एप्रिल महिन्याच्या अखेरीस परीक्षांचा हंगाम संपायला आला की, माझे वडील नित्यनेमाने त्यांच्या अभ्यासाला लागायचे. ते रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. तोपर्यंतच्या वर्षभरामध्ये त्यांनी त्यांच्या विषयावरचं जे नवं वाचन केलं असेल त्याची टिपणं एका वहीत असायची. जून-जुलैपासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षातील त्यांच्या व्याख्यानांची यादी तयार असायची. ते प्रत्येक व्याख्यानाचा ‘प्रवाह’ तयार करायचे. त्यात सारे मुद्दे असायचे. शर्टाच्या खिशात बसतील अशी बारा छोट्या पानांची पुस्तकं. त्यात उजव्या पानावर लिहायचं आणि डाव्या पानावर नोंद ठेवायची, त्या विषयावर वर्गात झालेल्या चर्चेची. त्यात भर नव्या मजकुराची. दरवर्षी ३०-३५ पुस्तिका तयार व्हायच्या नियमाने… ४० वर्षं!
‘‘काय गरज आहे तुम्हाला हे सगळं लिहिण्याची? अभ्यासक्रमच बदलला की तुमच्या नोट्सही बदलणार ना?’’ मी एकदा त्यांना विचारलं. त्यांचं खुद्कन आलेलं हास्यही चांदण्यासारखं मवाळ असायचं. ‘‘एक तर विज्ञानातील प्रगतीचा आणि अभ्यासक्रमाचा संबंध नाही. शिक्षकानं त्याला जितकं येतं तितकं द्यावं. पण माहितीचं डबकं करू नये. माझा अभ्यास, माझ्या ज्ञानाला खेळतं ठेवण्यासाठी असतो. प्रत्येक वर्षी येणारी मुलं वेगळी. मला जे सांगायचं तेही वेगळं. त्यामुळे मला शिकवायचा कंटाळा येत नाही आणि त्यामुळेच बहुधा त्यांनाही.’’ मी लक्षपूर्वक ऐकत होतो. ‘‘आणि शिक्षकाचा आत्मविश्वास त्याच्या ज्ञानावर अवलंबून असतो. फक्त शैलीवर नाही.’’
‘स्फूर्ती’ (Motivation) आणि ‘स्वयंशिस्त’ (Self discipline) यांचं रहस्यच सांगत होते वडील. शिकवण्याचा त्यांना कंटाळा यायचा नाही कारण वर्षभराचा अभ्यास आणि वर्गातलं आख्यान या साऱ्यातून ते उत्साह निर्माण करायचे. कसा? समरसतेतून. ज्ञान आणि विद्यार्थ्यांविषयीची आस्था त्यात होती. स्वत:च्या व्यवसायाकडे आनंददायी व्रत अशा भूमिकेतून पाहिल्यामुळे त्यांची ऊर्जा टिकायची. माझ्या बहिणीला रांगोळी काढायला शिकवताना ते म्हणायचे ‘‘सुबक आणि सुंदर काम करायची सवय म्हणजे शिस्त.’’
आघाडीचे मानसशास्त्रज्ञसुद्धा काही वेगळं सांगत नाहीत. स्फूर्ती म्हणजे विचारांची ज्योत पेटवणारी ठिणगी. ती प्रभावी आणि तीव्र भावना असते. अगदी भारून टाकणारी. कधी कधी ती भोवतालच्या परिस्थितीतून येते. एखाद्याच्या उत्कृष्ट कामगिरीने अवाक होऊन आपण ‘तसे’ बनायला जातो. कधी कधी उपेक्षा आणि अपमानाची ठिणगीसुद्धा वणवा नव्हे तर अग्नीकुंड धगधगतं ठेवते. स्फूर्तीच्या ठिणगीला वारंवार फुंकर मारून प्रज्वलित करावं लागतं. अशा वर्तनाच्या सवयीला म्हणतात शिस्त! स्फूर्ती नसेल तोवर शिस्तीचा बडगा असतो. कारण तो बाहेरून लागलेला असतो. त्या जुलमाच्या रामरामाची अखेर बंडात तरी होते किंवा त्या ध्येयालाच दूर लोटलं जातं.
स्फूर्ती ध्येयाला आणि ध्येयप्राप्तीला स्वसन्मुख करते. पण शिस्त नसेल तर स्फूर्ती तात्पुरती ठरते. ‘इच्छाच न होणं’ नावाचं एक फोल कारण (Excuse) आपल्या सगळ्यांकडे असतं. स्फूर्ती कमी झाली तरीही ध्येयाकडे नेणारा कष्टप्रद प्रवास न सोडणं ही आहे शिस्तीची व्याख्या. एका मुलाखतीमध्ये अभिनेता ऋतिक रोशनला विचारलं की, ‘‘तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीचं रहस्य काय?’’ त्यावर ‘‘आज व्यायाम करायचा की नाही हा निर्णय मी अंथरुणात नाही, तर व्यायामशाळेत घेतो.’’ त्याने एक वाक्यात रहस्यस्फोट केला. स्फूर्ती कमी झाल्यावर मदत करते ती जिद्द.
आपण बऱ्याचदा स्फूर्तीला मखरात बसवतो, पण शिस्तीला नकारात्मक ठरवतो. खरं तर स्वयंशिस्तीचा प्रभावी वापर हा आत्मविश्वास जागवणारा आणि वाढवणारा असतो. शिस्त करडी असावी असा नियम नाही. त्यात खूप विविधता असते आणि आणताही येते. मनोविकारशास्त्रामध्ये रुग्णसेवा देता देता माझी ४५ वर्षं कारणी लागली. (नुसती ‘गेली’ नाहीत). मला वेगवेगळ्या मनोविकारांचं निदान करण्यातली विविधता मिळते. वय वर्षं आठ ते ऐशी, महानगरी जीवन ते आदिवासी भाग असे अनेक पैलू आहेत. पण माणसाबद्दलचं कुतूहल ही भावना माझ्या शिस्तीच्या मुळाशी आहे. वेदनेबद्दलची ‘आस्था’ ही दुसरी भावना. या तुतारी फुंकणाऱ्या स्फूरणभावना नव्हेत. परंतु स्फूर्ती म्हणजे एकाच प्रकारची असते हे कोणी सांगितलं? पूर्वी मी उपचार करायचो आता ती जबाबदारी सहकारी घेतात आणि मी उपचाराच्या अनुभवाचं ‘मूल्यवर्धन’ (value addition) करतो. कर्तव्याचा पोत बदलणं हेही शिस्तीला पोषक असतं. अशा प्रकारे कंटाळा कमी झाला की शिस्त घट्ट होते.
आळस ही भावना तर किती सुखावह. त्यामध्ये स्फूर्तीचा दट्ट्या नाही आणि शिस्तीचा रट्टाही नाही. आरामदायक निष्क्रियता काय जादू करते ते आपण अनुभवतोच. मी स्वत:ला सांगितलं की ‘मोजलेला आटोपशीर आळस’ हे शिस्त पाळल्यानंतरचं बक्षीस आहे. साधारण आठ ते दहा कार्यमग्न दिवसांनंतर मी स्वत:ला ‘सुनियोजित’ आळशी दिवसाची भेट देतो. त्या दिवशी मी एकही गोष्ट शिस्तीने करत नाही. खरं म्हणजे काहीच करत नाही. लोळत राहतो. मूड लागेल ते करायचं. अगदी दाढी-स्नानाच्या- देखील ‘वेळा’ पाळायच्या नाहीत. ही फक्त ‘विश्रांती’ नसते. ध्येय नसलेली निष्क्रियता असते. सुट्टीच्या शेवटाकडे कशी शाळेची आठवण येते तशी कामाची आस येऊ लागते. नव्या कल्पना आणि पुढचं नियोजन आकार घ्यायला लागतं…की पुन्हा शिस्तशीर आणि वक्तशीर आठवडा सुरू. स्वयंशिस्तीची किंमतही द्यावी लागते. आयत्या वेळी येणाऱ्या अनेक कामांना, आकर्षणाला ठाम नकार द्यावा लागतो. ‘नाही म्हणण्याचं सामर्थ्य’ हा स्वयंचलनाचा गाभाच.
‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’त, अस्ताव्यस्त जगणं झालेल्या मित्रांना हे अनेकदा शिकवावं लागतं. तात्पुरतं सुख देणाऱ्या होकारामध्ये दडलेली शोकांतिका अनेकदा भोगल्यावरही शमत नाही. आग्रही नकाराचे प्रयोग जमू लागले की संयमी होकार जमणं तुलनेनं सोपं होतं. ‘मोटिव्हेशन’ या शब्दातच ‘मोटिव्ह’ म्हणजे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाचं भान या मित्रांना सतत देत राहावं लागतं. व्यसनमुक्तीचा प्रवास व्यसनापेक्षा आकर्षक बनवणं हे या क्षेत्रातलं सगळ्यात अवघड आव्हान. संधी मिळाली की नवीन पोषक विचार त्यांच्या डोक्यात बसवायचा. एका रुग्णाला ‘विथड्रॉअल’ म्हणजे व्यसनवियोगाच्या काळात आकडी आली. योग्य उपचार वेळीच मिळाले. ‘‘मी गुंगीत होतो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर महादेवाची पिंड येत होती सारखी,’’ तो मला म्हणाला. ‘‘त्यावर अभिषेक होत होता का रे?’’ मी विचारलं. ‘‘नाही दिसला.’’ तो उत्तरला. ‘‘आपण त्या दृश्यामध्ये अभिषेकाचे टपटपणारे थेंब मिसळू या. एक थेंब म्हणजे व्यसनमुक्तीचा एक दिवस! किती काळ चालणार अभिषेक?’’ मी विचारलं. ‘‘मी जिवंत असेतोवर.’’ उत्तर आलं. स्फूर्तीचे कणही आपोआप मिळत नाहीत. ते गोळा करावे लागतात. त्यासाठी सतत निरीक्षण करायला हवं. ‘शिस्तबद्ध’ अवलोकनातून स्फुरण वाढवणारे क्षण मिळतात.
व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातले माझे एक ज्येष्ठ सहकारी होते स्टॅनीअंकल सिक्वेरा. ३५ वर्षं मद्यापाशापासून दूर राहिल्यानंतरही ते ‘अल्कोहोलिक अॅनोनिमस’(ए.ए.)ची सभा चुकवायचे नाहीत. पहिल्या रांगेत बसून समोरच्या वक्त्याचे अनुभव एकतान होऊन ऐकायचे. ‘‘इतक्या वर्षांनंतर तुम्ही का करत राहता हे?’’ मी त्यांना विचारलं. ‘‘आता करावं लागत नाही. पूर्वी पावलं आपोआप दारूकडे वळायची. आता बैठकीकडे वळतात.’’ ही असते आत्मसात झालेली, मुरलेली सवय. अशा वेळी स्फुरण आणि शिस्त वेगळे राहतच नाहीत. ‘‘माझी शिस्त जशी मला आवश्यक तशी माझ्या सहवासातल्या सर्वांसाठी महत्त्वाची. पण ती जाचक नको. ए.ए.च्या सभेतले संवाद ऐकताना मी तपशीलच नाही तर भावना टिपायचा प्रयत्न करतो. मी अनुभवलेल्या प्रसंगांसोबत त्या भावना जोडतो. म्हणून सभेनंतर मी ताजातवाना असतो.’’ अंकल म्हणाले. त्यांचे रुपेरी केस अगदी माझ्या वडिलांसारखेच होते. ‘परिपक्वता’ म्हणजे काय तर काटे नसलेली शिस्त आणि रोज नव्याने तयार करायची स्फूर्ती या दोघांचीही अभिन्नता. उत्कृष्टता म्हणजे फक्त कृती नव्हे तर (मुरलेली) सवय असं सॉक्रेटिसचं एक विधान आहे.
स्फूर्ती आणि शिस्त या समीकरणामध्ये जास्त चर्चिला न जाणारा एक मुद्दा आहे चित्ताच्या चंचलतेचा. (Attention Deficit). गरम तव्यावर पाण्याच्या थेंबांची तत्परतेनं वाफ व्हावी, तशी शिस्तीची स्थिती असते तिथे. आणि एकाग्रता नावाचं कार्य, सर्वसामान्य अवस्थेला असल्याशिवाय प्रगती होत नाही. व्यक्तिमत्त्वातील काही दोष-दुराग्रहांमुळे माणसं बेशिस्त वागतात, स्फूर्ती शोधण्याऐवजी ‘थ्रील’ शोधतात. त्यामुळे आपण जी चर्चा करत आहोत ती सर्वसामान्यांच्या सर्वमान्य मानसिक परिघातच करायला हवी.
बाह्य कारणांमुळे लाभणारी स्फूर्ती टिकाऊ नसते. जॅक वेल्श या व्यवस्थापन तज्ज्ञाने, औद्याोगिक क्षेत्रामध्ये कार्यकौशल्य आणि वेतनव्यवस्था यांची सांगड घालणारी रचना तयार केली. तुमच्या कुशलतेमुळे कंपनीचं ध्येय किती साध्य होतं त्यावर तुमची बढती, पगार आणि खास वेतन असं सारं ठरणार. ही पद्धती खूप ठोस आणि वास्तव आहे असं म्हटलं जातं. परंतु तिची एक मर्यादा आहे. बाह्य स्फुरण देणाऱ्या गोष्टी, कौशल्याची रेषा वरवर नेतात खरी पण सतत नव्हे. बहुतेक कर्मचाऱ्यांसाठी एका पातळीनंतर भौतिक सुखापेक्षा भावनिक उद्दिष्ट्ये महत्त्वाची ठरतात. कामातले समाधान, नवीन शिकण्याची संधी, सहकाऱ्यांबरोबरची नाती या गोष्टी जास्त महत्त्वाच्या होतात.
अंत:करणातील स्फूर्ती आणि विचारवर्तनातली शिस्त ज्या व्यक्तींना इतरांपर्यंत पोहोचवता येते त्यांना आपण त्या त्या क्षेत्रातील नेते म्हणतो, दिग्गज म्हणतो. त्यातले काही तर त्यांच्या मृत्यूनंतरही आपले मानदंड होऊन राहतात. त्यांना आपण महापुरुष म्हणतो. पण या व्यक्तींच्या जीवनातलं उद्दिष्ट मात्र ‘महामानव’ बनण्याचं नसतं. निवडलेल्या विधायक ध्येयाप्रती असलेली निष्ठा त्यांना सातत्य देते आणि या ध्येयावरचं अनासक्त प्रेम त्यांना स्फूर्ती देतं. त्यांचं ध्येय जणू त्याच्या अस्तित्वातच भिनलेलं असतं.
दमट आणि कोंदट पाणबुडीतून जर्मनीतून सिंगापूरकडे जाताना सुभाषबाबू त्यांच्या ‘इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती तयार करतात आणि प्रकाशकापर्यंत पोहोचवतात. त्यांच्यासाठी स्फूर्ती आणि शिस्त वेगळी कुठे असते? पत्नीवियोगाचं दु:ख पचवून लोकमान्य टिळक मंडालेमध्ये ‘गीतारहस्य’ लिहिण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. असं म्हणतात की, एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. या साऱ्या वंदनीय व्यक्तींमध्ये स्फूर्ती आणि शिस्त यांची एकच दुधारी तलवार बनते. महात्मा गौतम बुद्धांचं एक वचन आहे, ‘खडक आणि पाणी यांच्या संघर्षामध्ये जीत पाण्याची होते; सामर्थ्यामुळे नव्हे तर सातत्यामुळे.’ आपल्या आयुष्यामध्ये एक तरी ‘सोनेरी सवय’ आत्मसात करता आली तर अहोभाग्यम्!