प्रभाकर जोग
व्हायोलिनवादक, संगीतकार

‘दाम करी काम’ हे सुधीर फडके यांच्या आवाजातील गीत ऐकून दादा कोंडकेयांनी मला ‘आंधळा मारतो डोळा’साठी बोलावले. मला आश्चर्य वाटले कारण त्यांच्या ‘सोंगाडय़ा’ आणि ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटांचे संगीत राम कदम यांचे होते. ते स्वत: गीतकार होते आणि प्रेक्षकांची नस जाणणारे कलाकार होते. त्यामुळे एखादी स्वररचना झाल्यानंतर ती त्यांच्या गळी कशी उतरवायची, दादांना पटवायचे कसे हा माझ्यासाठी काही वेळा त्रासाचा भाग असायचा. पण चित्रपटातली सगळीच गाणी गाजली. ‘हिल हिल हिल पोरी हिला’ या गीताने तर ‘एचएमव्ही’ कंपनीच्या कॅसेट विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दादांनी मला चित्रपट संगीतासाठी कधी बोलावले नाही. याचे गुपित मला त्यांच्या एका मुलाखतीमध्ये वाचायला मिळाले..’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’ची एक मैफल. बाबूजींच्या गायनाला माझी व्हायोलिनची साथ होतीच. एकामागोमाग एक गीत बाबूजी गात होते. रसिकांमध्ये होते, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. बाबूजींनी सूर लावला आणि ‘दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगति पुत्र मानवाचा’ हे गीत त्यांनी गायला सुरुवात केली. या गीतानंतर छोटेखानी मध्यंतर झाले. त्यामध्ये पुलंच्या हस्ते कलाकारांचे सत्कार झाले. या वेळी पुलंनी मनोगत व्यक्त केले. ‘‘जीवनामध्ये प्रत्येकाला दु:ख आहे. त्या अर्थाने तो पराधीन आहे. पण आपल्यामध्ये प्रभाकर जोग ही एकमेव व्यक्ती पराधीन नाही तर ‘स्वराधीन’ आहे.’’ पुलंच्या या अनपेक्षित कौतुकाने मी भारावून गेलो. त्या दिवशी मोठा पुरस्कार लाभला, अशीच माझी भावना होती. इंदूर येथे गीतरामायणाचाच कार्यक्रम होता. रसिकाग्रणी रामूभय्या दाते हे त्याला आवर्जून उपस्थित होते. तोपर्यंत मी केवळ त्यांचे नावच ऐकून होतो. कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये ते बाबूजींना भेटण्यासाठी आले. त्यांनी व्हायोलिन वाजविणारा कलाकार कोण? अशी फडकेसाहेबांकडे विचारणा केली. मग रामूभय्या मला भेटले. ‘काय वाजवलेस तू’, त्यांनी मला विचारले. क्षणभर मला काहीच कळेना. मी विचारलं, ‘माझे काही चुकले का?’ त्यावर माझा हात हातामध्ये घेऊन रामूभय्या म्हणाले, ‘इतर व्हायोलिनवादक केवळ स्वरच वाजवितात. तू स्वर तर वाजवलेस, पण व्यंजनही वाजविलेस. असे व्हायोलिन मी कधीच ऐकले नाही.’’ रसिकाग्रणी रामूभय्या यांच्या प्रशंसेने त्या वेळी मी भारावून गेलो होतो.
ही उदाहरणे मुद्दाम सांगितली, ती माझा मोठेपणा म्हणून नाही किंवा आत्मप्रौढी म्हणूनही नाही. माझ्यातील कलाकाराला लाभलेले हे अलंकार मी जीवनभर मोठय़ा आनंदाने परिधान केले आहेत. बालपणीच्या प्रतिकूल परिस्थितीने जगण्यासाठी लढण्याची जिद्द दिली आणि संगीताने माझे जीवन घडले. एका अर्थाने मला घडविणाऱ्या व्हायोलिन या वाद्याचा आणि संगीताचा ऋणी आहे. स्वरलेखन म्हणजेच नोटेशन करण्याची कला ही मला दैवी देणगीच लाभली. त्याच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास तीन पिढय़ांतील नामवंत संगीतकारांसमवेत काम करू शकलो. वादक, संगीत संयोजक आणि स्वतंत्र संगीतकार अशा तीनही भूमिकेमध्ये सहजतेने वावरताना ‘साँग व्हायोलिनिस्ट’ हा लौकिक संपादन केला. व्हायोलिन या वाद्याने मला केवळ ओळखच दिली नाही तर, चित्रपटसृष्टीमध्ये माझे ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ स्थान प्रस्थापित केले.
ज्येष्ठ भावगीतगायक बबनराव नावडीकर यांनी मुलाप्रमाणे माया करून मला आधार दिला. एका अवचित क्षणी सुधीर फडके यांनी माझे व्हायोलिनवादन ऐकणे आणि त्यांनी मला काम करायला बोलावून घेणे हा माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण ठरला. मराठी चित्रपटांबरोबरच हिंदूी चित्रपटसृष्टीमध्ये जवळपास चार दशके मी काम केले. प्रतिकूल परिस्थितीमुळे जीवनामध्ये अनेक टक्केटोणपे अनुभवले आहेत. मी प्रामाणिक राहून संगीतकलेशी जोडलेली नाळ कायम ठेवली. आता वयोमानापरत्वे काम कमी केले असले तरी दररोज रियाज सुरू असतो. विद्यार्थ्यांना व्हायोलिनवादन शिकवितो आणि शक्य असेल तेव्हा ‘गाणारं व्हायोलिन’ कार्यक्रमही सादर करतो.
मी जेमतेम दहा-बारा वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वडिलांचे मोटार अपघातामध्ये निधन झाले. मोठा गोतावळा असलेले आमचे कुटुंब उघडय़ावर पडले. प्रपंच चालविण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही छोटे काम करू लागला. ती आमची त्या वेळची गरजच होती. आकाशवाणी नागपूर केंद्रावर माझे बंधू वामनराव काम करीत होते. तेथे व्हायोलिनवादकाची जागा रिकामी झाली होती. तेथे मी जावे, असे मला सुचविण्यात आले होते. मात्र ज्येष्ठ भावगीतगायक बबनराव नावडीकर यांनी बंधूंना माझ्या भवितव्याविषयी आश्वस्त केले आणि माझ्या शिक्षणाचा आणि पुण्याला परतण्याचा मार्ग मोकळा झाला. स. प. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊन मी शिक्षण सुरू केले. एका स्नेहसंमेलनामध्ये माझे व्हायोलिनवादन ऐकून बाबूजींनी मला बोलावून घेतले. पुण्यात ध्वनिमुद्रणाचे काम असेल तेव्हा मी तुम्हाला बोलावून घेईन, असे त्यांनी सांगितले आणि तसे केलेही. ‘प्रभात फिल्म’ कंपनी बंद पडण्याच्या मार्गावर असताना त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त’ हा चित्रपट करण्याचे ठरविले. स्नेहल भाटकर त्याचे संगीतकार होते. कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या नृत्य कार्यक्रमामध्ये मी व्हायोलिनची साथ करीत असे. हे भाटे यांच्याशेजारी राहणारे फ्लूटवादक प्रल्हाद होंबळ यांना ठाऊक होते. त्यांच्याकडे नवीन वादक शोधण्याची कामगिरी असायची. वादक कमी मोबदल्यात उपलब्ध होत असल्यामुळे माझी वर्णी लागली. या चित्रपटातील एक गीत गाण्यासाठी ललिता फडके आल्या होत्या. त्या गाण्याआधी असलेल्या नृत्याच्या तुकडय़ाचे संगीत देताना स्नेहल भाटकर आणि वादक आठ मात्रांचा तुकडा विसरले. त्यामुळे कलाकार समेवर येण्याऐवजी नवव्या मात्रेवर जायचे. हा घोळ मी भाटकर यांच्या लक्षात आणून दिला. एवढेच नव्हे तर तो तुकडा वाजवून दाखविल्यानंतर ते खूश झाले. ही कला तू कशी आत्मसात केली असे भाटकर यांनी विचारले खरे. पण माझ्याकडे तरी त्याचे कुठे उत्तर होते.

मराठीतील सर्व दृष्टी आडची सृष्टी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Renowned violinist prabhakar jog sharing his life journey
First published on: 02-07-2016 at 01:05 IST