संगीत हे जरी निरनिराळ्या सुरांनी सजत असलं, तरी त्यातील नाद एकमेकांमध्ये विलीन होताना ऐकू येतात. ही एक प्रकारची ध्यानावस्था असू शकते. कारण या अवस्थेत गायक शब्द, उच्चार, स्वर आणि लय अशा घटकांपुरताच मर्यादित न राहता, त्यापलीकडे जाऊन आपल्या आवाजातून एक निराकार संगीत साकार करू पाहत असतो. या ‘शब्देविण संवादु’ प्रक्रियेत श्रोता म्हणून सहभागी होण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत रोजचेच शब्द, रोजचेच अर्थ, रोजचेच समज, रोजचेच गैरसमज, रोजचीच कलकल आणि रोजचेच आवाज. या सगळ्या चाकोरीच्या मुळाशी असणाऱ्या ‘शब्द-गुंत्यातून’ बाहेर पडण्यासाठी, एखाद्या दिवसाची सुरुवात शब्दांनी न करता अभिजात दर्जाची अनुभूती देणाऱ्या तेजस्वी सुरांनी करावी, या कल्पनेतून आम्ही काही समविचारी रसिकांनी मिळून ‘ध्रुपद गायकी’ची (हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातली प्राचीन शैली) सहसा ऐकायला न मिळणारी एक प्रात:कालीन घरगुती बैठक आयोजित केली होती.
एकीकडे जुळू पाहणारे तंबोरे झंकारत होते आणि त्या सुरेल झंकारातून सूर्योदयापूर्वीच भोवतालच्या जगाचा जीवनप्रवाह सुरू होण्याआधीचा ताजेपणा आम्ही अनुभवत होतो. सुरात लागलेल्या तंबोऱ्यांमध्ये एका गायकाने ‘‘रि द न न नो sssम’’ अशा भारदस्त आवाजात त्याची गायकी मिसळली आणि तो नाद ऐकून जणू मनाचा गाभारा भरू लागला. एरवी संगीताचा आस्वाद शब्दांनी आणि अर्थाने घेण्याची सवय, पण आजच्या या संगीताच्या जोडीला शब्द आणि अर्थ नव्हते. तो राग ओळखीचा नव्हता, ते सूरही ओळखीचे नव्हते, ‘रिदनननोम’ या शब्दांनी कोणताच अर्थबोध होत नव्हता, पण तरीही त्या भारदस्त स्वराकृतीतून निघणारं ते ध्वनिसौंदर्य गायकाला आणि श्रोत्यांनाही कुठे तरी मनाच्या तळाशी नेणारं होतं. ते अर्थहीन शब्द गळ्यात घेऊन एकेका सुराला गोंजारताना गायकाच्या चेहऱ्यावर सात्त्विक आनंद ओसंडून वाहत होता, कारण त्या गायकीतील शब्द अर्थहीन असले, तरी त्यांचं विसर्जन हे एका विशिष्ट लयीत आणि ओंकारसदृश नादात होत होतं, ज्यामुळे रसिक आणि कलाकार हा संवाद नकळतच एका आंतरिक भावविश्वाशी जोडला जात होता. आकार, उकार, इकार आणि सगळ्याच अक्षरांचे आकृतिबंध जणु त्या गायकीतून एका ओंकाराच्या चरणी समर्पित होत होते.
थोडा रागविस्तार ऐकल्यानंतर मी त्या गायकीत काही तरी शोधू लागले. कदाचित शब्द, कदाचित अर्थ किंवा कदाचित मला जे हवं. ते काही सापडेना. मग काही वेळानं कळलं की माझं हे शोधणंच चुकीचं आहे, त्यापेक्षा कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यातील सौंदर्याचा मोकळेपणानं आस्वाद घेता आला पाहिजे. मग गायक जसा ‘जमून’ गात होता तशीच मीही ‘जमून’ ऐकू लागले. गाणं कळत नसलं तरी ते उच्चार आणि संवाद थेट मनाला भिडत होते. गायकासाठी ते अर्थहीन उच्चार संगीताशी संवाद साधण्याचे केवळ बाह्य साधन होते; पण खरा सुसंवाद आतून सुरू होता हे जाणवत होतं. गायकीचा प्रांत ओलांडून पुढ्यात आलेलं ते ‘मग्नपण’ मला आकर्षित करू लागलं. एक श्रोता म्हणून मी अधिक तरल झाले होते, मला शांत वाटू लागलं.
या अशा अर्थहीन शब्दात खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य येतं कुठून, असा विचार माझ्या मनात सुरू असतानाच गायकाने ‘रिदनननोम’ शब्दातील अर्थ समजावून सांगायला घेतला. त्यातून हे समजलं की ध्रुपद गायकांसाठी ‘रिदनननोम’ हे नुसते शब्द नसून शब्दांच्या पलीकडे नेणारे विशेष उच्चार आणि नाद असतात. ते या उच्चारांकडे ‘मूलध्वनी’ (Root Sound) म्हणून बघत असतात. स्वरनिर्मिती ही जरी कंठातून होत असली तरी तिची कंपनं मात्र शरीरभर, शरीराच्या मुळापर्यंत जाणवावीत हा अनुभव घेण्यासाठी सखोल साधनेत रममाण झालेले ध्रुपद गायक असे मूलध्वनी समरसून गात असतात. संगीत हे जरी निरनिराळ्या सुरांनी सजत असलं तरी मूलध्वनींच्या उच्चारात मात्र संगीतातील वेगवेगळे सूर ‘अखंड-नाद’ म्हणून एकमेकांमध्ये विलीन होताना ऐकू येतात. ही एक प्रकारची ध्यानावस्था असू शकते जी स्वत:शी आणि श्रोत्यांशी एकाच वेळी संवाद साधू शकते. कारण या अवस्थेत गायक हा शब्द, उच्चार, स्वर आणि लय अशा घटकांपुरताच मर्यादित न राहता, त्यापलीकडे जाऊन आपल्या आवाजातून एक निराकार संगीत साकार करू पाहत असतो. या ‘शब्देविण संवादु’ प्रक्रियेत श्रोता म्हणून सहभागी होण्याचा आनंदच काही वेगळा आहे.
हा आनंद समजून घ्यायचा असेल तर ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेताना आपण तो किती तरलतेने घेतो याला फार महत्त्व आहे. आपण सहजपणे किंवा मोकळेपणानं श्रवण करायला तयार नसतो. कारण आपण जे श्रवण करीत असतो ते ‘श्रवण’ व ‘आपण’ यांच्यामध्ये पूर्वग्रहांचा एक अदृश्य पडदा उभा असतो म्हणून आपण कधी आवडीनं श्रवण करतो, कधी तुलना करतो तर कधी प्रश्न उभे करतो… ‘ध्रुपदा’सारख्या दुर्मीळ शैलीचे श्रवण करताना ‘मला हे ऐकून काही तरी समजून घ्यायचं आहे,’ असं मनावरील दडपण पूर्णपणे बाजूला ठेवलं तर श्रवण करण्यासाठी एक प्रकारची आंतरिक शांतता निर्माण होऊ शकते. अशा अवस्थेत जे शाब्दिक निष्पत्तीच्या पलीकडचं संगीत असतं त्याचंही श्रवण केलं जाऊ शकतं. म्हणून ‘ध्रुपद गायकी’ ऐकत असताना ‘रिदनननोम’ ही प्रक्रिया किंवा तिचा अर्थ किंवा तिच्यातील ‘नारायण-ओम’ हा आभास नेमकेपणानं सांगता येत नाही, परंतु तिच्या श्रवणातून मिळणारा नादसौंदर्याचा आनंद हा शब्दांच्या पलीकडे नेणारा असतो इतकं मात्र सांगता येईल.
‘नोमतोम’ची गायकी म्हणून प्रसिद्ध असलेली ध्रुपद गायकी समाजमाध्यमावर अनेक थोर कलाकारांच्या आवाजात जतन केलेली दिसून येते. वास्तविक पाहता हे श्रवण तितकेसे परिणामकारक होत नसते. त्यातून ‘ध्रुपद’ या मूळ शैलीचे किंवा त्या गायकाच्या आवाजाच्या भारदस्तपणाचे जिवंत वातावरण निर्माण होऊ शकत नाही. असं असलं तरी उत्तम प्रतीच्या ध्वनी प्रणाली (साऊंड सिस्टीम)वर डोळे बंद करून काही काळ श्रवण केले, तरी साधारण त्या गायकीची निदान कल्पना करता येऊ शकते. अर्थात प्रत्यक्ष आणि थेट श्रवणाला पर्यायच नाही. हल्ली महाराष्ट्रातूनही ध्रुपद शैलीचं गायन वरचेवर ऐकायला मिळतं. अशा थेट मैफिलींचा आस्वाद अवश्य घेतला पाहिजे. प्रत्यक्ष ध्रुपद गायकीतील खर्जयुक्त मूलध्वनींचा अफाट विस्तार ऐकण्याने आनंद तर होतोच, पण मानवी कंठातून निघणाऱ्या आवाजाचे सौंदर्यदेखील अनुभवता येते. पण बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या गायकीतील मोठा विस्तार ऐकण्यातला संयम आणि वेळ कमी पडल्यामुळे श्रोते या आनंदापासून वंचित राहतात. अशाने ध्वनीविषयक अभिरुचीच्या कक्षा कशा रुंदावणार, असा प्रश्न पडतो.
मानवी कंठातून निर्माण होणारे ध्वनी हे कधी आवाजातून, कधी ‘शब्द’रूपाने तर कधी ‘स्वर’रूपाने प्रकट होत असतात. नुसत्याच शब्दातून निघणारे नाद हे तुटक, आखूड किंवा तोकडे असतात तर ध्रुपद शैलीसारख्या स्वरातून निघणारे नाद हे सलग, दीर्घ आणि लांबविलेले असतात. ‘सुखदु:खादी संवेदना व्यक्त करताना कंठातून निघणारे स्वर लांबवता येऊ शकतात’ या अनुभवात्मक निरीक्षणातूनच ‘गळ्याने गाता येऊ शकते’ ही जाणीव मानवात विकसित झाली असावी. ध्रुपद गायकीतील मूलध्वनी हे संगीतनिर्मितीबरोबरच एका आंतरिक प्रक्रियेशी संवाद साधू पाहत असतात. गायकांनी त्या मूलध्वनींचे सौंदर्य ‘गाणे’ आणि श्रोत्यांनी ते ‘ऐकणे’ हे आनंददायी तर आहेच, परंतु ते आध्यात्मिकतेशीही जोडणारे आहे हे ध्रुपद गायकी ऐकताना जाणवते. आज ऐकू येणारे ध्रुपद व अभिजात भारतीय रागसंगीत हे मुख्यत: स्वरांवर तर सुगम संगीत हे मुख्यत: शब्दांवर आधारित असते. शब्द आणि सूर यांच्या मिश्रणाने ठुमरी, दादरा, गझल, नाट्यगीतं यांसारखे काही उपशास्त्रीय संगीत प्रकारही लोकप्रिय झाले आहेत परंतु शब्दविरहित शुद्ध संगीताचा आनंदच काही वेगळा असतो. शास्त्रीय असो, उपशास्त्रीय असो अथवा सुगम; या प्रत्येक प्रकारच्या संगीतात, ‘स्वरांना शब्दांचा’ आणि ‘शब्दांना स्वरांचा’ परस्पर आधार घ्यावा लागतो. सुगम प्रांतातील शब्दप्रधान संगीताला जसा साहित्याच्या बाजूने अर्थ असतो तसाच शास्त्रीय किंवा अभिजात प्रांतातील स्वरप्रधान संगीतालाही रागाच्या बाजूने अर्थ असतो. पण एखादी संगीतशैली अशीही असते जी शब्दांच्या, अर्थाच्या किंवा अर्थपूर्ण संगीताच्याही पलीकडे आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. ध्रुपद संगीत हे याचे उत्तम उदाहरण आहे.
हे उदाहरण प्रत्यक्ष सादर करणाऱ्या त्या प्रात:कालीन मैफिलीत एका अनोळखी रागाने नदीच्या अथांग पात्राप्रमाणे विशाल वळण घेतलं होतं आणि नकळतच रसिकांच्याही मनाचं पात्रही विशाल झालं होतं. सकाळच्या कोवळ्या प्रकाशात, ‘रिदनननोम’चे वेगवेगळ्या लयीत चाललेले ते ‘गान-नृत्य’ प्रत्येक आवर्तनाचं क्षितिज ‘नारायण ओम’ म्हणून विस्तारणारे होते. ध्रुपदाच्या लयीला पखावजाची घनगंभीर साथ आणि श्रोत्यांची दिलखुलास दाद मिळत होती. अनोळखी शब्द, अनोळखी सूर, पण ओळखीचा संवाद असा हा सौंदर्यसोहळा रंगला होता आणि ध्रुपद गायकी या एका अनोळखी शैलीच्या बहरलेल्या त्या झाडाखाली मीही सुखावले होते.
trupti.chaware@gmail.com