जोतिबांचे लेक  : पुरुषप्रधानतेविरुद्ध लढा  स्वत:पासून!

समाजकार्याचं प्रशिक्षण घेत असतानाच योगेशना ज्योती नाईक ही त्यांची जोडीदार भेटली होती.

योगेश हुपरीकर

||हरीश सदानी
स्त्री-पुरुष समानतेबद्दल कुणाला समजावून सांगताना ते के वळ गुळगुळीत शब्द राहायला नको असतील, तर ‘आपण आपल्या आयुष्यात स्त्री-पुरुष समानता पाळली आहे का?’ या प्रश्नाचं उत्तर खरोखरच होकारार्थी असावं लागतं. उत्साही कार्यकर्ता म्हणून काम सुरू के लेल्या योगेश हुपरीकर यांना शालेय मुलांनी नेमका हाच प्रश्न विचारला. तेव्हा ते केवळ अंतर्मुख झाले नाहीत, तर त्यांनी स्वत:च्या आयुष्यात तसे बदल घडवले. लिंगभावाच्या मुद्द्यावर काम करतानाच जात व धर्मव्यवस्थेसारखे संलग्न मुद्देही विचारात घ्यायला हवेत, असं आवर्जून सांगणाऱ्या योगेश यांची ही प्रेरणादायी कथा. 

 

स्त्रियांच्या बाबतीत होणारा लिंगभेद दूर करण्यासाठी, पुरुषपणाची चाकोरी मोडण्यासाठी आणि पारंपरिक पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजात जे व्यापक प्रयत्न व्हायला हवेत, त्यात संवेदनशील पुरुषांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक पुरुषांपर्यंत पोहोचायला हवं आणि स्त्री-पुरुष समतेचा संदेश द्यायला हवा. ते एक महत्त्वाचं पाऊल ठरेल; पण इतर पुरुषांना समतेचा संदेश देण्यापूर्वी पुरुषप्रधानतेविरुद्धची लढाई ही संबंधित पुरुषांनी स्वत:पासूनच सुरू करायला हवी. पुरुषभान आल्यानंतर ही लढाई सातत्यानं लढणाऱ्या आणि हजारो किशोरवयीन मुलग्यांमध्ये स्त्री-पुरुष समतेची बीजं पेरणाऱ्या योगेश हुपरीकर या ३२ वर्षांच्या तरुणाची कहाणी हेच सांगते.

कोल्हापूरमधील हातकणंगले तालुक्यात हुपरी गावात जन्मलेल्या योगेश यांचे वडील चांदीचे दागिने बनवण्याच्या दुकानात मजुरीवर काम करायचे. आईही शेतात मजुरी करीत असे. परिवारात एक मोठा भाऊ आणि बहीण. सर्वांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण नव्हतं. पदवीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर गावाजवळच्या ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’ परिसरातील कंपनीत योगेश काम करू लागले. गोदामातील सामान गाडीत भरणं आणि गाडीतून ते काढणं, इथपासून डेटा एन्ट्री ऑपरेटरपर्यंतचं मिळेल ते काम करून घर व पुढील शिक्षणासाठी ते जिद्दीनं पैसे जमवू लागले. शिवाजी विद्यापीठात ‘समाजकार्य’ या विषयात त्यांनी २०१०-२०१२ मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. व्यावसायिक समाजकार्य प्रशिक्षणाचा भाग म्हणून महिनाभर एका सामाजिक संस्थेत जाऊन तिथलं काम जवळून पाहाणं जरुरीचं होतं. त्यासाठी त्यांनी पुण्यातील ‘इक्वल कम्युनिटी फाऊंडेशन (ईसीएफ)’ या संस्थेची निवड केली. विल मुईर या ब्रिटिश नागरिकानं ऋजुता तेरेदेसाई यांच्यासोबत २००९ मध्ये सुरू केलेली ही संस्था गरीब वस्तीतील १३ ते १७ वर्षं वयोगटातल्या- म्हणजेच वाढीच्या वयातल्या मुलग्यांबरोबर स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यांवर काम करते. लिंगभाव समतेच्या पैलूंवर काम करण्याची आवड निर्माण झाल्यानंतर योगेश या संस्थेतच ‘मेन्टॉर’ म्हणून नोकरी करू लागले.

सुरुवातीला पुण्यातील ३-४ वस्त्यांमध्ये प्रामुख्यानं मुलांबरोबर योगेश संवादसत्रं घेऊ लागले. तसंच इतर सहकाऱ्यांबरोबर १६ नव्या वस्त्यांमध्ये काम करू लागले. ‘ईसीएफ’मध्ये येण्यापर्यंत योगेश यांची जी जडणघडण झाली होती, त्यामध्ये पुरुषाला स्त्रीपेक्षा अधिक मान, शिक्षण व इतर गोष्टींत बहिणीपेक्षा भावाला प्राधान्य या विचारसरणीचा पगडा होता. पुरुषांनी घरकाम करावं, स्त्रियांना पुरुषांसमान दर्जा असायला हवा, ते मान्य करायला तयार नसलेल्या योगेशना वस्तीतील मुलांना ते समजावून सांगणं, अंगीकारायला लावणं कठीणच होतं. ते सांगतात, ‘‘वस्तीतील मुलं जेव्हा मला थेट प्रश्न विचारू लागली की, ‘सर, तुम्हीही स्त्रियांशी समानतेनं वागता का?’, ‘तुम्ही घरातली कोणती कामं करता?’ त्यांच्या अशा विचारण्यानं मी अंतर्मुख झालो आणि पुरुषप्रधानतेविरुद्धची लढाई आधी स्वत:पासून सुरू करायला हवी हे मनात पक्कं झालं. मुलांना ज्या गोष्टी मी करायला सांगतोय त्याआधी मी स्वत: करायला हव्यात. तरच माझ्या बोलण्याला, माझ्या कामाला इतर लोक महत्त्व देतील हे उमजलं.’’ मग योगेश यांनी स्वत:च्या बाबतीत छोटे छोटे बदल करायला सुरुवात केली. घरात भांडी घासणं, कपडे धुणं, झाडलोट करणं, फरशी पुसणं अशी कामं ते करू लागले. कालांतरानं या कामांमध्ये सहजता येऊ लागली.

समाजकार्याचं प्रशिक्षण घेत असतानाच योगेशना ज्योती नाईक ही त्यांची जोडीदार भेटली होती. त्याही समाजकार्याचं पदव्युत्तर शिक्षण घेत होत्या. एकमेकांशी बंध जुळल्यानंतर दोघांनी जुलै २०१३ मध्ये नोंदणी पद्धतीनं विवाह केला. ते आंतरजातीय लग्न होतं. घरातून फारसा विरोध झाला नाही, मात्र उघड पाठिंबाही मिळाला नाही. पुण्याला योगेश व ज्योती राहू लागल्यानंतर योगेश यांनी ‘ईसीएफ’मध्ये नोकरी सुरू केली होती. दोन वर्षांनी त्यांना एक मुलगा झाला. विहान या त्यांच्या मुलाच्या संगोपनामध्ये योगेश इतर सर्वसामान्य वडिलांच्या तुलनेनं अधिक जबाबदारीनं सहभाग घेऊ लागले. मुलाला आंघोळ घालण्यापासून त्याला जेवण भरवणं, त्याच्याशी गप्पा मारणं, हे सर्व आनंदानं करू लागले. ते सांगतात, ‘‘मुलाचं संगोपन करताना एक वडील म्हणून मला जो आनंद मिळतो, आमच्यात जे भावबंध आकाराला येत आहेत, ते शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. आजही समाजात ‘बाप’ म्हटलं  की भीती घालणारा, सतत रागवणारा, मुलाचं काही चुकलं तर मारणारा, ही प्रतिमा असते. ती बदलण्यासाठी मुलाच्या वाढीत, जडणघडणीत बाप मोलाची भूमिका बजावतो, हे चित्र अधिक मुलांना पाहायला मिळायला हवं. मला आठवतं, मी एका नातेवाईकांकडे विहानबरोबर गेलो असताना त्याला मांडीवर बसवून औषध पाजत होतो. तेव्हा मला टोकण्यात आलं की, ‘तू हे सर्व कशाला करत बसतोस? त्याची आई हे सगळं करील ना!’ मातृत्वाची, वात्सल्याची भावना बापामध्येही असू शकते याचा त्यांना अनुभवच नव्हता. बदल किती दूर आहे या जाणिवेनं तेव्हा दु:ख झालं.’’

‘ईसीएफ’बरोबर काम करताना योगेशना सुरुवातीला जाणवलं, की १३ ते १७ वर्षं वयाच्या मुलांना ‘लिंगभाव व पुरुषप्रधानता’ हा विषय रुक्ष वाटतोय. मित्रांसोबत बाहेर फिरणं, गप्पाटप्पा करणं, वाढदिवस साजरे करणं, पार्टी करणं, गर्लफ्रेंडबद्दलची चर्चा करणं, एकमेकांच्या ग्रुपबद्दल आकस-अभिमान, अशा विषयांमध्ये ते जास्त रस घेतात. मग सहभागी पद्धतीनं खेळ, कथाकथन, लघुपट यांद्वारे मुलांमध्ये सलोखा निर्माण करून लिंगभाव, किशोरावस्थेत शरीरात व मनात होणारे बदल, मानवी हक्क, लैंगिकता, मर्दानगी, हिंसा, आरोग्य आणि तत्सम विषयांवर सोप्या भाषेत, उदाहरणं देऊन योगेश संवाद साधू लागले. वस्तीतल्या एखाद्या मोठ्या हॉलमध्ये आठवड्यातून एकदा संध्याकाळी २ तासांचं सत्र ते घेत. असे साधारण १५ आठवडे योगेश आणि त्यांचे साथी ‘ईसीएफ’चा ‘अ‍ॅक्शन फॉर इक्वॅलिटी’ हा उपक्रम राबवू लागले.              १५ आठवड्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलांमध्ये होणारे छोटे छोटे बदल, मुलं सत्रांतून काय शिकली, हे मुलांनीच त्यांच्या शब्दात व्यक्त करावं, म्हणून संस्थेतर्फे आणखी एक कार्यक्रम घेतला जातो. वस्तीतील सर्व रहिवाशांना, मुलांच्या पालकांना बोलावलं जातं आणि मुलांना संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन, आखणी करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. त्यांच्यात हळूहळू नेतृत्वगुण विकसित करण्याकरिता ती एक संधी असते, असं  योगेश सांगतात.

आपल्या कामाचा प्रभाव काय झाला हे सांगण्यासाठी योगेश काही अनुभव शेअर करतात. ‘‘कामाचा एक भाग म्हणून मी जेव्हा सत्रानंतर एका वस्तीत भेट दिली. तेव्हा पाहिलं, की मुसेफ हा मुलगा दाराबाहेर भांडी घासत होता. यापूर्वी मी त्याला कधी घरकाम करताना बघितलं नव्हतं. ऋषिकेश या १४ वर्षांच्या मुलाच्या घरात आईवडिलांमध्ये वाद होऊन वडिलांनी आईवर हात उगारला होता. तेव्हा या मुलानं वडिलांना सांगितलं होतं की, ‘तुम्ही आईला मारहाण केली ते मला आवडलेलं नाही.’ वडिलांना आपली चूक लक्षात आल्यावर त्यांनी मुलाजवळ असं पुन्हा वागणार नाही, हे मला प्रत्यक्ष भेटून सांगितलं.  पुण्यातील मार्केटयार्डजवळील प्रेमनगर वस्तीमधला शिवराज हा मुलगा         १५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा गणेशोत्सवानिमित्त स्वत:हून एखादा उपक्रम राबवण्यात पुढाकार घेऊ लागला. ‘भूमिकानाट्या’सारख्या माध्यमाद्वारे तो लिंगसमानतेविषयी वस्तीतील लोकांमध्ये प्रबोधन करतोय. एकदा घरात जेवणाच्या वेळी ‘भाजीत मीठ कमी आहे’ म्हणून त्याचेही वडील आईवर खूप ओरडले. तेव्हा शिवराजनं हस्तक्षेप केला आणि ‘जेवणात मीठ कमी आहे, तर आपण स्वत: उठून मीठ घेऊ शकतो. क्षुल्लक कारणावरून आईला ओरडणं चुकीचं आहे,’ हे त्यानं वडिलांना सांगितलं. असे अनेक दाखले देता येतील. स्वत:च्या बहिणीचा, इतर  मुलींचा आदर करायला शिकणारी मुलं समवयस्क मित्रांच्या दबावाला ‘नाही’ म्हणताना मी पाहिली. छेडछाड करण्यात इतर मुलांना साथ न देता वेळप्रसंगी त्याला विरोध करणारी मुलं बघितली. मुलांमधील या सर्व बदलांमुळे माझंही जीवन समृद्ध होत असताना मी अनुभवतोय.’’

स्त्री-पुरुष समतेसाठी ‘ईसीएफ’ जसं किशोरवयीन मुलांबरोबर उपक्रम राबवते, तशा प्रकारचे उपक्रम देशातील इतर भागांतील सामाजिक संस्थांनीही राबवावेत आणि पुरुषांबरोबर, मुलग्यांबरोबर काम करणं हे स्त्रियांसोबत केलेल्या कामाइतकंच महत्त्वाचं आहे, हे समजावून सांगण्यासाठी संस्थेनं ‘हमिंग बर्ड’ या संस्थेच्या आर्थिक सहाय्यानं पश्चिम बंगालमधील काही संस्थांना २ वर्षं  प्रशिक्षित केलं. त्यात योगेश सक्रियपणे सहभागी होते. याच उपक्रमाचं पुढचं पाऊल म्हणून ‘प्रोजेक्ट रेझ’ सुरू झाला. त्यात गेली ३ वर्षं ते ‘प्रोग्राम असोसिएट’ म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्राबरोबरच राजस्थान, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा इथल्या सुमारे २० स्वयंसेवी संस्थांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या क्षमताबांधणीविषयक कार्यशाळा योगेशनी घेतल्या आहेत. अधिक संस्था, व्यक्ती यांना जोडण्यासाठी ते सध्या प्रयत्नशील आहेत.

ते आवर्जून सांगतात, ‘‘पितृसत्तेला आव्हान देत असताना के वळ लिंगभावाशी (जेंडर) संबंधित मुद्द्यांवर काम करून चालणार नाही. धर्म, जातव्यवस्था, राज्यसंस्था, न्यायसंस्था यांचा आंतरसंबंध जाणून घेऊन समाजसुधारणा घडवणं गरजेचं आहे.  दलित असल्यामुळे मी लहानपणापासून जातीय विषमतेचे चटके अनेकदा अनुभवले आहेत. शाळेमध्ये असताना अंगाला स्पर्श झाला की काही सहाध्यायी लांब सरकून बसायचे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना काही मुली तथाकथित उच्चवर्णीय मुलग्यांसोबतच बोलायच्या व मला वेगळेपणाची जाणीव करून द्यायच्या. मध्यंतरी फ्लॅटकरिता चौकशी करत असताना माझी जात कळल्यानंतर मला आवडलेली जागा मला नाकारण्यात आली.’’ लिंगभाव व जातीयतेच्या अंताच्या प्रश्नांवर वंचित समुदायांबरोबर जोरकसपणे काम करायचं आहे, असं ते सांगतात.

‘पुरुष’ म्हणून पितृसत्तेमुळे मिळणाऱ्या विशेषाधिकारांचा (प्रिव्हिलेजेस) त्याग करून आपल्या आयुष्यातील स्त्रियांशी समानशील वागण्यानं आपणास स्वत:ला काय मिळतं, हेच योगेश यांच्या कथेतून समोर येतं. पुरुष वाचक त्यातून स्फूर्ती घेतील, ही आशा!

saharsh267@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Fight against masculinity by itself eliminate sexism in women akp

ताज्या बातम्या