मृदुला भाटकर
‘ऐकणं’ ही आपोआप होणारी क्रिया असली तरी काहीवेळा मात्र काही गोष्टी मुद्दाम पूर्ण भान ठेवून ऐकाव्या लागतात. या ऐकण्यातून डोक्यात अनेक विचारचक्रं फिरतात आणि तयार होतो त्या-त्या परिस्थितीवरचा आपला एक निर्णय. न्यायाधीश न्यायालयात नेमकं हेच करत असतात. पण रोजच्या आयुष्यात न्यायाधीशासारखं निर्णय देण्याची गरज नसतेच. नुसतं ‘ऐकणं’ही पुरेसं असतं!
‘कुछ दिल ने कहा
कुछ भी नहीं
कुछ दिल ने सुना
कुछ भी नहीं
ऐसी भी बाते होती हैं..’
इतका अद्भुत, तरल संवाद व्यक्त करणारं हे ‘अनुपमा’मधलं गाणं डोळे मिटले की मनात नेहमी ऐकू येतं. मारुती चितमपल्ली यांचं लिखाण वाचताना ‘जंगल ऐकणं’ म्हणजे काय हे पदोपदी जाणवतं. कोणत्याही नादाशी संवाद साधण्याची मिळालेली ही ऐकण्याची देणगी केवढी अचंबित करणारी आहे.
‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ अगदी लहानपणी ही म्हण आपण सर्वानी रिकाम्या जागा भरताना लिहिली किंवा त्यावरचा स्पष्टीकरणाचा प्रश्न सोडवला वगैरे. ‘माझं ऐक’, ‘मोठय़ाचं ऐकावं’, हेही सतत ऐकलेलं. एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देण्याचा प्रकार तर कितीतरी वेळा केला! आजही करतो.
ऐकणं म्हटलं, की मला आठवतात रुईया कॉलेजमधल्या ‘फर्स्ट इअर’च्या वर्गाला इंग्रजीमधून संस्कृत शिकवणाऱ्या बाक्रे मॅडम. त्यांचे उच्चार आणि शिकवणं अगदी ठाशीव आणि स्पष्ट. कालिदासाचं ‘रघुवंशम’ हे काव्य आणि भासाचं ‘स्वप्नवासवदत्तम’ हे नाटक त्यांनी आम्हाला शिकवलं. ‘स्मृती फॉलोज् श्रृती’ यातलं ऐकण्याचं महत्त्व अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवलं. ‘अपौरुषेय वेद’ केवळ ऐकून म्हणजेच ते श्रृत वाङ्मय स्मृतीमध्ये जतन करून पुढच्या पिढीला त्याचा वारसा परत ऐकवून पिढय़ान् पिढय़ा जतन करण्यात आलं. तेव्हा मुद्रणकला मानवास अवगत नव्हती.
न्यायालयात तर न्यायदान करणाऱ्या व्यक्तींना ऐकण्याचंच काम करावं लागतं. कधी कधी तर पूर्ण दिवस किंवा त्यानंतरही काही दिवस वकिलांचे युक्तिवाद तासन् तास ऐकावे लागतात. सगळंच सिद्ध करायचं असतं. कागदपत्रं, परिस्थिती आणि तोंडी पुरावा म्हणजे ‘साक्ष’ यांच्या आधारे एखादी वस्तुस्थिती, घटना किंवा प्रसंग सिद्ध केला जातो. ही वस्तुस्थिती म्हणजे व्यक्तीच्या पंचेद्रियांमार्फत आकळलेलं वास्तव! डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा यांद्वारे व्यक्तीला जे वास्तवाचं ज्ञान होतं ती वस्तुस्थिती. साक्षीदार जे न्यायालयात त्या आकलनाबद्दल बोलतो, ती साक्ष ग्राह्य धरली जाते. त्यात ऐकणं आलंच, पण त्यात तेसुद्धा स्वत: थेट ऐकलेलं हवं. म्हणजे करार करताना केलेल्या चर्चा, कोणत्याही व्यवहाराची स्वत: ऐकलेली बोलणी, वाजलेलं गाणं, मारलेली किंचाळी, इत्यादी स्वत: ऐकलेली हवी. दुसऱ्यांनी त्याबद्दल सांगितलेलं ऐकून ते न्यायालयात बोललेलं नाही चालत. म्हणजे स्वत: खाल्लेला आंबा आणि त्याबद्दल दुसऱ्यानं खाऊन त्याच्या चवीबद्दल ऐकवलेलं वर्णन, यातला फरक किंवा स्वत: पाहिलेली अजिंठा-वेरुळची लेणी आणि बघून येऊन दुसऱ्यानं ऐकवलेलं वर्णन, यातला अनुभवातला फरक लक्षात घ्यावा. म्हणूनच ऐकीव (hearsay) पुरावा हा हिणकस म्हणून न्यायालयात ग्राह्य नसतो. दैनंदिन व्यवहारात मात्र आपण सतत ऐकीव गोष्टींवरच बोलतो, आपली मतं तयार करतो. विचारांची, ग्रहण करण्याची, अनुमानाची एक एक पायरी असते. त्या पहिल्या पायरीवरून एकदम चौथी पायरी नाही बांधता येत. तिला दुसऱ्या-तिसऱ्या पायरीचा आधार हवा. म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारासारखा- ज्यांनी स्वत: संभाषण ऐकलं तो पुरावा न्यायालयाला मान्य.
इंग्लंडमधल्या एका न्यायाधीशांची ही एक गोष्ट नेहमी ‘ऐकलेली’. तिथे निवृत्तीचं वय नाही. एक न्यायाधीश एका वकिलाचा युक्तीवाद ऐकत होते. त्यांनी त्या वकिलाला दोन वेळा ते काय म्हणाले ते परत सांगायची विनंती केली आणि नंतर त्या न्यायाधीशांनी तातडीनं राजीनामा दिला, कारण त्यांच्या लक्षात आलं की त्यांची ऐकण्याची क्षमता कमी झाली होती. जेव्हा सांगण्याचा मुद्दा असतो, तेव्हा ऐकण्याची नितांत गरज असते. वकिली व्यवसायात तर ऐकणं हे फारच महत्त्वाचं. पक्षकाराचं दु:ख ऐकून घेऊन मगच ते न्यायालयात मांडता येतं. बरं, ते मांडतांना फक्त स्वत:चा युक्तिवाद झाला, की ‘संपलं आपलं’ असं निवांत अजिबातच होता येत नाही. तर दुसरा वकील काय युक्तिवाद करतो ते नीट ऐकणं गरजेचंच. जे भांडण आहे त्यात दुसऱ्याचं म्हणणं खोडून काढायचं तर ते आधी ऐकायला हवं ना. वकिलांना मराठीत विधिज्ञ, अधिवक्ता, प्रतिनिधी अशी भारदस्त नावं असली, तरी ‘झगडपिल्लू’ याही नावाची नोंद घ्यायला हवी.
खरंतर कायदेविषयक अभ्यासक्रमात ‘ऐकणं’ हा विषय हवा. विद्यार्थी जरी वाचून आणि ऐकून ज्ञान मिळवत असले किंवा ज्ञान मिळवण्याचं प्रमुख साधन पानावरचं किंवा पडद्यावरचं वाचणं हे असलं, तरी कितीतरी विषयांवरची भाषणं आणि पुस्तकच्या पुस्तकं आपण ऐकतही असतो. म्हणजे ‘ऐकणं’ हाही शिकण्याचा विषय हवा. असं म्हणतात, ‘It is the province of the knowledge to speak & it is the privilege of wisdom to listen’ (ज्ञानी माणसानं बोलावं आणि शहाण्यानं ऐकावं).
कायद्यात नैसर्गिक न्यायाची काही तत्त्वं दिली आहेत. कायदा एकीकडे खूप क्लिष्ट, कठीण आहे, तर दुसरीकडे साधा, सोपा, सर्वसामान्य वागणुकीवर आधारलेला. या नैसर्गिक न्यायामध्ये ‘दुसऱ्याचं म्हणणं नेहमी ऐकून घ्या’ असं महत्त्वाचं तत्त्व आहे. कधी कधी तातडीचा आदेश मिळवण्यासाठी न्यायालयात लोक सुट्टीतही येतात. विशेषत: मनाईच्या, ताबा घेण्याच्या खटल्यांमध्ये तातडीच्या अंतरिम आदेशाची निकड असते किंवा तो केवळ दिखावाही असतो दुसऱ्याला अडचणीत टाकण्याचा!
एका अशाच सुट्टीत एका बँकेचे कर्जाचे अनेक हप्ते एका इमारतीतील लोकांनी थकवल्यानं आणि विजेचं बिलही न भरल्यानं त्या बँकेनं इमारतीच्या एका भागाचा ताबा घेऊन वीजपुरवठा केवळ गरजेपुरता सुरू ठेवला होता. त्यामुळे वातानुकूलनाची सर्व यंत्रणा ठप्प झाली. तिथले चार ते पाच दुकानदार मालक तातडीनं न्यायालयात पूर्ण वीजपुरवठा हवा म्हणून धावत गेले. एका कापडाच्या दुकानदारातर्फे मी व माझे सहकारी वकील होतो. त्या न्यायाधीशांना आमच्या मालकाबद्दल, आमच्याबद्दल अजिबात सहानुभूती नव्हती. आमची बाजू दुबळीच होती. आमचं म्हणणं ते अजिबात ऐकून घेत नव्हते. ‘बँकेला तुम्ही सगळे फसवून लोकांचंच नुकसान करत आहात’ वगैरे म्हणाले. बँकेच्या वकिलाचं मात्र त्यांनी मन लावून ऐकलं आणि आमचं मागणं नाकारणारा आदेश द्यायला सुरुवात केली. तेवढय़ात एक पोरगेलासा नवीन वकील धावत, धापा टाकत एका घामाघूम झालेल्या माणसाला घेऊन आला. त्या वकिलाच्या हातात ब्रीफऐवजी दोन भले मोठे कागदी खोके होते. त्या माणसाच्या हातातही पाच-सहा खोके होते. त्यांनी ते उघडले अन् त्यातलं सगळं दूध वकिलाच्या अंगावर सांडलं. गरम झालेल्या न्यायाधीशांकडे पाहून तो पोरगेलासा वकील कसाबसा बडबडला, ‘‘युवर ऑनर, आइस्क्रीम पार्लर- मेल्टेड.’’ तेवढं मात्र खाली मान घालून आदेश लिहिणाऱ्या न्यायाधीशांनी ऐकलं आणि बाजूच फिरली. त्यांनी ताबडतोब वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा आदेश दिला. म्हणूनच न्यायधीशाला सतत ऐकण्याचं काम ‘उघडय़ा कानांनी लक्षपूर्वक’ करावं लागतं. समोर चालणारा एवढा लहानसाही युक्तिवाद कानाआड करून चालत नाही. खूपच एकाग्रतेनं वकिलांच्या तोंडून येणारा प्रत्येक शब्द नीट ऐकावा लागतो. प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचं वजन जोखावं लागतं.
मी एकदा जेव्हा माझी सायकल दुरुस्त करायला घेऊन गेले, तेव्हा सायकलवाला सरदारजी म्हणाला, ‘‘ये घंटी निकाल दूँ? जोरसे बजनेवाला हॉर्न लगा देता हूँ। आजकल ये घंटी कोई सुनता नहीं।’’ तेव्हा ‘चौकात उधळले मोती’ या पुस्तकाच्या माझ्या आवडत्या लेखकानं- अंबरिश मिश्र यांनी उद्धृत केलेल्या ओळी आठवल्या..
‘कैसे मंजर सामने आने लगे
गाते गाते लोग चिल्लाने लगे’
कधी कधी दुसऱ्या माणसाचं फक्त ऐकायचं असतं. विशेषत: नात्यात! सांगणाऱ्याला गरज असते ऐकणाऱ्याची. मी न्यायदानाचं काम करत असल्यामुळे दुसऱ्याचं ऐकल्यावर माझ्या डोक्यात लगेच यावर निर्णय काय द्यावा, तोडगा काय काढावा, अशी चक्र सुरू व्हायची. पण आता मला समजलंय, की प्रत्येक वेळी निकाल देण्याची गरज नसते, तोडगाही नको असतो, समोरची व्यक्ती फक्त सांगत असते, ‘ऐक जरा.’
‘बोललात तुम्ही?
नाही ऐकू आलं
ओरडलात तुम्ही?
नाही ऐकलं मी
रडलात?
नाही ऐकलं
महिने गेले
वर्ष सरली!
पांढऱ्यावर काळं करताना
काळय़ाचे पांढरे झाले!
पुटपुटलात तुम्ही?
ऐकू आलं मला
नि:श्वास तुमचा
ऐकला मी.
नाही बोललात तुम्ही
ते सारं ऐकलं मी!’
chaturang@expressindia.com