‘‘तुम्हाला त्यांचा ‘बोध’ झाला… तरीही गोष्टी तशाच असणार आहेत. तुम्ही अज्ञानात राहिलात… तरीही गोष्टी त्याच, तशाच असणार आहेत.’’ झेन वचन.

‘सन्मानदायी मृत्यू’ या विषयावर परिसंवाद ठेवणाऱ्या संयोजकांच्या धैर्याचं कौतुकच करायला हवं. त्याहूनही दमदार दाद द्यायला हवी शेकडोंची उपस्थिती देणाऱ्या ‘रसिकांना’. एक न्यायमूर्ती, एक वैद्याकीय आणीबाणी उपचारतज्ज्ञ आणि मन:स्वास्थ्य क्षेत्रातील मी अशा तिघांनी संभाजीनगरमध्ये त्या संध्याकाळी मृत्यूवर अनेक पदरी चर्चा केली. तर्कशास्त्र शिकताना सॉक्रेटिसची विधानं शिकवली जातात. ‘सर्व माणसं मर्त्य आहेत. सॉक्रेटिस मानव आहे. म्हणून तोही मर्त्य आहे.’ असं तर्कशास्त्र आपल्या भावनाप्रधान मेंदूच्या पचनी पडतं. तुमचा आणि माझा भावनिक कलह ‘मृत्यू’ या शब्दापेक्षाही ‘माझा मृत्यू’ या शब्दामुळे होतो. कारण आपल्यातल्या बहुसंख्यांची अमूल्य मालमत्ता असते ‘मी’पण. ‘मी’ला कुरवाळण्यात, त्याचे लाड करण्यात, प्रसंगी त्याला हाणण्यात, शिव्या देण्यात माझं जीवन पुढे पुढे जात राहतं. ‘मी’पणाला न हिणवता त्याला समजून घेण्याची गरज आहे.

आपलं ‘नाव’ स्वत:ला कळायला लागायच्या आधीच स्वत्वाचे थर जमू लागलेले असतात. ते पुढे घट्ट बनत जातात. जीवनवादी आणि स्वहितवादी शिकवण जगण्यासाठीची ऊर्जा देते. तेही योग्यच. पण या स्वत्वाला सुखवादी बनवण्याची सवय पुढे घात करू शकते. जे अंतिम हितकर ते चवीला रुचकर असेलच असे नाही. रूढ जीवनशैली तर सुखाच्या मागे धावणारी. वस्तू आणि सुविधांची प्राप्ती, मालकी आणि सततचा उपभोग याभोवती जगणं फिरू लागतं. इतक्या गोंडस, गोजिऱ्या ‘मी’ला स्वत:च्या नष्ट होण्याचं दु:ख सर्वात जास्त होणं अपरिहार्य नाही का?

‘‘आता हौस म्हणून राहिलीच नाही कशाची,’’ या वाक्याचा ध्वनी विरण्याआधीच, ‘‘किती गं सुंदर आहे हा दागिना… दिवाळीच्या वेळेस करेन कदाचित,’’ अशी ‘मोह’मयी माणसं आपण! त्यामुळे स्वत्वाला मीपणाच्या विळख्यातून सोडवल्याशिवाय मृत्यूला एक स्थित्यंतर म्हणून सामोरं जाता येत नाही. स्थितीबदलाची इतकी भीती का असते आपल्याला? कष्टांनी, गुणांनी, थोडी नशिबाने घडली-घडवलेली जी ‘आयडेंटिटी’ असते आपली त्या स्वयंओळखीबद्दलचं प्रेम ही उपजत भावना आहे. अतिप्रेमात असलेली आत्मकेंद्रित (नार्सिसिस्टीक) मंडळी म्हणजे आपल्याच अधिक पुढे गेलेल्या आवृत्त्या. स्थित्यंतराचं वय ७५ मानलं, तर स्वप्रेमाचे उमाळे कमी करण्याचा प्रवास गेलाबाजार दोन-तीन दशकं आधी सुरू करावा. भावनांचा अतिरेक टाळून वास्तवात राहण्याची सवय लागायला एवढा वेळ लागणार. नि:स्पृहता बहुतेकांसाठी कमवायचा गुण आहे. माझ्या प्रियजनांचा वियोग मला असह्य होतो, कारण त्यातही मला माझंच प्रतिबिंब दिसत असतं.

उपनिषदामध्ये एक प्रतिपादन आहे की, माझी सर्व जवळची नाती शेवटी ‘स्वान्त सुखाय’च असतात. रूढ सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही मृत्यू हा शोकदायकच मानला जातो. लहानपासूनच मृत्यूचे ‘वाईटपण’ आपल्या मनावर ठसवलं जातं. मला माझं आवडतं माणूस आता ‘कधीच’ भेटणार नाही ही व्यथा असतेच. अशा वेळी छोट्या मनांची समजूत घालण्यासाठी, ‘आजोबा तारा झालेत, आजी चांदणी झाली’ अशी प्रामाणिक काव्यमय कारणं देतो. पण मन असं जिज्ञासू की त्याला पटेल असं उत्तर हवं असतं. काही जण कर्मकांडामध्ये, काही जण तत्त्वज्ञानाच्या भूमिकांमध्ये आपापलं उत्तर शोधतात. खरं तर ज्याला जगण्याचा अर्थ कळतो त्याचीच मृत्युजिज्ञासा शमून जाते. वेदांत तत्त्वज्ञान आणि बौद्धिमत जीवन मृत्यूचं आवर्तन मानतात. त्यातही भेद आहेतच. ख्रिास्ती, ज्यू, मुस्लीम हे अंतिम निवाड्याचा पूर्णविराम मानतात. वेदांतात ‘जीवनमुक्त’ आणि ‘देहमुक्त’ अशा संकल्पना आहेत. विज्ञान म्हणतं की, चैतन्याचा अस्त (Loss of vitality) म्हणजे मृत्यू. मज्जापेशीचा मृत्यू म्हणजे क्लिनिकल मरण. अचेतन देह म्हणजे ऊर्जाविरहित स्थिती. हिंदू धर्मात वस्तू आणि ऊर्जा यामध्ये स्थितीबदल सांगितले आहे. कठोपनिषदाप्रमाणे ‘आत्मन्’ला जन्म आणि मृत्यू नाही.

‘न जायते म्रिवा अजो

नित्य: शाश्वतोऽयं पुराणो

न हन्यते हन्यमाने शरीरे’

शरीराच्या मृत्यूबरोबर जो मरत नाही त्याला चार विशेषणं लावली आहेत. अज : जन्म-मृत्यू नसलेला. नित्य : काळाच्या चौकटीत न बसणारा. शाश्वत : ज्यात बदल संभवत नाहीत. पुराण: नित्यनूतन, कधीही न कोमेजणारा. कठोपनिषदाप्रमाणे जगण्यामध्ये ‘अप्राप्तस्य प्राप्ती’ या भागावर आपण खूप लक्ष देतो. आकर्षक आणि तत्कालिक सुखाचे स्राोत ऐहिक जीवनात आणि स्वत:च्या बाहेर शोधतो. हे आहे प्रेयस! ‘प्राप्तस्य प्राप्ती’ म्हणजे आपण स्वत:चं समाधान आणि आनंदाचं मूळ आहोत हे समजणं. ‘आनंदरूप’ होण्याची सायुज्यता यायची, तर त्याआधी समीपता हवी. स्वत:ची देहमनापलीकडची ओळख म्हणजे श्रेयस! स्वकेंद्रिततेकडून सर्वकेंद्रित मनोवृत्तीकडे जाणं म्हणजे ‘प्रेयस’कडून ‘श्रेयस’कडे जाणं. ‘तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता’ या ओळी म्हटलं तर खोल आणि म्हटलं तर दाहक आहेत.

माझी ‘स्व-प्रतिमा’ म्हणजेच माझं ‘मी’पण, म्हणजेच माझं स्वत्व. आणि स्वत्व असेल तर मग ‘मी म्हणजे कोण?’ याची उत्तरं शरीर, मन, संवेदना, भूमिका, उपलब्धी, नाती, स्थावरजंगम मालमत्ता, संपत्ती, गुण, व्यक्तिमत्त्व… यादी लांबत जाईल. हे सगळे माझे भाग आहेतच. पण यातील एक किंवा सर्व मिळून माझं ‘माणूसपण’ तयार होत नाही. इथपर्यंतची मांडणी मानसशास्त्राचीच आहे. माझ्या ‘उपाधि’ गळून पडल्याशिवाय स्वयंकेंद्रितता संपणार नाही. त्याशिवाय नि:संग परोपकार कसा भेटणार. म्हणून दृष्टिकोन असा हवा की सगळी मडकी मातीपासून बनतात. मडकं म्हणून जगताना मातीचं भान सतत जागृत ठेवायचा प्रयत्न करायचा. याचाच अर्थ असा की तात्कालिक, आकर्षक अशा आरोग्यदायी अनुभवांपासून फटकून राहायचं नाही. उत्तम गाणं ऐकावं, अन्न स्वादपूर्वक खावं. कणाकणानं ज्ञान मिळवण्याचा आनंद घ्यावा. सुखदु:खाचे क्षण समरसतेनं भोगावे. परंतु तो तो अनुभवसंपन्न झाल्यावर त्याला स्मृतींच्या गाभाऱ्यात बसवून पूजा करायची नाही. आपण सद्भावाच्या निर्मितीचं माध्यम आहोत, वाहक आहोत असं राहायचं. म्हणजे प्रेम व्यापक होतं. असमाधान, अस्थिरता कमी होते. भीतीने उन्मळून जायला होत नाही.

माझ्या अंतिम टप्प्यावर माझ्या शरीराचे कृत्रिम नळ्यांनी पोखरलेलं खेळणं बनू नये यासाठी वैद्यकीय इच्छापत्राची सुविधा आता कायदेमान्य झाली आहे. त्या कार्यक्रमामध्ये न्यायमूर्तींनी ही प्रक्रिया समजावली. डॉ. अय्यर हे ‘आयसीयू’तज्ज्ञ होते. ‘‘डॉक्टर किती शक्यता आहे वाचायची?’’ अशा प्रश्नांना कशी उत्तरे द्यायची यावर ते बोलले. त्यानंतर श्रोत्यांबरोबर प्रश्नोत्तरे झाली. ‘‘देहभाव कमी करायचा म्हणजे कसं वागायचं?’’ प्रश्न आला

‘‘हा वृत्तीचा भाग आहे. तुम्ही असं म्हणायचं कारण नाही की आज या शरीराने अंघोळ केली. किंवा या मनाला आता गाणं ऐकायचं आहे. तुम्हाला तुमच्या आनंदासाठी अत्तर लावायचं असेल तरीही ते लावा. क्षणिक आनंदांना न अव्हेरता त्यांचा मर्यादापूर्ण स्वीकार करण्याची सवय लावूया. स्वत:बरोबर प्रामाणिक असावं.’’

‘‘आणि चुका झाल्या तर?’’

‘‘खेळकरपणे सुधारावं. मधुमेह आहे आणि आंबे खाताना जीभ सैल झाली तर आता डॉक्टरी सल्ल्यानुसार तिला ताब्यात आणावं.’’

‘‘म्हणजे मृत्यूला मित्र मानायचं का?’’

‘‘शत्रू न मानण्यापासून सुरुवात करू… जवळची माणसं पुढे गेली तर मन काही काळ गलबलणार. जे मानवी आहे ते का टाळावं. शहाणे पर्याय स्वीकारण्याकडे कल असावा.’’

‘‘शहाणे पर्याय कसे असतात?’’

‘‘स्वत:च्या शरीर-मनाकडे माध्यम म्हणून पाहणारे. स्वहिताची व्याख्या व्यापक करून इतरांना सामावणारे. प्रसंगी विनासंकोच मदत मागणारे. सत्ता आणि लोभ यापासून शक्यतो दूर राहून आरोग्याला जपणारे.’’

‘‘दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची भीती वाटते. त्यापेक्षा मृत्यू पटकन यावा!’’

‘‘तुमची भावना कळते मला. पण काळानुसार मर्यादा वाढल्या तर मदत घेण्यास कमीपणा वाटून घेऊ नये. तक्रारवृत्ती कमी करायचा प्रयत्न करायचा आणि असलेल्या क्षमता, सोयी, नाती यांना मनापासून दाद द्यावी.’’ मी म्हणालो.

‘‘संत तुकाराम मरणाला सोहळा का म्हणाले असतील?’’

‘‘ज्याला उपमा नाही असा सोहळा ‘मी’ पाहिला, असे ते म्हणतात. हा ‘मी’ खूप व्यापक आहे. संकुचित अहंभावापासून दूर गेलेला आहे. तो आता विश्वाशी एकरूप झाला आहे. त्याला तुकाराम महाराज म्हणतात ‘सुकाळ’. जखडणाऱ्या ‘मी’पणाचा दुष्काळ संपला. जन्ममरण म्हणजे घटकांमध्ये बदल हे कळले तर मृत्यूनंतर सुतक कशासाठी ठेवायचे?’’

‘‘कठीण आहे हो समजायला… त्यापुढे पचायला…’’

‘‘म्हणून तर निरर्थक व्यवधाने टाळून हव्या त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं.’’ मी हसत हसत म्हणालो. सूत्रसंचालन करणाऱ्यांनी ‘अंतिम’ वाक्य सांगा अशी सूचना केली.

‘‘‘आर्ष विद्या गुरुकुला’चे स्वामी दयानंद सरस्वती म्हणतात, only body has DOB and DOD. Rest is Legacy… जन्म आणि मृत्यूचे दिनांक असतात ते फक्त शरीरासाठी. बाकी सर्व उरणार तो वारसा. प्रियजनांसाठी विचारभावनांचा आणि जीवनमूल्यांचा कोणता वारसा ठेवणार आपण हा विचार प्रत्येक ज्येष्ठ जनाने करायचा आहे.’’ कार्यक्रम संपन्न झाला. श्रोत्यांच्या मनात विचारमंथन सुरू झालं असावं. आम्ही वक्तेसुद्धा अंतर्मुख झालो होतो. सारे एका वाटेचे प्रवासी या दुनियेतल्या वेगळ्या रस्त्यांनी पुढे निघाले होते.
anandiph@gmail.com