निरंजन मेढेकर

‘सेक्स टॉइज’विषयी उघडपणे बोललं जात नसलं, तरी एका पाहणीनुसार टाळेबंदीच्या काळात भारतात ‘सेक्स टॉइज’च्या खपात तब्बल ६५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आणि त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. आज अनेक जोडप्यांचं नोकरी-व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर राहणं किंवा कामाच्या वेळा वेगळय़ा असल्यानं जवळीक साधण्यास वेळच नसणं, एकल स्त्री-पुरुषांचं वाढतं प्रमाण, अशा परिस्थितीत ‘सेक्स टॉइज’ वापरणं हा पर्याय असू शकतो का?

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
BJP spent 38 crores in online advertisements in three months
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च; ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
survey of disabled in maharashtra,
राज्यात अपंगांच्या सर्वेक्षणाला तीस वर्षांनंतर मिळाला मुहूर्त

लग्नाला ठरावीक वर्ष झाल्यावर बाकी गोष्टींप्रमाणेच कामजीवनातही तोचतोचपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळेच शरीरसंबंधांत नावीन्य आणण्यासाठी किंवा जोडीदार काही कारणानं दूर असेल तर लैंगिक स्व-सुखासाठी ‘सेक्स टॉइज’चा वापर करावा का, असा अनेकांचा प्रश्न असतो. पण ‘सेक्स टॉइज’संदर्भात जाणून घेण्याची  उत्सुकता आहे, मात्र योग्य माहितीचा स्रोत माहीत नाही, अशी अनेकांची अवस्था असते.

  पुण्यातील सायकियाट्रिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. निकेत कासार यांच्याकडे मध्यंतरी एक परदेशी जोडपं उपचारांसाठी आलं होतं. या जोडप्यातल्या पतीला लिंगाचा कर्करोग झालेला होता. त्यामुळे उपचारांदरम्यान लिंगाचा काही भाग काढावा लागला होता. तर दुसऱ्या एका प्रकरणात पन्नाशीच्या पुरुषाला ‘पेरोनीज’ ही व्याधी (Peyroniels disease) झाली होती. पुरुषांच्या लिंगाला नैसर्गिक बाक (curvature) असणं स्वाभाविक असलं, तरी या आजारात लिंगाचा बाक ९० अंशापर्यंत वाढू शकतो. या दोन्ही उदाहरणांमधील समान धागा म्हणजे हे दोन्ही पुरुष समागम करण्यास अक्षम आहेत. मात्र,आपल्या पत्नीच्या भावनांची, शारीर सुखाची त्या दोघांनाही जाणीव आहे. त्यामुळेच स्वत:च्या व्याधीवर उपचार घेत असताना पत्नीच्या शरीरसुखाचा विचार करत ‘सेक्स टॉइज’चा वापर करता येईल का, असा त्यांचा प्रश्न होता. डॉ. निकेत सांगतात, ‘‘लिंगाला कर्करोग झालेल्या पुरुषावर कृत्रिम लिंग बसवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र त्यासाठी मोठा कालवधी लागणार आहे. अशा वेळी जोडप्यांमध्ये भावनिक बंध उत्तम असेल, तर पती ‘सेक्स टॉइज’चा वापर करू शकतो. पण डॉक्टर म्हणून मी ‘सेक्स टॉइज’ आजही थेट ‘प्रिस्क्राईब’ करू शकत नाही.’’

‘सेक्स टॉइज’ वापरणं नैतिकदृष्टय़ा गैर नसलं, पती-पत्नीपैकी कुणी एकजण कुठल्या व्याधीमुळे लैंगिकदृष्टय़ा अक्षम असले आणि तो पर्याय ठरत असला, तरी या लेखाच्या अनुषंगानं मी ज्या ज्या डॉक्टरांशी बोललो, त्यांच्याकडून हेच उत्तर मिळालं. ‘सेक्स टॉइज’च्या विक्री किंवा वापरासंबंधी थेट कुठला कायदा नाही; तरी भारतीय दंड संहितेतील अन्य काही कलमं संदिग्ध असल्यामुळे डॉक्टर याबाबत काहीसे संभ्रमात असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे ‘सेक्स टॉइज’ला भारतीय जोडप्यांकडून आणि एकल स्त्री-पुरुषांकडूनही मोठी मागणी असल्याचं सध्याचं चित्र आहे. विशेषत: करोना आणि टाळेबंदीच्या काळात अनेक नवे-जुने उद्योग ढेपाळले असले, तरी ‘सेक्शुअल वेलनेस फील्ड’या क्षेत्रानं या मंदीतही संधी साधली. यामध्ये अर्थातच वेगवेगळय़ा प्रकारच्या ‘सेक्स टॉइज’चासुद्धा समावेश होतो. ‘ग्लोबल न्यूजवायर’ या साईटच्या अंदाजानुसार २०२६ पर्यंत या क्षेत्राची जागतिक उलाढाल ही ४५ बिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. तर ‘दॅट्स पर्सनल डॉट कॉम’ या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार टाळेबंदीच्या काळात भारतात ‘सेक्स टॉइज’च्या खपात तब्बल ६५ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. ‘सेक्स टॉइज’ची खरेदी करण्यात महाराष्ट्र सगळय़ात आघाडीवर आहे. सेक्स टॉय तुमच्या शयनकक्षापर्यंत पोहोचलेलं असो, की तुम्ही याबाबत अनभिज्ञ असा; वैवाहिक कामजीवनाचा विचार करता यांचा वापर करावा का, हे जाणून घ्यायला हवं.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तिशीचा राकेश सांगतो, ‘‘माझ्या आणि पत्नीच्या नोकरीच्या वेळा वेगवेगळय़ा असल्यानं बऱ्याचदा आमची गाठ फक्त वीकेंडलाच पडते. त्या दिवशी इतर कामं, आईवडिलांकडे जाणं, अन्य कार्यक्रम ठरलेले असतात. त्यामुळे सेक्ससाठी वेळ काढायला हवा हे जाणवत असूनही शक्य होतंच असं नाही. कधी कधी घुसमट असह्य होते. यावर एकमेकांसोबत नसताना ‘सेक्स टॉइज’चा उपाय आम्ही शोधून काढला. ‘सेक्स टॉइज’खरेदीची अनेक ऑनलाइन पोर्टल आज उपलब्ध आहेत. मी स्वत: तर वापरतोच, पण माझ्या पत्नीलाही तिच्या वाढदिवसाला मी हे भेट म्हणून दिलं आहे.’’

‘सेक्स टॉइज’च्या वापरामुळे त्याचीच सवय लागून प्रत्यक्ष समागमातली उत्सुकता संपण्याची भीती व्यक्त केली जाते. यावर राकेश म्हणतो, ‘‘आमच्याबाबतीत उलट झालं आहे. पूर्वी आमच्यात महिन्या-दोन महिन्यांतून एखाद्या वेळी संबंध यायचे. पण ‘सेक्स टॉइज’च्या वापरामुळे ‘ऑरगॅझम’ ही आपल्या शरीराची गरज आहे, ती टाळता कामा नये, याची जाणीव होते. त्यामुळे आमची शारीरिक जवळीक वाढली असून, वैवाहिक नातंही दृढ झालंय.’’ याची सवय लागण्याबाबत सांगायचं, तर ते प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतं. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईटच.     

‘सेक्स टॉइज’चं भारतातलं कायदेशीर स्थान काय, हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे तसाच तो डॉक्टरांनाही आहे. भारतीय दंड संहितेचं (आयपीसी) २९२ हे कलम ‘ऑब्सिनिटी’ संदर्भात म्हणजेच अश्लीलतेसंदर्भात आहे. यात कुठेही ‘सेक्स टॉइज’चा थेट उल्लेख नसला, तरी ज्यामुळे अश्लीलतेचा प्रचार-प्रसार होतो अशा साहित्यावर या कायद्यान्वये पोलीस किंवा कस्टम अधिकारी कारवाई करू शकतात. थोडक्यात ‘सेक्स टॉइज’ची खुलेआम विक्री किंवा कव्हरवर अश्लील चित्र असलेल्या किंवा लिंग-योनी अशा अवयवांशी थेट साधम्र्य असणाऱ्या ‘सेक्स टॉइज’वर कारवाई होऊ शकते. पण ‘सेक्स टॉइज’च्या वैयक्तिक वापरावर कोणतीही बंदी नाहीये. भारतात जी काही ‘सेक्स टॉइज’ची विक्री होते, ती सगळीच्या सगळी अश्लील या प्रकारात मोडते का, याबद्दल २०११ मध्ये ‘कलकत्ता उच्च न्यायालया’नं एक महत्त्वाचा निकाल दिला होता. कविता फुंभरा विरुद्ध ‘कमिशनर ऑफ कस्टम्स’ अशी ती केस होती. त्या केसमध्ये याचिकाकर्तीनं भारतात ‘सेक्स टॉइज’ची विक्री करण्यासाठी ती परदेशातून आयात केली होती, ज्यावर कस्टम विभागानं अश्लीलतेचा गुन्हा लावत आयपीसी कलम २९२ नुसार कारवाई करत ती जप्त केली होती. या वेळी कोर्टानं याचिकाकर्त्यांच्या बाजूनं निकाल दिला होता. लैंगिक गरजांचं शमन करणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अश्लीलतेचं लेबल लावणं चुकीचं आहे, असं म्हणत न्यायालयानं याचिकाकर्त्यांला ‘सेक्स टॉइज’ आणण्याला परवानगी दिली होती.       

 नागपूरमधील सेक्सॉलॉजिस्ट आणि ‘काउन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अँड पॅरेंटहूड इंटरनॅशनल’ या संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे सांगतात, ‘‘इंग्रजांच्या काळात अस्तित्वात आलेल्या काही कायद्यांचं पुनरावलोकन आवश्यक आहे. आयपीसी कलम २९२ नुसार कारवाईच्या भीतीनं डॉक्टर आजही ‘सेक्स टॉइज’संबंधी रुग्णांना सल्ला देऊ शकत नाहीत, मात्र वैवाहिक कामजीवनात वैविध्य म्हणून किंवा एकल स्त्रीपुरुषांनाही लैंगिक गरजांच्या पूर्ततेसाठी ‘सेक्स टॉइज’ हा चांगला पर्याय आहे, हे मान्य करतात. त्यामुळेच ‘सेक्स टॉइज’चा वापर गैर  नाही. मात्र याला कायदेशीर मान्यता हवी.’’

‘सेक्स टॉइज’कडे मोकळेपणानं पाहायला हवं, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. संजय सांगतात, ‘‘परस्त्रीसोबत किंवा परपुरुषासोबत संबंध ठेवल्यानं लैंगिक आजारांचा धोका संभवतो. त्यामुळेच हस्तमैथुन हे सुरक्षित ठरतं. त्याचप्रमाणे कुणीही सज्ञान स्त्री-पुरुष ‘सेक्स टॉइज’चा ऐच्छिक वापर करू शकतो. या गोष्टींकडे समाज म्हणून आपल्याला स्वच्छ दृष्टिकोनातून पाहता यायला हवं. पण तशी दृष्टी यायला वेळ लागेल असं वाटतं. कारण आजही अनेक जोडपी एकमेकांबरोबर सेक्ससंबंधी बोलतच नाहीत. त्यामुळे आधी हा संवाद प्रस्थापित करण्यासाठी जोडप्यांनी जाणीवपूर्वक विचार करायला हवा.’’

 ‘सेक्स टॉइज’विषयी वैद्यकीय क्षेत्रात मतमतांतरं असली तरी बाजारपेठेचा विचार करता काही भारतीय स्टार्टअप्स या वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रात उतरली आहेत. व्यावसायिक साहिल सांगतात,‘‘आम्ही नेमकं कशावर काम करतोय याविषयी घरी आणि मित्रपरिवाराला सांगताना आम्हालाही संकोचल्यासारखं व्हायचं. पण नंतर आम्हाला जाणवलं, की आम्ही जितका कमी बाऊ करू तितकेच लोकही या विषयाकडे मोकळेपणानं बघायला लागतील.’’

डॉ. वा. वा. भागवत लिखित ‘कामविज्ञान’ या जुन्या पुस्तकातही ‘व्हायब्रेटर’चा उल्लेख आहे. या पुस्तकाची सुधारित आवृत्ती १९९४ मध्ये प्रकाशित झाली होती. याचा अर्थ हे मूळ पुस्तक त्याहीआधीचं असावं. या पुस्तकातील ‘संभोगाशिवाय कामपूर्ती’ या प्रकरणात ‘यांत्रिक पद्धतीनं कामसुख मिळवणं’ या शीर्षकाअंतर्गत स्त्री-पुरुषांनी वापरायच्या वेगवेगळय़ा ‘सेक्स टॉइज’चा चित्रासह उल्लेख करण्यात आलाय. या पुस्तकाचे लेखक नमूद करतात,‘यांत्रिक उपकरणांचा उपयोग करण्यास काहींचा विरोध असतो. आपण मिक्सर, मोटार, वॉशिंग मशिन, अशा यंत्रांचा उपयोग करत असताना  कामसुख वाढवण्यासाठी यांत्रिक मदत घेण्यात चूक नाही.’

 ‘सेक्स टॉइज’चा विचार करणं हा आजही संकोचाचा आणि संदिग्धतेचा विषय ठरत असला, तरी अश्मयुगीन मानवही याबाबतीत ‘सॉर्टेड’ असल्याचे दाखले सापडतात. अवा इनसाइट लिखित Tickled Pink: A Lighthearted Journey Through the History of Sex Toys या पुस्तकात निअँडरथल मानव हे दगडापासून तसंच प्राण्यांच्या हाडापासून बनवलेल्या डिल्डोचा वापर ‘सेल्फ प्लेजर’साठी करायचे असे संदर्भ आहेत. भूतकाळाचा आणि वर्तमानाचाही असा सगळा आढावा घेतल्यावर ‘सेक्स टॉइज’चा वापर करायचा की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे स्पष्ट होतं. फक्त आपला जोडीदार ते वापरत असला, तर आपल्यात कमतरता असल्यानं त्याला किंवा तिला सेक्स टॉय वापरावं लागतंय, असा विचार विनाकारण न्यूनगंड देऊ शकतो. नात्यात एकमेकांना स्पेस देणं महत्त्वाचं असतं. तसंच शारीर नात्यातही तशी स्पेस देण्याचा एक ऐच्छिक पर्याय म्हणून याकडे मोकळय़ा मनानं बघणं गरजेचं आहे.