मृदुला भाटकर chaturang@expressindia.com

‘खोटं बोलणं’ म्हणजे काय असतं हे तुम्हाला आयुष्यात सर्वात पहिल्यांदा कधी जाणवलं, हे आठवून बघा. अगदी लहान असताना ही संकल्पनाच अनोळखी असते, मात्र मोठेपणी आपण ‘प्रत्येकाचं वेगळं सत्य असतं’ ही भूमिका सोयीनुसार वाकवायलाही शिकतो! ‘निर्विवाद सत्य’ असं काही असतं का? ते शोधायचं कसं?..

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?
How did Swargate get its name in Pune
Pune : पुण्यातील ‘या’ ठिकाणाला स्वारगेट हे नाव कसे पडले? जाणून घ्या ‘स्वारगेट’ नावामागचा इतिहास

‘तुका म्हणे येथे सत्याचे सामर्थ्य, नाही तरी सारे मायाजाल!’ ‘आपल्याला खोटं बोलता येतं’ हा शोध माणसाला कधी लागला असेल? म्हणजे खरं बोलायचं का? खोटं का नाही? असे बारीकसारीक प्रश्न मला लहानपणी फार पडायचे.

‘सत्य’ या संकल्पनेविषयी अनेक ग्रंथ लिहिले गेले. अत्यंत व्यापक, कधी पटकन समजणारी, तर कधी खूप खणल्यावरही न मिळणारी अशी ही संकल्पना. तिच्याविषयी थोडंसं! माझी मैत्रीण आणि मी गप्पा मारत होतो. अचानक फ्लॉवरपॉट धाडकन् फुटल्याचा आवाज आला. मैत्रीण धावत तिकडे गेली. तिच्या दोन आणि तीन वर्षांच्या नातवांना तिनं विचारलं, ‘‘कोणी पाडला फ्लॉवरपॉट? खरं सांगा.’’ तर तो दोन वर्षांचा चिंगू म्हणाला, ‘‘म्हणजे?’’ त्याला मुळात खोटं काय हे माहीतच नव्हतं! म्हणून त्याला ‘खरं सांगा’ म्हणजे काय हेही कळलं नाही. जे घडलं त्यापेक्षा काही तरी वेगळंच, उलटं सांगायचं म्हणजे खोटं, हे अगदी छोटय़ा मुलांना कळत नाही. लहान मुलांना शाळेत गेल्यावर शिक्षक किंवा घरी आई-बाबा ‘खोटं बोलावं, खरं कधी बोलू नये’ अशी वाक्यं नाही लिहायला देत! पण आपण मात्र आयुष्यात सोयीनुसार ती वाक्यं वाकवतो. एक मजेशीर प्रसंग आठवला, एकदा अभिनेते विजू खोटे आमच्या घरी आले होते. तेव्हा रमेशनं (रमेश भाटकर) गमतीत म्हटलं, ‘‘कोण म्हणतं शेवटी विजय नेहमी खऱ्याचा असतो? विजय खोटय़ांचाही असतो!’’

जे घडलं, जे पाहिलं, ऐकलं, जाणवलं ते सत्य! इतकी साधी व्याख्या आपण करू या. पण प्रत्येकाची दृष्टी, भावना, अनुभव, क्षमता वेगळी असते. त्यामुळे एकच गोष्ट प्रत्येकाला वेगळय़ा प्रकारे दिसू, जाणवू शकते.  म्हणजेच प्रत्येकाचं स्वत:चं ‘सत्य’ असतं. एखादी व्यक्ती आपल्याला नाही आवडत, तसंच आपणही सर्वाना नाही आवडत, तर काहींना आवडतो. एका घटनेवरच्या प्रतिक्रिया नेहमी निरनिराळय़ा असतात. तसंच सत्याचं होतं. परंतु ही अशी व्यक्तिसापेक्ष अनेक ‘सत्यं’ लक्षात घेऊन वस्तुनिष्ठ पद्धतीनं कोर्टात सत्य ठरवावं लागतं. ते कायद्याचं किंवा न्यायाचं सत्य असतं. वैश्विक सत्यही असतंच. तर खरं शोधण्याच्या प्रवासातल्या या हत्तींच्या तीन गोष्टी. त्या तुम्हालाही कदाचित स्वत:च्या वाटतील. कदाचित तुम्हाला त्या माहितीही असतील, पण या गोष्टींकडे आपण आज एका वेगळय़ा दृष्टीनं पाहायचं आहे.

‘सत्यमेव जयते’ हे तर न्यायसंस्थेचं बोधवाक्य! त्यामुळे सत्याच्या शोधात, साक्षी-पुराव्यांच्या आधारे सुरू होतो कोणत्याही खटल्याचा प्रवास आणि तो एका निर्णयापर्यंत जाऊन थांबतो. साक्षीदार पिंजऱ्यात शपथ घेऊनही खरंच बोलेल याची खात्री नसते, हे मी याआधीच्या लेखात अधोरेखित केलं आहे. माणूस परमेश्वर किंवा स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीच्या नावावर किती तरी खोटं बोलत राहतो. ‘खऱ्याची दुनिया नाही राहिली’ हेही किती वेळा ऐकलेलं. तर हत्तींच्या या तीन गोष्टी मला सांगायच्या आहेत..

कौरव-पांडवांच्या युद्धात साक्षात गुरू द्रोणाचार्याना तोंड देणं पांडवांना कठीण होतं. तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून मोठी आवई उठवली गेली, ‘अश्वत्थामा मारला गेला..’ द्रोणाचार्याच्या पुत्राचं नाव अश्वत्थामा. आणि तेच नाव एका हत्तीचंही होतं. श्रीकृष्णानं या गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं. त्यामुळे त्या हत्तीला मारून सैन्यात ती बातमी अशा पद्धतीनं पसरवली गेली, की लढणाऱ्या द्रोणाचार्यापर्यंत ऐकू जावी. अश्वत्थामा चिरंजीव आहे, हे ज्ञात असलेले द्रोणाचार्य तरीही पुत्रवियोगाच्या विचारानं अस्वस्थ झाले. त्यांना माहीत होतं, की धर्मराज युधिष्ठीरच खरं काय ते आपल्याला सांगेल. म्हणून त्यांनी युधिष्ठिराला विचारलं, ‘‘खरंच अश्वत्थामा मारला गेला का?’’ युधिष्ठिरानं श्रीकृष्णानं सांगितल्याप्रमाणे ‘होकार’ दिला, पण सदैव सत्याची साथ देणाऱ्या युधिष्ठिरानं नंतर हळूच म्हटलं ‘नरो वा कुंजरो वा..’ (याचा अर्थ ‘अश्वत्थामा मारला तर गेला, पण माणूस की हत्ती ते माहीत नाही!’) तोपर्यंत तो ‘होकार’ ऐकून धनुष्य खाली टाकणाऱ्या द्रोणाचार्याचा अर्जुनानं वध केला. म्हणजेच खरी गोष्ट झाकल्यामुळे किंवा लपवल्यामुळे खोटी घटना सांगितली गेली.

खोटी घटना ध्वनित केली गेली. याला कायद्यात म्हणतात, ‘Suppressio veri suggestio falsi’. तर हे ‘नरो वा कुंजरो वा’ न्यायालयात नेहमी होतं आणि म्हणूनच ‘हत्ती की माणूस’ याचा शोध घेणं कायम गरजेचं असतं.

दुसरीही गोष्ट आपल्या सर्वाना माहीत असलेली. हत्ती आणि सात आंधळय़ांची. सात अंध व्यक्ती हत्तीची प्रत्येकी एकेक बाजू स्पर्शानं अनुभवतात आणि आपल्याला आलेल्या अनुभवाचं वर्णन करतात. प्रत्येक जण वेगळं वर्णन करतो. कोणाला हत्ती दोरासारखा वाटतो, तर कोणाला खांब, कोणाच्या मते हत्ती म्हणजे मोठी िभत, इत्यादी. त्यांच्यापैकी कोणीच खोटं बोलत नव्हतं, सगळे खरंच सांगत होते. म्हणजे हे त्या प्रत्येकाचं हत्तीबद्दलचं स्वतंत्र असं सत्य होतं. ते प्रत्येक सत्य एकेकटं तपासलं, तर त्या प्रत्येकाचं म्हणणं चुकीचं वाटतं. पण हत्ती जर संपूर्ण सत्य आहे, तर त्याचं सात भागातलं वर्णन हेही सत्याचे तुकडेच. असंच न्यायालयात खूपदा प्रत्येक वेगवेगळय़ा साक्षी-पुराव्यांचे तुकडे जोडावे लागतात कोलाजसारखे! आपल्या आजूबाजूला असे तुकडे पडलेले असतात. ते जोडण्याची समज असेल, तर आपलाही सत्याचा शोध वेगळय़ा वाटेनं जाऊ शकतो.   

तिसरा हत्ती शंकराचार्याचा! ‘ब्रह्म सत्य, जगत् मित्थ्या’ (ब्रह्म सत्य, जग हा भास) म्हणणाऱ्या शंकराचार्यावर एक माणूस कायम टीका करत असे. एकदा शंकराचार्य रस्त्यानं जात असताना एकाएकी कालवा झाला, ‘पिसाळलेला हत्ती लोकांना तुडवत धावत येतोय.’ सगळे लोक सैरावैरा धावू लागले. शंकराचार्यही पळाले. त्या माणसानं ते पाहिलं आणि खोचकपणे त्यांचं तत्त्वज्ञान किती फोल आहे हे दाखवत त्यांना म्हणाला, ‘‘ब्रह्म सत्य, जगत् मित्थ्या, गजम् मित्थ्या, मग तुम्ही का धावत आहात? सगळं भोंदू तत्त्वज्ञान सांगता तुम्ही!’’ 

शंकराचार्य उत्तरले, ‘‘ब्रह्म सत्य, जगत् मित्थ्या, गजम् मित्थ्या, पलायनम् अपि मित्थ्या!’’ (म्हणजे ब्रह्म सत्य, जग आभासी, हा हत्ती जितका खोटा, तितकंच मी धावतोय हाही भासच!) हे शंकराचार्याचं फार मोठं तत्त्वज्ञान! खूप सारे पुरावे जरी मांडले गेले, तरी नेमका पुरावा न मिळाल्यावर हातातून सत्य निसटल्याच्या वैफल्याच्या क्षणी किती तरी वेळा या शंकराचार्याच्या तत्त्वज्ञानानं मला शांत केलं आहे. दिवाणीपेक्षाही फौजदारी खटल्यात पुराव्याचं प्रमाण जास्त असणं गरजेचं असतं. कधी कधी गुन्हा नक्की आरोपीनं केलेला आहे हे कळत असून आवश्यक पुराव्याअभावी गुन्हेगाराला सोडून द्यावं लागतं, तेव्हा जी उद्विग्नता येते त्याचं उत्तर मला या तत्त्वज्ञानात सापडलं. मिथकाचं आकलन झालं, तर सत्याचा साक्षात्कार होतो.

 आता एक शेवटची गोष्ट. ही मी नेहमी सत्य आणि सदसद्विवेकबुद्धी यांचं कसं नातं असतं त्यासाठी सांगते. माझी मैत्रीण निवृत्त न्यायमूर्ती रोशन दळवी (पूर्वाश्रमीच्या सिगनपोरिया) या पारशी असल्यामुळे लहानपणी पहिली आणि दुसरीपर्यंत गुजराथी माध्यमाच्या शाळेत गेल्या. नंतर त्यांना त्यांच्या पालकांनी इंग्रजी माध्यमात घातलं. तेव्हा इंग्रजीतले खूप शब्द छोटय़ा रोशनला माहिती नव्हते. एकदा परीक्षेत रिकाम्या जागा भरा असा प्रश्न आला होता आणि त्याला प्रत्येकी १ गुण होता. ‘– इज माय फेव्हरिट फ्रूट!’ (‘अमुकतमुक हे माझं आवडतं फळ आहे’). छोटय़ा रोशनला अ‍ॅपल, बनाना, ऑरेंज, मँगो हे शब्द स्पेलिंगसह माहीत होते. पण तिचं आवडतं फळ वेगळं होतं, ते होतं अंजीर! त्याला इंग्रजीत काय म्हणतात आणि त्याचं ‘फिग’ (Fig) हे स्पेलिंग तिला माहिती नव्हतं. केवळ एक गुण मिळवण्यासाठी आपल्याला न आवडणारं फळ कसं काय आवडतं म्हणून लिहायचं? छोटय़ा रोशनला वाटलं, की ‘अंजीर’ आपल्याला खाण्याचा एवढा आनंद देतं, त्याच्याशी आपण प्रामाणिक असायला हवं. असं आपण खोटं लिहिलं, तर त्या आनंद देणाऱ्या समस्त अंजिरांना किती वाईट वाटेल! त्यामुळे तिनं खरं तेच लिहिलं, ‘अंजीर इज माय फेवरिट फ्रूट!’ त्याला शून्य गुण मिळाले. या प्रश्नाला जरी शून्य गुण मिळाले असले, तरी वास्तवात ती मोठी परीक्षा उत्तीर्ण झालेली होती.

आपण जेव्हा एकटे असतो, तेव्हा स्वत:शी किती प्रामाणिक राहतो किंवा जेव्हा एकटे असतो, तेव्हा स्वत:ला उघडं-नागडं करून आपण नेमके कसे आहोत हे पाहणं आणि त्यात उमगलेलं सत्य हे मान्य करण्याची ताकद

म्हणजे सदसद्विवेकबुद्धी. ही सदसद्विवेकबुद्धीच आपल्याला खऱ्या अर्थानं स्वत:च्या जवळ जाण्यासाठी मदत करते. नाही तर आपल्यातला ‘स्व’ आपल्यालाच खोटा आणि अनोळखी वाटतो.