अपर्णा देशपांडे

‘‘आमच्या घरात सध्या जे घडतंय ते तुम्ही इतकं  नेमके पणानं कसं लिहिलंत? असा प्रेमळ प्रश्न विचारणारे अनेक ई-मेल्स ‘जगणं बदललंय’च्या वाचकांकडून वर्षभर मला मिळत होते, समाजात, घरात दिसतं ते सार्वत्रिक असतं, हेच यामुळे सिद्ध झालं. आपल्या लेखांमध्ये वाचकांनी स्वत:ला बघावं, त्यावर चिंतन करावं आणि त्याप्रमाणे काही बदल स्वत:मध्ये करावे यासारखी मोठी पोचपावती नाही. ती या सदरामुळे भरभरून मिळाली. वाचक विचारानं किती समृद्ध आहेत, प्रगल्भ आहेत हे कळलं आणि स्वत:लाही खूप शिकता आलं. समृद्ध करणारा हा वाचकानुभव यापुढेही बदलणारं जगणं शोधत राहील, हे नक्की!’’   

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

प्रिय वाचकहो,

असं म्हणतात, की जगात सातत्यानं होणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे बदल. तत्त्ववेत्ता हेराक्लिटसचं प्रसिद्ध वाक्य आहे ना..

‘चेंज इझ द ओन्ली कॉन्स्टंट’! साहजिकच आपल्या रोजच्या जगण्यातही त्याची छाया पडणं अपरिहार्यच. ‘जगणं बदलताना’ हे सदर  लिहिताना आपलं आयुष्य कुठे, कसं आणि किती अंगानं बदलतंय याकडे बारकाईनं बघितलं, तेव्हा जाणवलं की खरोखरच काळानं केवढी कूस बदलली आहे. आपण फुरसतीनं त्याकडे बघितलंच नाही. आपण आवर्जून लिहावं, त्यावर चर्चा व्हावी, असे इतके महत्त्वाचे विषय डोक्यात पिंगा घालू लागले की वाटलं, एक वर्ष हे बारा नाही, तर चोवीस महिन्यांचं असायला हवं होतं! कारण अजून किती तरी विषय इथे घेता आले असते, जे कालमर्यादेमुळे समाविष्ट नाही करता आले. हे बदल राजकीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील किंवा पर्यावरणाशी निगडित नसून तुम्हा-आम्हासारख्या सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जगण्यातील असावेत आणि शक्यतो कौटुंबिक संवादातून विषय पोहोचवावा हे ठरलेलं होतं. प्रवाहाबरोबर वाहत जाताना मागे काय सुटत गेलं, कालानुरूप काय जाणीवपूर्वक सोडून दिलं, सोबत काय नेतोय, नव्याचा स्वीकार कसा करतोय आणि आपल्या मागे काय ठेवणार आहोत याचा ऊहापोह करावा, हाही उद्देश होता.

गेलं संपूर्ण वर्ष आपण- मी आणि तुम्ही वाचक या लेखमालिकेतून एकमेकांशी जोडले गेलो आहोत. त्यातून आपल्यात एक अदृश्य ऋणानुबंध तयार झाला. या सदराला तुमचा प्रचंड प्रतिसाद आणि प्रेम मिळालं हे माझं फार मोठं भाग्य. प्रत्येक लेखानंतर येणारे ई-मेल्स म्हणजे पुढील लेखांसाठीची ऊर्जा होती. तन्मय आनंद हे उच्च प्रतीचं समाधान आहे, असं का म्हणतात हे समजलं. तुमच्यातील बहुतांश सर्वाचीच उच्च दर्जेदार भाषा आणि विषयावर व्यक्त होतानाचा अभ्यास, यातून मी खूप शिकत गेले. भरभरून प्रतिसाद देणं, लिखाणाला आणि विषयाला दाद देणं, त्यावर मोकळी चर्चा करणं आणि आजच्या बदललेल्या ‘डिजिटल’ युगातही वाचनप्रेमी आहेत, हा दिलासा देत लेखकाला उत्तेजना देणं हे तुमच्यासारख्या चोखंदळ वाचकांचं वैशिष्टय़ आहे. असे अनेक वाचक आहेत, ज्यांनी प्रत्येक- म्हणजे एकूण एक लेखानंतर संवाद साधलाय. त्यांच्या चिकाटीचं आणि सातत्याचं खूप कौतुक वाटलं. असंख्य ज्येष्ठ मंडळींनी फारच प्रेमानं पाठीवर हात ठेवला. काही लेखांत त्यांच्याकडून कुटुंबाच्या असलेल्या अपेक्षांचा उल्लेखही त्यांनी फार सकारात्मकतेनं स्वीकारला हे विशेष. त्यातून ज्येष्ठ मंडळींची त्यांच्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी ‘बदलाची’ तयारी दिसून आली. या सदरातील सगळेच लेख आजच्या बदललेल्या जगण्याशी निगडित असल्यानं लेखांत इंग्रजी शब्दांचा वापर टाळता आला नाही. काही ठिकाणी आजचं तंत्रज्ञान, तर काही ठिकाणी तरुणाईची बदललेली भाषा असे मुद्दे असल्यानं या मराठी लेखांत इंग्रजी शब्द भरपूर होते आणि तुम्ही वाचकांनी त्याचाही तितक्याच समजुतीनं स्वीकार केला. या लेखमालिकेला तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी कायम तुमच्या ऋणात राहीन. हे सदर सुरू होण्यापूर्वीही मी ‘चतुरंग’मध्ये काही लेख लिहिले होते आणि ते वाचून आपण मला जो अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता, त्यामुळे माझा लिखाणातला आत्मविश्वास प्रचंड वाढला हेही इथे मान्य करायला हवं.

‘ही पहाट वेगळी आहे’ या लेखापासून ‘जगणं बदलताना’ हे सदर सुरू झालं आणि ई-मेल्सचा पाऊस पडला. त्या प्रतिसादामुळे माझ्या लेखणीत एक वेगळीच चेतना जागी होतेय असं वाटायला लागलं. सुरुवातीचे ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या नवीन पॉलिसीवरील ‘डोळे हे जुलमी गडे’, आजच्या अतिचतुर आणि प्रतिभावान बालकांवरील लेख ‘बाल म्हणोनी कोणी’, बदललेली करमणुकीची माध्यमं उद्धृत करणारा ‘बी-स्कोप ते ओ.टी.टी’, त्यानंतर उठल्यापासून झोपेपर्यंत सतत फोटो काढण्याच्या व्यसनावरील ‘मनातील कॅमेरा रिकामाच’ हे लेख जरा मिश्किल पद्धतीनं लिहिले होते. अनेक वाचकांना ती शैली आवडली. कठीण विषय जराशा विनोदी शैलीत मांडले तर वाचताना रंजकता येते हे जरी खरं असलं, तरी जगण्यातील सगळेच विषय मिश्कीलपणे हाताळणं अवघड आहे. सगळे विषय साध्या-सोप्या शब्दांत लिहिताना साधेपणा किती अवघड असतो, हेही जाणवलं.

‘बाबा तुम्ही राहू द्या’ हा लेख समस्त बाबांसाठी एक हळवा कोपरा उघडून देणारा ठरला. कुटुंबासाठी घरापासून दूर राहणाऱ्या बाबा वर्गानं आपले अनुभव अतिशय मोकळेपणानं मला लिहून पाठवले. मला आपल्या घरातील सदस्यच समजून मन मोकळं केलं, काही परदेशात राहणाऱ्या बाबांनी तर मी त्यांच्या भारतातील सहचारिणीशी बोलावं, अशी विनंतीही केली. मदुमलाईच्या जंगलात वनरक्षक असलेल्या आणि घरापासून दूर राहणाऱ्या एका मराठी वाचकानं फार हृद्य आठवण लिहून पाठवली. हा सगळा संवाद  फारच विलक्षण वाटला. ‘म्हणजे सारं आयुष्य नव्हे!’ या लेखातील विचार अनेक पालकांना फारच भावला असं लक्षात आलं. ‘मुलांमध्ये नको तितकं गुंतून आम्ही आमचं वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो होतो, पण तुमच्या लेखानं नवी दृष्टी दिली’ अशा अर्थाचे मेल तर आलेच, पण जेव्हा ‘आता स्वत:ला त्रास न करून घेता आम्ही आमचं आयुष्य नव्यानं जगणार  आहोत’ हे मुद्देसूद मांडणारे मेल आले, तेव्हा आपला लिखाणाचा उद्देश सफल होतोय हे ध्येयसिद्धीचं समाधान मिळालं. मी स्वत:ही एक पालक म्हणून अधिक सजग झाले त्याचं श्रेय नक्कीच तुमचं सर्वाचं! ‘त्यात काय एवढं’ या लेखात तरुण पिढीची त्रासदायक विषय सहजतेनं सोडून देण्याची मानसिकता अधोरेखित झाली. तो विषय तुम्हाला प्रत्येकाला आपल्या घरातलाच वाटला आणि त्यावर भरभरून चर्चाही झाली. तरुणाईचं (विशेषत: तरुण मुलींचं) कपडय़ांविषयीचं अति प्रेम या विषयावरचा ‘वस्त्रवलय’ हा लेख वाचून एका स्त्रीनं लिहिलं, ‘तुम्ही गुप्त रूपानं आमच्या घरात राहताय का? इतकं तंतोतंत कसं काय लिहिलंत?’ पण खरं सांगू? जे फक्त आपल्याकडेच, खासगीत घडतंय असं वाटतं ना, ते सगळं खूपच सार्वत्रिक असतं!

‘ब्रेकअप- वेकअप’ हा तरुण वर्गाचं प्रेमात पडणं आणि ब्रेकअपनंतर सामंजस्यानं परिस्थिती हाताळणं या विषयावरचा लेख; पण त्यानंतर अनेक महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी हा लेख वाचावा असं सुचवण्यात आल्याचं मला काही कॉलेजकडून कळवण्यात आलं. अनेक तरुणींनी  माझ्याशी संपर्क करून त्यांच्या आयुष्यातील अडचणींवर चर्चा केली. तरुण मुलंमुली आजही मराठी वृत्तपत्र नुसतं वाचत आहेत असं नाही, तर त्यावर चर्चाही करत आहेत हे बघून खूप समाधान वाटलं. आजच्या मुलांची वाचनाबद्दल आणि त्यातही मराठी वाचनाबद्दलची अनास्था हा सतत काळजीचा विषय असतो; पण मला मात्र तरुण वाचकांनी सुखद अनुभव दिला.

‘चाचरता संस्कार आणि ओशाळलेली शिस्त’ या लेखानंतर काही पालकांनी फारच बोलकी प्रतिक्रिया दिली. एका वडिलांनी लिहिलं, ‘तुमचा लेख वाचून समजलं, की खरंच मी माझ्या मुलांना काही बाबतीत नाही म्हणताना थोडं कचरायचो. मोकळेपणानं बोलत नव्हतो. आतापर्यंत हे कुणी निदर्शनास आणूनच दिलं नव्हतं. आता मी नक्की स्वत:त बदल करीन.’ दुसऱ्या एका तरुण वाचकानं  लिहिलं, की ‘हा लेख वाचून बंडखोरी मनात येतेय, कारण आमच्याकडे एकदम उलट अनुभव आहे. माझे वडील मला सतत अभ्यास करत असताना उठवून कामं सांगतात आणि ‘अभ्यासाच्या नावाखाली तू काम टाळतोस,’ अशी आईची तक्रार असते. मी कायम वर्गात पहिला असतो; पण पालकांच्या या कामांच्या अपेक्षेत माझी खूप ओढाताण होते. तुम्ही यावर  जरूर लिहा.’ मला त्या मुलाचं वाचनाविषयी फार कौतुक वाटलं आणि त्याची बंडखोरीही आवडली.

‘शांत आयुष्यासाठी डीटॉक्स’ या लेखानंतर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी संवाद साधला. त्यांच्याकडे  अशा विषयांवर होणारे प्रशिक्षण वर्ग किंवा सेमिनार यांची माहिती दिली. व्यावसायिक जगात वावरताना काम आणि जगण्यातील समतोल यावर चर्चा झाली. अनेकांनी ते स्वत: त्यासाठी कोणते मार्ग अवलंबतात हेही सांगितलं. हे सगळे अनुभव मला समृद्ध करणारे आहेत. ‘कॉर्पोरेट सूनबाई’ या लेखानंतर आलेले पुरुष वाचकांचे मेल वाचण्याजोगे आहेत. त्या सगळ्या मेल्समधील समान धागा म्हणजे आपल्या स्नुषेनं पुढे जावं यासाठी लागेल ती सगळी मदत करण्याची तयारी. हा बदल खूप सुखावह आहे.

‘चतुरंग’च्या वाचकांना विषयाचं वावडं नाहीये. पाश्चात्त्य देशांकडून आलेलं लोण मोठय़ा शहरांत फार लवकर पसरतं. त्यामानानं इतर शहरांत तितक्या वेगानं बदल घडत नाहीत. लिखाण करताना अर्थातच सगळीकडच्या वाचकांना विचारात घ्यायचं असतं. म्हणूनच ‘बॅचलर आणि स्पिन्स्टर पार्टी’ हा लेख लिहिताना बरीच मर्यादा ठेवून लिहिला होता. त्यावर काही तरुण मंडळींनी त्यांच्या कंपूत झालेल्या पाटर्य़ामधील अनुभव मला लिहून पाठवले. खरेखुरे अनुभव! तेव्हा वाटलं, की आपण लिहिताना थोडं आणखी स्पष्ट आणि मोकळं लिहायला हवं होतं का? आपण डोळे झाकले म्हणून गोष्टी घडायच्या थांबत तर नाहीत ना! शेवटचा लेख ‘खोल आणि गडद काही’ यातील गडद जाळं म्हणजे ‘डार्क वेब’बद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल, अशा अर्थाचे तुमचे मेल आले, त्यावर नक्की विचार करीन.

बऱ्याचदा  एखादा विचार अथवा लेख वाचत असताना अगदी आपल्याच मनातलं लिहिलंय असं वाटतं. ती त्या लिखाणाच्या यशाची पावती असते. आपण मला अशी पावती देऊन माझा उत्साह वाढवलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपणा सर्वाना नवीन वर्षांच्या शुभेच्छा. असाच वाचनस्नेह असू द्यावा. या सदरापुरता निरोप घेते.

कळावे,

लोभ असावा.

adaparnadeshpande@gmail.com

(सदर समाप्त)