वंदना गुप्ते chaturang@expressindia.com

गाणी म्हणण्यात पुढे असणाऱ्या मला अभिनय करता येतोय, हे कळलं ते माझ्या ‘गद्धेपंचविशी’च्या सुरुवातीला. स्वत:विषयी मिळालेलं ते मोठं ‘सरप्राईज’ होतं आणि तोच माझा मुख्य प्रवास झाला. अभिनयात सुरुवातीला कु णीही गुरू नव्हता, पण ‘विद्यार्थिदशा कधी सोडू नको’ ही आईची शिकवण लक्षात ठेवून मी निरीक्षणातून शिकत गेले. अभिनयासाठी खोदकाम करत राहिले. गेली ५० वर्ष सुरू असलेल्या प्रवासाच्या या पहिल्या टप्प्यात अडचणी आल्या, तारेवरची कसरत करतोय असंही वाटलं. पण नाटकाच्या प्रेमानं मला कायम आपल्याकडे खेचून घेतलं आणि माझ्या प्रिय व्यक्तींच्या साथीनं मी त्या रस्त्यावर चालत राहिले..   

actress suruchi adarkar express her feeling about her husbond piyush ranade on occasion of ganesh festival
लग्नानंतरच्या पहिल्या गणेशोत्सावानिमित्ताने अभिनेत्री सुरुची अडारकरने शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाली, “बाप्पा, तुझ्या येण्याने… “
11th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
११ सप्टेंबर पंचांग : प्रीती योग कोणाच्या नशिबाचे उघडणार कुलूप? व्यवसायात लाभ तर मान-सन्मानात होईल वाढ; वाचा तुमचे भविष्य
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
chhichhore movie has 5 years complete shraddha kapoor share her memories on social media
‘छिछोरे’ सिनेमाला पाच वर्षे पूर्ण! सुशांतबरोबरच्या ‘त्या’ व्हिडीओद्वारे श्रद्धा कपूरचा जुन्या आठवणींना उजाळा, म्हणाली…
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!
Business started from three thousand rupees Today earns more than 70 lakhs per month
Success Story: तीन हजार रुपयांपासून सुरू केला व्यवसाय; आज महिन्याला करतो ७० लाखांची कमाई
Success Story Of IPS N Ambika
Success Story : बालपणी लग्न, तर १८ व्या वर्षी मातृत्व; नवऱ्याच्या साथीनं जिद्दीनं पूर्ण केलं ‘IPS’ बनण्याचं स्वप्न

‘बालपणीचा काळ सुखाचा’ असं म्हणतात, त्याला अनेक कारणं आहेत. एक तर आपण फारच निरागस असतो, व्यवहारशून्य असतो. वाढलेलं खायचं, मैदानात खेळायचं, अभ्यासाचं टेन्शन न घेता पास व्हायचं, शिक्षक सांगतील ते शिकायचं, मोठे सांगतील ते ऐकायचं.. जसं येईल तसं आयुष्य जगायचं..

माझं सातवीपर्यंतचं शिक्षण पुण्यात आजोळी झालं होतं. आई-वडिलांच्या (माणिक आणि अमर वर्मा) व्यग्रतेमुळे आणि आमच्यावर एकत्र कु टुंबाचे संस्कार व्हावेत म्हणून आम्हाला तिथे ठेवलं होतं. एकत्र कु टुंब म्हणजे समाजाचं छोटं रूप असतं आणि अशा घरात राहून आम्ही ‘अ‍ॅडजस्टमेंट’ शिकू यावर आई-वडिलांचा मोठा विश्वास. आजोळी सणवार पाळणारं घर, शाळांना मोठी पटांगणं, बरोबर खेळायला भरपूर मुलंमुली. मी लहानपणापासून खूप खोडकर. माझी आई -माणिक वर्मा-  हे नाव प्रचंड नावाजलेलं असलं, तरी तिनं तिचं मोठेपण कधीच घरी आणलं नसल्यामुळे आम्हालाही ते जाणवलं नव्हतं. माझा आणि शाळेच्या अभ्यासाचा दूरान्वयानंच संबंध येत होता. बहुतेक वेळा आईची पुण्याईच माझ्या कामी येत असे! तिच्या शाळेतल्या मैत्रिणी माझ्या तेव्हाच्या शिक्षिका होत्या. ‘माणिक, तुझ्या मुलीला वरच्या वर्गात ढकललंय,’ असं त्या म्हणत. आठवीच्या वर्गात असताना आम्ही मुंबईला आलो आणि पुढेही कॉलेजसाठी मुंबईतच राहिलो. इथे आल्यावर मला प्रथमच जबाबदारीची मोठी जाणीव झाली. इथे आईची पुण्याई मला वाचवायला येणार नाही आणि किमान अभ्यास करावाच लागेल, हेही लक्षात आलं. आमची आई किती मोठी आहे, हे त्याच सुमारास कळलं असावं. आपल्याला तिचं नाव राखायचंय आणि त्याच वेळी आपल्या अंगानं फु लायचंय, हे उमगण्याचा काळ म्हणजे माझ्या ‘गद्धेपंचविशी’ची सुरुवात.

पंचविशीला ‘गद्धेपंचविशी’ का म्हणायचं? बरं, हा काळ विशी ते तिशीमधला. म्हणजे शालेय आणि कॉलेजचं किमान शिक्षण पूर्ण झालेलं असतं. थोडीफार स्वत:ला अक्कल आलेली असते. मैत्री निवडून केलेली असते. आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचंय याचं गणित मांडायला सुरुवात होत असते. माझ्या बाबतीत नेमकी त्याच वेळेस नाटकात काम करण्याची संधी मिळाली. संधीचं सोनं करत गेले, कारण तशी नाटकंही मिळत गेली.

‘पाहू कशाला कुणाकडे’ (१९८४-८५) नाटकात वंदना गुप्ते, सुधीर जोशी आणि विवेक लागू.

प्रेमात पडायचंही हेच वय. याच वयात ‘क्या करूँ हाए कुछ कुछ होता हैं’ वाटायला लागतं. आत प्रेमाचे आरोह-अवरोह जाणवायला लागतात. प्रेम म्हटलं की राग, लोभ, मोह, मद, मत्सर सगळंच आलं. हेही सगळं अनुभवलं. त्या काळी मुलींच्या फार मोठय़ा महत्त्वाकांक्षा नसत. संसार, मुलं आणि सुखी जीवन हे समीकरण बहुतेक जणींच्या डोक्यात असे. माझ्यावर तसा काही दबाव नसला, तरी आम्ही कोणता तरी छंद जोपासायलाच हवा, असा मात्र आई-वडिलांचा आग्रह असे. आम्ही ‘वर्मा सिस्टर्स’ गात असू, पण अभिनय वगैरेचा विचारही नव्हता. शाळेत  सुलभा देशपांडे आम्हाला शिकवायला होत्या. आंतरशालेय स्पर्धेसाठी फार सुंदर नाटकं  त्या बसवत. त्या नाटकांमध्ये मी गाणाऱ्या मुलींमध्येच असे. त्यांनी एक लोकनाटय़ बसवलं होतं आणि माझ्या स्वभावाला साजेशी एक मिश्कील, खोडकर लावणी मी त्यात गात असे. तेव्हाच्या मोठय़ा अभिनेत्री मनोरमा वागळे यांनी एकदा मला ती लावणी गाताना ऐकलं आणि ‘पद्मश्री धुंडिराज’ हे माझं पहिलं नाटक त्यांच्यामुळे मला मिळालं. एका फटाकडय़ा मुलीची विनोदी भूमिका होती ती. मला आठवतं, त्या वेळेस आई तिच्या क्षेत्रात अक्षरश: राज्य करत होती. तेव्हाच तिला ‘मॅनेंजायटिस’ झाला आणि सहा-आठ महिने रुग्णालयात राहावं लागलं. ८० दिवस ती कोमात होती. रसिकांनी तिच्यासाठी नवस के ले होते, नामवंत मंडळी रोज भेटायला येत (पुढे आई त्यातून बाहेर आली आणि लोकांनी के लेले नवस फेडण्याच्या कार्यक्रमांनाही ती मनापासून उपस्थित राहात असे.).  हा अवघड काळ होता. वडील एक वाक्य कायम सांगायचे, ‘कु छ भी हो सकता हैं जिंदगी में। ’ (ते अलाहाबादचे असल्यामुळे आमच्याशी हिंदीत बोलत.) येईल त्या परिस्थितीसाठी आपली शारीरिक आणि मानसिक तयारी हवी आणि स्वत:च्या पायावर उभं राहायलाच हवं, ही त्यांची शिकवण होती, ती त्या वेळी आणि पुढेही जीवनात अनेक वेळा कामी आली.

‘पद्मश्री धुंडिराज’च्या तालमी सुरू होत्या. तरी नाटक आणि अभिनयाविषयी मला फार माहिती होती असं मुळीच नव्हतं. एकदा मी तालमी- वरूनच हॉस्पिटलमध्ये गेले, तेव्हा आईला भेटायला विजय तेंडुलकर आले होते. समोर बरीच गर्दी पाहून भीतीनं माझ्या हातून नाटकाचं स्क्रिप्ट खाली पडलं. तेंडुलकरांनी ते उचललं आणि ‘कोणत्या नाटकाची ही संहिता?’ असं कु तूहलानं विचारलं. स्क्रिप्टला संहिता म्हणतात हेही तोवर मला माहीत नव्हतं! पण या नाटकातली भूमिका मी लीलया करू शकले आणि आपल्याला अभिनय करता येतो, हा साक्षात्कार झाला. ही १९७०ची गोष्ट. ‘पद्मश्री धुंडिराज’विषयी रकाने भरून लिहून आलं होतं आणि माझ्याबद्दल ‘रंगभूमीला नवी अभिनेत्री मिळाली’ असं लिहिलं गेलं. मी बिनधास्त नाटकात कामं करायला सुरुवात के ली.

गद्धेपंचविशीच्या सुरुवातीलाच मला माझा नवरा भेटला (शिरीष गुप्ते). कमलाकर सोनटक्के ‘जसमा ओडन’ नावाचं नाटक बसवत होते. त्यात माझी भूमिका होती. शिरीष आणि मित्रमंडळी तालीम बघायला आली होती. तो ‘लॉ’ शिकत होता, पण नाटकाची त्याला खूप आवड. तिथेच त्यानं मला पाहिलं (त्याचं ‘लव्ह अ‍ॅट फस्र्ट साईट’ होतं. पण तो म्हणतो, की हिनंच पुढाकार घेतला. असो!). वयाच्या एकविसाव्या वर्षी आमचं लग्नही झालं. माझा स्वभाव आधी म्हटल्याप्रमाणे मुळात अतिशय खोडकर आणि विनोदी. दोघांच्याही घरी आई-वडिलांना भेटून मान्यता मिळवली. पहिल्यांदा भावी सासू सासऱ्यांना भेटायला गेले. एक तर ‘माणिक बाई’वर त्यांचं नितांत प्रेम, श्रद्धा आणि आदर. जेवढं तिचं गाणं आवडायचं तितकाच तिचा स्वभाव आवडायचा. त्यांची मुलगी आपला शिरीष घरी घेऊन येतोय ओळख करून द्यायला, त्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. आईनं मला जाताना बजावल्याप्रमाणे मी प्रथम त्यांना भेटल्यावर वाकून तीन-तीनदा नमस्कार केला. ‘सीकेपी’ पद्धतीप्रमाणे! तिथेच मी त्यांचं मन जिंकलं. बरं, तशीही मी समोरच्यावर छाप मारण्यात पटाईत होतेच! इकडच्या-तिकडच्या गप्पा झाल्यावर सहज विचारलं त्यांनी, ‘तू पण गातेस की नाही?’. ‘हो’ म्हटल्यावर, ‘मग गा ना,’ असा गोड आग्रह केला त्यांनी. आणि मी काय गावं? ‘पाडाला पिकलाय आंबा’ ही सुलोचना चव्हाणांची लावणी! अगदी दोघांकडे बघून धिटाईनं ‘नीट बघ’ हेही ठसक्यात म्हटलं! (गाण्यातले शब्दच होते तसे.) समोरून माझं खूप कौतुक झालं. पण शेजारी बसलेल्या शिरीषनी जी खाली मान घातली, ती आज लग्नाला ४५ वर्ष झाली तरी वर केलेली नाही! मला असं वाटलं, की त्यांनाही कळू दे ना, आपल्याकडे काय येणारे ते! हा हा हा!

तोपर्यंत मी जी नाटकं  के ली होती त्यात प्रायोगिक अधिक होती. लग्न होताच मी करिअर सोडून दिलं. ‘गुप्तेंकडे कु णी नाटक करत नाही. त्यामुळे तुला नाटक करायला मिळेल की नाही ते माहीत नाही,’ असं शिरीष म्हणाला होता. माझाही त्यावर काही आक्षेप नव्हता. वय लहान होतं, प्रेमात पडले होते आणि मुख्य म्हणजे संसाराची मला आवड होती. लग्नानंतरच्या काळात मी ‘दूरदर्शन’वर ‘आपण यांना पाहिलंत का?’सारखे कार्यक्रम करत असे (ज्यात हरवलेली व्यक्ती वृद्ध असेल, तरी अनेकदा त्यांचा दाखवला जाणारा फोटो तरुणपणीचा असे. ज्यावरून कु णीही त्यांना शोधणं अशक्य वाटे!). स्मिता पाटील, भक्ती बर्वे, स्मिता तळवलकर यांचं तेव्हा ‘दूरदर्शन’मध्ये नाव होतं. याच काळात एकदा ‘गोवा हिंदू असोसिएशन’चे लोक आमच्या घरी आले. ते ‘अखेरचा सवाल’  नाटक करत होते आणि त्यातल्या कर्क रोग झालेल्या मुलीच्या प्रमुख भूमिके साठी त्यांनी मला विचारलं. ती भूमिका आधी भक्ती करत असे आणि नाटकातली आईची भूमिका विजया मेहता करत होत्या. मी संस्थेच्या लोकांना सांगितलं, ‘मी करू शकणार नाही. आमच्या घरी चालणार नाही.’ माझे सासरे शेजारच्याच खोलीत हे सर्व ऐकत होते. त्यांनी विचारलं, ‘एवढी चांगली संधी आहे. तू नाही का म्हणालीस?’ मी निरागसपणे सांगून टाकलं, की शिरीष म्हणाला, घरी चालणार नाही! सासरे मला म्हणाले, ‘तुझ्यात कला आहे. ती तू का मारावीस?’. म्हणजे ‘घरी चालणार नाही’ हे आमचं आम्हीच गृहीत धरलेलं होतं! मग मी ‘अखेरचा सवाल’मध्ये काम करू लागले आणि एकामागून एक नाटकं  स्वीकारत गेले.

‘अखेरचा सवाल’ आलं, त्याच काळात मला मुलगी झाली. तीन महिन्यांच्या मुलीला सोडून मी १४-१४ दिवसांचे नाटकाचे दौरे करत असे. तो ‘ट्रंक कॉल’चा काळ होता. प्रवासाची, राहाण्याची सोय तेव्हा आताएवढीही बरी नसे. ते सगळं निभावणं फार जड गेलं. पण नाटकाची बांधिलकी, ‘कमिटमेंट’ काय असते ते मला तेव्हा कळलं. नाटकात काम करतानाचं ‘टायमिंग’ मला माझ्या स्वभावामुळे आपसूक जमत होतं, पण भूमिके चा अभ्यास कसा करतात हे मी इतरांना पाहून शिकू  लागले. माझ्या भूमिके चा भाग संपल्यावर मी विंगेत बसून बारकाईनं निरीक्षण करत असे.

माझी मुलं लहान असताना सकाळ-दुपार-रात्र असे दिवसाला तीन-तीन नाटय़प्रयोग (महिन्याला जवळपास ४० प्रयोग) मी करत असे. दरवर्षी एक नवीन नाटक स्वीकारत असे आणि जुनी नाटकं ही सुरूच असत. सासू-सासऱ्यांनी आणि माझ्या बहिणींनी मुलांना सांभाळण्यात फार मदत के ली. मला खूप अपराधी वाटायचं. कु चंबणा होत असे. कारण नवरा त्याच्या व्यवसायात स्थिरावला होता. शिवाय माझ्या पैशांवर घर चालत नव्हतं.

कुटुंबानं एकत्र बसून जेवावं किं वा सणवार एकत्र साजरे करावेत, तर नेमके सुट्टीच्या दिवशी नाटकाचे प्रयोग असत. मुलं थोडी मोठी झाल्यावर मी त्यांना नाटकाच्या दौऱ्यांना घेऊन जात असे. जेणेकरून त्यांना आई काय करते हे माहीत व्हावं. एकदा मुलांच्या शाळेत ‘फॅ न्सी ड्रेस’ स्पर्धा होती. मी हौसेनं त्यांची तयारी करून घेतली. नंतर मुलानं मला विचारलं, ‘मम्मा, त्या दिवशी तू नसशीलच ना?’. त्यानं फार निरागसपणे विचारलं होतं, पण स्पर्धा बघायला आई येणार नाही, हे त्यानं गृहीत धरलंय, हे मला फार लागलं. थोबाडीत लगावल्यासारखं वाटलं! पुढे मी निर्मात्यांना विनंती करत असे, की घरातल्यांचे वाढदिवस, सणवार, अशा दिवशी दुपारी तरी मला मोकळीक मिळावी. अर्थात नाटकाचे दौरे सुरू असतात तेव्हा अशी विनंती करणं आणि ती मान्य होणं, दोन्ही अवघडच.

यश मिळवणं सोपं, टिकवणं अवघड. पण माझ्या आईनं मला एक सांगितलं होतं, ‘विद्यार्थी असणं कधी सोडू नको. ते थांबलं की प्रगती खुंटली.’. नाटकात मला कु णी गुरू नव्हताच. त्यामुळे पहिल्यापासून कु णाची नक्कल करावीशी वाटली नाही. माझी शैली हळूहळू तयार होत गेली. आता नवीन मुलं जेव्हा ‘अभिनयासाठी काय करू?’ विचारतात, तेव्हा वाटतं, की अभिनय असा शिकवता येत नाही. काही तरी मुळातच तुमच्यात असावं लागतं. तरच त्याला पैलू पाडता येतात. विजया मेहतांबरोबर काम करताना मला प्रचंड शिकायला मिळालं (अजूनही त्यांचा सतत संपर्क  असतो.). मी

डॉ. श्रीराम लागूंबरोबर ‘सुंदर मी होणार’मध्ये काम करायचे. हे खरं तर डॉक्टरांना न आवडलेलं नाटक, पण ते पु.लं.साठी करायचे. नावडत्या नाटकात अभिनय करतानाही गंभीर प्रसंगात ते डोळ्यांत असं पाणी आणत की बास! अभिनयातलं ‘कन्व्हिक्शन’ त्यांच्याकडून शिकायला मिळालं. अभिनेता अरुण जोगळेकर ‘एन.एस.डी.’मधून (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय) शिकू न आलेला. त्यानं ‘रीडिंग बिटवीन द लाइन्स’ ज्याला म्हणतात, ते शिकवलं.

वंदना आणि शिरीष गुप्ते                                               , ‘पद्मश्री धुंडिराज’

प्रत्येक नवं नाटक स्वीकारताना आपण नवी जबाबदारी घेतो आहोत, असं  मला वाटत असे. आधीच्या पेक्षा एकदम वेगळी, आव्हानात्मक भूमिका मिळावीशी वाटे. मधुकर तोरडमल ‘झुंज’ नाटक करत होते.  त्यात ‘रखमा’ नावाची गावरान, शिवराळ बोलणाऱ्या कष्टकरी स्त्रीची भूमिका होती. ‘तुला हे जमणार नाही,’ असं तोरडमल मला म्हणाले. मला फार राग आला. त्यांना म्हटलं, ‘मला दहा दिवस द्या. मी या नाटकातलं काही तरी तुम्हाला करून दाखवते.’ दिवसभर एका गरीब, कष्टकरी लोकांच्या वस्तीत जाऊन एका कु टुंबाबरोबर राहिले. निरीक्षण के लं, भाषेचा लहेजा बदलला, दिसणं बदललं. त्या भूमिके चं प्रेक्षकांकडून खूप कौतुक झालं. माधव मनोहर यांनी ‘मार्मिक’मध्ये परीक्षणात लिहिलं होतं, ‘वंदना गुप्ते यांनी इतक्या उत्कृष्ट शिव्या दिल्या, जणू त्यांना घरीही शिव्या देण्याची सवयच असावी!’ (पुढे ‘वाडा चिरेंबंदी’च्या वेळी ‘नागपुरी बोलीत संवाद जमले नाहीत तर नागपुरात प्रयोग करताना चुका काढतील,’ असं म्हणून मला लोकांनी घाबरवलं होतं. पण कित्येक नागपुरी प्रेक्षकांनी भेटून सांगितलं, की ‘तुम्ही बोललात तितकी सहज भाषा आमच्याही तोंडी येत नाही.’ अशोक पाटोळेंच्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या नाटकातली भूमिकाही आव्हानात्मक होती- चेटूक करणाऱ्या बाईची. नवीन काही करण्याची इच्छा असली की आपण तसं करत जातो.)

करिअरला ५० वर्ष पूर्ण झाली याचा मला खूप अभिमान वाटतो. आता मागे वळून बघताना वाटतं, काय काय केलं मी या गद्धेपंचविशीत! पहिलं नाटक, पहिलं प्रेम, लग्न, दोन गोंडस मुलांचा जन्म, स्वत:चा स्वतंत्र संसार थाटायचं दोघांचं स्वप्न पूर्ण केलं, तुटपुंज्या पैशांत संसाराचे चटके एकमेकांच्या सोबतीनं सोसले. हौस म्हणून सुरू केलेला अभिनयाचा प्रवास व्यवसायाच्या स्टेशनवर आणला. अभिनयासाठी खोदकाम करत राहिले. ‘अखेरचा सवाल’, ‘गाठ आहे माझ्याशी’, ‘सोनचाफा’, ‘गगनभेदी’, ‘रमले मी’, ‘रंग उमलत्या मनाचे’ अशी केवढी नाटकं रंगभूमीवर गाजवली. स्वत:चा प्रेक्षकवर्ग तयार केला. नाटकाच्या निमित्तानं महाराष्ट्र, गोवा, बडोदा, अहमदाबाद, इंदोर, भोपाळ, ग्वाल्हेर, जबलपूर, कोलकाता, दिल्ली आणि शिवाय विदेश दौरापण केला. आई-वडील, बहिणी, सासू-सासरे, नवरा, मुलं, सगळ्यांना माझा अभिमान वाटेल असं नाव कमवायला सुरुवात केली. आणि वेगवेगळ्या भूमिका यशस्वीपणे करू शकेन असा आत्मविश्वास याच गध्देपंचविशीत मिळवला. त्यामुळे पुढच्या वाटचालीची पायाभरणी भक्कम झाली ती याच १० वर्षांत.