मृणालिनी साराभाई नृत्यातील एक ठसठशीत नाव. पारंपरिक नृत्यप्रकार आणि आधुनिक कल्पना यांची सांगड घालून मृणालिनी यांनी नृत्य क्षेत्रात केलेल्या प्रयोगातून कलेचा वारसा पुढे नेत अनेक शिष्यांनाही या वाटेवर आणून सोडलं. आपल्या पथकासह ४० देशांचे दौरे करणाऱ्या मृणालिनी फ्रान्समधील ‘आर्काइव्हज ऑफ इंटरनॅशनलेस दे ला डान्स’ या संस्थेतून पदवी आणि पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय होत्या. त्यांनी तीनशेहून अधिक नृत्यनाटके दिग्दर्शित केली आहेत. ‘मनुष्य-द लाइफ ऑफ मॅन’ ,‘मीरा’,‘चंडलिका’ आणि ‘शकुंतला’ ही त्यांनी बसवलेली नृत्यनाटके खूपच लोकप्रिय ठरली. पद्मश्री, पद्मभूषण मिळवणाऱ्या मृणालिनी यांचे नुकतेच ९७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्याविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयुष्याचा प्रत्येक क्षण साजरा केला पाहिजे, असं म्हटलं जातं. पण जगभर प्रसिद्ध पावलेल्या अहमदाबादच्या ‘दर्पण’ अकादमीत सध्या एका मृत्यूचा सोहळा सुरू आहे. तुम्हाला कदाचित हे पटणार नाही, पण ख्यातनाम नृत्यांगना, नृत्यगुरू मृणालिनी साराभाई यांचं निधन झाल्यापासून (२१ जानेवारी) ‘दर्पण’मधील प्रत्येक दिवस गजबज आणि धावपळीचा ठरत आहे. आपलं अवघं आयुष्य एखाद्या साम्राज्ञीसारखं जगलेल्या मृणालिनी साराभाई यांच्या कन्या आणि विख्यात नृत्यांगना मल्लिका साराभाई, मुलगा कार्तिकेय, त्यांचे कुटुंबीय आणि अभ्यंगत हे सर्वच जण त्यांच्या अनेकविध आठवणींमध्ये रमत आहेत..
जगासाठी त्या मृणालिनी साराभाई असल्या तरी ‘दर्पण’मध्ये विद्यार्थी आणि सारेच त्यांना प्रेमाने ‘अम्मा’ म्हणून हाक मारत. वयाच्या ९७ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या मृणालिनी यांना ‘भारतीय नृत्याची सम्राज्ञी’ म्हणून ओळखलं जात होतं. ‘अम्मा रंगमंचावर प्रवेश करायची तेव्हा असं वाटायचं जणू तिच्या शरीरात असंख्य दिवे एकाच वेळी प्रकाशमान झाले आहेत. रंगमंच हेच तिचं आयुष्य होतं आणि तेथेच ती १०० टक्के जिवंत असायची,’ मल्लिका साराभाई आपल्या आईच्या आठवणी सांगत होत्या.
मृणालिनी साराभाई यांचे वडील डॉ. एस. स्वामिनाथन हे वकील होते. लंडन आणि मद्रास येथे त्यांनी वकिली केली होती. त्यांची आई, अम्मू मद्रासच्या सार्वजनिक जीवनात आणि समाजकार्यात नेहमी सक्रिय असायची. पुढे त्या काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यां बनल्या आणि लोकसभेत मद्रासचं प्रतिनिधित्व करण्याची संधीही त्यांना मिळाली. मृणालिनी यांचं नृत्यशिक्षण अगदी बालपणातच सुरू झालं. मन्नरकोइल येथील मुथुकुमारन पिल्लई यांच्याकडे त्यांनी भरतनाटय़मचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक नृत्यगुरूंच्या तालमीत त्यांनी नृत्याभ्यास सुरूच ठेवला. पंडनल्लूर येथील थोर नर्तक मीनाक्षी सुंदरम पिल्लई यांच्या मृणालिनी या सर्वात आवडत्या शिष्या होत्या. त्यांचं निधन होईपर्यंत, १९४५पर्यंत मृणालिनी यांनी त्यांच्या छत्रछायेखाली नृत्याचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी मायलापूर गौरीअम्मा आणि तंजावरच्या अंदालाम्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन ‘अभिनय’ आणि ‘कुरूवंजिस’ या विशेष विषयांत प्रावीण्य मिळवलं.
फ्रान्समधील ‘आर्काइव्हज ऑफ इंटरनॅशनलेस दे ला डान्स’ या संस्थेतून पदवी आणि पदक मिळवणाऱ्या मृणालिनी या पहिल्या भारतीय होत्या. एवढंच नव्हे तर, जकार्ताच्या सुलतानचा भाऊ तेद्जोकोएसोमो यांच्याकडून शिक्षण घेतलेल्या त्या एकमेव भारतीय आहेत. त्या काळी नृत्य हा केवळ जावाच्या राजघराण्याचा वारसा असल्याचे मानले जात होते. मात्र, तरीही मृणालिनी यांना राजकन्यांसोबत नृत्य करण्याची परवानगी होती. अशी सूट असलेल्या त्या एकमेव परदेशी नागरिक होत्या.
जावाहून त्या न्यूयॉर्कला आल्या व तेथील ‘अमेरिकन अ‍ॅकॅडमी ऑफ ड्रामाटीक आर्ट’ येथे त्यांनी अभिनय आणि रंगमंचीय तंत्र हा सहा महिन्यांचा अभ्यास पूर्ण केला. तेथून मायदेशी परतल्यानंतर त्यांनी कुंजू कुरूप यांच्याकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
मृणालिनी यांचा विवाह भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते असलेले ख्यातनाम शास्त्रज्ञ आणि उद्योजक डॉ. विक्रम साराभाई यांच्याशी झाला. ‘‘अम्मा आणि पप्पा यांची कौटुंबिक पाश्र्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. अम्माचं संगोपन परंपरावादी कुटुंबात झालं होतं, तर पप्पांचं कुटुंब अतिशय पुरोगामी होतं. पण ज्या दिवशी पप्पांचं निधन झालं, त्या दिवशी त्यांचा आत्मा जणू तिच्या शरीरात विलीन झाला. त्यानंतर माझी आई माझे वडीलदेखील बनली.’’ मल्लिका साराभाई सांगत होत्या.
मृणालिनी यांनी नृत्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली, तो काळ अतिशय रूढीवादी विचारसरणीचा होता. ‘चांगल्या’ घरातील मुलींनी नृत्य शिकणं, हे तेव्हा प्रतिष्ठा खालावण्याचं लक्षण मानलं जात होतं. ‘‘विवाहानंतर ती अहमदाबादला आली, तेव्हाही या शहराच्या संस्कृतीत नृत्याचं अस्तित्वच नव्हतं. पण तिने प्रचंड धडपड करत नृत्याला स्वतंत्र अस्तित्व मिळवून दिलं. नृत्य हेदेखील सृजनशीलतेचं माध्यम आहे, हे तिने सर्वाना पटवून दिलं.’’ मृणालिनी यांचे सुपुत्र कार्तिकेय आपल्या आईच्या नृत्यातील योगदानाबद्दल सांगत होते.

* ११ मे १९१८ – मृणालिनी यांचा जन्म
* १९४२ मध्ये विक्रम साराभाई यांच्याबरोबर विवाह आणि अहमदाबादला आगमन
* १९४९ ‘दर्पण’ अकादमीची स्थापना
* १९६३ न्यूयॉर्कमध्ये ‘स्वप्न वासवदत्ता’ या नाटकाचे सादरीकरण
* १९६५ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान
* १९९२ मध्ये पद्मभूषण प्रदान

मृणालिनी यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नृत्यांगना आणि नृत्यगुरू म्हणून ओळख प्राप्त आहे. जगभरात त्यांच्या नृत्याचा लौकिक पसरला आहे. आपल्या पथकासह जवळपास ४० देशांचे दौरे करणाऱ्या मृणालिनी यांना विविध आंतरराष्ट्रीय संस्थांकडून पुरस्कार आणि मानपत्रांनी गौरवण्यात आलं आहे. १९६३मध्ये त्यांना न्यूयॉर्कच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्सड् स्टडीज इन थिएटर आर्ट्स’ या संस्थेनं एका संस्कृत नाटकाचं दिग्दर्शन करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिलं. ‘स्वप्न वासवदत्ता’ नावाच्या या नाटकात अमेरिकी कलाकारांनी संस्कृत कलातंत्राचा अवलंब करत हे नाटक सादर केलं, हे विशेष.
मृणालिनी यांचे पुत्र कार्तिकेय साराभाई हे ‘सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन’चे संचालक आणि ‘नेहरू फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट’चे व्यवस्थापकीय विश्वस्त आहेत. ते सांगतात, ‘‘आपल्या मुलांना तिने नेहमीच प्राधान्य दिलं. आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे असायचं. अलीकडेच मी तिला पर्यावरणविषयक श्लोकांबाबत विचारणा केली. तिने लगेचच त्याचा शोध घेऊन मला श्लोक सांगितले.’’
मृणालिनी स्वत: नेहरू फाऊंडेशन फॉर डेव्हलपमेंट या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. १९६६पासून शिक्षणाचा प्रसार करणारी ही संस्था विज्ञान, निसर्गाभ्यास, आरोग्य, विकास आणि पर्यावरण अशा सर्व क्षेत्रांत कार्यरत आहे. आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगताना कार्तिकेय सांगतात, ‘‘मी तान्हा बाळ असताना आईने माझ्या प्रत्येक हालचालींची सविस्तर नोंद ठेवण्यासाठी खास वही तयार केली होती आणि ती रंगांनी सजवलीही होती.’’
मल्लिका म्हणतात, ‘‘नृत्य करताना अथवा शिकवताना ती अतिशय शिस्तप्रिय आणि कठोर होत असे. पण इतर वेळी ती आपल्या मायेने आसपासच्या लोकांना मोहून टाकत असे.’’
मृणालिनी यांचा एक गमतीशीर किस्साही मल्लिका यांनी सांगितला. ‘‘आई आणि तिचे विद्यार्थी पाच महिन्यांच्या युरोप दौऱ्यावर होते. दौरा खूपच मोठा होता आणि हे शाकाहारी विद्यार्थी भात आणि सूप खाऊन कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांनी एक बेत आखला. ही मुलं हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये गेली आणि ‘मृणालिनीजींची तब्येत बरी नसल्याने त्यांना भारतीय पद्धतीने मसाज करण्यासाठी शुद्ध तुपाची गरज आहे’’ असं सांगून भरपूर तूप घेऊन आले. रेस्टॉरंटचे आचारी घरी गेल्यानंतर या मुलांनी त्या स्वयंपाकघरात प्रवेश केला आणि आणलेलं सर्व साहित्य वापरून झक्कास बिर्याणी बनवली. दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या व्यवस्थापकाला ही गोष्ट कळली, तेव्हा त्याने
‘‘काय मालिश नीट झाली का?’ असं विचारलं होतं..’’
मृणालिनी यांनी तीनशेहून अधिक नृत्यनाटके दिग्दर्शित केली आहेत. ‘मीरा’,‘चंडलिका’ आणि ‘शकुंतला’ ही त्यांनी बसवलेली नृत्यनाटके खूपच लोकप्रिय ठरली. त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, कविता, लहान मुलांच्या गोष्टी, नाटके लिहिली. पारंपरिक प्रकार आणि आधुनिक कल्पना यांची सांगड घालून मृणालिनी यांनी नृत्य क्षेत्रात केलेले प्रयोग ही त्यांची या जगताला मिळालेली देणगीच आहे.
१९७१मध्ये लंडनच्या बीबीसीनं मृणालिनी आणि ‘दर्पण’ यांच्यावर एक अनुबोधपट प्रसारित केला. मार्गारेट डेल यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दर्पण : अ वर्कशॉप ऑफ आर्ट्स’ नावाच्या या अनुबोधपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.
१९६८ साली ‘फोकलॅरिको ऑफ मेक्सिको’ या बॅलेसाठी नृत्यदिग्दर्शन केल्याबद्दल मेक्सिको सरकारनं मृणालिनी यांना सुवर्णपदक देऊन गौरवलं होतं. ‘कथकली’ नृत्यप्रकारासाठी केलेल्या योगदानाबद्दल ‘वीर श्रृंखला’ मिळवणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. १९७९मध्ये त्यांना कोलकात्याच्या रवींद्र भारती विद्यापीठाने डी. लिट. पदवी प्रदान केली तर, १९८४ मध्ये ‘विश्व गुर्जरी’ पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला. १९८७ मध्ये विश्व-भारती विद्यापीठाने त्यांना ‘देसिकोट्टमा’ ही प्रतिष्ठेची मानद पदवी देऊन त्यांचा सन्मान केला. १९९४ मध्ये त्या नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमीमध्ये रुजू झाल्या. त्याच्या पुढच्याच वर्षी भारतीय शास्त्रीय नृत्यातील प्रयोग, संशोधन आणि विविध नृत्यशैलींच्या निर्मितीकरिता त्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरवण्यात आले होते. त्याच वर्षी त्यांना केरळ कलामंडलमने शिष्यवृत्तीही जाहीर केली. १९९६मध्ये मध्य प्रदेश सरकारने त्यांना कालिदास सन्मान प्रदान केला. ब्रिटनच्या नॉर्विच येथील ईस्ट अँग्लिया विद्यापीठानेही त्यांना मानद डॉक्टरेट देऊन गौरवले. २००५ मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या एक हजार महिलांच्या यादीत मृणालिनी साराभाई यांचाही समावेश होता.
मृणालिनी यांच्यासोबत ४० वर्षांहून अधिक काळ काम करणारे त्यांचे शिष्य कोट्टकलचे शशी नायर यांनीही आपल्या गुरूच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितलं, ‘‘त्यांची अध्यापनाची पद्धत आजच्यासारखी नव्हती. त्यांची शिकवण्याची पद्धत उपनिषदांमध्ये मांडलेल्या पद्धतीसारखी असायची. त्या मार्ग दाखवायच्या. पण त्याच वेळी तो मार्ग आम्ही आमच्या पद्धतीने पुढे न्यावा याचं स्वातंत्र्यही त्या देत असत. जणू त्या व्याकरणाचे धडे द्यायच्या, पण वाक्ये आम्हालाच तयार करायला सांगत.’’
मल्लिका साराभाई सांगतात, ‘‘अम्माच्या मनात कशाहीबद्दल असुरक्षिततेची भावना नसे. त्यामुळेच तिने मला किंवा कार्तिकेयला अमुक काही करण्यासाठी वा न करण्यासाठी कधी बळजबरी केली नाही. स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी जे काही करावेसे वाटेल, ते करायला तिची पूर्ण मुभा होती. तिने दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच मी आजवर इतकी मजल गाठू शकले आहे.’’
शांतिनिकेतनमधील शाळेत मृणालिनी यांचे रवींद्रनाथ टागोरांशी खूप जिव्हाळय़ाचे संबंध होते. त्यामुळेच त्यांच्या बहुतांश नृत्यनाटय़ांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. केवळ नृत्यच नव्हे तर वेशभूषा, प्रकाशयोजना आणि नेपथ्य यांच्यावर भर देत शास्त्रीय नृत्याचे नवनवीन आविष्कार त्यांनी निर्माण केले. ‘मनुष्य-द लाइफ ऑफ मॅन’ हे अशाच प्रयोगांतून जन्मलेलं पहिलं नृत्यनाटय़ होतं. कथकली प्रकारातलं हेच नाटय़ आज भारतीय नृत्यप्रकारातील अजरामर कृती बनलं असून त्यातून नवनवीन नृत्यरचनाही विकसित होत गेल्या. अनेक वर्षांच्या ज्ञानार्जनातून त्यांनी ‘दर्पण’ ही नवी नृत्यशैली विकसित केली. ही नृत्यशैली आज तंत्रशुद्धता आणि सौंदर्यशास्त्राचा उत्तम नमुना मानली जाते.
मृणालिनी यांच्या विविध नृत्यशैली आणि सौंदर्यबोधाला पारिभाषिक रूप देण्याची जबाबदारी जणू मल्लिका साराभाई यांचीच होती. ‘‘सौंदर्यविषयक माझ्या प्रत्येक गोष्टीला तिचं सौंदर्यज्ञान, भारतीयत्व, पारंपरिक दृष्टिकोन, कलात्मकता यांचं कोंदण लाभलं होतं. आमच्या ताटातल्या प्रत्येक पदार्थाची मांडणी आणि रंग यांच्यापासूनची प्रत्येक गोष्ट तिच्या सौंदर्यात्मक दृष्टिकोनाला बांधली गेली होती. तिने कधीच आहाराचं नियंत्रण पाळलं नाही. कधी योग किंवा ध्यानसाधना केली नाही. कारण नृत्य हीच तिची ध्यानसाधना होती. मात्र, आपण आपल्या बहिणीपेक्षा कमी गोरे आहोत, याचं तिला नेहमी वैषम्य वाटत होतं,’’ असं त्या म्हणतात.
गुजरात राज्य हस्तकला आणि हातमाग विकास महामंडळाच्या अध्यक्ष असताना मृणालिनी यांनी प्राचीन तंत्रकला, नक्षीकाम आणि ग्रामीण शैलीला अधिक महत्त्व दिलं. ‘‘अम्मा १६ वर्षांची होती, तेव्हा तिने खरेदी केलेली मिरर वर्क असलेली एक पट्टी मला अजूनही आठवते. प्रत्येक कलावस्तूचं तिला इतकं अप्रूप होतं की ती पट्टी तिने ८० वर्षे जतन करून ठेवली होती. माझ्या कुडतीवर आजही ती पट्टी आहे,’’ असं मल्लिका सांगतात.
‘‘अम्माला सामाजिक जबाबदारीची पूर्णत: जाणीव होती. आपण सगळे कोणत्या ना कोणत्या हेतूने जगात आलेलो असतो, असा तिचा दृढ विश्वास होता.’’ कार्तिकेय सांगतात. मृणालिनी यांचे नातू आणि मल्लिका यांचे पुत्र रेवंत सांगतात, ‘‘ती एखादा कटाक्ष किंवा हातवाऱ्यांनी स्वत:ला व्यक्त करू शकत होती. जणू तिच्या अंगी दैवी शक्तीच होती. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमातही अवघ्या चार ते पाच वाक्यांच्या भाषणातूनही ती श्रोत्यांवर प्रभाव पाडू शकत होती. अशी क्षमता क्वचितच अन्य कुणामध्ये असते.’
मृणालिनी यांनी २०१५मध्ये ‘कडक बादशाही’ या नाटकात भूमिका केली होती. अहमदबाद शहर आणि येथील लोक यांच्याशी संबंधित गोष्टी सांगणारं ते नाटक होतं. मल्लिका साराभाई, यादवन चंद्रन आणि निसर्ग त्रिवेदी यांनी दिग्दर्शित केलेली ही नृत्यनाटिका त्यांच्या बहारदार कारकीर्दीतलं शेवटचं पान होतं. पण मल्लिका म्हणतात, ‘‘डोक्यावर रंगीबेरंगी छत्री धरून ऐटीत ‘दर्पण’च्या पायऱ्यांवरून चालत येणाऱ्या अम्माची प्रतिमा आमच्या डोळय़ांसमोरून कधीच हटणार नाही. तिच्या अंत्यविधीच्या वेळीही तशीच छत्री आम्ही तिच्या पार्थिवावर धरली होती..’’

भाषांतर -असिफ बागवान

 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A journey of mrunali sarabhai
First published on: 06-02-2016 at 02:04 IST