स्त्री वादी चळवळीचं यंदाचं पन्नासावं वर्ष असलं तरी जगभरातील अनेक स्त्रिया त्याआधीपासूनच आपापल्या साहित्याच्या, कलेच्या माध्यमातून स्त्रीवादाला प्रोत्साहन देत आल्या आहेत. कणखर, स्वाभिमानी, निर्भय स्त्रिया त्यांनी साहित्यातून, कलाकृतीतून लोकांसमोर मांडल्या. त्यातल्याच एक पहिल्या जर्मन स्त्रीवादी सिनेदिग्दर्शिका ‘मार्गारेथा फोन ट्रोटा’( Margarethe von Trotta).

मार्गारेथा यांनी आत्तापर्यंत १५ चित्रपटांचं आणि अनेक टीव्ही मालिकांचं, तसंच माहितीपटांचं दिग्दर्शन केलं आहे. आज ८३व्या वर्षीही त्या या क्षेत्रात सक्रिय असून दोन वर्षांपूर्वीच, २०२३ मध्ये त्यांनी प्रसिद्ध जर्मन कवयित्री इंगबोर्ग बाखामान यांच्यावर माहितीपट बनवला. इतक्या सातत्यानं सिनेदिग्दर्शन करणाऱ्या स्त्रिया आजही विरळाच आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट पहिल्यापासून खूपच वाखाणले गेले.

जर्मनीत स्त्रीमुक्ती चळवळ तीन टप्प्यांत प्रगत झाली. आधी स्त्रियांच्या संघटना निर्माण झाल्या. १९२०मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९७०च्या दशकात ‘नव्या स्त्रीमुक्ती चळवळी’ची सुरुवात झाली. हे दशक मार्गारेथा यांनी आपल्या तरुणपणी अनुभवलं. याच दशकातल्या स्त्रियांची व्यक्तिचित्रं त्यांनी आपल्या चित्रपटांत उभी केली. मार्गारेथा यांनी १९७५ मध्ये ‘आत्मसन्मान हरवलेल्या काथारीना ब्लूम’ (Die verlorene Ehre von Katharina blum) या चित्रपटाने दिग्दर्शनाची सुरुवात केली ती श्ल्योन्डोर्फ या प्रसिद्ध दिग्दर्शकाबरोबर. त्यानंतर त्यांचं श्ल्योन्डोर्फशी लग्न झालं. पण पुढे त्यांनी स्वतंत्रपणे त्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. हा चित्रपट ‘हाइन्रिश ब्योल’ या नोबेल पुरस्कारप्राप्त कादंबरीकाराच्या छोट्या कादंबरीवर आधारित आहे. गुन्हेगाराशी संबंध असल्याच्या संशयावरून काथारीना या मध्यमवर्गीय स्त्रीची पोलीस अतिशय कठोर चौकशी करतात. वार्ताहरांचा ससेमिरा तिच्या मागे लागतो. तिचं चारित्र्यहनन केलं जातं. एक पत्रकार तिला इतका सतावतो की, शेवटी ती गोळ्या झाडून त्याची हत्या करते. काथारीनाची व्यक्तिरेखा मार्गारेथा यांनी अतिशय समंजसपणे आणि सहानुभूतीपूर्वक रंगवली आहे. स्त्रिया कित्येकदा पापाराझींच्या कशा ‘सॉफ्ट टार्गेट’ असतात आणि खप वाढवण्यासाठी काहींचा कसा बळी दिला जातो, हे मार्गारेथा यांच्या चित्रीकरणातून जाणवत राहतं.

मार्गारेथा यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेला ‘ख्रिास्ता क्लागेसला दुसऱ्यांदा जाग येते’ (Zweites Erwachen von Christa Klages) हा पहिला चित्रपट. हा पहिला जर्मन स्त्री-केंद्रित चित्रपट म्हणून ओळखला जातो. ‘स्त्रीवादी चित्रपट’ असा वेगळा विभाग नसताना १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला अनेक जर्मन आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. ख्रिास्ता क्लागेस म्युनिकमध्ये एक पाळणाघर चालवत असते. त्यासाठी तिला पैसे पुरत नसतात. म्हणून ती दोन मित्रांबरोबर बँकेवर दरोडा घालते. त्यातल्या एकाला पोलीस पकडून तुरुंगात टाकतात. दुसरा मित्र पळून जाताना मारला जातो. ख्रिास्ता पोर्तुगालमध्ये मैत्रिणीकडे, इंग्रीडकडे काही काळ राहते. त्यांच्यात जवळकीचे संबंध निर्माण होतात. बँकेची कर्मचारी लेना ख्रिास्ताला शोधत असते. कालांतराने ख्रिास्ता आणि इंग्रीड म्युनिकला परत जातात. पण पोलिसांना ख्रिास्ताचा सुगावा लागतो आणि ते तिला अटक करतात. गुन्हेगाराच्या ओळख परेडीच्या वेळी बँकेची कर्मचारी लेना ‘आपण हिला ओळखत नाही’ असं सांगते. १९७०च्या दशकात स्त्रियांची परिस्थिती कशी होती, त्या कितपत स्वतंत्र होत्या, समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता, आपल्या उपजीविकेचं साधन निवडून त्यांना कितपत स्वतंत्रपणे जगता येत होतं याबद्दल माहिती मिळते. मार्गारेथा यांनी या चित्रपटात स्त्रियांचं एकमेकींशी नातं, त्यांच्या भावना आणि त्यांच्या मनाचा कल यांची काटेकोर मांडणी केली आहे. स्त्री स्वातंत्र्याचा प्रश्न इथे केंद्रस्थानी आहे.

‘शिशासमान जडत्वाचा काळ’(Die bleierne Zeit) हा १९८१ मधला मार्गारेथा यांचा गाजलेला चित्रपट. त्याला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. या चित्रपटासाठी मार्गारेथा यांना व्हेनिसमधल्या ‘फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मानाचा ‘गोल्डन लायन’ हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री दिग्दर्शिका होत्या. या चित्रपटाला १९७०च्या दशकातल्या राजकीय घटनांचा संदर्भ आहे. काही अस्वस्थ जर्मन तरुण उग्रवादाकडे का आणि कसे वळले, याची ही गोष्ट आहे. दोन मुली आणि त्यांचा एक मित्र यांनी ‘रेड आर्मी फ्रॅक्शन’ (राफ) ही डावी उग्रवादी संघटना स्थापन केली आणि शस्त्र हातात घेतली. या संघटनेचे सभासद बँका लुटून, मोठ्या प्रतिष्ठित अधिकाऱ्यांचं अपहरण करून, काहींच्या हत्या करून पश्चिम जर्मन सरकारवर आणि दुसऱ्या महायुद्धात सहभागी वडिलांच्या पिढीवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. हा पश्चिम जर्मनीच्या इतिहासातला अस्वस्थ काळ होता.

‘शिशासमान जडत्वाचा काळ’ या चित्रपटाची गोष्ट आहे ती दोन बहिणींची. लहान बहीण मारियाना मृदू आणि मितभाषी आणि मोठी बहीण युलियाना ही बंडखोर, ठाम विचारांची. कडक शिस्तीचे, हुकूमशाही वृत्तीचे वडील आणि जर्मनीचा नजीकचा नाझी भूतकाळ. त्यावर या बहिणींचे विचार आणि त्यांच्या प्रतिक्रिया भिन्न असतात. त्यांच्या वाटा वेगळ्या होतात. मारियाना मित्राबरोबर राहत असते, तिला एक मुलगा असतो. ती उग्रवादी बनते आणि पकडली जाते. जन्मठेपेची शिक्षा होते. पुढे काही वर्षांनी ती आपल्या कोठडीत आत्महत्या करते. युलियाना स्त्रीवादी संघटनेत सामील होते. स्त्रियांच्या हक्कासाठी लढते. विशेषत: स्त्रियांना गर्भापाताचा हक्क मिळावा यासाठी. ती पत्रकार असते आणि स्त्रियांच्या हक्काविषयी जागृती निर्माण करण्यासाठी मैत्रिणींबरोबर एक नियतकालिक चालवत असते. हा चित्रपट, विशेषत: मारियानाची व्यक्तिरेखा उघड उघड ‘गुद्रून एन्स्लीन’ (१९४०-१९७७) हिच्यावर बेतलेली आहे. ती ‘राफ’ या संघटनेची संस्थापक सदस्य होती. गुद्रून आपलं घर, नवरा आणि लहान मुलगा सोडून ‘राफ’मध्ये सक्रिय झाली. पुढे तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. तिच्या नवऱ्यानं आत्महत्या केली. गुद्रूनने कोठडीतच आत्महत्या केली. मारियानाचं आयुष्य गुद्रूनच्या आयुष्याशी समांतर रंगवलेलं आहे. अगदी हेच सगळं मारियानाच्या आयुष्यातही घडतं. मार्गारेथा यांनी चित्रपटात ‘राफ’चा स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. या चित्रपटात कुठेही उग्रवादी कारवाया किंवा प्रत्यक्ष हिंसाचार दाखवलेला नाही. तरी मारियानाचं वागणं, तिचे सहकारी, तिचं पोलिसांपासून लपून राहणं या सगळ्यातून तिची विचारसरणी कळून येते.

या चित्रपटाची कथा आणि पटकथा मार्गारेथा यांची आहे. एकूण उग्रवादी संघटनेचा आणि अतिरेक्यांचा उदय या विषयाला आणि चर्चेला हा चित्रपट वाचा फोडतो. कोण बरोबर नी कोण चूक अशी भूमिका न घेता मार्गारेथा तटस्थपणे गोष्ट सांगतात. पण त्यात दुसरी बाजू, म्हणजे उग्रवादाला बळी गेलेल्यांची, पीडितांची बाजू नीट मांडली गेलेली नाही, अशी टीकाही यावर झाली. पण तो मार्गारेथा यांचा हेतूही नव्हता. मार्गारेथा म्हणतात, त्यांना राजकीय सिनेमा बनवायचा नव्हता, तर एकूणच महायुद्धानंतरच्या दशकांमधलं पश्चिम जर्मनीत कसं वातावरण होतं ते दाखवायचं होतं. मुख्य म्हणजे हा त्यांनी आपल्या तरुण वयात अनुभवलेला काळ होता. त्याची मांडणी त्यांना करायची होती. या दशकांतले त्यांचे स्वत:चे अनुभव, त्यांच्या भावना या चित्रपटात उतरल्या आहेत.

मार्गारेथा सांगतात, ‘शिशासमान जडत्वाचा काळ’ ही संकल्पना त्यांनी ‘ह्योल्डर्लीन’ (१७७०-१८४३) या कवीच्या कवितेतून घेतली होती. हे शीर्षक पश्चिम जर्मनीतल्या १९७०च्या दशकातल्या वातावरणाकडे निर्देश करतं. १९६० आणि १९७०च्या दशकात युद्धातली नामुष्की आणि अपराधी भावना या कारणांनी युद्धात सहभागी झालेली पिढी युद्धाबद्दल, नजीकच्या भूतकाळाबद्दल बोलत नसे. जणू काही सगळ्यांच्या तोंडावर शिशाची मुखपट्टी बांधलेली होती. सगळं वातावरण तरुणांना अस्वस्थ करणारं होतं. बंड करून, क्रांती घडवून हे चुप्पीचं, जडत्वाचं आवरण फोडून त्यातून बाहेर पडून त्यांना मोकळा श्वास घ्यायचा होता. भूतकाळाबद्दल नीट माहिती न मिळणं, गोष्टी दडपून ठेवणं हे तरुणांना अस्वस्थ करत होतं. त्यामुळे काही तरुण बंड करून उठले, काहींनी शस्त्रं हातात घेतली. हा चित्रपट खूप नावाजला गेला. वेगवेगळ्या देशांत आणि भाषांमध्ये प्रदर्शित झाला.

मार्गारेथा यांचे चित्रपट स्त्रीकेंद्रित असतात. मुख्य मांडणी मनोव्यापारांची असते. त्यात राजकीय विचारसरणी अनुषंगानं येते. ‘काथारीना ब्लुम’ आणि ‘ख्रिास्ता क्लागेस’ याही चित्रपटांना १९७०च्या अस्वस्थ दशकाच्या राजकीय संदर्भाची किनार आहे. स्त्रियांचे एकमेकींशी असलेले नातेसंबंध त्या तरलतेने मांडतात. त्यांच्या स्त्री व्यक्तिरेखा वास्तव, सरळ आणि थेट भिडणाऱ्या असतात. मार्गारेथाच्या चित्रीकरणाची नेहमी प्रशंसा केली जाते. सिनेकलाकारांकडून उत्कृष्ट अभिनय काढून घेणं यात त्यांचं कसब दिसतं. त्यांच्या अनेक व्यक्तिरेखांना उत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं आहे. २०१९मध्ये त्यांना ‘जर्मन फिल्म पुरस्कारा’ने गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या स्त्री सिनेदिग्दर्शक आहेत.
त्यांनी चित्रण केलेल्या स्त्री व्यक्तिरेखांमुळेच त्यांचे हे चित्रपट स्त्रीवादी चळवळीतले मैलाचे दगड ठरतात.
लेखातील चित्रपटांच्या शीर्षकांचं भाषांतर लेखिकेने केलेले आहे.
neetibadwe@gmail.com
(लेखिका पुणे विद्यापीठात जर्मनच्या प्राध्यापक होत्या. मराठी आणि जर्मन या दोन भाषा आणि संस्कृतींमधे त्या सातत्याने मध्यस्थाचे काम करत आहेत.

आरती कदम यांनी घेतलेल्या डॉ. स्वरूप संपत रावल यांच्या मुलाखतीवजा लेखाला (६ सप्टेंबर) वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी डॉ. स्वरूप यांच्या ईमेल आयडीची मागणी केली असल्याने तो प्रसिद्ध करीत आहोत. वाचक त्यावर डॉ. स्वरूप यांच्याशी संपर्क साधू शकतात.
waresh12@gmail.com