|| सरिता आवाड

काही जणांच्या बाबतीत ओळखीच्या, विश्वासाच्या माणसाशी के लेल्या लग्नाचं भविष्यसुद्धा अंधकारमय असू शकतं. असं लग्न तुटतं तेव्हा एकाकीपणा तर येतोच, पण आपण फसलो, ही कडवटपणा आणणारी बोचही राहते. अशा अनेक वर्षं एकाकी राहिलेल्या, कामातच जीव गुंतवणाऱ्या पद्माजा यांना उतारवयात ध्यानीमनी नसताना एक सहचर सापडला. आपलं स्वत्व आणि वैयक्तिक ‘स्पेस’ जपूनही यशस्वी ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ शक्य आहे, याची ग्वाही देणारी पद्माजा आणि श्रीनिवास या जोडप्याची ही कहाणी.  

ratnagiri sindhudurg lok sabha marathi news
रत्नागिरीत महायुतीपुढे कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाचे आव्हान
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
34 Year Old Marries 80 Year Old Reel Star
८० वर्षांच्या रीलस्टारच्या प्रेमात महाराष्ट्रातील ३४ वर्षीय शीला झाली ‘दिवानी’; लग्नासाठी पार केले ६०० किमी अन् आता..
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”

एकाकी ज्येष्ठांना जोडीदाराची सोबत मिळावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या हैदराबादमधील ‘थोडू नीडा’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी बोलताना मला अशा अनेक वृद्धांच्या गोष्टी समजत होत्या, अनेक प्रश्न नव्यानं लक्षात येत होते. मुलाच्या तीव्र विरोधामुळे घरातून पळून जाऊन सहजीवन सुरू करावं लागलेल्या सत्तरीच्या जोडप्याची एक गोष्ट आपण मागील लेखात (२३ ऑक्टोबर) पाहिली. आता आणखी एक कहाणी; अगदी जाणून घ्यावीच अशी.

मी या संस्थेत जाऊन कार्यकर्त्यांना भेटल्यावर सुमारे दोन तास आमची चर्चा झाली आणि मग सर्वजण बाहेरच्या हॉलमध्ये पोटपूजा करायला जमलो. तेव्हा सत्तरीकडे झुकलेल्या, अतिशय बोलक्या डोळ्यांच्या एक बाई माझ्याजवळ आल्या. मघाच्या चर्चेत माझं त्यांच्याकडे लक्ष जात होतं. त्या फारसं बोलत नव्हत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर प्रतिक्रिया उमटत होत्या. ‘मला काही सांगायचं आहे,’ असा भाव त्यांच्या नजरेत होता. ‘मी पद्माजा’ अशी त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. ‘‘आज संध्याकाळी माझ्याकडे याल का?’’ त्यांनी विचारलं आणि मी आनंदानं होकार दिला. माझ्या शेजारी बसलेल्या राजेश्वरीबाईंनी (‘थोडू नीडा’च्या प्रमुख राजेश्वरी देवी.) लगेच मला सांगितलं, की ‘‘पद्माजा या संस्थेच्या मुख्य कार्यकत्र्या आहेत. त्यांना अवश्य भेटा आणि त्यांची कहाणी जाणून घ्या.’’ पद्माजाबाईंनी लगेच त्यांचा पत्ता ‘गूगल मॅप’सह मला पाठवलाही. 

संध्याकाळी मी त्यांच्याकडे निघाले. त्या राहात होत्या हैदराबादच्या अगदी दुसऱ्या टोकाला. हे जुनं शहर माझ्यासाठी नवंच होतं. माझ्या जिज्ञासेला इतिहास आणि आधुनिकता यांची बेमालूम सरमिसळ जाणवत होती. त्यांच्या घरी पोहोचले. घराचं दार सताड उघडून पद्माजाबाई माझी वाटच बघत होत्या. मला थंडगार पाणी देऊन त्या म्हणाल्या, ‘‘हे माझं आणि श्रीनिवास यांचं घर. आज श्रीनिवास घरात नाहीत. ते असते तरी तुम्हाला अवघडल्यासारखं वाटलं नसतं; पण कदाचित मला माझी कहाणी मोकळेपणानं सांगता आली नसती!’’ थोड्या गप्पा झाल्यावर माझ्या आवडीची कडक फिल्टर कॉफी आली आणि कॉफीचा आस्वाद घेता घेता मी पहिला प्रश्न विचारला, ‘‘‘थोडू नीडा’चा आणि तुमचा संबंध कसा आला?’’ उत्तरादाखल त्यांच्या कहाणीचा ओघ सुरू झाला आणि पुढचा दीड तास त्यात  मी बुडून गेले.

पद्माजाबाईंचा जन्म तिरुपतीच्या सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांना एकच मोठी बहीण. ती लग्नानंतर हैदराबादला स्थायिक झाली. राजेश्वरीबाई म्हणजे या बहिणीची अगदी खास मैत्रीण. या मैत्रीमुळे पद्माजा ‘थोडू नीडा’शी परिचित झाल्या; पण त्या कार्यकत्र्या होण्यामागे वेगळं कारण होतं. पद्माजा यांचा विवाह त्यांच्याच घरात शिक्षणासाठी राहिलेल्या सदाशिवशी झाला होता. सदाशिव हुशार मुलगा, पण घरची परिस्थिती हलाखीची होती. म्हणून पद्माजांच्या वडिलांनी त्याला आपल्या घरी आश्रय दिला होता. शिक्षणास मदत केली. नोकरी मिळाल्यावर त्यानं पद्माजांशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनी आनंदानं लग्न लावून दिलं. सदाशिवला अमेरिकेला जायचं होतं. त्याच्या पुढच्या शिक्षणासाठीही पद्माजाच्या वडिलांनी आर्थिक मदत केली. ही दोघं अमेरिकेला गेली आणि तिथे त्यांचा संसार सुरू झाला; पण हळूहळू सदाशिवचं लक्ष संसारातून उडालं. दुसरी एक भारतीय स्त्री त्याच्या आयुष्यात आली होती. पद्माजांच्या रूपावरून, बेताच्या शिक्षणावरून सदाशिव त्यांना टोमणे मारायला लागला. त्यांचं आयुष्य तणावग्रस्त झालं. एके दिवशी तर तो म्हणालाच, की पद्माजांच्या वडिलांच्या पैशाखातर त्यानं पद्माजांशी लग्न केलं आहे. त्या पैशांच्या बळावर अमेरिकेला जाण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता त्याला या बायकोची गरज नव्हती. हे ऐकून उद्ध्वस्त झालेल्या पद्माजांनी घटस्फोट घेतला आणि त्या भारतात परतल्या. बहीण हैदराबादला असल्यानं हैदराबादला राहायला लागल्या. माँटेसरीचं प्रशिक्षण घेऊन एक छोटी बालवाडी काढली. शिवाय साड्या विकण्याचाही व्यवसाय सुरू केला. कामात त्यांनी स्वत:ला बुडवलं, तरी सदाशिवनं केलेली वंचना त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्या दु:खाचा निखारा मनात धुमसत होता.

बहिणीच्या संसारात त्या रमत. बहिणीच्या मुलाचं संगोपनही त्यांनी केलं. त्याला लळा लावला. बघता बघता अनेक वर्षं उलटली. शिक्षण संपवून भाचा कामानिमित्त दिल्लीला गेला आणि पद्माजांना पोकळी जाणवायला लागली. तेव्हा बहिणीची मैत्रीण असलेल्या राजेश्वरीबाईंनी त्यांना ‘थोडू नीडा’मध्ये काम करण्यास सुचवलं. संस्थेचे मेळावे घेण्यात मदत करणं, पत्रव्यवहार संभाळणं, फोनवरून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं,

असं ते काम होतं.

 बहिणीचे पती गेल्यावर विधवा बहिणीची जबाबदारीसुद्धा पद्माजांनी स्वीकारली. ‘थोडू नीडा’चं काम करत असताना एक दिवस त्यांनी अर्जदार श्रीनिवास यांच्या फोनला उत्तर दिलं. श्रीनिवास ६५ वर्षांचे विधुर होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोघांची लग्नं झाली होती. स्वत: श्रीनिवास एका बँकेतून वरिष्ठ प्रबंधक म्हणून निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर एका खासगी बँकेच्या संचालकपदावर होते. एका शाळेच्या व्यवस्थापनात त्यांचा सहभाग होता. समाजकार्याची आवड होती. त्यांना सहचर हवी होती. विशेष म्हणजे सहचरीबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा नेमक्या होत्या. त्या अपेक्षा म्हणजे ती ५५ ते ६० या वयोगटात असावी, उच्चशिक्षित असावी, तिच्या संसाराच्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या असाव्यात, मुख्य म्हणजे तिला तिचं स्वत:चं कार्यक्षेत्र असावं. दिवसभर श्रीनिवास आपल्या कामात मग्न असणार होते. त्यामुळे ‘जेवलात का? चहा प्यालात का? कोण भेटलं? काय बोलणं झालं?’ अशी नेमानं चौकशी करणारी, ‘पतीपरायण’ सहचरी त्यांना मुळीच नको होती. दिवसभर आपल्या स्वत:च्या कामात रममाण झालेली सखी किंवा प्रिया त्यांना हवी होती. इतक्या नेमक्या अपेक्षा समोर आल्यावर श्रीनिवास यांच्यासाठी जोडीदार शोधणं पद्माजांना फारच सोपं वाटलं. त्या संस्थेकडे येणाऱ्या अर्जांतून निवड करून नावांची यादी त्यांना पाठवायला लागल्या. दर दोन महिन्यांनी होणाऱ्या मेळाव्यांना श्रीनिवास हजर राहायला लागले. असं एक वर्ष गेलं. तरी श्रीनिवासना मनासारखी जोडीदार  मिळेना. एक दिवशी वैतागून त्यांनी पद्माजांना फोन केला आणि पद्माजा त्यांच्यासाठी नीट शोधच घेत नाहीयेत, असा आरोप करून मोकळे झाले! मग पद्माजांनी आणखी प्रयत्नांनी आलेल्या अर्जांमधून उच्चशिक्षित स्त्रियांची निवड करून ती नावं सुचवली; पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

या दरम्यान पद्माजा आणि श्रीनिवासच्या बऱ्याचदा गाठीभेटी झाल्या, फोनवर बोलणं झालं. एकदा श्रीनिवासनी फोनवर आपल्या मनातली सहजीवनाची कल्पना विस्तारानं सांगितली. त्यांना अवलंबित्व नको होतं, तर मैत्रभाव हवा होता. तिची आवडनिवड, तिचं जग आणि त्यांची आवड, त्यांचं जग यांत संवाद हवा होता. याबद्दल ते भरभरून अर्धा तास बोलले आणि मग स्वत:च चमकून म्हणाले, ‘‘बाप रे! आयुष्यात पहिल्यांदा एका परस्त्रीशी इतक्या मोकळेपणानं मी अर्धा तास बोललो!’’ त्यानंतरच्या भेटीत श्रीनिवास म्हणाले, ‘‘मला तर या सगळ्या बायकांपेक्षा तूच बरी वाटते आहेस.’’ पद्माजाबाईंना एव्हाना त्यांच्या मनाचा अंदाज आला होता; पण तरी त्यांनी विचारलं, की ‘‘तुम्हाला उच्चशिक्षित सहचर हवी आहे आणि मी तर फक्त पदवीधर आहे. शिवाय तुम्हाला हवी पंचावन्न ते साठ या वयोगटातली. मी आहे ६३ वर्षांची. मग कसं जमणार?’’ श्रीनिवास यांनी त्या अटी इतक्या काही कडक नसल्याची ग्वाही दिली. अशा रीतीनं काहीशा आडवळणानं, लाजत लाजत आपल्या प्रेमाचा दोघांनी इजहार केला!

पण इथूनच काही प्रश्न सुरू झाले. पद्माजांना लग्नाचं कायदेशीर बंधन नको होतं. लाखो रुपये खर्चून मिळालेलं तथाकथित सौभाग्य किती कुचकामी ठरू शकतं, याचा त्यांनी अनुभव घेतला होता. त्या मांडवाखालून त्यांना पुन्हा जायचं नव्हतं. श्रीनिवाससुद्धा मैत्रभावाच्या शोधात होते. त्यामुळे ‘लिव्ह इन रीलेशनशिप’चा पर्याय त्यांना योग्य वाटला; पण राहायचं कुठे? कारण पद्माजांवर त्यांच्या मोठ्या बहिणीची जबाबदारी होती. तिला नोकरमाणसांच्या ताब्यात देऊन किंवा वृद्धाश्रमात पाठवून त्यांना श्रीनिवासबरोबर नवीन आयुष्य सुरू करायचं नव्हतं. पद्माजांची ही घालमेल त्यांच्या दिल्लीतल्या भाच्याला समजली. मावशीच्या उतारवयात का होईना, तिला सोबत मिळते आहे, हे समजल्यावर त्याला खूप आनंद झाला आणि आईला सांभाळायची जबाबदारी त्यानं घेतली. आता श्रीनिवास यांच्या घरी पद्माजांनी राहायचं ठरलं; पण त्यांचं स्वत:चं घर त्यांनी सोडलं नाही. स्वत:चं घर राखून ठेवणं त्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी आवश्यक वाटलं. पूर्वायुष्यातल्या जळजळीत अनुभवानं हे शहाणपण त्यांना  दिलं होतं.

पुढचा प्रश्न होता श्रीनिवास यांच्या मुलांना विश्वासात घेणं. ही अवघड आणि नाजूक कामगिरी कशी पार पाडायची यावर दोघांचा विचारविनिमय झाला. पद्माजांनी ठरवलं, की आपणच मुलांशी बोलायचं. श्रीनिवास यांची या प्रस्तावाला संमती होती. त्याप्रमाणे मुलांना त्या भेटल्या. या भेटीत त्यांनी स्पष्टच सांगितलं की, ‘तुमच्या आईची जागा मला कधीच घेता येणार नाही. तुमच्या आयुष्यातलं तिचं स्थान अबाधित असेल. तुमच्या वडिलांची जवळची मैत्रीण या नात्यानं तुम्ही माझा स्वीकार करा.’ अशी रोखठोक भूमिका मुलांना पटली. आपल्या मागे संपत्तीचं वाटप कसं व्हावं, याचं इच्छापत्र श्रीनिवास यांनी  लिहिलं आणि त्याची एकेक प्रत मुलांना दिली.  मुलाची थोडी नाराजी होती; पण या नाराजीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.

श्रीनिवास यांचं स्वत:चं कुटुंब मोठं होतं. त्यांचे चार भाऊ आणि तीन बहिणी आपापल्या संसारात मग्न होते; पण त्या सगळ्यांकडे श्रीनिवास पद्माजांना घेऊन गेले. वर्षातून दोनदा त्यांचा कौटुंबिक मेळावा होतो. आता नियमितपणे त्याला पद्माजा आवर्जून हजर असतात आणि त्यांना सन्मानानं वागवलं जातं.

त्यांचं सहजीवन सुरू होऊन आता दहा वर्षं झाली आहेत. रोज पहाटे साडेपाचला त्यांचा दिवस सुरू होतो. सकाळची कॉफी एकत्र घेऊन ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडतात. उंचेपुरे श्रीनिवास भरभर चालतात. पद्माजाबाईंची चाल त्यामानानं मंद आहे. त्या झाडाखाली, बागेत शांतपणे बसतात. १० वाजता श्रीनिवास घराबाहेर पडतात. दुपारी जेवायला अर्धा तास घरी येऊन पुन्हा बाहेर पडतात. संध्याकाळी ७ नंतर मात्र ते एकमेकांसाठी असतात. टी.व्ही.वर आवडते कार्यक्रम बघणं, सिनेमे बघणं किंवा शांतपणे वाचन करणं, असा त्यांचा कार्यक्रम असतो. महिन्यातून दोन दिवस श्रीनिवास आपल्या दोस्त मंडळींसाठी राखून ठेवतात. ते जवळपास

कुठेतरी सहलीला जातात. त्यात पद्माजाबाईंना प्रवेश नसतो.

‘थोडू नीडा’च्या कामात पद्माजांचा भरपूर वेळ जातो. लोकांशी संपर्क ठेवणं, त्यांच्याशी बोलत राहणं वेळखाऊ काम आहे. इतकं, की श्रीनिवास क्वचित तक्रार करतात. म्हणतात, ‘‘आता मला दुसरी मैत्रीण शोधायला हवी!’’ यावर पद्माजा ताबडतोब सांगतात, ‘‘अगदी अवश्य शोधा! कुठल्याही क्षणी मी माझ्या घरी परत जाईन; पण मला खात्री आहे, की माझ्या जवळपास येईल अशी कोणीही तुम्हाला सापडणार नाही! कारण जशी माझ्यासारखी मीच, तसे तुमच्यासारखे तुम्हीच आहात. वी आर मेड फॉर इच अदर, समझे?’’

(पद्माजा -श्रीनिवास यांच्या कहाणीतील  व्यक्तींची नावे बदलली आहेत.)

sarita.awad1@gmail.com