|| अनिकेत साठे
भारतात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परीक्षेसाठी परवानगी दिली. या निर्णयाने काही विभागांपुरता सीमित राहिलेला स्त्रियांच्या सेवेचा परीघ तिन्ही सैन्य दलांत सशस्त्र कारवाईतील सहभागापर्यंत विस्तारणार आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील स्त्री सैनिकांच्या सहभागाचा आणि कामगिरीचा हा ऊहापोह…  

पराक्रम गाजविणे हा पुरुषांचा जणू जन्मजात हक्क असल्याचा गैरसमज देशोदेशीच्या सैन्य दलांतील स्त्री अधिकारी आणि सैनिक आपल्या लढाऊ कामगिरीने गेल्या कित्येक वर्षांपासून दूर करीत आहेत. खडतर लष्करी सेवा स्त्रियांसाठी नवीन नव्हती. सहाय्यकारी दलात त्या दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्या कशा तग धरतील, याविषयी घेतल्या जाणाऱ्या शंका-कुशंकांना युद्धभूमीवर उतरलेल्या स्त्रिया सडेतोड उत्तर देत आहेत. पुरुषांचे एकहाती वर्चस्व असणाऱ्या सेनादलाच्या रचनेत स्त्रियांच्या सहभागाने वेगळे परिमाण लाभत आहे.

भारतात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) परीक्षेसाठी परवानगी दिली. या निर्णयाने काही विभागांपुरता सीमित राहिलेला त्यांच्या सेवेचा परीघ तिन्ही दलांत सशस्त्र कारवाईतील सहभागापर्यंत विस्तारणार आहे. पुरुषांच्या बरोबरीने त्यांना कामगिरीची संधी मिळेल. जगातील अनेक राष्ट्रांनी लिंगभेदाची जळमटे कधीच दूर सारली. स्त्रियांचा सैन्य दलातील प्रवेश मान्य केला. केवळ प्रवेश देऊन ते थांबले नाहीत, तर आघाडीवर लढण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली. प्रागतिक विचार करणाऱ्या राष्ट्रांना स्त्रियांची सक्षम कामगिरी लवकर लक्षात आली, असे म्हणायला हवे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वैद्यकीय-परिचारिका विभागात अनेक राष्ट्रांतील स्त्रिया कार्यरत होत्या. युद्धाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अनुभव त्या अव्याहतपणे घेत आहेत. कालांतराने अन्य सहाय्यकारी दलांत त्यांना समाविष्ट करण्यास सुरुवात झाली. आता तर पायदळात शत्रूशी थेट झुंज असो, लढाऊ विमानाचे संचलन अथवा युद्धनौकेवरील जबाबदारी असो. स्त्रिया समर्थपणे पुरुषी मक्तेदारीस आव्हान देत आहेत. जगात लष्करी सेवा हे एकमेव असे क्षेत्र आहे की, जिथे स्त्रियांची संख्या अतिशय कमी आहे. अमेरिका, कॅनडासारखी काही राष्ट्रे ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे त्यांच्या सैन्य दलांत किमान १५ टक्क्यांहून अधिक स्त्रियांचा सहभाग होऊ शकला. भारतासह कित्येकांना बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

जगातील शक्तिशाली सैन्य म्हणून अमेरिकेची ओळख. आठ दशकांपूर्वी त्यांनी स्त्रियांचे दल स्थापन केले. पण त्याचे कार्य सीमित होते. कोरियन, व्हिएतनाम युद्धानंतर बदल घडू लागले. वैद्यकीय कामापलीकडे स्त्रियांचा विचार होऊ लागला. मात्र, ‘पेंटागॉन’ने तोफखाना, चिलखती व पायदळ अर्थात सशस्त्र लढाईपासून त्यांना दूर ठेवले होते. कालांतराने हे निर्बंध हटले. त्यामुळे थेट कारवाई करणारी ली अ‍ॅन हेस्टर ‘सिल्व्हर स्टार’ मिळवणारी पहिली स्त्री ठरली. कर्नल स्टेफिन डाऊसन या ब्रिगेड कमांडर, तर चार स्टार मिळवणाऱ्या अ‍ॅन इ. डूनवुडी जनरल पदापर्यंत पोहोचल्या. जनरल लोरी रॉबिन्सन यांनी उत्तर विभागीय हवाई संरक्षण मुख्यालयाचे नेतृत्व केले. कार्यक्षमता, अनुभवाच्या बळावर स्त्रिया उच्च पदांना गवसणी घालत आहेत. विशेष मोहीम विभाग आणि पूर्वी प्रतिबंधित शाखांमध्ये आता स्त्रियांसाठी हजारो पदे खुली करण्यात आली. पाच वर्षांपूर्वी प्रशिक्षित स्त्रियांची पहिली ‘इन्फ्रंट्री’ (सर्वसमावेशक अधिकारी, सैनिकांची तुकडी) तयार करण्यात आली. नौदलाच्या ताफ्यातील पाणबुडी तुकडीत २० टक्के स्त्रियांना सामावण्याचे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे. हवाई दलाच्या सर्व शाखांमध्ये स्त्रिया लक्षणीय प्रतिनिधित्व करतात. या दलाच्या विशेष युद्धतंत्र विभागात रणनीती, बचाव कार्य, युद्ध नियंत्रण, हवाई संपर्क अशा महत्त्वाच्या पदांवर त्या कार्यरत आहेत. सक्षम स्त्रियांची भरती आणि प्रशिक्षणासाठी ३३ व्या विशेष युद्धतंत्र भरती तुकडीची स्थापना केली गेली. या सर्वांचे प्रतिबिंब अमेरिकी लष्कराच्या ताकदीत उमटते. आजवर अनेकींनी त्यांच्या देशासाठी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या शौर्यगाथा व्हर्जिनियास्थित लष्करी संग्रहालयात जतन केल्या जातात. लष्करातील स्त्रियांच्या स्मृती जतन करणारे हे जगातील एकमेव संग्रहालय आहे.

स्त्रियांच्या कर्तृत्वावर अमेरिकेप्रमाणे रशिया मात्र विश्वास दाखवू शकलेले नाही. बदलते जागतिक प्रवाह लक्षात घेऊन रशियाने स्त्रियांना अधिक्याने स्थान देण्याची तयारी दाखविली. मात्र, त्यांचा सहभाग मर्यादित राखल्याचे दिसून येते. रशियन सैन्यात ८० हजार स्त्रियांना समाविष्ट करण्याचे लक्ष्य गाठता आले नाही. गेल्या काही वर्षांत रशिया लष्करी मनुष्यबळ तुटवड्याला तोंड देत आहे. तरुणांना या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी मोहीम राबवावी लागते. निवृत्त अथवा राखीव सैनिकांना मोहिमेसाठी बोलवावे लागले. लष्करी संस्थांच्या प्रशिक्षण कालावधीत कपात करण्यात आली. ही स्थिती भविष्यात रशियन स्त्रियांना संधी देणारी ठरू शकते.

जगात सर्वांत मोठे लष्कर बाळगणाऱ्या चीनमध्ये स्त्री सैनिकांची संख्या पाच टक्क्यांच्या आसपास आहे. चीनमधील स्त्रिया रणगाडे संचलन, हवाई संरक्षण, लढाऊ विमानांचे सारथ्य व विशेष मोहिमेसाठी हवाई छत्रीधारी (पॅराट्रूपर्स) गटात कार्यरत असल्याचे चिनी प्रसारमाध्यमे सांगतात. रणगाड्याची स्त्री चालक वजनदार तोफगोळे बॅरलमध्ये भरू शकते. विमानविरोधी क्षेपणास्त्र डागण्यात काही जणी निष्णात होत आहेत. मध्यंतरी तिबेट क्षेत्रात चिनी लष्कराने मोहीम राबविली. अतिउंच क्षेत्रात प्राणवायूच्या कमतरतेमुळे पुरुष सैनिकांची दमछाक झाली. स्त्री सैनिकांवर तितकासा परिणाम झाला नाही. मोहीम सक्षमतेने पूर्णत्वास नेण्यास स्त्रिया आघाडीवर राहिल्याचे उल्लेख आढळतात. चीनचे हे दावे खरे आहेत की आभासी, हे मात्र कळण्याची सोय नाही.

फ्रान्स, ऑस्टे्रलिया, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इस्रायल, न्यूझीलंड, नॉर्वे या राष्ट्रांनी स्त्रियांना युद्धभूमीवर पाठवण्यास आता बराच काळ लोटला. इस्रायलमध्ये सैनिकी शिक्षण, काही काळ लष्करी सेवेचे बंधन आहे. तोफखाना, विमानविरोधी आणि बचाव दलात स्त्रिया नेटाने काम करतात. त्यांचे कौशल्य, अचूक नेमबाजी, तुकडीला प्रोत्साहन देण्याची धडपड वारंवार अधोरेखित होते. नॉर्वे हे ‘नाटो’तील स्त्रियांना पाणबुडीबरोबर सशस्त्र लढाईची जबाबदारी देणारे पहिले राष्ट्र. लढाऊ कामगिरीसाठी शारीरिक तंदुरुस्तीची मानके महत्त्वाची ठरतात. सैन्य दलाच्या खडतर सेवेची जिद्द बाळगणाऱ्यांना प्रशिक्षणात ती गाठणे अवघड नसते. उलट याआधारे बराच काळ त्या उत्तमपणे सेवा बजावतात, असे नॉर्वेतील लष्करी अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. स्त्रियांना पराक्रम गाजविण्याची संधी देण्यात कॅनडियन सैन्यही मागे नाही. तालिबान्यांशी लढताना तोफगोळ्याच्या माऱ्यात कॅनडाची पहिली स्त्री सैनिक धारातीर्थी पडली होती. निर्बंधाची भिंत हटल्यानंतर जर्मनीच्या सशस्त्र दलात स्त्रियांची संख्या वाढली. पायदळातील पुरुषांप्रमाणे स्त्रियांही चिवट झुंज देतात, हे डेन्मार्क लष्करातील रणरागिणींनी सिद्ध केले आहे. धार्मिक कट्टरतावादास खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानी सैन्यात चार हजारच्या आसपास स्त्रिया आहेत. त्यांना सैनिक वा खलाशी म्हणून काम करता येत नाही. विहित भरती प्रक्रियेतून (कमिशन) जावे लागते. मधल्या काळात लढाऊ विमानाची धुरा त्यांच्यावर सोपविली गेली. शेजारील अफगाणिस्तानातील परिस्थिती अलीकडेच पूर्णपणे बदलली. तालिबानशी लढण्यासाठी अफगाणी लष्करात स्त्रिया मोठ्या संख्येने भरती झाल्या होत्या. अमेरिकेने सैन्य काढून घेतल्याने अफगाणी लष्कराचे अवसान गळाले. तालिबानशी दोन हात न करता सैन्याने सपशेल शरणागती पत्करली. ही कृती अफगाणी स्त्री सैनिकांना गर्तेत लोटणारी ठरली.

संयुक्त राष्ट्र संघाच्या शांती सेनेत स्त्री सैनिकांच्या वाढत्या सहभागाने तणावग्रस्त क्षेत्रात स्थानिकांचे मन जिंकून कार्यवाहीची परिणामकारकता साधली जात आहे. तपासणी नाक्यांवर त्यांचे तैनात असणे संघर्षमय वातावरण निवळण्यास मदत करते. याकडे लक्ष वेधताना संघाच्या सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी लैंगिक शोषणाची बाजू मांडली. अनेक राष्ट्रांच्या सैन्यदलांत लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे प्रकार घडले आहेत. पण स्त्रिया न घाबरता तक्रार करण्यास पुढे येतात. संयुक्त राष्ट्र संघाने २०२८ पर्यंत सेनेत स्त्रियांचे प्रमाण २८ टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सुरक्षेची आव्हाने वाढत असताना लष्करात स्त्रियांचा समावेश महत्त्वपूर्ण ठरतो. लढाऊ दलात स्त्रियांच्या सहभागाने कारवाईची परिणामकारकता वाढते. इराक आणि अफगाणिस्तानमध्ये स्त्रिया मैदानात उतरल्यानंतर ते प्रकर्षाने समोर आले होते. सैन्य तुकडीला संवेदनशील, गोपनीय माहिती मिळवता आली.

‘नाटो’चा अभ्यास असे अनेक मुद्दे अधोरेखित करतो. सैन्यात स्त्रियांना सामावण्यात नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावू शकते. स्त्रियांना प्रोत्साहन मिळेल असे पोषक, सुरक्षित वातावरण देण्याची त्यांची जबाबदारी आहे. स्त्रियांची मानसिकता वेगळी असते. प्रशिक्षणात त्या जखमी होण्याचे प्रमाण अधिक असते. ते कमी करण्याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागेल. सदस्य राष्ट्रांनी स्त्रियांना अनुरूप उपकरणे, संच, पोशाख देण्याचा आग्रह ‘नाटो’चे अभ्यासक धरतात. या अभ्यासाचे काही संदर्भ अमेरिकेच्या २१ लष्करी पोलीस तुकडीतील निकोला हॉल यांच्या कामगिरीशी जुळतात. २००२ मधील घटना. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानच्या भूमीवर जम बसविण्याचा हा काळ. गस्त घालणाऱ्या तुकडीपासून स्थानिक स्त्रिया महत्त्वाची माहिती, शस्त्रास्त्रे दडवत असल्याचे लक्षात आले. अमेरिकी जवानांसाठी ते सांस्कृतिक द्वंद ठरले. स्थानिक स्त्रियांशी संवाद म्हणजे कलहास निमंत्रण. त्यामुळे आघाडीवर बेधडक गस्त घालू शकेल, अशा स्त्री सहकाऱ्यांची मागणी केली गेली. त्या वेळी निकोला यांची निवड झाली. स्त्री म्हणून तुकडीने त्यांना वेगळी वागणूक दिली नाही, असे त्या सांगतात. हवाई छत्रीधारी सैनिक तुकडीतील हॉल यांनी गस्तीची जबाबदारी नेटाने पार पाडली.

स्त्री-पुरुषांच्या शरीररचनेत फरक आहे. जडणघडण, मानसिकता वेगळी असते. यामुळे अनेकदा लष्करी प्रशिक्षणाची मानके, तंदुरुस्ती चाचण्या स्वतंत्र ठेवले जातात. प्रशिक्षण कालावधीत फरक आहे. यामध्ये समानता आणण्याची गरज काही निवृत्त स्त्री अधिकारी मांडतात. कवायत, अतिभार वाहून नेण्याच्या सरावात स्त्री प्रशिक्षणार्थींना पायास दुखापत, ओटीपोटाचा त्रास होतो. स्त्रिया भारमान पेलण्यास वा वाहून नेण्यात कमी पडत नाहीत. फरक पडतो तो भार वाहून नेण्याच्या कालावधीत. पुरुषांचा विचार करून गणवेश, साहित्य ठेवण्यासाठी जागेची रचना असते. भारमानाची समान विभागणी होईल, असा स्त्रियांसाठी वेगळ्या रचनेच्या गणवेशावर चर्चा होत आहे. युद्धात शस्त्रास्त्रांचा दर्जा व आधुनिकता यांच्या जोडीला शस्त्र हाताळणाऱ्या सैनिकाची कुशलता महत्त्वाची असते. युद्धभूमीवर केवळ शस्त्राने नाही, तर मनानेही लढायचे असते. त्यामुळे सैन्याचे मनोबल टिकवण्यास प्राधान्य दिले जाते. तुकडीतील सहकार्याची भावना ते काम करते.

भारतीय मुलींच्या ‘एनडीए’ प्रवेशाकडे त्या दृष्टीने पाहायला हवे!

aniket.sathe@expressindia.com