व्यावसायिक जगाशी जुळवून घेताना नवी पिढी अधिकाधिक बिनचेहऱ्याची व्यावहारिक होत चालली आहे. व्यावसायिक जग आणि घरचं जग हे कप्पे करताना त्यांना जड जातंय. अशा वेळी नातेसंबंधाची वीण घट्ट ठेवणारं चेहऱ्यांचं जग ज्येष्ठ पिढीलाच जपायचं आहे; पण आपली भावनिक गुंतवणूक त्यात होऊ न देता! मुलांवर राग काढणं, निराश होणं किंवा परिस्थितीशी झगडा करीत बसण्यापेक्षा योग्य वयातच आपल्या उतारवयाची तयारी केली तर? चतुरंगच्या १२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘प्रश्नांकित उत्तरायण’ या लेखातून निर्माण झालेल्या प्रश्नांच्या, वेदनांच्या उत्तरायणाला दुसरी बाजू असते हे सांगणारा लेख.
कल्पनाताई आमच्या संस्थेत काम करायला आल्या त्या आधीही अनेक वर्ष त्यांनी स्वत:ला विविध सामाजिक कामात गुंतवून घेतलेले होतं. पती आणि दोन मुलं असा संसार उत्तम सांभाळत त्या समांतरपणे विविध सामाजिक कामे करत राहिल्या. त्यांचे यजमान निवृत्त झाले नि घरात एकटय़ाने कंटाळायला लागले तेव्हा दोघांनी एकमेकांच्या सोबतीने अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद घेतला. दरम्यानच्या काळात मुलांची लग्नं झाली. पुढे यजमानांची शारीरिक आणि मानसिक तब्येत बिघडायला लागली. काही वेळा त्यांना सांभाळणे खूप कठीण व्हायचे. कल्पनाताईंनी शांत राहून तेही सर्व व्यवस्थित निभावले. पुढे ते वारले. महिनाभर कुणी-कुणी भेटायला येत होते. त्यानंतर कल्पनाताई परत एकदा घराबाहेर पडल्या. आता त्या सकाळी सुनेला लागेल ती मदत करून, जेवून घराबाहेर पडतात. बसने एका संस्थेच्या मुख्य कार्यालयात जातात. त्यांची नेमणूक ज्या प्रकल्पावर केली आहे त्याचे कोणतेही काम असो, अगदी खेडेगावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रकल्प राबवण्यापासून डॉक्युमेंटेशनपर्यंत आनंदाने करतात. कटकट नाही. तक्रार नाही. संध्याकाळी बसनेच घरी परततात. थोडा वेळ मुलगा, सून, आता मोठा झालेला नातू यांच्याबरोबर घालवतात. थोडा वेळ टी.व्ही. बघतात. लवकरच झोपतात. कल्पनाताई खऱ्या अर्थाने ‘वानप्रस्थाश्रम’ जगतात! तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांना जमणारा, झेपणारा!
आपल्या पूर्वजांनी अतिशय विवेकाने हे चार आश्रम निर्माण केले. ब्रह्मचार्याश्रम (ब्रह्माचे साहचर्य म्हणजेच ज्ञान मिळवण्याचा काळ), गृहस्थाश्रम (घरगृहस्ती म्हणजेच प्रापंचिक कर्म) आणि जबाबदाऱ्या, वानप्रस्थाश्रम (गृहस्थाश्रमातून शरीराने आणि मुख्य म्हणजे मनाने, भावनेने बाहेर पडून वनाकडे प्रस्थान म्हणजेच अध्यात्माकडे प्रवास) आणि संन्यासाश्रम (अनासक्ती आणि विरक्ती). कुटुंबव्यवस्थेच्या चौकटीचे हे चार फार महत्त्वाचे कोन आहेत, कारण आपल्या आयुष्याच्या वेगवेगळय़ा टप्प्यांवर काय करणे आणि काय टाळणे गरजचे आहे याची एक विचारसरणी, तत्त्वज्ञान शिस्त हे आश्रम आपल्याला घालून देतात. दुर्दैवाने आज फार थोडी शहाणी, सुज्ञ माणसं याची दखल घेताना दिसतात.
हे सारं आज लिहावंसं वाटण्याचं कारण म्हणजे नातेसंबंधविषयक समुपदेशक म्हणून काम करताना घरातील व्यक्तींनी या आश्रमांची ती जाणीव ठेवायला हवी ती ठेवलेली दिसत नाही. ‘मुलगा-सून असे वागतात वा वागत नाहीत त्यांनी कसं वागायला हवं..’ असं सांगत जेव्हा पालक येतात आणि त्यांना जर ‘मुलांशी बोलूच पण तुमच्या वानप्रस्थाश्रमचं काय?’ असं विचारलं तर अनेक पालकांना आवडत नाही! ‘आम्हाला सारं कळतं, काय ते मुलांना सांगा’ अशी भावना खूप प्रबळ असते. त्यामुळे बरेच जण समुपदेशकांवर नाराजही होतात. पण नाराज होऊन प्रश्न सुटत नाहीत, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा परत येतात आणि मग कुठे थोडं ऐकण्याच्या मन:स्थितीत असतात. वाढत्या वयाने येणारं ‘ज्येष्ठ’पण आणि विचारांची प्रगल्भता या दोन वेगळय़ा गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट ज्येष्ठांना खऱ्या अर्थी विवेकी बनवते.ज्यांनी योग्य वयात, योग्य वेळी नियोजन करून वानप्रस्थाश्रमाकडे वाटचाल केली, त्यांनाच हे जमतं.
  आमची आजी सांगायची की तिच्या माहेरच्या गावी एक पद्धत होती. मुलाचं लग्न झालं की त्याचे आईवडील नव्या सुनेकडं चाव्या देऊन काशीला जायचे. त्या वेळी दळणवळणाची सोय फारच कमी. त्यामुळे या प्रवासाला कित्येक वेळा सहा-सहा, आठ-आठ महिनेही लागायचे! प्रवासाच्या मार्गात आतासारखी हॉटेल्स, लॉजेस् असं काही असण्याची शक्यताच नव्हती. माणसं गावातील पुजाऱ्याचं घर, देवळं, धर्मशाळा इथेच विसाव्याला थांबायची. त्या वेळी पाठय़, पठण, भजन, कीर्तन सारं काही कानावर पडायचं. आता संसारातून हळूहळू निवृत्ती घेत, कान, डोळे, मन, सर्व परमार्थाकडे लावायला सुरुवात करायची आहे. याची जाणीव या साऱ्या गोष्टी करून द्यायच्या. संसार करताना सगळय़ांसाठी खूप कष्ट केले, अनेक अडचणींना, संकटांना सामोरे जात संसाररूपी नाव पुढे नेत ठेवली. आता सुकाणू पुढच्या पिढीतील देत आपली किनाऱ्यावर विसावण्याची, वेळ आली आहे. इतकी र्वष स्वत:कडे, स्वत:च्या आरोग्याकडे, मानसिक स्वास्थ्याकडे, स्वत:च्या आणि एकमेकांच्या आवडीनिवडींकडे बघायला फुरसतच मिळाली नाही. आता थोडे स्वविकासाकडे लक्ष देऊ या. राहून गेलेल्या गोष्टी जोडीने करू या, समाजासाठी काही करता येतंय का तेही बघ ूया. अध्यात्म-अध्यात्म म्हणजे दुसरं काय असतं?
वानप्रस्थाश्रमाचा हाच तो विचार, असं आजी सांगायची. यात्रा पूर्ण करून घरी परत येईपर्यंत ते जोडपं प्रगल्भ झालेलं असायचं आणि नवपरिणित जोडपंही विवाहाच्या नव्या नात्यात स्थिरस्थावर झालेलं असायचं. दुसरीकडे त्यांनाही आपल्या जबाबदाऱ्यांची प्रत्यक्षात जाणीव व्हायची. कुटुंबव्यवस्था टिकून राहायलाच नव्हे तर सशक्त राहायलाही याची मदत व्हायची. आमची आजी फार शिकलेली नव्हती, पण ती स्वत: असा वानप्रस्थाश्रम आजोबा असताना आणि ते गेल्यानंतरही जगली आणि या व्यवहारोपयोगी  शिक्षणाचा, शहाणपणाचा वारसा आम्हाला देऊन गेली.
तुलनेने कमी असली तरी काही जोडपी, एकएकटी माणसं असा सुजाण वानप्रस्थाश्रम जगताना आजूबाजूला दिसतात. माझ्या आईच्या मैत्रिणींना त्यांच्या सहचरासमवेत असा आदर्शवत वानप्रस्थाश्रम जगताना मी जवळून पाहिलं-अनुभवलं आहे. शाळेतून निवृत्त झालेल्या माणिकमावशीनं आपल्या बागकामाच्या छंदात स्वत:ला इतकं वाहून घेतलं की नंतर कंपन्यांमध्ये झाडं बदलत ठेवण्याचा व्यवसायच मागणीवरून सुरू झाला. तिनं अनेक पुरस्कारही मिळवले. दोघांनी मिळून मूलबाळ नसलेल्या आपल्या बहिणीच्या विधुर यजमानांना शेवटपर्यंत छान सांभाळलं.
 आमच्या बॅडमिंटन ग्रुपमधल्या एका काकांनी तर एकत्र कुटुंबात राहून निवृत्तीचं जीवन किती समाधानानं  आणि सृजनशीलतनं जगायचं याचा वस्तुपाठच घालून दिला. घरासाठी, कुटुंबासाठी कुठला वेळ आणि कुठली कामं. पत्नीसाठी कुठला वेळ आणि कोणते उपक्रम/ छंद (दोघांनी मिळून ठरवलेले), स्वत:साठी कोणता वेळ आणि उद्योग याचं काटेकोर नियोजन आणि पालन शेवटपर्यंत केले. ते अत्यंत आनंदी आणि रचनात्मक आयुष्य जगले. घरकामांबरोबर व्यायाम, खेळ, बागकाम, मित्रमंडळ, नाटक-चित्रपट-प्रदर्शन अशा अनेक सांस्कृतिक गोष्टींचा आस्वाद, पर्यटन आणि हिमालयातले असंख्य ट्रेक्स् त्यांनी केले. पती-पत्नीने लग्नाचा प्रत्येक वाढदिवस मुलांनी बुकिंग करून दिलेल्या ठिकाणी चार दिवस राहून एकत्र साजरा केला. स्वत:पेक्षा ज्येष्ठ असलेल्यांचा सांभाळही केला. वानप्रस्थाश्रमात राहून गृहस्थाश्रमाची गरजेपुरती जबाबदारी सांभाळण्याचा इतका उत्तम मेळ क्वचितच कुणी घातला असेल. दुसऱ्या एका काकूंनी स्वत: कम्प्युटर शिकून घेतलाच पण पतीलाही शिकवला. आज दोघंही परदेशातल्या आपल्या नातवांशी गप्पा मारतात. सुनेला मार्गदर्शनही करतात.
हेमामावशी आणि सानेकाका (तिचे यजमान) या दोघांनी मिळून कितीतरी सामाजिक चळवळी, उपक्रम यांना अमूल्य मदत, सहकार्य केले, सहयोग दिला. जोडीदाराच्या पश्चातही या माणसांनी स्वत:ला आपापल्या उद्योगात छान गुंतवून ठेवत, एकटेपणावर मात केली आहे.
   आपल्या नातवंडांना सांभाळणारं एक असं जोडपं मला माहीत आहे की आजी-आजोबांच्या भूमिकेकडेच परमार्थ म्हणून बघतात! म्हटलं तर ते लहान मुलाचं सर्व करतात; पण तितक्याच सहजतेने मुलांच्या आई-वडिलांनी त्याचा ताबा घेतल्यावर त्यातून सहज निवृत्तही होतात. आपापल्या उद्योगांमध्ये गुंतून जातात. स्वत:च्या नातवंडांपलीकडे जाऊन अनाथ मुलांचा सांभाळ निवृत्तीनंतर करणारं एक ज्येष्ठ वयाचं जोडपं पुण्यात निरलसपणे हे काम अनेक र्वष करत आहे. ते दोघे म्हणतात की हाच आमचा भक्तिमार्ग आहे आणि तो आम्हाला खूप समाधान देतो. आमची नातवंडं येतात तेव्हा तीही या मुलांमध्ये अगदी सहज मिसळून जातात. वृद्धापकाळात यापेक्षा दुसरं समाधान ते कोणतं?
एकटेपणावर मात करत, संसारात राहूनही अतिशय कार्यक्षम आयुष्य अत्यंत समाधानाने जगणारी अजून एक व्यक्ती म्हणजे आमच्या आय.पी.एच.च्या थत्ते मॅडम! त्यांचे यजमान त्यांची मुलं लहान असताना अगदी अचानक गेले. एकीकडे संसाराची जबाबदारी आणि दुसरीकडे नोकरी सांभाळत स्वत:ची (आणि त्याबरोबर इतरांचा!) विकास असा दुहेरी प्रगती करणारा समांतर प्रवास मॅडम गेली २५-३० र्वष विनातक्रार करत आहेत; तोही सर्वाना सोबत घेऊन. त्यांची कुणाबद्दल आणि कशाही बद्दल कधीच तक्रार नसते; ना कुणाची त्यांच्याबद्दल! कोणत्याही वयाच्या, कोणत्याही क्षेत्रातल्या, कोणत्याही पातळीवरच्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांचं छान जमतं. अनेक शस्त्रक्रियांना सामोऱ्या जाऊनही त्यांचा कोणत्याही बाबतीतला उत्साह जराही कमी झालेला नाही! घरबसल्या संगणकावरून त्यांची सर्व कामं स्वत: करण्यापासून अफाट वाचन, स्वयंपाक, सामाजिक कामे,ते त्यांच्या मानसशास्त्र या विषयाशी संबंधित असंख्य उपक्रमांपर्यंत. त्यांच्या गच्चीमधील बागेतील बागकाम, मैत्रिणींच्या ग्रुपचं गेट टुगेदर किंवा आमच्या सहलींमध्ये नाचगाण्यापर्यंत, मॅडम काहीही करू शकतात आणि तेही अत्यंत सहजतेने! अगदी आज वयाच्या ७३ व्या वर्षीही!  इतका सशक्त, समृद्ध वानप्रस्थाश्रम इतक्या जिवंतपणे, आनंदानं आणि समाधानानं जगणारी दुसरी व्यक्ती मिळणे दुर्मीळ. त्यांच्या सहवासात राहिलं आणि आपली बॅटरी रिचार्ज झाली नाही, असं होणं शक्य नाही.
काळ वेगानं बदलत आहे. आज नवा वाटणारा जमाना बघता-बघता कालबाहय़ केव्हा होतोय हेही कळेनासं झालंय. इतक्या वेगानं बदलणाऱ्या पिढय़ांमध्ये प्रचंड वैचारिक अंतर असणार हे उघड आहे. दोन पिढय़ांना उभारणारा पूल उभारून यात आपल्या ज्येष्ठ पिढीचीच दमछाक होणार आहे. तरुण पिढीसमोर सतत नवनवी आव्हानं आहेत. ती सांभाळताना, त्यांच्या व्यावसायिक जगाशी जुळवून घेताना नवी पिढी अधिकाधिक व्यावहारिक बिनचेहऱ्याची होत चालली आहे. व्यावसायिक जग आणि घरचं जग हे कप्पे करताना त्यांना जड जातंय. अशा वेळी नातेसंबंधाची वीण घट्ट ठेवणारं चेहऱ्यांचं जग आपल्याला जपायचं आहे; पण आपली भावनिक गुंतवणूक त्यात होऊ न देता! नाहीतर आपल्यालाच त्रास अधिक. वानप्रस्थाश्रमातली ही सर्वात अवघड पायरी! संन्याश्रमाची पूर्वतयारी मानसिक आणि भावनिक निवृत्ती सर्वानाच मन:स्वास्थ देणारी. एकनाथ महाराजांनी म्हटले आहे, ‘ऐसे असावे संसारी। जोवरी प्राचीनाची दोरी॥’ पक्षी अंगणात येतात, दाणे टिपतात आणि उडून जातात, तसे आहे. आपले कुटुंब; हे आपण सर्वानीच ध्यानात ठेवायला हवे.
  आपल्या माणसांना आपण हवेहवेसे वाटण्यासाठी थोडं अंतर ठेवून जगणं यातच शहाणपण आहे. वेगानं बदलणाऱ्या काळाबरोबर जगण्याचे संदर्भ जर बदलत असतील तर आपणही नव्या जीवनवाटा निवडायला हव्या. आयुष्याची उरलेली पायवाट जोडीदाराच्या साहाय्यानं अथवा एकटय़ाने अर्थपूर्ण जगण्यासाठी मनाची तयारी आधीपासून करायला हवी. स्वविकासाच्या वाटेवर चालताना, वळणं अवघड वाटली तरी ती ओलांडल्यावर एक नवं, सुंदर जग समोर येण्याची केवढी तरी शक्यता आहे ना! त्यामुळे, स्वत:लाच प्रश्न विचारत (चाळिशीनंतर आपल्याला नेमकं कसं जगायचं? कण्हत की गाणं म्हणत?), स्वत:चीच अर्थपूर्ण उत्तरं शोधूया नि वानप्रस्थाश्रमातील आपलं उत्तरायण सुफल, संपूर्ण करूयात..    
chaturang@expressindia.com