‘बिब्लिओथेक’ म्हणजे ‘लायब्ररी’ हे जेव्हा समजलं तेव्हा अशा पाटय़ा कुठे दिसतात हे पाहण्याचा छंदच लागला. पॅरिसचं मुख्य सुसज्ज ग्रंथालय. प्रत्येकाला कॉम्प्युटर. विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, भाषेचे अभ्यासक.. सगळ्या खोल्या माणसांनी गजबजलेल्या. बाहेरच्या प्रशस्त मार्गिकेमध्येही बसायला कोच. फ्रेंच साहित्य, धर्म, इतिहास इत्यादींवरची हजारो पुस्तकं खुणावत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

‘बिब्लिओथेक’ हा शब्द फ्रेंच आहे. ज्यांना फ्रेंच समजतं, त्यांना याचा अर्थ लगेच कळेल. फ्रान्समध्ये असताना जाईन तिथे ‘बिब्लिओथेक’ अशा पाटय़ा मी वाचल्या आणि त्याबद्दल माझ्या फ्रेंच मैत्रिणींना विचारायचं ठरवलं. थेक या शब्दानं मला चकवलं होतं. मला वाटलं, पॅरिस (फ्रेंच उच्चार पारी) तर नृत्यासाठी, मोकळ्या वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून मी ‘बिब्लिओथेक’कडे दुर्लक्ष केलं; पण एकदा अर्थ कळल्यावर तिथे जायची ओढ निर्माण झाली.
‘बिब्लिओथेक’ हा शब्द ‘बिब्लिओग्राफी’शी (एखाद्या विषयावरील विशिष्ट पुस्तकांची यादी) संबंध दाखवणारा आहे. ‘बिब्लिओ’ शब्दाला ‘मोनिआ पोल’ (पुस्तकविक्रेता) असे शब्द जोडले, की ते सर्व पुस्तकाच्या संदर्भातले असतात. ‘बिब्लिओ’ हा मूळ शब्द इंग्रजी. त्याला ‘थेक’ शब्द जोडून ‘बिब्लिओथेक’ म्हणजे वाचनालय, ग्रंथालय असा अर्थ निर्माण केला गेला. ‘बिब्लिओथेक’ म्हणजे ‘लायब्ररी’ हे जेव्हा समजलं तेव्हा अशा पाटय़ा कुठे दिसतात हे पाहण्याचा छंदच लागला आणि मी माझी पॅरिसमधली मैत्रीण ख्रिस्तीन हिला म्हटलं, पॅरिसचं मुख्य ग्रंथालय पाहायचं आहे. ख्रिस्तीनच्या घरातही बैठकीच्या खोलीपासून टॉयलेट-बाथरूमपर्यंत पुस्तकंच पुस्तकं होती. ती भारतात येऊन गेल्यानं भारताबद्दलच्या इंग्रजी पुस्तकांचा भरणा खूप होता. अगदी आपल्या बॉलीवूडवरचीही पुस्तकं होती.
मग पॅरिसच्या नकाशावरून राष्ट्रीय वाचनालय शोधलं. मेट्रो आणि बस अशा दोन्ही मार्गानी तिथे जाता येतं. आम्ही बसने गेलो. स्टॉपवर उतरलो आणि मी चकित झाले. समोर आपल्या एशियाटिक लायब्ररीसारख्या रस्त्यापासून वरपर्यंत पायऱ्या होत्या. वरती गेल्यावर लक्षात आलं, ते मुख्य प्रवेशद्वार नव्हतं. ख्रिस्तीनही गोंधळून गेली. समोर १२ मजल्यांच्या चार गगनचुंबी इमारती होत्या. कुठे जावं ते तिलाही क्षणभर कळलं नाही; पण एका सरकत्या पण खाली उतरणाऱ्या जिन्यानं गेलो आणि इमारतीखाली फिरत राहिलो. दुपारचा एक वाजला होता. पाचनंतर लायब्ररीत मोफत प्रवेश होता. आम्हाला तर अजून बऱ्याच ठिकाणी जायचं होतं. मग लगबगीनं वाचनालय शोधलं. तिथे प्रत्येक खोलीच्या दारातून आत डोकावलो. सुसज्ज ग्रंथालय. प्रत्येकाला कॉम्प्युटर. विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, भाषेचे अभ्यासक.. सगळ्या खोल्या माणसांनी गजबजलेल्या. बाहेरच्या प्रशस्त मार्गिकेमध्ये बसायला सुंदर कोच होते. तिथेही विद्यार्थी-मार्गदर्शक यांच्या आपसात चर्चा चालू होत्या. मार्गिकेत छतापासून खालपर्यंत उभे जाड पडदे. त्यावर या मजल्यावर कोणत्या प्रकारची पुस्तकं आहेत याची माहिती होती. एका इमारतीत २२० खोल्या होत्या. फ्रेंच साहित्य, धर्म, इतिहास इत्यादींवरची हजारो पुस्तकं खुणावत होती.
इतक्यात माझं लक्ष इमारतीच्या बाहेर गेलं आणि मी उडालेच. समोर इमारतीला स्पर्श करणारं जंगल होतं. वाचनालयाबाहेर, उत्तुंग आधुनिक इमारतींच्या बाहेर जंगल. काही कळेना. मग ख्रिस्तीन म्हणाली, ‘‘इथे या नॅशनल लायब्ररीसाठी जागा घेतली तेव्हा दाट जंगल या भागात होतं. त्याचा काही भाग या इमारतींच्या मधोमध राखलेला आहे.’’ काय सुंदर दृश्य होतं ते. ज्या कागदावर पुस्तकं छापली जातात, त्यांचे पूर्वज असे झाडांच्या रूपात दिमाखात उभे होते, लक्ष वेधून घेत होते. मी त्या वृक्षांकडे बघतच उभी राहिले. ख्रिस्तीनने मला हलवलं. आमच्या ग्रुपला नॅशनल असेंब्ली (पॅरिसची लोकसभा) पाहायला जायचं होतं. तिथेही मोठी ‘बिब्लिओथेक’ आहे असं समजलं होतं. लोकसभा इमारतीबाहेर किंवा आत कुठेही पोलीस नाहीत, छुपे कॅमेरे असावेत. संपूर्ण इमारत आम्हाला दाखवली गेली. प्रत्येक दालनात सुंदर दिव्यांची झुंबरं, उत्तमोत्तम भव्य आकाराची पेंटिंग्ज, पुतळे असं डोळे दिपणारं दृश्य. मोठय़ा तावदानांच्या खिडकीतून दिसणारी बाहेरची हिरव्या रंगाचा घुंगट घेतलेली फुलांच्या झाडांनी उमललेली बाग. प्रदर्शनासाठी दालन, उत्तम थिएटर. इथे आम्हाला पॅरिसबद्दल, नॅशनल असेंब्लीबद्दल एक उत्तम प्रकारे तयार केलेली फिल्म दाखवली गेली.
पॅरिसमधून कुठल्याही भागातून इथे असेंब्लीमध्ये पोहोचण्यासाठी बारा मेट्रोलाइन्स, बसेसचे ९३ रूट आहेत. गिफ्ट शॉप, पुस्तकाचं दुकान. प्रत्येक दालनांमध्ये बसण्याची उत्तम सोय आणि बिब्लिओथेक. एखाद्या खासदाराने जर निमंत्रण दिलं, तर ५० लोकांना एका वेळी ही लोकसभा पाहता येते आणि मार्गदर्शकही दिला जातो. (इंग्रजीतून माहिती) सगळी दालनं फिरल्यावर नॅशनल असेंब्लीची बिब्लिओथेक दाखवली गेली. इथेही ग्रंथालयाच्या प्रशस्त आणि भव्य दरवाजात उभं राहूनच आतली पुस्तकं न्याहाळता आली. हे ग्रंथालय खासदार व त्यांच्या साहाय्यकांसाठीच संदर्भ पुरवायला उपयुक्त आहे, अन्य वाचकांसाठी नाही. इथेही १६ व्या शतकापासूनची कापडी आणि चामडय़ाच्या बांधणीची हजारो पुस्तकं, हस्तलिखितं यांनी आतली दालनं गच्च भरलेली होती. इथे जवळजवळ सात लाख व्हॉल्यूम आहेत. म्हणजे वेगवेगळ्या विषयांची दोन हजार जुनी हस्तलिखितं आहेत. फ्रान्समधल्या वृत्तपत्राच्या महत्त्वाच्या विषयावरचे २००/३०० व्हॉल्यूम्स आहेत. असेब्लीत गाजलेल्या चर्चा, महत्त्वाचे निर्णय यांच्या फायली नीट पुस्तकाच्या आकारात जतन केलेल्या आहेत. असे किती तरी प्रकारचे दस्तऐवज.
पॅरिसमध्ये आम्हाला व्हिजिटर्स गॅलरीतून त्यांच्या असेब्लीचं काम पाहता आलं. प्रश्नोत्तराचा तास चालू होता. दृश्य मोठं विलोभनीय होतं. जुन्या राजवाडय़ाचं भव्य दालन असावं अशी रचना होती. तिथेही आपल्याप्रमाणे लोकसभेत स्त्रियांची संख्या नगण्य होती. आपल्याप्रमाणेच खासदारांच्या अनेक खुच्र्या रिकाम्या होत्या.
पॅरिसहून टीजीव्ही या वेगवान रेल्वेने ब्रिटनी या प्रांतातल्या सांब्रियो (सेंट ब्युरो) या गावाला आम्ही गेलो. ५०० कि.मी. अंतर गाडीने तीन तासांमध्ये कापलं. सांब्रियोला स्टेशनवर डेनिस भेटली. ती एका बिब्लिओथेकच्या संगणकीकरणाचं काम करते. त्यामुळे त्या लायब्ररीत जायचं माझं नक्की झालं. सांब्रियो या शहराच्या आसपास असलेल्या दिनान, ट्रिगर इत्यादी अनेक छोटय़ा शहरांत, खेडय़ांत आमचे पूर्वनियोजित कार्यक्रम ठरलेले होते. त्या त्या गावात डेनिस मला तिथल्या लायब्ररीत घेऊन जायची आणि मी तिथली दृश्यं पाहून थक्क व्हायची.
प्रत्येक लायब्ररीत संगणकयुक्त पुस्तकं ग्रंथपालाकडून घेण्यासाठी वाचकांच्या लांबच लांब रांगा. लहान मुलं त्यांच्या विभागात पुस्तकात रमलेली. वाचनालयाला लागूनच पाहिजे ते संगीत ऐकण्याची सुविधा. संदर्भ, संशोधनाचे वेगळे विभाग. वाचनालयाला लागूनच थिएटर अ‍ॅक्टिव्हिटी, संगीताचे वर्ग असं सगळं साहित्य-संगीतात रमणाऱ्यांना मन तृप्त करणारं वातावरण. खेडं असो वा शहर सर्वत्र बिब्लिओथेकचं हेच दृश्य. एका कनिष्ठ महाविद्यालयाची लायब्ररी पाहायला जायचं होतं; पण वाटेत डेनिसची लायब्ररी होती म्हणून लोहान्सबरोबर (मूळ नाव लॉरेन्स) तिकडे गेले. डेनिसची लायब्ररी ही चर्चची आहे. ती एकटीच त्या भव्य इमारतीत काम करते. आठवडय़ातून दोनदा वाचक येतात. लायब्ररीला जोडूनच चर्च आहे; पण नेहमी मोठी चर्च पाहतो तसं नाही. त्या इमारतीचा एक भाग म्हणजे चर्च. नेहमीपेक्षा वेगळं. डेनिसने लायब्ररी दाखवली. पुन्हा इथे १६व्या शतकापासूनची पुस्तकं आहेत, जास्त करून धर्मावरची. तिने एक खास पुस्तक मला दाखवायला बाजूला काढलं होतं, ते रामकृष्ण परमहंसांवरचं पुस्तक फ्रेंचमध्ये होतं. मी त्यावरचा फोटो पाहता क्षणीच ओळखलं आणि तिला परमहंसांविषयी सांगितलं. प्रत्येक ठिकाणी १६व्या शतकातली पुस्तकं. त्या आधीची लढाईत किंवा क्रांतीच्या काळात नष्ट झाली असावीत. मला मात्र मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधु’ आणि ज्ञानदेवांची ‘ज्ञानेश्वरी’ या १२व्या शतकातल्या पुस्तकांचा अभिमान वाटला. ज्ञानेश्वरी ग्रंथ कुलूपबंद नाही, तर आजही आबालवृद्धांपासून तो वाचला जातोय, अभ्यासला जातोय, हे आठवलं.
मी जिच्या घरात राहत होते, ती लोहान्स, कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी-बारावीला फ्रेंच शिकवते. तिच्या महाविद्यालयात भर पावसात मी लायब्ररी पाहायला गेले. कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत, अत्याधुनिक लायब्ररी सुसज्ज. आम्ही गेलो तेव्हा मुलं परीक्षा जवळ आली म्हणून गटागटानं अभ्यास करीत होती. प्रत्येकाच्या टेबलावर संगणक होताच. पुस्तकाच्या विभागात धर्म, साहित्य, समाज, विज्ञान इत्यादी पुस्तकं भरपूर होती. इतकंच काय, फ्रान्समध्ये प्रसिद्ध होणारी सर्व मासिकं, साप्ताहिकंसुद्धा वृत्तपत्र विभागात न्यूजपेपरबरोबर ठेवलेली होती. आम्ही गेलो तेव्हा लायब्ररीमध्येच असलेल्या ऑडिटोरियममध्ये मुलांना शरीरशास्त्रावरची फिल्म दाखवली जात होती. अ‍ॅनाटॉमीचा (अल्लं३े८) विषय नीट समजावा म्हणून फिल्म दाखवतो, असं लोहान्स म्हणाली. नंतर ती मला कॉलेजमधल्या इंग्रजी विभागाकडे घेऊन गेली. २६ वर्षांपूवी फ्रान्समध्ये गेले होते तेव्हा इंग्रजी विषय शाळांमध्ये नव्हताच. आता पहिलीपासून एक विषय म्हणून इंग्रजी शिकवलं जातं आणि हा विभाग ऑडिओ, व्हिडीओ, कॉम्प्युटर यांच्या साहाय्याने भाषा शिकवायला चालवला जातो. मी मनाशी ठरवूनच टाकलं होतं. त्यांचा देश पाहताना आणि शाळा-महाविद्यालयं पाहताना आपल्या इथली मुलं व शाळांची परिस्थिती आठवून मन विषण्ण झालंच. इतकी साधनसामग्री आमच्या मुलांना मिळाली तर! हा विचार आलाच; परंतु संपूर्ण फ्रान्समध्ये एकही इंग्रजी माध्यमाची शाळा नाही. केजी ते विद्यापीठ. डॉक्टर, इंजिनीअर, वकील वगैरे काहीही शिकायचं असलं तरी माध्यम फ्रेंच, असं लोहान्स म्हणाली. बिब्लिओथेकच्या शोधात मी अशा शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचले. साांब्रियोलाच ब्रिटनी (ब्रिटनी हा प्रांत आहेच) ही भाषा शिकवणारी एकमेव शाळा आहे. ही भाषा फ्रेंचचाच एक भाग आहे. त्या भाषेतली पुस्तकंही पाहायला मिळाली. समृद्ध भाषा, त्यात लिहिली गेलेली पुस्तकं आणि सर्व प्रकारची पुस्तकं एकाच ठिकाणी वाचायला मिळतील, असे हे ‘बिब्लिओथेक’ आपल्या भाषेत ग्रंथालय. त्या वेळी मी ग्रंथालयाशी संलग्न असं काम करीत असल्याने या ‘बिब्लिओथेक’ने माझ्यावर जणू मंत्रच टाकला.
madhuvanti.sapre@yahoo.com

 

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bibliotheek and libraries in paris
First published on: 20-02-2016 at 01:20 IST