समाजातल्या वृद्धांच्या दाहक अनुभवांवर मायेची आभा पसरवणं, त्यांनाही आनंदाने जगता यावं यासाठी डॉ. रोहिणी पटवर्धन यांनी याच विषयात पीएच.डी. केली, आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यातून खानापूर येथे वास्तू उभारली गेली. अनेक उपक्रम राबविल्या जाणाऱ्या स्नेहाची आभा पसरवणाऱ्या ‘सनवर्ल्ड फॉर सीनियर्स’विषयी..
गोष्ट पन्नास वर्षांपूर्वीची! प्रसंग अगदी साधा. एक आई आपल्या शाळकरी मुलांना एक रुपया देऊन मंडईत पाठवत असे. या एका रुपयात मुलांनी तिला दोन दिवस पुरेल इतकी भाजी आणून द्यायची. त्यामध्ये पालेभाजी, फळभाजी, कोशिंबीर, चटणी या सगळ्याचा विचार करून त्या त्या प्रमाणात भाज्यांची निवड करायची. व्यवस्थापन शास्त्राचा हा कृतिशील वस्तुपाठ! एकदा त्या आईच्या लेकीला वर्गातली एक मैत्रीण भेटली. तिला पैशांची खूप अडचण होती. तिला गरज होती जेमतेम चार आण्यांची! पण हातांतल्या रुपयात दोन दिवसांच्या भाजीचा हिशोब बसवायचा तर मैत्रिणीला चार आणे देऊ करणं कठीणच होतं. घरी आपल्यावर लेकीने आईला हे सांगितलं तेव्हा आई म्हणाली, ‘अगं एक दिवस पिठलं केलं असतं. पण द्यायचे तिला पैसे! यापुढे लक्षात ठेव. आपल्या हातून सहजपणे कुणाचं चांगलं होत असेल तर फार विचार करत बसू नये!’
दातृत्वाच्या संस्कारांची बाळगुटी अशी बालवयांत चाटवली की जाणत्या वयात ते दातृत्व चहु अंगांनी उमलतं, फुलतंय. मग कार्याला क्षेत्राचं बंधन उरत नाही. विषयांच्या मर्यादा पडत नाहीत. पुण्याच्या डॉ. रोहिणी पटवर्धन यांचं हे बोलकं उदाहरण. आईच्या संस्कारांतून सहृदयशीलीतेचं बीज त्यांच्या मनांत रुजलं आणि त्यातून उभा राहिला एक अनोखा प्रकल्प, ‘सनवर्ल्ड फॉर सिनियर्स’ या सहनिवासाची वास्तू मूळची एका सेवाभावी संस्थेची. तिची बांधणी अत्यंत कल्पक आहे. लालचुटूक भिंती, कमानीवर उतरती घरं, प्रशस्त खोल्यांसमोर चहुबाजूंनी बाल्कनी, मधोमध मोकळं आवार आणि सुंदर, सुवासिक फुलांनी फुललेला बगिचा इतक्या विलोभनीय वास्तूचं नाव ‘सनवर्ल्ड’ अर्थात ‘सूर्यजगत’ का? तर सूर्याच्या उगवण्यातील सातत्य, सर्वावर समानतेची पाखर आणि नवनिर्मितीची ऊर्जा! ज्येष्ठांसाठी कार्य उभं करायचं ते त्याच संकल्पनेवर, हा डॉ. रोहिणीताईंचा मूलभूत विचार. शिक्षण क्षेत्र, शेती व उद्योगशीलतेचा विलक्षण मिलाफ असलेल्या डॉ. रोहिणीताईंनी, ‘वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापनाचा आकृतिबंध आणि व्यवस्थापनातील समस्यांचा अभ्यास’ त्या विषयावर पीएच.डी. केलं. हा अभ्यास करताना त्यांना वृद्धाश्रमातील त्रुटी प्रकर्षांने जाणवल्या. मर्यादित जागा, साचेबंद दिनक्रम, एकारलेलं आयुष्य आणि सर्वच वृद्धांच्या मनांतील नाकारलं गेल्याची कटुता. पीएच.डी.बरोबर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून वृद्धकल्याण शास्त्राची पदविका आणि इंटरनॅशनल ट्रेनिंग ऑन सोशल जेरेन्टॉलॉजी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण घेत असताना ज्येष्ठांना गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता यावं अशी निवास व्यवस्था उभी करावी हे स्वप्न त्यांनी पाहिलं. त्यासाठी उरळीकांचनला जागाही घेतली. पण दरम्यान खडकवासला धरणालगतची डोणजे पानशेत मार्गावरील खानापूर गावातील ही तयार वास्तू मिळाली आणि स्वप्न सत्यात उतरलं. अल्प मोबादल्यात ज्येष्ठांसाठी कायमस्वरूपी, गरजेपुरतं वास्तव्य व विरंगुळ्यापुरतं रमणीय स्थळ अशा तीन प्रकारच्या निवास व्यवस्थेची सोय त्यांनी इथे केली.
बहुतेक वृद्ध घरांत राहणेच पसंत करतात. पण कधीकधी मुलांना काही काळासाठी परगावी, परदेशी जावं लागतं. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर राहावं लागतं. वृद्ध जर परावलंबी, व्याधीग्रस्त असतील तर त्यांच्या देखभालीसाठी विश्वासू माणसं मिळत नाहीत. अशा वेळी कायमस्वरूपी अथवा गरजेपुरतं का होईना त्यांना सुरक्षित हाती सुपूर्द करणं कुटुंबीयांना सोयीचं असतं. अर्थात अनुभवाअंती असंही लक्षात आलंय की वृद्धांना एकदा इथे आणून टाकलं की मुलं पुन्हा फिरकतही नाहीत. त्यासाठी प्रवेश देताना एका स्थानिक पालकाचा पत्ता व फोन नंबर घेतला जातो. त्याने वरचेवर येऊन भेटून जाणं बंधनकारक असतं. एखादी व्यक्ती अचानक आजारी पडली तर जवळच प्रॅक्टिस करणाऱ्या
डॉ. शहांना बोलवलं जातं. गावातील उत्तम अशा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका येऊन त्यांना तिथे दाखलही केलं जातं. परंतु तशी वेळ आल्यास हे काम नातलगाने करावं अशी अपेक्षा असते. कारण त्या ज्येष्ठ व्यक्तीच्या वैद्यकीय उपचारासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार नातलगांनाच असतो. बरेचदा प्रवेशापूर्वी ज्येष्ठांच्या परिस्थितीची नीटशी कल्पना दिली जात नाही. एका आजोबांचा मलमूत्र विसर्जनावर ताबा नव्हता. पण ते सांगितलं न गेल्याने त्यांनी एका दिवसात सर्व परिसर अस्वच्छ केला. एका माजी पोलीस कमिशनर आजोबांना- आजीला त्यांच्या मुलांनी फसवून इथे आणून टाकलं. ते दोघेही रात्रीच्या वेळी दार उघडून पळून गेले. म्हणूनच ज्येष्ठांची तब्येत ठीक असेल, सवयी चांगल्या असतील आणि त्यांनी इथलं वास्तव्य मन:पूर्वक स्वीकारलं असेल तरच त्यांना इथे प्रवेश दिला जातो.
डॉक्टर रोहिणीताईंनी वृद्ध व्यवस्थापनशास्त्राचा सखोल अभ्यास केलेला आहे. म्हणूनच त्या विविध विषयांवर इथे समृद्ध जीवन कार्यशाळा घेत असतात. मोकळं वातावरण विविध उपक्रम आणि ज्येष्ठांचं आपसातील साहचर्य यामुळे या तीनदिवसीय कार्यशाळांचा ज्येष्ठांच्या मनावर अनुकूल परिणाम होत असतो. वेगवेगळ्या खेळांद्वारे त्यांना भावनांच्या प्रकटीकरणाची संधी मिळते. उदा. ज्येष्ठांना बंद दाराचं चित्र दिलं जातं. तुम्ही मनात आणाल तर तुम्हाला हवी ती व्यक्ती तिथून येईल. तुम्हाला कोण व का यावंसं वाटतं ते एका कागदावर लिहून द्या, असं सांगितल्यावर नातू, मुलगा, जुनी मैत्रीण अशी नावं लिहिली जातात व मोकळेपणाने बोलण्यासाठी ती व्यक्ती यावी असंही लिहिलं जातं. असं कोणीही किंवा अशा जागाच आज ज्येष्ठांसाठी उरल्या नाहीत हेच त्यांतून स्पष्ट होतं. पण याला कुटुंब, समाज, नातेवाइकांइतकेच ज्येष्ठ स्वत:ही जबाबदार असतात याची त्यांना रास्त जाणीव करून दिली जाते. टीव्हीवर कार्यक्रम हा वेळ घालवण्याचा उत्तम उपाय असला तरी त्यामुळे आपण एकटे एकाकी होत जातोय हे कोण लक्षात घेणार? यासाठीच तंदुरुस्त ज्येष्ठांनी वयस्क शेजाऱ्यासोबत वैद्यकीय तपासणीसाठी जाणं, गटाने एकमेकांना रुग्णालयात सोबत करणं, बँकेच्या अथवा पेन्शनच्या कामासाठी एकत्र जाणं हे सहजशक्य आहे, याचं मार्गदर्शन त्या कार्यशाळांत करण्यात येतं.
वृद्धापकाळाची पुनर्बाधणी मानसिक स्तरावर व्हावी यासाठी इथे एक समुपदेशन केंद्र चालवलं जातं. एका आजोबांनी पत्नी व मुलांच्या नावांवर घर ठेवलं. मृत्यूपूर्वी त्यांनी तिला ‘तू कोणत्याही कागदावर सही करू नकोस,’ असं बजावलं होतं. ते शब्दश: ग्राह्य़ मानून आज ही आजी मुलांनी विकसित केलेल्या घरात छान राहण्याऐवजी स्वत:च्या वाटणीच्या एका खोलीत गैरसोय सोसून राहते. नाशिकच्या आठले आजीचा मुलगा तिचा खूप छळ करत होता. तिला मारहाण करून चटके देत होता. त्यांनी अध्र्या रात्री घर सोडलं. ओळखीने इथे आल्या. त्यांची केस पाहून ‘वृद्ध अवहेलना’ या प्रश्नाची त्यांना तीव्र जाणीव झाली. समाजालाही या ज्वलंत प्रश्नांची जाणीव व्हावी या हेतूने डॉक्टर रोहिणीताईंनी या संकल्पनेवर कार्यशाळा सुरू केल्या. अशाच एका कार्यशाळेत सुर्वे आजी दाखल झाल्या. ‘माझ्याइतकी सुखी जगात कोणी नाही’ हे त्या सर्वाना सातत्याने दर्शवत होत्या. परंतु कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात अनुभव कथनाच्या कार्यक्रमांत सुर्वेआजी धाय मोकलून रडू लागल्या. आपल्याला मुलांनी इतकं छळलं की शेवटी कोर्टात जाऊन न्याय मिळवावा लागला, हे धगधगीत सत्य त्यांनी सर्वासमोर मांडलं तेव्हा सगळेच हेलावून गेले. अशा कार्यशाळांमधून स्वमदत गटाची स्थापना केली जाते. अशा गटांमध्ये एकमेकांशी संवाद साधला की समस्येवर मार्ग तर सापडतोच. शिवाय अशा स्वमदत गटांनी मुलांवर दबाव टाकला, ज्येष्ठांच्या सेवाभावी संस्थांची व पोलिसांची मदत घेतली तर अशा असहाय वृद्धांना आधार मिळू शकतो.
साठी उलटलेल्या वृद्धांसाठी ‘केवळ’ साठी उलटली म्हणून वय झालं म्हणत आयुष्यातून मनाने निवृत्त होण्याची गरज नाही, हे पटवणारी एक अभिनव कार्यशाळा घेण्यात येते. अशा कार्यशाळेतील नित्याचा अनुभव असा की ग्रुप अॅक्टिव्हिटीजमध्ये बायका उत्साहाने भाग घेतात. उखाणे घेतात. कविता म्हणतात. नाटुकली सादर करतात तर पुरुष अनेकदा ठोकळ्यासारखे बाजुला बसून राहतात. हे चित्र पालटण्याची आज खूप गरज आहे. ज्येष्ठांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्नही इथे होतोच. इथले ९१ वर्षांचे आजोबा. ८९ वर्षांच्या आजी! माझं वय झालंय. मला आता काहीही होत नाही म्हणणारे आजोबा, आजीच्या हातची आमटी हवी, तिनेच हात धरून बाथरूमध्ये न्यावं, असा आग्रह धरतात तेव्हा आजीचंही वय झालंय हे लक्षातच घेत नाही. ज्येष्ठांच्या अशा मानसिकतेवर इथे तज्ज्ञांकरवी समुपदेशन केलं जातं.
ही रमणीय वास्तू ज्येष्ठांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना निवासी कार्यशाळांसाठी किंवा ज्येष्ठांसाठी सहस्रचंद्रदर्शन सोहळा यासाठी अल्प मोबदल्यात उपलब्ध करून दिली जाते. ज्येष्ठ अनेकदा तब्येतीमुळे एकटे घराबाहेर पडू शकत नाहीत म्हणूनच ज्येष्ठांच्या ग्रुपला एकदिवसीय सहलीसाठी ही वास्तू अल्प मोबदल्यात दिली जाते.
ज्येष्ठांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर कोवळ्या सूर्यकिरणांची स्वयंप्रकाशी आभा पसरावी हा ‘सनवर्ल्ड’चा हेतू इथे प्रत्यक्षात साकार होताना दिसतो.
‘सनवर्ल्ड फॉर सीनियर्स’
द्वारा : डॉ. रोहिणी पटवर्धन
पोस्ट खानापूर, डोणजे- पानशेत रोड,
पुणे- ४११०२५.
फोन : ०२०२५४३८०१२
९४२१०८११८१
E-mail- elderearesolution@gmail.com
http://www.sunworldforseniors.com
ऑफिसचा पत्ता :
१२७/ १ , ‘पुण्याई’, पौड रोड, पुणे. ४११०३८.