|| अर्चना जगदीश

सिंथिया मॉसने ओरिया आणि इयान डग्लस हॅमिल्टनच्या पावलावर पाऊल ठेवत किलिमांजारो पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आंबोसेली इथं चौदा वर्षे राहून आफ्रिकन हत्तीवर मूलभूत संशोधन केलं. हत्ती हुशार, बुद्धिमान, उत्कट, मजेशीर प्राणी असतात, त्यांचं परिसराचं ज्ञान कमालीचं अचूक असतं, ते एकमेकांशी दूरवरून संपर्क साधू शकतात, अशा अनेक तोपर्यंत माहीत नसलेल्या गोष्टी जगाला कळाव्यात म्हणून त्यांच्या सर्व भावभावनांचे आपल्याला आलेले अनुभव ‘एलिफन्ट मेमरीज’ या ग्रंथात तिने शब्दबद्ध केले आहेत. त्या सिंथिया मॉस आणि गजकथांविषयी..

भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून निसर्ग संवर्धनाबद्दल सांगते आहे. कधी ते देवराई आणि निसर्गपूजनाच्या परंपरांमधून समोर येतं तर कधी आपल्या रोजच्या जीवनाचा भाग होऊन गेलेल्या गणेशासारख्या दैवतांच्या प्रतीकातून अधोरेखित होतं. गणेश हा देव स्थळ-काळ-देश आणि इतिहासाच्याही सीमा ओलांडून सहज मनामनात पोहोचला. वैदिक काळात गणपतीचा फक्तउल्लेख होता, पण नंतर या देवतेचे नाते यक्षांशी, वन्य प्राण्यांशी, म्हणजे हत्ती, नागसर्प यांच्याशी जोडले गेले. पुढे त्याचा समावेश प्रमुख देवतांमध्ये झाला. त्याचे नामस्मरण प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी महत्त्वाचे बनले. गणपती आणि निसर्ग यांचा संबंध पुरातन काळापासून महत्त्वाचा आहे. त्यात प्राण्यांबरोबर शमी, दूर्वा, हळद, जास्वंदी यांसारख्या वनस्पतीही आहेत. मध्ययुगीन मराठी काळात त्याचे महत्त्व अपरंपार वाढले आणि त्याची अनेक स्तवनं, स्तोत्रं-आरत्या लिहिल्या गेल्या.

गणेशाचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्याला जसा आकार देऊ तसा तो आकार घेतो आणि त्याचे गणपती असणे कायम राहते. हे मुख्यत: त्याच्या गजमुखामुळे. गणपतीला हत्तीचे मस्तक का मिळाले याबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. गणपतीच्या मूर्तीचे वर्णन ‘मत्रयणी संहिते’त आले आहे. व्यासमुनींचा लेखक, चौसष्ट कला-विद्यांचा अधिष्ठाता, शिव पार्वतीचा पुत्र आणि काíतकेयाचा भाऊ म्हणून फक्त महाराष्ट्र-भारतातच नव्हे तर जगभर त्याच्याबद्दल कुतूहल आणि प्रेम आहे. गणपती आणि हत्ती हा संबंध लहानपणापासून प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजलेला असतो. हत्ती बघितलेला नाही, असा भारतीय सापडणं आजही अवघड आहे. आपण हत्तीची पूजा करतो गणपतीशी त्यांचा संबंध गृहीत धरून. पूर्वी हत्ती घेऊन गावोगाव फिरणारे साधू असत, दक्षिणेतल्या अनेक मठ-देवस्थानांत हत्ती असायचे. म्हैसूरच्या दसऱ्याची हत्तीची मिरवणूक बघण्याची प्रत्येक पर्यटकांची इच्छा असते. हत्ती पकडण्याची ‘खेड्डा पद्धत’ १९७३ मध्ये ‘वन्य प्राणी अधिनियम’ लागू झाल्यावर बंद झाली. हत्तींच्या माध्यमातून अवजड मालाची वाहतूक आदी करण्याची कामेदेखील बंद झाली. पण हत्तींचा वनवास संपला नाही.

एकीकडे हत्तीचं प्रतीक असलेला, परंपरेने स्वीकारलेला देव, म्हणजे गणपती, सर्व समाजाने स्वीकारला आणि दुसरीकडे त्या वन्य प्राण्याच्या दुर्दशेकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही हा विरोधाभास दिवसेंदिवस जास्त पक्का होत चालला आहे. म्हणूनच परंपरेने अरण्ये म्हणजे देवराया तुटतात, तिथली देवळं टोलेजंग होतात, अनेक प्रजाती वाचवण्याचा आटापिटा केला जातो. कोटय़वधी रुपये खर्च होतात, पण त्याच वेळी या प्रजातींचा अधिवास जास्तीत जास्त वेगाने आकसत जातो. गणेशासारख्या बुद्धीच्या देवतेला ज्याचं मस्तक लावलं गेलं, तो हत्ती खरोखर बुद्धिमान असतो. भारतीय उपखंडात गेली अनेक शतके हत्तीचा युद्धासाठी आणि इतर अनेक कामांसाठी, तसेच समृद्धीचं प्रतीक म्हणून खूप वापर होत आला आहे. थायलंड म्हणजे पूर्वीच्या सयाममध्ये तसेच इतरही अनेक आशियाई देशांच्या संस्कृतीमध्ये हत्तीला फार महत्त्व होतं. सयामचे पांढरे हत्ती म्हणजे तर दंतकथाच.

इतकं सगळं असूनही हत्तीचं संरक्षण होत नाही आणि हस्तिदंतासाठी चोरटी शिकार जगात कुठे ना कुठेतरी रोज होत असते. जंगल आणि प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चाललेत आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहोचलाय. म्हणूनच हजारो वर्षांपासून ज्याला आपण दैवताचे स्वरूप दिले, त्या हत्तीची परिस्थिती काय आहे आणि त्यांचे अधिवास जपून ठेवणं कधी नव्हे इतकं महत्त्वाचं आहे; यावर चर्चा आणि उपाय व्हायला हवेत.

हत्ती म्हणजे जमिनीवरच्या सस्तन प्राण्यांमध्ये सगळ्यात अवाढव्य, बुद्धिमान प्राणी. हत्ती कळपाने राहतात आणि आशियाई हत्ती आफ्रिकन हत्तीपेक्षा माणसाळवायला सोपा असतो यापलीकडे त्याबद्दल फारशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नव्हती. म्हणूनच जगभरातल्या संशोधकांमधे या प्राण्याबद्दल अधिक जाणून घेण्याचं सुरुवातीपासूनच अपार कुतूहल होतं. तोपर्यंत, म्हणजे साधारण १९७०च्या दशकापर्यंत पाश्चिमात्य संशोधक आणि प्रवाशांनी आफ्रिकेबद्दल खूप माहिती जगासमोर आणली होती. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात हत्तीचा मागोवा घेणं सहज शक्य होतं. त्याच सुमारास जेन गुडालसारख्या स्त्रिया तिथे प्रत्यक्ष राहून प्राण्यांचा अभ्यास करत होत्या. म्हणूनच १९७४-७५ पासून आफ्रिकेत दक्षिण केनियामधलं ‘आंबोसेली राष्ट्रीय उद्यान’ आफ्रिकन हत्ती संशोधनाचं महत्त्वाचं केंद्र बनलं होतं. इयान आणि ओरिया डग्लस हॅमिल्टन यांनी याच पार्कमध्ये प्रत्यक्ष राहून अनेक वर्षे हत्तींची वागणूक आणि समाजजीवन यांचा अभ्यास केला होता. इथल्या १७५ चौरस किमीमधले सगळे हत्ती त्यांच्या शारीरिक आणि वागणूक वैशिष्टय़ांसह ओरिया ओळखत असे. तिच्या संशोधनाने अनेक स्त्री संशोधक या कामाकडे वळल्या आणि पाश्चिमात्य जगाला हत्तीची, विशेषत: आफ्रिकन हत्तीची, नव्याने ओळख होऊ लागली.

सिंथिया मॉसने ओरिया आणि इयान डग्लस हॅमिल्टनच्या पावलावर पाऊल ठेवत किलिमांजारो पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आंबोसेली इथं चौदा वर्षे राहून आफ्रिकन हत्तीवर मूलभूत संशोधन केलं. हत्ती हुशार, बुद्धिमान, उत्कट, मजेशीर प्राणी असतात, त्यांचं परिसराचं ज्ञान कमालीचं अचूक असतं, ते एकमेकांशी दूरवरून संपर्क साधू शकतात, अशा अनेक तोपर्यंत माहीत नसलेल्या गोष्टी जगाला कळाव्यात म्हणून त्यांच्या सर्व भावभावनांचे आपल्याला आलेले अनुभव ‘एलिफन्ट मेमरीज’ या सुंदर ग्रंथात तिने शब्दबद्ध केलेत.

हत्तींच्या प्रजननाबद्दल आणि वयस्कर माद्यांच्या जबाबदार नेतृत्वाबद्दल तिने हजारो तास निरीक्षणं केली. तिच्या चौदा वर्षांच्या काळात तिने हत्तीचे कळप सुखाने नांदताना पहिले. त्यांच्या पिढय़ा वाढताना बघितल्या नि अवघड परिस्थितीत तगून राहताना बघितल्या. मसाईंच्या शिकारीला, चोरटय़ा शिकारीच्या पाठलागांना तोंड देताना बघितल्या. अमेरिकत १९४० मध्ये जन्मलेली सिंथिया १९६८ पासून आजपर्यंत आंबोसेली आणि आफ्रिकेतच आहे.

हत्तीचा मागोवा घेत सिंथियाने आपल्या कारकीर्दीची सुरुवात ‘न्यूजवीक’मध्ये बातमीदार म्हणून केली. पुढे ‘आंबोसेली हत्ती संशोधक केंद्रा’ची संचालक, ‘आंबोसेली हत्ती संवर्धन ट्रस्ट’ची संचालक अशा अनेक पदांवर तिने काम केलं आहे. ती ‘न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटी’ची फेलो आहे. हत्तींबरोबरच आफ्रिकेतल्या इतर प्राण्यांवरही तिने विपुल लेखन केले आहे. म्हणूनच स्त्रियांच्या, निसर्गाबद्दलच्या संवेदनशीलतेबद्दल पुन:पुन्हा लिहावंसं वाटतं कारण त्यांचं लिखाण निर्मळ, प्रामाणिक काळजीतून आलेलं असतं. आज तर अशा संवेदनशील लिखाणाची आणि त्यातून होणाऱ्या जाणीव-जागृतीची खूप गरज आहे. सिंथियाने तिच्या संशोधन काळात आणि पुढेदेखील हत्तीची वाताहत, हस्तिदंतासाठी सतत चाललेली शिकार बघितली आणि आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ती हत्ती आणि त्यांचे अधिवास वाचवण्यासाठी काय करता येईल यावरच काम करते.

सिंथिया मॉसबरोबरच आंबोसेलीलाच काम सुरू केलेल्या कॅथरीन पायनेने हत्ती संवाद कसा साधतात आणि त्यांच्या संदेशवहनावर मूलभूत संशोधन केले. हत्तीचे मोठाले कळप अनेकदा अचानक थांबतात, सगळे अगदी एकाच क्षणी सारखाच आवाज करतात, कोणताही आवाज येत नसताना दचकतात, कुणाची तरी वाट बघतात, अशा अनेक गोष्टींची तिने निरीक्षणं केली आणि त्यावरून हत्तीची, माणसाला न समजणारी आपल्या कानाच्या क्षमतेपलीकडची संवादक्षमता हत्तीकडे असली पाहिजे हे तिला जाणवलं. कॉन्रेल विद्यापीठात कॅथरीनने आधी व्हेल मासे समुद्रात कसा संवाद साधतात याचाही अभ्यास केला होता. हत्तींच्या शेकडो हालचाली आणि इन्फ्रारेड म्हणजे आपल्याला न ऐकू येणाऱ्या पट्टीतले आवाज.

आंबोसेलीमधेच दोन-तीन वर्षे सतत ध्वनिमुद्रित केले आणि पुढे त्यांचं पृथक्करण केलं. हत्ती दूरवरून एकमेकांना संदेश पाठवतात, दूरच्या नातलग कळपांशी संपर्क ठेवतात, पाण्याच्या उपलब्धतेबद्दल एकमेकांना कळवतात, अशा अनेक वैचित्रपूर्ण आणि महत्त्वाच्या गोष्टी त्यातून पुढे आल्या. कॅथरीनदेखील ‘न्यूयॉर्क झूलॉजिकल सोसायटी’ची फेलो आहे. ‘एलिफंट्स कॉलिंग’ हे तिचं लहान मुलांसाठीचं पुस्तक आणि ‘सायलेंट थंडर’ हे हत्तीच्या संवादावरचं पुस्तक खूप गाजलं. हत्ती एकमेकांशी पाच किलोमीटरवर ऐकू जाईल इतक्या मोठय़ाने बोलत असतात हेदेखील तिनेच पहिल्यांदा सिद्ध केलं.

हत्तीबद्दल मूलभूत संशोधन करणाऱ्या या दोघींना गणेशोत्सवानिमित्ताने सलाम करायला हवा. ओरिया हॅमिल्टन आणि या दोघींच्या संशोधावरच पुढचं हत्ती संशोधनाचं काम तयार झालं. त्याचा उपयोग हत्ती संरक्षणासाठी कसा करता येईल यावरही काम सुरू झालं. आफ्रिकन हत्तींवरच जास्त संशोधन झालं, कारण गवताळ प्रदेशात त्यांचा मागोवा घेणं सोपं असतं. त्यामानाने आशिया खंडातल्या हत्तींचा जंगलात मागोवा घेणं कठीण. शिवाय हत्तीची चोरटी शिकार, हस्तिदंताचा व्यापार या गोष्टीही आफ्रिका खंडात अधिक वेगाने होत असत. महत्त्वाचं म्हणजे आशियाई हत्तींना परंपरेने धार्मिक महत्त्व दिलेलं असल्यामुळे त्यांचं सहज संरक्षण होत असणार असा गरसमज. धार्मिक आणि पारंपरिक महत्त्वामुळे संशोधन करण्यात अडचणी येतील असंही संशोधकांना वाटत असणार, म्हणून आशियाई हत्तीवर सुरुवातीच्या काळात असं शास्त्रीय संशोधन झालं नव्हतं. अर्थात, आशियाई हत्तीचं सांस्कृतिक, धार्मिक आणि समाजजीवनातलं महत्त्व सांगणारे अनेक प्राचीन आणि अर्वाचीन ग्रंथ उपलब्ध आहेत. इथे हत्तींची पूजाही होते आणि शिकारही होते. हत्ती शेतीचं नुकसान करतात म्हणून त्यांना हाकलून लावतात, पण तेही आधी दुरून त्यांची पूजा करून.

हा सगळा असा विरोधाभास. वाढतं शहरीकरण आणि विकासाचा रेटा यामुळे हत्तीचे अधिवास आशियाई देशांत वेगाने नष्ट होत चाललेत आणि आशियाई हत्ती आता दुर्मीळ होत चाललाय. इथल्या दाट लोकवस्तीच्या भागातल्या अभयारण्यांमधून हत्ती आणि माणूस यांच्या संघर्षांच्या गोष्टी सातत्याने पुढे येत आहेत. पण अशा अवघड परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी, हत्तींना अभय देण्यासाठी आजही आफ्रिकी आणि आशिया खंडांत स्त्रियाच महत्त्वाचं संशोधन आणि संरक्षण असं सगळं जोखमीचं काम करत आहेत, त्याबद्दल पुढच्या ७ सप्टेंबरच्या लेखात.

(क्रमश:)

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com