तसेच पालकांची अनेक खाती काढली. गृहपयोगी वस्तू खरेदीसाठी महिलांना विनातारण कर्ज वाटप केले. यामध्ये असलेली जोखीम जबाबदारी मोठी असली तरी महिला कर्जफेड करीत आहेत. विधवा महिलांच्या कर्ज खात्यावरील व्याज माफ करून एकरकमी पसे भरून कर्जखाती बंद केली. महिलांचा आधार असलेल्या या बँकेच्या अध्यक्षा जयाताई आणि उपाध्यक्ष डॉ. रजनी हजारे या दोघी आणि त्यांच्या पूर्ण महिला कर्मचारी या बँकेच्या चढत्या आलेखाच्या मानकरी आहेत. बँकेचे ब्रीदवाक्यच आहे. ‘श्रीर्मा देवीर्जुषताम’ – ‘तुमच्या माझ्या घरी लक्ष्मीदेवता निरंतर वास करो.’
सगळ्याच महिला बँका आपापल्या परीने स्त्रियांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयास करतात. अहमदनगर जिल्ह्य़ातील, अंबिका महिला सहकारी बँक तशीच प्रयत्नशील! सध्याच्या अध्यक्षा पुष्पा मरकड यांनी दुसऱ्यांदा हा पदभार उचलला आहे. एम.ए.एम.एड झालेल्या पुष्पाताई आधी एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. बँकेत आल्यावर मात्र संपूर्ण बँकिंग त्यांनी समजून घेतले. आज अंबिका बँक जिल्ह्य़ातील अग्रणी बँक म्हणून तिच्याकडे बघितले जात आहे. प्राध्यापिका असल्याचा फायदा घेत त्यांनी विविध महाविद्यालयात जाऊन मुलांशी संवाद साधून त्यांना बँकेकडे वळवले. तसेच जिल्हा उद्योग विनिमय आणि महिला बँक मिळून अनेक मेळावे घेतले, महिलांना प्रशिक्षण, कर्ज दिले. पर्यटनापासून विविध कारणासाठी कर्ज दिल्याने ग्राहक बँकेकडे वळले नाही तरच नवल!
कोणाच्या नेतृत्वाचा कसा प्रभाव पडेल हे सांगता येत नाही. तसंच झालं नांदेडच्या भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या बाबतीत. अतिशय बिकट परिस्थितीत २००७ साली संध्या कुलकर्णी यांनी बँकेच्या अध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतली, आणि बँकेचा कायापालट झाला. आल्या आल्या संध्याताईंनी बँकेला स्थर्य देऊ केले आणि नंतर विस्तार कार्यास प्रारंभ केला. जिद्द, खंबीर नेतृत्व, धडाडी या गुणांमुळे अल्पावधीत त्यांनी बँकेत अनेकविध प्रकल्प सुरू केले. बचत गटाच्या माध्यमातून अत्यंत दुर्दम्य अशा आदिवासी महिलांना अनेक समस्यांना तोंड देत सक्षम केले. त्यांच्यात मोठा बदल घडवून आणला. प्रतिवर्षी या आणि इतर बचत गटांची संख्या वाढत गेली. नाबार्डकडून बँकेला स्वयंसेवी संस्था म्हणून मान्यता मिळाली आणि त्याने अल्पदराने महिलांना कर्ज उपलब्ध होऊ लागले.
बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही म्हणतात आणि तेच भांडवल समजून समाजोपयोगी प्रकल्प राबविताना मोठय़ा प्रमाणावर महिलांना सहभागी करून घेण्यात आले. शाडूचे गणपती, कागदी आकाशकंदील, सौरचूल हे सर्व तयार करण्याचे प्रशिक्षण दिले गेले. त्यातून बरीच आवक झाली. घरोघरी सौरचुलीवर स्वयंपाक केला जात आहे. बँकेच्या १६ पकी संगणकीय तीन शाखा पूर्णत: सौरऊर्जेवर उत्तमरीत्या कार्यरत आहेत. नांदेड परिसरात पाण्याचे दुíभक्ष प्रचंड. त्यावर मात करण्यासाठी बँकेने ‘जलपुनर्भरण’ प्रकल्पासाठी कर्ज देऊ केले. वीज आणि पाणी दोन्हींची बचत करायचे हे बँकेचे प्रकल्प अनुकरणीय असेच आहेत. सहकाराचं तत्त्व अमलात यावं या दृष्टीने भाग्यलक्ष्मी बँकेने ‘बिझिनेस कॉरसपॉन्डंट’ नियुक्ती करून वित्तीय समावेशांतर्गत छोटय़ा छोटय़ा वाडय़ा, वस्त्यावरील लोकांना बँकेत सामावून घेतले. ही योजना राबविणारी मराठवाडय़ातील ही एकमेव अशी बँक आहे. बँकेतील ६० टक्केमहिला कर्मचारी आहेत. महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न संध्याताईंनी केले आणि सगळ्याजणी उत्साहाने कामाला लागल्या. अध्यक्षांच्या अथक प्रयत्नांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले. २००९ ते २०१३ कालावधीत अनेकविध संस्थांकडून ‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महिला बँक’ हा सन्मान बँकेला मिळाला. देशातील सर्वोत्कृष्ट महिला बँक अध्यक्षा हा २०१३ चा राष्ट्रीय पुरस्कार संध्या कुलकर्णी यांना प्राप्त झाला आहे. त्यांना ‘नांदेडची भाग्यलक्ष्मी’ या नावानेसुद्धा संबोधिले जाते. ‘अष्टतारका’, ‘गुरुरत्न पुरस्कार’ यासह अनेक पुरस्कारांनी संध्या कुलकर्णी यांना गौरवण्यात आले आहे.
अजूनही महिलांना म्हणावा तितका पाठिंबा घराघरांतून मिळत नाही. त्यांना दुय्यम दर्जाचीच वागणूक मिळते. या पाश्र्वभूमीवर महिला तग धरून नेटाने प्रत्येक क्षेत्रात धडाडीने कार्यरत आहेत. यश संपादन करीत आहेत. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. ‘यवतमाळ महिला सहकारी बँक’ ही अशीच एक महिला बँक. सध्याच्या त्याच्या अध्यक्षा आहेत, ललिता निवल. यवतमाळ जिल्ह्य़ात महिलांना कर्ज देण्यासाठी एकही बँक पुढे येत नव्हती, त्याला शह दिला तो या महिला बँकेने. महत्प्रयासाने महिलांची मानसिकता बदलून, त्यांना समजावून सांगून, कर्ज प्रकरणे केली गेली. महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली, आत्मभान जागवून सन्मानाने जगायचे असते हा संदेश दिला आणि चित्र बदलत गेले. बँकेतर्फे आपद्ग्रस्तांना कपडे, अन्न, वस्तू वाटप केले गेले. सामुदायिक विवाहासाठी मदत केली गेली. आता महिलांना बँकेतर्फे संगणक प्रशिक्षण देण्यात येत आहे. या बँकेला वेगवेगळ्या संस्थांचे अनेक पुरस्कार मिळाले. त्यात विशेष उल्लेखनीय म्हणजे ‘इकोनॉमिक ग्रोथ सोसायटी ऑफ इंडिया, न्यू दिल्ली,’ यांचा बँकिंग एक्सलेंट पुरस्कार!
 महिला बँकेच्या उत्तम कामगिरीमध्ये आदराने नाव घेतले जाते ते ‘माणदेशी महिला सहकारी बँक, म्हसवड, जिल्हा सातारा’ या बँकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांचे. ओबामा सरकारने त्यांच्या कामाची दखल घेतली. या झाल्या सगळ्या महिला सहकारी बँका. सर्वसाधारण सहकारी बँकांच्या अध्यक्षपदीसुद्धा महिला अतिशय सक्षमतेने कार्यरत आहे. त्यापकी भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड, पुणेच्या अध्यक्षा जयश्री काळे. शाळाशाळांमधून मुलींची गळती मोठय़ा प्रमाणात होते, ते प्रमाण कमी करण्यासाठी जयश्रीताई दररोज त्यांच्या वस्तीत जावून गणिताचे शिक्षण या मुलींना देत आहेत.
अशीच एक मुंबईची माहेरवाशीण, कोकणातील महाडगावात अनेक संस्थांचा कार्यभाग कुशलतेने सांभाळताना दिसते आहे. त्या म्हणजे, रायगड जिल्ह्य़ातील सर्वसाधारण सहकारी बँक – दि अण्णासाहेब सावंत को-ऑप. अर्बन बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा शोभा सावंत. संचालक मंडळात महिलांच्या समावेशाची कायदेशीर तरतूद होण्यापूर्वीच या बँकेच्या संचालक मंडळात किमान तीन महिलांचा समावेश होताच. त्यांचे सासरे आणि पती यांच्या पश्चात ते दोघे सांभाळीत असलेल्या अनेक सामाजिक संस्थांचा पदभार २००६ पासून शोभाताईंनी स्वीकारला आणि प्रत्येक ठिकाणी त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय होत आहे. सहकार  क्षेत्राबद्दल अविश्वासाचे वातावरण असताना, बँकेच्या ठेवी वाढवून, वैविध्यतेने कर्ज वितरण करून तमाम ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन केला. त्यांनी घडवून आणलेले सकारात्मक परिवर्तन पाहून त्यांची महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. नवीन वर्षांपासून ‘नारीसखी’ या खास महिलांसाठीच्या योजनेची सुरुवात होणार आहे.  एक योगशिक्षिका, निसर्गोपचारतज्ज्ञ अशीही त्यांची ओळख आहे. निर्णय होईपर्यंत सखोल चर्चा आणि निर्णय झाल्यावर त्याची सखोल अंमलबजावणी हे शोभाताईंच्या नेतृत्व गुणाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ‘तेजस्विनी पुरस्कार, २०१२’, ‘स्त्रीशक्ती गौरव पुरस्कार’, ‘सावली गौरव पुरस्कार’, ‘अथर्व रायगड  सन्मान २०१०’, ‘राज्यस्तरीय संजीवनी पुरस्कार २००९’ या आणि इतर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी आहेत.
समाजोन्नती हेच बँकेचे महत्त्वाचे कार्य आहे. समाज विकासासाठी कटिबद्ध, सर्वोत्तम व्यावसायिक स्थिती, वक्तशीर आणि मत्रीपूर्ण ग्राहक सेवा यासाठी नावाजलेली  देवगिरी नागरी सहकारी बँक लि. औरंगाबादला  आहे. या बँकेच्या अध्यक्षपदी प्रथमच एक महिला, डॉ. मंजूषा कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.  २६ शाखांचा महाराष्ट्रभर विस्तार, सुसज्ज कर्मचारी प्रशिक्षण केंद्र, संपूर्ण संगणकीकरण असलेल्या बँकेचा प्रगतीचा आलेख अतिशय समाधानकारक आहे. आपला विस्तार करताकरता इतर दोन सहकारी बँकांना आपल्यात समाविष्ट करून घेतले, हे विशेष आहे. कोअर बँकिंग, एटीएम सेवा, रूपे कार्ड अशी प्रगत बँकिंग कार्यप्रणाली बँकेतर्फे देण्यात येते. मंजूषाताई व्यवसायाने डॉक्टर आहेत. जनकल्याण रक्तपेढी, डॉ. हेडगेवार रुग्णालय या संस्थांचा कार्यभाग त्यांनी सांभाळला आहे. वैद्यकीय क्षेत्रातून संपूर्णपणे भिन्न असलेल्या बँकिंग क्षेत्रात इतरांच्या उत्तम सहकार्याने त्या बँकेचा कारभार सांभाळताना दिसतात. म्हणूनच ‘कर्त्वृवान महिला’ हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. २००६ पासून देवगिरी बँकेच्या संचालक पदावर त्या कार्यरत होत्या, आणि नोव्हेंबर, २०१२ पासून त्या बँकेच्या अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. एकंदरीत या बँकेचा संख्यात्मक आणि गुणात्मक विस्तार करण्यामध्ये मंजूषांताईंचा मोलाचा सहभाग आहे.
 महिला सहकारी बँका आणि सर्वसाधारण सहकारी बँका यांमधील काही महिला अध्यक्षांचा आपण परिचय करून घेतला. प्रत्येक सहकारी बँकेत संचालक पदी किमान दोन महिला असायलाच पाहिजेत असा  नियम आहे. त्यामुळे त्या स्थानावर महिला आहेतच. सरव्यवस्थापक तर मोठय़ा प्रमाणात महिला उत्कृष्ट काम करीत आहेत. आता, सर्वात कडी केली आहे, ती सायली भोईर यांनी. स्त्रिया आíथक क्षेत्रातील कुठलेही जबाबदारीचे पद स्वीकारून उत्तम तऱ्हेने सांभाळू शकतात, हेच इथे प्रतीत होत आहे. ‘दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन’च्या मुख्य अधिकारी व सचिव या पदाचा कार्यभाग मागील तीन वष्रे त्या सांभाळीत आहेत. त्या वाणिज्य आणि कायदा विषयांच्या पदवीधर असून सध्या ‘बँकिंग अँड फायनान्स’ विषयात एमबीए करीत आहेत. फेडरेशनचा महत्त्वाचा पदभार, मुख्य कार्यकारी व सचिव या पदी एक महिला अधिकारी म्हणून सायली भोईर. अतिशय सक्षमतेने, परिपूर्णतेने कार्यरत आहेत. आíथक क्षेत्रात महिला काय काय करू शकतात, त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
येथे ओळख करून दिलेल्या भगिनी स्त्री-शक्तीची प्रतीकात्मक रूपे आहेत. अजूनही अनेक महिला बँकिंग क्षेत्रात अत्यंत मोलाची कामगिरी करीत आहेत. असंख्य महिला बँकिंग सुविधांचा उपयोग करून आपले, आपल्या घरादाराचे भवितव्य उज्ज्वल करण्यात गुंतलेल्या आहेत. महिलेने महिलेसाठी केलेल्या या प्रयत्नांना महिला दिनानिमित्ताने सलाम!