आई-वडिलांच्या घटस्फोटात फरपट होते ती मुलांची. पण जेव्हा, तुला कुणाकडे राहायचंय, असा प्रश्न मुलांना विचारला जातो तेव्हा त्यांची उत्तरं अनेकदा नि:शब्द करणारी असतात. तेव्हा नात्यांचा अर्थ नव्यानं शोधावासा वाटतो. पण मुळात नवरा-बायकोंनी आपल्या नात्याला ‘समंजस’ केलं तर मुलांना इतक्या कटू अनुभवांतून जावं लागणार नाही हे प्राथमिक सत्य उरतंच.

‘ताबा’ हा शब्द छोटय़ा मुलांच्या संदर्भात वापरणं मला नाही आवडत. कारण यात मालकी हक्काची किंवा अधिकाराची सुप्त भावना असते, असं मला वाटतं. जागेचा, वस्तूंचा ताबा वा कैद्यांचा ताबा असतो; परंतु न्यायालयात अशा शब्दांना पर्याय नसतो. त्यामुळे ताबा        (Custody) हाच शब्द वापरला जातो.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

इंग्रजीमध्ये पझेशन (Possession) आणि ताबा (Custody) या दोन्ही शब्दांचे अर्थ थोडे वेगळे आहेत.  Possession म्हणजे ताबा, तर कस्टडी हा ताब्याचा कायदेशीर अधिकार आहे. मला मुलांची कस्टडी याला ‘देखरेख’ हाही शब्द तितकासा अचूक वाटत नाही. भाषा शेवटी प्रवाही असते. वाचकांपैकी कोणाला तरी  Possession आणि  Custody मधला फरक दाखवणारे दोन अचूक मराठी शब्द मिळतीलही.

मागील लेखात (१६ जुलै) मी एका नकार पचवणाऱ्या छोटय़ा मुलाच्या ताब्याबद्दल लिहिलं होतं. मुलांचा ताबा हा फारच वेदनादायी, दु:खी करणारा विषय असतो. मला तर एखादा खुनाचा खटला चालवणं ताब्याच्या भांडणापेक्षा सोपं वाटायचं. ताब्याच्या भांडणात छोटय़ा मुलांच्या भावनांचा आणि आईवडिलांच्या भावनांचाही बळी जात असतो. बिरबलाच्या गोष्टी अनेकांनी वाचल्या आहेतच. बिरबल म्हणजे शहाणपण आणि चातुर्य! न्यायदान कसं करावं याचेही उत्कृष्ट धडे त्याच्या वेगवेगळय़ा गोष्टींत मिळतात. ‘हा मुलगा माझाच’ म्हणून त्याचा ताबा मागणाऱ्या दोन स्त्रियांना बिरबल सांगतो, ‘‘मुलाचे दोन समान भाग करून दोघींना देण्यात येतील.’’ तेव्हा एक स्त्री म्हणते, ‘‘मला नको मुलगा, दुसरीला द्या.’’ पण बिरबल त्याच स्त्रीला मुलाची खरी आई ठरवतो. कारण मुलाला झालेली इजा ती बघूच शकत नव्हती. तसाही प्रकार छोटय़ांची कस्टडी ठरवताना कधी कधी वेगळय़ा अंगांनी करावा लागतो. ज्या आई-बाबांना वाटतं, की मूल ही माझीच मालमत्ता आहे ते खरं तर त्या मुलाच्या मनाचे दोन समान वाटे करत असतात. अदृश्य, पण जाणवणारे!

एकदा असेच खूप भांडणारे आई-बाबा समोर आले. आधी आईचं म्हणणं ऐकून घेतलं; मग बाबांचं. अत्यंत सुशिक्षित, नवश्रीमंत घरातले ते दोघेही होते. प्रश्न पोटगी, पैशांचा नव्हताच. नेहमीसारखा अहंकाराचा (Ego) होता. दोघंही तो/ती किती वाईट आणि लेकाचे हाल कसे होतात, हे मला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर मी त्या आठ वर्षांच्या मुलाला बोलावलं. त्यानं शांतपणे पहिलंच वाक्य इंग्रजीमध्ये उच्चारलं, ‘‘Why did they give birth to me? हे दोघंही मला नको आहेत. मला बोर्डिग स्कूलमध्ये पाठवा. पंधरा दिवसांनी त्यांना भेटू द्या.’’ आता मला काहीच काम उरलं नव्हतं. त्या छोटय़ानं निर्णय घेतला होता. त्याला शांतता हवी होती. मी त्या आई-बाबांना विचारून खरोखरच बोर्डिग स्कूलमध्ये जाण्याचा त्याचा निर्णयच कायम ठेवला. आइर्-बाबा मात्र मुलाचा ताबा दुसऱ्याकडे गेला नाही यातच खूश होते. त्या दोघांनाही निकाल दुसऱ्याच्या विरुद्ध (?) गेला याचाच आनंद होता.

अशा ताब्याच्या खटल्यामध्ये बहुधा विजय तसा कोणाचाच नसतो. सगळेच जण हरलेले असतात. काही तोडगा काढला जातो, पण शेवटी आयुष्यात बहुतेकदा प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो आणि त्याची किंमतही द्यावीच लागते! ‘आई की बाबा?’ हा प्रश्न किती भयानक असणार त्या छोटय़ा मुलांसाठी! २ ते ३ वर्षांच्या बाळांना तर कळतही नसतं. त्यांचा ताबा साधारणत: आईकडेच जातो. आई ही कायद्याने नैसर्गिक- प्रथम पालक असते. मुलाच्या वयाच्या ५ वर्षांनंतर वडील तो ताबा घेऊ शकतात. पण हा नियम त्या त्या आई-वडिलांच्या वागणुकी आणि कुवतीप्रमाणे लवचीक असतो. त्यामुळे खरं भांडण सुरू होतं ते मुलांच्या ५ वर्षांनंतर. ‘ताबा’ याचा अर्थ दुसऱ्या पालकांना त्यांना भेटायला मिळणार नाही, ते जवळ राहाणार नाहीत, असा कधीच नसतो. तर दुसऱ्या पालकालाही मुलांबरोबर राहाण्याचा, त्यांचं दु:ख, आनंद, यश, शाळा हे सगळं काही जाणून घेण्याचा, त्या संदर्भात निर्णय घेण्याचा, मुलांसोबत सुट्टी घालवण्याचा पूर्ण अधिकार असतो.

कधी कधी एकाकडेच ताबा देणं ही मुलाच्या हिताच्या दृष्टीनं आवश्यक प्रक्रिया असते. अशा वेळी मुलाचा ताबा मागणं ही त्या आई-वडिलांची अत्यावश्यक कृती असते. पाल्याच्या योग्य वाढीसाठी आणि सुरक्षिततेसाठी. एखादी व्यक्ती नवरा किंवा बायको म्हणून वाईट असू शकते, पण तीच व्यक्ती मुलांसाठी चांगला बाबा किंवा योग्य आई असू शकते. भूमिका बदलल्या की व्यक्तीच्याही गुणधर्मात फरक होतोच की!

असाच एक १०-११ वर्षांचा मुलगा माझ्यासमोर ‘ताबा’ निवड करण्यासाठी बसला होता. मी त्या छोटय़ाला विचारलं, की त्याला कोणासोबत राहायला आवडेल. ‘‘आई की बाबा?’’ हातांची चाळवाचाळव करत तो एक मिनिटभर गप्प होता. मी त्याला तो प्रश्न पुन्हा विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘बाबा.’’

‘‘बरं, पण आई का नको?’’

‘‘I love my mother very much.’’

‘‘मग तिच्याकडे का नाही राहायचं?’’

‘‘माझं आईवर खूप प्रेम असलं, तरी आई फक्त नोकरी करते. पप्पांचा मोठा बिझनेस आहे. आई मला प्रेम देईल जास्त, पण मला पुढे चांगलं करिअर करायचं आहे. तेव्हा खूप पैसे लागतील आणि मला जी कम्फर्टस् हवी आहेत ती पप्पाच देऊ शकतील, आई नाही. त्यामुळे मी पप्पांकडे राहाणार. आई काय, भेटेलच मला!’’

गरजांचा अग्रक्रम त्याच्या डोक्यात अगदी स्पष्ट होता. मला तेव्हा लक्षात आलं, की न्यायासनावर बसलेल्या अधिकाऱ्यांनी आपले विचार, जगाचं आकलन हे सतत बदलत नव्या धारणेनुसार ताजं ठेवायला हवं. खूप भाबडय़ा कल्पना घेऊन तिथे बसून निकाल देता येत नाही. मुलांमध्ये नैसर्गिक निरागसता असते असा सतत अंधविश्वास नको. काही मुलांचं मूलपण जर संपूनच गेलं असेल, तर त्या निरागसतेची अपेक्षा ही भाबडी आणि अनाठायी असते.

‘‘पापाने मेरे साथ बुरा काम किया। मेरे कपडे के अंदर हाथ डालता हैं।’’ अशी तक्रार करणाऱ्या ६ वर्षांच्या छोटीला आईनंच पढवून खोटं बोलायला लावलंय हे माझ्या नजरेतून सुटलं नाही. असे वेडेवाकडे खोटे आरोप करवून त्या मुलीची आई तिला प्यादं म्हणून वापरत होती. प्रत्येक मूल, त्याचे प्रश्न हे त्याच्या खटल्यानुसार बदलतात. जसं हृदयाची शस्त्रक्रिया तीच असेल, पण प्रत्येक रुग्णाच्या प्रकृतीनुसार शल्यविशारदाला तसा निर्णय घ्यावा लागतो.

दोन-तीन वर्षांची भोकाड पसरून रडणारी, इकडून तिकडे आई-बाबांकडे बदली होणारी छोटी मुलं असे प्रसंग पाहाणं फार वेदनादायी असतं. मग त्या बाळांना चॉकलेट्स, खेळणी काही तरी हातात द्यायचं. पण त्यांचं हरवलेलं प्रेमाचं माणूस त्यांना कसं परत मिळणार? आई-बाबा दोघंही असणं हा त्या मुलाचा खराखुरा अधिकार!

समंजस पालकत्व हा शिकण्याचा, आत्मसात करण्याचा विषय आहे. ‘मी माझ्या मुलासाठी, मुलीसाठी हे हे केलं’ याची यादी देणारे पालक हे आई-बाबा म्हणून सपशेल नापास! जेव्हा आई-बाबा असं बोलतात, तेव्हा मला आचार्य प्र. के. अत्रे यांनी लिहिलेली ‘दिनूचे बिल’ ही सुप्रसिद्ध गोष्ट आठवते. ‘मी तुझी ही ही कामे केली’ म्हणून आईला काही रुपयांचं बिल दिनू देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनूला आईनं लिहिलेलं बिल मिळतं, जन्म दिला, अभ्यास घेतला, तापात शुश्रूषा केली, स्वयंपाक केला इ. इ. पण बिलावरची रक्कम मात्र ‘शून्य’ असते. तर या जुन्या साध्या गोष्टी परत ‘चिकन सूप’सारख्या बोधकथा म्हणून नवीन आई-बाबांना सांगण्याची गरज वाटते.

आणखी एक घटना आठवते. दोन आज्या ५ वर्षांच्या नातीसाठी भांडत होत्या. त्या छोटीच्या आईबाबांचा प्रेमविवाह झाला होता. ती छोटी जन्माला आली दुबईत. त्यानंतर वर्षभरातच तिच्या बाबांनी तिच्या आईचा खून केला आणि तिथल्या कायद्यानुसार त्यांना फाशीची शिक्षा झाली. आईचा खून झाल्यावर लगेच त्या छोटीला वडिलांची आई भारतात घेऊन आली. इथे आल्यावर लगेच तिचा ताबा हवा म्हणून आईच्या आईनं कोर्टात दावा केला. त्या छोटीला कुणीच नव्हतं, ना आई, ना बाबा. बाबाची आई ताबा सोडायला केवळ एका अटीवर तयार होती, की आईच्या आईनं दुबईच्या कोर्टात ‘जावयाला पश्चात्ताप होत आहे आणि त्याच्या हातून खून झाला त्याबद्दल त्याला माफ केलं आहे,’ असा माफीनामा पाठवला, तर त्याची फाशीची शिक्षा टळणार होती. त्यासाठी आईची आई अजिबातच तयार नव्हती. मुलीच्या खुन्याला कसं माफ करणार? ती छोटी माझ्यासमोर आली. खालच्या कोर्टानं तिचा ताबा आईच्या आईकडे देण्याचा हुकूम केला होता. तिनं तिची अम्मी किती छान आहे, खूप प्रेम करते आणि तिथेच तिला शाळेत जायला आवडतं, वगैरे सांगितलं. त्या छोटीला ती आता सगळय़ाच लोकांचा केंद्रिबदू आहे हे पूर्णपणे समजत होतं. तिच्या प्रत्येक शब्दात, वागण्यात ती जाणीव व्यक्त होत होती. तिची नानीबद्दल काहीच तक्रार नव्हती, पण तिला तिथे सुरक्षित वाटत नाही, असं तिनं सांगितलं.

ती नवीन फ्रॉक घालून आली होती. पण तिच्या नखांना भडक रंगाचं नेलपॉलिश, ओठांना लिपस्टिक, डोळय़ांत काजळ, भुवया कोरलेल्या होत्या. तिच्या संभाषणातली समज मला फार विचित्र वाटली. नेलपॉलिश बघण्याच्या निमित्तानं बोटं पाहिली, तर नखांत मळ होता. मी अर्थातच दिवाणी कोर्टाचा निर्णय कायम करून तिचा ताबा आईच्या आईकडे दिला. त्यानंतर एका महिन्यानं जेव्हा पाठपुरावा करण्यासाठी ती छोटी आली, तेव्हा ती साधा फ्रॉक, कोणताही मेकअप नसलेली शांत अशी मुलगी होती. तेव्हा कोर्टानं दिलेला ताबा योग्यच होता याची खात्री पटली.

न्यायमूर्ती रोशन दळवी आणि मी बोलत असताना त्यांनी मला F.A.M.I.L.Y. म्हणजे Father And Mother I Love You  अशी कुटुंबाची समर्पक व्याख्या सांगितली! तीच मी ताब्यासाठी भांडणाऱ्या आईबाबांना सांगत असे. ताब्याविषयी शेवटी एक महत्त्वाचं. मुलांच्या ताब्याविषयी कधीही न भांडणारे आई-वडील मात्र मूल मोठं झालं, त्याचं लग्न झालं, तरी कधी कधी त्याचा ताबा सोडत नाहीत. ही विशेषत: आपल्या भारतीय समाजाची मानसिकता आहे. मुलांची काळजी, प्रेम म्हणजे ताबा; हक्क नाही. हा मानसिक ताबा किंवा रिमोट कंट्रोल मात्र फार मोठे प्रश्न उभे करतो. शेवटी आपलं मूल हे १८ वर्षांनंतर स्वतंत्र व्यक्ती आहे. तिच्या स्वत:च्या स्वतंत्र आयुष्यासकट! याचं भान प्रत्येक पालकानं ठेवायला हवं.

chaturang@expressindia.com